Quick Reads

ओम दर-ब-दर ची रंगभूमी: दिग्दर्शक कमल स्वरूप यांची मुलाखत

सिनेकर्मी कमल स्वरूप यांच्यासोबतच्या दीर्घ संवादाचं शब्दांकन.

Credit : वैभव वाळुंज

ओम दर-ब-दर आणि रंगभूमी अशा सिनेमांचे दिग्दर्शक, गांधी सारख्या अनेक चित्रपटांच्या निर्मिती प्रक्रियेचा भाग असणारे कमल स्वरूप वास्तव आणि अमूर्त या दोहोंचा अनुभव देणारे सिनेकर्मी आहेत. ट्रेसिंग फाळके या पुस्तकाची निर्मिती असो वा डॉक्युमेंट्रीद्वारे नव्या शक्यता उलगडू बघणं, इस्त्रोसोबत प्रकल्प असोत की २०१४ मधल्या मोदी-केजरीवाल निवडणुकीवर भाष्य - सर्वच कामांत कमल स्वरूप यांनी आपल्या वेगळेपणाची छाप पाडली. आर. व्ही. रमणी यांच्या कार्यशाळेदरम्यान कमल स्वरूप यांच्याशी दीर्घ संवाद करता आला. त्याचं शब्दांकन.

 

तुमच्या चित्रपटांविषयी तसंच तुम्ही केलेल्या कामांविषयी नेहमी सातत्यानं बोललं जातं. त्याच्या थियरिज मांडल्या जातात. या विषयी तुम्हाला काय वाटतं?

जेव्हा लोक मला काहीतरी एक संज्ञा देऊन 'हा असा असा आहे' म्हणतात तेव्हा त्रास होतो. मी माझ्या कामाला लोकांसारखा वस्तूकरण करून साचेबंद बघत नाही. मला वाटतं नवं काही करायचं असेल फक्त माहितीपट आणि डॉक्युमेंट्री बनवणं यातच काही शक्यता असू शकतील. एखादी रोजची घटना पुन्हा पुन्हा शूट करत राहणं आणि त्या व्यक्तीचं जीवन जगून बघणं हे एखाद्या कल्पनातीत गोष्टीपेक्षा जास्त चांगली कलाकृती बनवू शकेल. म्हणजे शूटिंग किंवा रेकॉर्डिंग सुरु असताना नट ओळखून असतो की दिग्दर्शक म्हणून तुमच्या डोक्यात काय सुरूय. ते दोघंही, नट आणि दिग्दर्शक दोघंही एकमेकांकडं परस्परांची शिकार असल्यासारखं बघत असतात. ते एकमेकांपासून काहीतरी शोषत असतात आणि म्हणून पडद्यावर एक भास तयार होत असतो. डॉक्युमेंट्री या बाबतीत सरस ठरते.

 एक उदाहरण देतो. बिरजू महाराज आणि कुमार यांच्यात घडणारा संवाद हा शिकण्याचा भाग होता. महाराज त्या दिवशी तल्लीन होऊन एखाद्या मोरासारखं नाचत होते. कुमार तेव्हा रेकॉर्ड करत होते. अचानक महाराज एका क्षणाला थांबले आणि त्या वेळी नट आणि दिग्दर्शकाकडून एकमेकांशी होणारा संवाद अनुभवता आला. तो जादुई अनुभव होता, एखाद्या जादूगारानं प्रेक्षकांना खिळवावं तसं ते जमून आलं.

 

पुण्यात होतात त्या काळात तुम्ही 'घाशीराम कोतवाल'चा भाग होतात. त्याविषयी अजून काही सांगू शकाल?

