India

गोवंडीमध्ये क्रांतिकारी पक्ष व समाजवादी कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष

समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असल्याचा क्रांतिकारी कामगार पक्षाचा आरोप.

Credit : इंडी जर्नल

मुंबई: गोवंडीमधील नगरसेविका शायरा खान यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयाजवळ गेले असता क्रांतिकारी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाणीचा सामना करावा लागला. स्थानिक आमदार आणि नगरसेवकांच्या समाजवादी पक्षाकडून ही मारहाण झाली असल्याचा आरोप क्रांतिकारी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. समाजवादी पक्षाच्या फहाद आझमी यांनी हे आरोप फेटाळत हा प्रसंग क्रांतिकारी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक लोकांमध्ये घडल्याचं म्हटलं आहे. क्रांतिकारी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आता शिवाजीनगर पोलीस स्थानकात तक्रार करत आहेत.

“गोवंडीच्या रफिक नगर भागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या काही नागरिकांना तुंबलेले नाले, वाहणारी गटारं, साचलेल्या कचऱ्याचा सामना करावा लागतोय. अत्यंत छोट्या गल्ल्या आणि त्यातल्या छोट्या गटारींमध्ये कचरा जमा झाल्यानं पाणी वाहत नसून गटारी तुंबल्या आहेत. यासंबंधी रहिवाशांसोबत ५ फेब्रुवारी रोजी मीटिंग घेतल्यानंतर आम्ही स्थानिक नगरसेविकांना आणि एम. पूर्व. विभागातील संबंधीत अधिकाऱ्यांना भेटून याविषयी ताकीद देण्याचं ठरवलं होतं,” बिट्टू म्हणाले.

त्यानुसार २०-३० नागरिक व ४-५ कार्यकर्ते आज (सोमवारी) नगरसेविका शायरा खान यांच्या शिवाजीनगरमधील कार्यालयावर गेल्याचं बिट्टू सांगतात. “तिथं आम्ही साधारण दीड तास वाट बघूनही त्या आल्या नाहीत. त्यांना आम्ही येणार याही कल्पनाही दिली होती आणि आम्ही त्यांना वारंवार फोनदेखील करत होतो. मात्र त्या आजूबाजूच्या भागात काही उदघाटनं करत असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. बऱ्याच वेळानं सगळे परत जायला निघत असताना नगरसेविका शायरा फहाद आझमी यांचे पती फहाद आझमी आणि इतर स्थानिक गुंडांनी येऊन कार्यकर्त्यांना मारहाण केली.”

यावेळी कार्यकर्ते अविनाश, बबन, शशांक, आशय तसंच त्यांच्यासोबत असलेल्या महिला कार्यकर्त्या डॉ. पूजा यांनादेखील मारहाण करून त्यांचे कपडेही फाडण्यात आल्याचा आरोप क्रांतिकारी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

 

फोटो: भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष/फेसबुक

 

मात्र क्रांतिकारी कामगार पक्षाचे कार्यकर्ते कार्यालयाजवळ नाही तर घराजवळ आले होते आणि त्यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत नाही तर स्थानिक लोकांसोबत हा प्रसंग घडल्याचं समाजवादी पक्षाचे नेते आणि शायरा खान यांचे पती फहाद आझमी यांचं म्हणणं आहे. 

क्रांतिकारी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा ‘एनजीओ’वाले असा उल्लेख करत आझमी म्हणाले, “मला आधी माहित नव्हतं की ‘एनजीओ’वाले आलेत, मला वाटलं रफिक नगरमधील लोक आलेत. त्यांना मी कार्यालयात वाट बघायला सांगितलं असूनदेखील ते घराजवळ बसले. काही वेळानं ते धरणे आंदोलनावर बसले आणि आमच्याविरुद्ध मुर्दाबादच्या घोषणा देऊ लागले. आम्हाला स्थानिकांचा फोन आला की बाहेरचे लोक कॉलनीमध्ये येऊन दंगा करत आहेत. त्यामधून सुरु झालेल्या बाचाबाचीत एका स्थानिकाला इजा झाली आणि त्यानंतर स्थानिक आणि त्यांच्यामध्ये मारामारी झाली.”

गेलं दीड वर्ष मुंबई महानगरपालिकेची कारवाई प्रशासक पाहत असल्यानं नगरसेवक काय करू शकतात, असा प्रश्न यावेळी आझमी यांनी विचारला.

मात्र आझम यांचे दावे खोटे असून स्थानिकांनी नाही तर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच मारहाण केल्याचं बिट्टू यांनी सांगितलं.

“समाजवादी पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली. स्वतः फहाद आझमीदेखील तिथं होते. आणि रफिक नगरचे लोकदेखील तिथं होते. या सर्व घटनेचे व्हिडीओ आमच्याकडे आहेत. यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस स्थानकात समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध आम्ही तक्रार दाखल करत आहोत,” बिट्टू म्हणाले.