Americas

जी-७ परिषद : दुध दर आंदोलन इथेही

पाश्चिमात्य शक्तिंचा अंतर्गत व्यापार संघर्ष

Credit : Reuters

आपल्याकडेही दुधाचे भाव कमी झाले की शेतकरी आंदोलन करतात. दुध रस्त्यावर फेकून सरकारचा लोकशाही मार्गाने निषेध होतो. अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षांनी मात्र शेतकरी हितासाठी, दुधाच्या दरासाठी चक्क दुस-या देशासोबत भांडण उकरुन काढलं आहे. 

अमेरिका आणि शेजारी राष्ट्रांतील आयात-निर्यात दरवाढीवरुन जगाचे राजकारण तापलेले असतानाच जी-७ राष्ट्रांची परिषद क्वेबेक सिटी येथे शुक्रवारी पार पडली. यावेळी जी-७ भेटीत डोनाल्ड ट्रंप यांनी आत्तापर्यंत कॅनडाने अमेरिकेच्या दुग्धउत्पादनावर भरमसाठ कर लावून आमच्या शेतक-यांचं आणि देशाचं कसं नुकसान केलं आहे हे रडगाणं गाऊन दाखवलं. 

या परिषदेतल्या जाहिर नाराजीला अगोदरच्या उखळ्या पाखळ्यांची किनार होती. तसा हा वर्षानुवर्षांचा ताण आहे. पॅरिस क्लायमेट अकॅार्ड आणि इराण अणुकरारातून अमरेकिने ट्रम्पच्या नेतृत्वात केलेल्या काडीमोडाने या ताणात भर पडली होतीच. पण एकमेकांच्या चढाओढीत व्यापारी जिन्नसावर करवाढ करुन संघर्षाला तोंड फुटत गेले आहे. 

अमेरिकेने कॅनडाच्या लोह आणि अॅल्युमिनियम आयातीवर भरमसाठ कर लावल्याबद्दल आपण जी-७ भेटीत आवाज उठवणार पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी वक्तव्य केले होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूल मॅक्रॅान यांनीही अमेरिकेच्या या आडमुठेपणाचा सगळ्यानांच तोटा होणार आहे असं एका संयुक्त पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. अमेरिकेतल्या रोजगार आणि कामगारांनाही या भांडणांची झळ बसणार आहे हे मॅक्रॅान यांना सुचवायचं होतं. 

एवढं सगळं झाल्यावर शांत बसतील ते ट्रंप कसले. ट्रूडो आणि मॅक्रॅान यांनी लोखंड, अॅल्युमिनियम असे विषय हाती घेताच, ट्रंप यांनी दुधाच्या विषयाला हात घातला. 'अमेरिकेच्या कृषिमाल आणि दुधावर सुमारे ३०० टक्क्यांपर्यंत आयातकर लावून आत्तापर्यंत कॅनडाने अमेरिका आणि आमच्या शेतक-यांची लूट केली आहे', अशा आशयाच्या ट्विटच्या मालिकाच ट्रंप यांनी चालवल्या. 

एकमेकांवर कुरघोडी करत जागतिक व्यापार संघटनेतला विकसनशील राष्ट्र आणि विकसनशील राष्ट्र यांच्यातला संघर्ष सर्वश्रुत आहे. विकसनशील राष्ट्रांनी शेतक-यांना द्यायच्या सबसिडीज याच्या नियमनावरुन आक्षेप नोंदवले जातात. भारताच्या अन्नसुरक्षा कायद्याच्या वेळेसही जागतिक व्यापार संघटनेत हा विषय चर्चेत होता.

पण विकसीत देशांमधला हा व्यापारी संघर्ष वेगळ्या पातळीवरला आहे. ट्रम्प यांच्या येण्याने अमेरिकेच्या व्यापार धोरणात कमालीचे बदल झाले आहेत. जागतिक व्यापार संघटनेने घालून दिलेल्या नियम अटींच्या अधीन राहून मुक्त व्यापार संकल्पनेला बळ देण हे ट्रंप यांच्या अगोदरच्या  नेतृत्वाचे  व्यापारधोरण होते. त्याची जागा सध्या अधिक आक्रमक , हेकेखोर धोरण घेताना दिसत आहे. त्याचबरोबर अमेरिकेचं आत्तापर्यंत कसं शोषण झालं आहे हा नवा डोनाल्ड रागही त्यात आळवला जात आहे.

जी-७ समूहात कॅनडा, फ्रान्स, इटली, जपान, जर्मनी अमेरिका आणि ब्रिटनचा सहभाग आहे. त्यात अमेरिका एकटेपणाने तुटक वागू लागली आहे. फ्रान्सच्या अर्थमंत्र्यांनी नुकतेच एक विधान केले असून त्यात ते म्हणतात, “ अमेरिकेचं वागणं पाहता, उद्या जी-७ हा समूह जी-६ म्हणूनही ओळखला गेला तर नवल वाटू नये.”

याच काळातलं मॅक्रान यांचं ट्विटही महत्वाचं आहे, “अमेरिका वगळता आम्ही सहा जण एकत्र काम करु शकतो. त्याने आम्हालाही आणि अमेरिकेलाही फार फरक पडेल असं वाटत नाही.”

यावेळी निमित्त अमेरिकेतल्या  शेतमालाचं आणि शेतक-यांच्या हिताचं होतं हे डोनाल्ड ट्रंप यांच्या बोलण्याच्या केंद्रस्थानी होतं. कदाचित हा मुद्दा इथेच संपू मॅक्रॅान, ट्रूडो मिळतं जुळतं घेतीलही. पण काही जाणकारांच्या मते ट्रंपच्या नेतृत्वात अमेरिकेने सोबत्यांशी तुटक वागत आपलं एकटं घोडं दामटून उत्तर कोरियाला अन मध्य पूर्व अशियावर लक्ष केंद्रित करणं ही नव्या राजकारणाची नांदी आहे.