तो प्रकल्प जास्त गंभीर नव्हता आणि त्यातल्या त्यात कमर्शियल सुद्धा नसल्यानं ती फिल्म बनवताना घडलेल्या गोष्टींमुळं माझं करियर डागाळलं गेलं. माझ्याविषयी अनेक गैरसमज पसरले की मी विश्वासपात्र नाही आणि एक नकारात्मक प्रतिमा तयार झाली. त्यानंतर मी 'फाळके' या प्रकल्पावर काम केलं. रंगभूमी प्रकल्पातही मला फाळके यांच्यावर सविस्तर वेळ घालवता आला. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मधल्या काही लोकांनाच ती फिल्म आवडली. मग त्या फिल्मची केवळ एकच कॉपी उरली होती. काही लोकांनी त्याच्या सीडी आणि डीव्हीडी बनवायला सुरुवात केली. पण काही लोकांना ती फिल्म अस्तित्वात आहे हेही मान्य होण्यासारखं नव्हतं. लोकं अशी फिल्मच नाहीये असंही सांगायचे. माझ्यावर कर्ज होतं, नॅशनल फिल्म डिव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचंही कर्ज होतंच. त्यामुळं फिल्म बनवणाऱ्या लोकांमध्ये माझी चर्चा चांगल्या नावानं व्हायची नाही. खाजगी आयुष्यातही त्याचा फरक पडला.

 

 

कमल स्वरूप यांची फोटोग्राफी

 

तुमच्या फोटोग्राफीविषयी काही सांगाल का ?

मी माझ्या कामात रूढ दृष्टिकोन बदलण्याचे प्रयत्न केले. आणि तोडायचेही. त्यामुळं मी एखाद्या माणसाची बॅकस्टोरी जाणून मग त्यावर काम करणं मला गरजेचं वाटत नाही. आम्ही जातो आणि डॉक्युमेंट्री शूट करतो. अजून जास्त काही करण्याचा सोस त्यात नसतो. कथात्मक काही रचणं हे त्रासदायक आहे, गवंड्यानं काही उभारावं इतकं ते शारीरिकदृष्ट्या थकवणारं आहे. माझ्या स्वभावाला डॉक्युमेंट्री हाच प्रकार रुचतो असं मला वाटतं. सध्या काही चित्रकार मला त्यासाठी मदत करतायत.

 

आवाजाच्या बाबतीत काम करण्याची तुमची काय पद्धत असते?

मी दृश्यांवर जास्त भर देतो आणि त्या अनुषंगानं आवाजाचा विचार करतो. पण लहानसहान आवाजांवर माझं चांगलं लक्ष असतं याचं कारण म्हणजे आवाज फुकट असतात. त्याला पैसे लागत नाहीत. आजूबाजूचे आवाज जमवत चला आणि हवे तिथं वापरून टाका, त्या आवाजांवर जीव जडेल तुमचा. ते काम करतात. आवाज आणि प्रतिमांची स्थित्यंतरं ही मोंताजेस सारखी असतात. पारंपरिक फ्रेम्समध्ये आवाज दृश्यावर वरचढ जाऊ बघतो. 'जे कट्स' आता प्रमाणभूत पद्धत बनलीय. मला स्वतःला डॉक्युमेंट्रीज् आवाजाला जास्त न्याय देतात असं वाटतं.

 

समाजात राहून, त्यातही भारतासारख्या गोंधळाच्या वातावरणात राहून दुसऱ्यांविषयी पूर्वग्रह न बाळगणं, राठ मतं बनवून त्यांना वजा न करणं का गरजेचं आहे?

मला या गोष्टी करायला वेळच मिळाला नाही असं मला वाटतं. माझं रोजचं जगणंच असं आहे. मी कधी खोली आवरत नाही तर! उठतो, जेवतो, झोपतो, वाचतो, काही रेकॉर्ड करतो, कुणाला भेटत नाही न बोलत नाही. जास्त लोकांना मी कधी भेटतच नाही.

 

तुम्ही एका ठिकाणी म्हणाला होतात, 'जर एका रेषेत धावणाऱ्या कथेला तुम्ही वातानुकूलन न करता मोकळं सोडलंत तर त्यात काहीच उरत नाही.' आपण विचार करतो ते सगळेच विचार कुठून ना कुठून प्रभावित झालेले आणि कृत्रिमतेतून प्रसवलेले असतात का?

याबाबत रमणी म्हणतो ते मला पटतं - 'लोकांच्या सूचना तुमच्या कामावर परिणाम करतात.' मला वाचणारा आणि बोलणारा माणूस व्हायला आवडेल, पण आता मी कोण आहे याची एक चव माझ्या डोक्यात राहून गेली आहे. मी करतो ते आवडतं मला. एक चित्रपट आठवला मला या प्रश्नावरून, 'इन सर्च ऑफ स्टोरी'. त्यात एक बेवडा माणूस बारमध्ये जाऊन दारू पिऊन एक स्टोरी शोधण्याच्या प्रयत्नात असतो, कारण एका गुंडानं त्याला कंत्राट दिलेलं असतं. त्यासाठी तो लोकांशी बोलून त्यात तुटक तुटक गोष्टी टाकत असतो. शेवटी स्क्रिप्ट तयार होते पण ती गचाळच राहते. शेवटी तो गुंड स्क्रिप्ट शोधायला बेवड्याच्या घरी माणसं पाठवतो असं कथानक आहे. माझ्या मते गोष्ट अशीच असते. ती एका दुसऱ्या गोष्टीत गुंतलेली असते आणि या गोष्टी कधीच संपत नाहीत. आपलं रोजचं आयुष्य असंच असतं की - एका कामात लक्ष घालून तेवढंच केलंत तर ते कधी संपायचं नाही, पण आपण ते सोडून दुसऱ्या कामाकडं जातो. अशा गोष्टी एकामागून एक सुरु असतात. त्यांचा माणसावर परिणाम होतो. माझ्या गोष्टी सांगण्यावरही मुंबईनं असाच परिणाम केला आहे. मुंबई शहरात अशा गोष्टीत गुंतलेल्या गोष्टी शोधायचा मी प्रयत्न केला होता. आपल्याकडं कथासरितसागर म्हणून सोमदेव भटानं लिहिलेलं एक पुस्तक आहे बघा, त्यातही हीच कल्पना आहे. जोनास (युनस) मिकस यांच्या दीर्घ लॉन्ग टेक सारखं ते परिणाम करतं.

गोष्टी अशा सुट्या येत नाहीत, त्या एकदमच येतात. त्यामुळं प्रभाव असतोच. तो एक प्रवास असतो, एक गंतव्य ठिकाण नसतं. त्यामुळं खरं सत्य असं कुणालाच सापडत नाही असं मला वाटतं. खऱ्या म्हणजे अगदी बीजगणितासारख्या खऱ्या सत्याला आपण पोहचू असं मला वाटत नाही. त्या समीकरणात एक x किंमत काढण्याचा प्रयत्न करत असतो. त्या x ची किंमत शोधत बसणं हाच सिनेमाचा उद्योग असतो. मनोविश्लेषणात असंच काहीतरी अगम्य शोधायचा प्रयत्न असतो. त्या x ला तोंड द्यायला जाणं म्हणजेच 'ओम दर ब दर' बनवणं असतं. त्या x ला आपल्या कामात तुम्ही किंमत म्हणून वापरू शकता. आणि सत्य तसं कळालं तरी लोक त्याला सामोरं जात नाहीत, त्यापासून पळण्याकडंच सगळ्यांचा कल असतो.

 

तुम्ही मघाशी जादूचा उल्लेख केलात तसा 'ओम दर ब दर' चित्रपटात जादूचे संदर्भ येतात. ही काय गोम होती?

ती फिल्म बनवणं हीच माझ्यासाठी काळी जादू होती असं मला वाटतं. जादू करणारा जादूगार दुसऱ्यांवर जादू करत नसतो, तो स्वतःला आणि आपल्या कृतींनाच स्वतःपासून वेगळं करून लपवत असतो. गोष्टी येतात, त्या लपतात आणि गायब होतात यातून जादू या गोष्टीचं रूपक रचलं जातं. ते करणं तेव्हा मला आवडायचं. आता मी ते उद्योग करणं बंद केलं आहे. मला तशा फिल्म्स करायची आणि जादूचीही भीतीच वाटते. पण त्या वेळी माझ्या कामात मी काळी जादूच केली.

 

थोडं अजून विस्तारानं सांगू शकाल?

आता समजा, मी तुला सांगितलं - पहाटे चार वाजता स्मशानात जा, तिथं जाऊन झाडावर चढ. एक कावळा घे, त्याला ठेचून मार, त्याचे डोळे काढ. त्याचं काजळ बनव आणि तुझ्या डोळ्यात घाल. असं केल्यानं त्या क्षणापासून तू अदृश्य होशील असं मी तुला सांगितलं. आता तू हे सगळं केलंस समज. तू नाहीच होणारे अदृश्य, साधी गोष्टय. पण आता जर हे सगळं केलंस तू तर माणूस म्हणून काहीतरी बदलशीलच की तू!

 

'ओम दर ब दर' चित्रपटात बेडूक वापरलेत ते याचंच उदाहरण आहे का?

बरोबर. मी अख्ख्या पिच्चरमध्ये लय बेडकं मारली. मेडिकलमध्ये तेव्हा आतडी वगैरे दाखवायला बेडकांचं विच्छेदन केलं जायचं.  त्यामुळं बेडूक वापरला का, तर असेल. पण बेडूक हा एकमेव प्राणी आहे जो दोनदा जन्मतो. एक टॅडपोल म्हणजे बारका बेडूक म्हणून तो असतो त्यासोबतच त्याला मोठं होताना एका वेगळ्या चक्रातून जायला लागतं. आपल्याकडं द्विज असतात म्हणजे मुंज झाल्यानंतर त्याला एक माणूस म्हणून व्हॅलिडेशन येतं. त्यामुळं बेडकं फाडून मारल्यानंतरच आपल्याला काहीतरी सापडेल असं मला जाणवत होतं. त्यातून आपल्या समाज आणि जगण्याविषयी बरंच शिकायला मिळालं.

 

चित्रपट बनवणं ही गोष्ट शिकायलाच लागते का? ते शिकणं का महत्त्वाचं असतं?

आता तुमच्या चित्रपटाचा फॉर्म हा तुमच्या अनुभवांतून आणि शिकण्यातून येत असतो. तुम्ही बाकीच्यांच्या फिल्म्स बघून शिकू शकालच, त्यात काही वाईट नाही. पण त्यानंतर तुम्ही तुमचे तुम्ही असत नाही. त्यांच्या एका गटाचा भाग बनता. तुम्ही काही दिग्दर्शक आणि त्यांच्या सिनेमांना निवडता आणि त्यांच्या जवळ जाता. त्यांचा सिनेमा बघून कॉपी करणं किंवा तशीच फिल्म बनवणं शक्य आहेच. आणि त्यातून तुम्ही शिकता - नकल से ही अकल आती है - असं लोकं म्हणून गेलीत. तुम्ही प्रौढ झालात तरी एक लहान मुलाप्रमाणं मोठ्या माणसांची नक्कल करत चालायला बोलायला शिकण्यासारखं हे असतं. ते लहान मुल जसं उपजतच नक्कल करून शिकतं तसं तुम्हीही नकळत काहीतरी कॉपी करत असता. त्यामुळं सिनेमा तसाही वापरता येईलच. ती एक भाषाच आहे, आणि भाषा शिकायची असेल तर 'माझ्यामागं म्हण' सांगून नक्कल केल्याखेरीज तरणोपाय नाही.

आयुष्यात फिल्म्स करायच्या असतील तर तुम्ही करताय त्याचा अर्थ लागण्यापूर्वी पुढं सरकून नवं काहीतरी शोधत राहा. नव्या प्रतिमांच्या शोधात राहा. एका प्रतिमेत जर का तुम्ही अडकून पडलात आणि त्यातल्या अगम्य गोष्टी शोधायचा जास्त प्रयत्न केलात तर बोअर व्हाल. त्यामुळं एक प्रतिमा घ्या आणि तिला तिच्या अगम्यतेसोबत एकटं पकडून दार बंद करून टाका. तरच तुम्हाला तिच्यात काही सापडू शकेल. आपल्या सिनेमांमध्ये सेक्स आणि हिंसा या दोन गोष्टींसोबत आपली अगम्य असणारी भावना इतकी ओळखीची करून दिलीय की त्यातून आता नवं काही तयारच होत नाही. या दोन गोष्टी फक्त सिनेमातून काढून घ्या आणि बघा - हेच ओळखीचे वाटणारे सिनेमे तुम्हालाही अनोळखी वाटू लागतील.

आणि प्रतिमांमध्ये कितीतरी अनोळखी गोष्टी असतात. अर्थ दडलेले असतात. म्हणजे 'टॅडपोल से हम' गाण्यात मुलगा आपल्या लॉकेट मधून कुराण काढून ते वाचत - गात असला तर त्याचे अर्थ पांगत जातात. पात्रांनी बोललेली वाक्यंही डेव्हिड लिंचच्या सिनेमासारखी नव्या शक्यता उघडणारी असावी लागतात कारण अशा अगम्यतेत संभाषणं एका रेषेत कधीच होत नाहीत. म्हणजे बघ, धुक्यामध्ये दिसणारी आकृती ही कधीच पूर्णपणे ठळक किंवा एका साच्यात गुंतून पडलेली नसते. ठोस तरीही अगम्य असते. तसंच.

 

पण कलाकृतीत भ्रम कुठं मोडला जायला हवा? तो थांबायला नको का? म्हणजे ब्रेष्तची नाटकं मोडतात तसं?

त्याच्या डोक्यामध्येे नाटक लिहिताना त्याचा प्रेक्षक हा नाही रे वर्गातला व्यक्ती होता. एक मजूर म्हणून एखाद्याला काय वाटतं आणि त्याचा दृष्टीकोन असेल त्याप्रमाणे त्यांना नाटकं लिहिली. कामगार वर्गातील लोकांचं लोकशिक्षण घडावं असा हेतू त्यामागे होता. याउलट गोदार्दला बुर्ज्वा वर्गाला 'तुमची अख्खी लागलीय' असं म्हणायचं असायचं. त्यामुळं त्याच्या कामात हे भ्रम आपोआप गळून पडायचे. मी स्वतःला असाच एक वस्तू उडवत फिरणारा विदूषक समजतो, मी अर्थांच्या बाबत असेच खेळ करत असतो. काही जागा अशा सापडतात जिथं तुम्हाला गोष्टींचा अर्थ समजू लागतो, त्याच्याशी तुम्ही जोडले जाता आणि ती प्रतिमा तुम्हाला उमगते. आता परत संगीताचं आणि आवाजांचं म्हणशील तर काहींना त्यातही चांगले अर्थ लागतात. किशोरवयाच्या मुलांना किंवा नवाट पोरांना ते ओळखीचं वाटेलही पण मोठ्या माणसांना अर्थाच्या शोधात जायचं असतं.

 

मग तुटक निवेदनं आणि त्यातून साधलेली लय लागू पाहणाऱ्या अर्थांना तोडत जाते का?

ओमच्या बाबतीत म्हणायचं तर सुरुवातीला जी 'पापांपीपोsss' टोन ऐकू येते आणि एक दृश्य तयार होतं. ते तयार होताना फिल्मच्या शेवटी ते एकमेकांपासून विलगही होतात. त्यामुळं गती आणि स्तब्धता असं दोन्ही फिल्मचा भाग बनतो. १-२-३ - थांबा - १-२-३ - थांबा अशा पद्धतीनं तिचा प्रवाह ठेवला आहे. बेडकाच्या भोवती माझं चिंतन फिरत होतं. त्याचीच लय आणि असणं मला दिशा दाखवत होतं असं मला वाटतं. या गोष्टी लहानपणापासूनच येतात, म्हणजे तुमचं बालपण बऱ्याच गोष्टी नियंत्रित करत असतं. आता मी चित्रपटांत मृत्यू म्हणून कधीच दाखवत नाही, कारण आपण खऱ्या अर्थानं कधी मरत नसतोच.

 

पण आजूबाजूचा समाज आणि परिस्थिती यांचंही योगदान असेलच की... 

अगदीच. लोकं म्हणतात या गोष्टी आतून प्रसवत असतात, अमूर्त मनातून वगैरे. पण तुमचं अमूर्त हे बऱ्याचदा बाहेरच वसत असतं. आणि बाहेरच्या जगाची अमूर्तता तुमच्या आतल्या अमूर्त मनाहून प्रचंड मोठी असते. या बाहेरच्या अमूर्तततेला तुम्ही जोडले जाता आणि बाहेरच्या गोष्टींनी चेतन होऊन स्वतःच्या आतली अमूर्तता बाहेर व्यक्त करता. त्या गोष्टींना तुमच्या भूतकाळानं दुजोरा दिलाच पाहिजे ही काही पूर्वअट नसते. 

 

मग या साच्यातून बाहेर पडून गोष्टींकडं वेगळ्या अर्थानं कसं बघायला लागलात? विद्यार्थ्यांनी काय करायला हवं?

सर्वात पहिलं म्हणजे घरातून पळून जा -  आयुष्यात नवं पाहायचं आणि करायचं असेल, जगाकडं वेगळ्या नजरेनं बघायचं असेल तर स्थिरतेतून पळून जा. ओम दर ब दर करताना या पात्रांकडं वेगळ्या दृष्टीनं बघणं अपेक्षित होतं. त्यांना मी बोलण्यासाठी अनेक संवाद दिले होते. त्यात बरेचदा काही अर्थ नव्हता, ते मजेशीर होते, आणि त्यासंबधी कलाकारांच्या स्वतःच्या वेगळ्या कल्पना होत्या. त्यातूनच त्यांच्या बनलेल्या चित्रपटाची कथा तयार झाली. यामागं मानसशास्त्र आणि प्रेरणेचा भाग अल्पसा होता. काहीतरी जगण्यापुरतं करायचं म्हणून मी ते लिहिलं होतं. मी स्वतःच त्या प्रक्रियेत काही अडथळे रचायचो आणि त्यांच्या पलीकडं उडी मारण्याचा प्रयत्न करायचो. ती फिल्म बाबूजी या पात्राच्या धडपडीच्या आजूबाजूलाच आहे असं मला वाटतं. एका सीनमध्ये ते सायकलवरून येतात. आता हे पात्र करणाऱ्या माणसानं स्वतः सायकल कधीच चालवली नव्हती. त्यांना मी काहीही फडतूस संवाद बोलायला दिले होते. त्यामुळं त्यांचा अभिनय हा अभिनय नव्हताच. तो माणूस जे प्रयत्न करत होता तेच फक्त मी चित्रित केलं. आताच्या काळात मुख्य प्रवाहातील सिनेमात तुम्हाला यातलं काही करताही यायचं नाही.

अभिनेत्यानं आपला अभिनय पडद्यावर दाखवण्यापूर्वी स्वतःला पात्रानुरूप परफॉर्म आणि प्रोजेक्ट करून, पूर्वकथा विचारात घेऊन तयार केलेलं असतं. या ठिकाणी फक्त जगत राहण्याची सक्ती असल्यानं ती कला घडत गेली होती.

आता एका ठिकाणी मी फक्त लांब नाक असणाऱ्या माणसाच्या शोधात होतो ज्याच्या डोळ्यांची हालचाल मंदावलेली असायला हवी. ही मागणी कारण्यामागं माझ्या आयुष्याच्या अनुभवांमधली कारणं होती. शाळेत असताना एका जाडसर पोरानं विनोदी पद्धतीनं चालत येऊन माझ्या नाकावर ठोसा मारला होता. त्यामुळं माझं नाक फुटलं. घरी येऊन मी सांगितलं की माझ्या नाकावर चेंडू आदळला म्हणून. त्या वेळी मी सतत माझ्या नाकाकडं पाहत असायचो. त्यामुळं ही गोष्ट नोंदवून मी ती वापरण्याचा प्रयत्न केला. 

 

नाटकांचा आणि इतर माध्यमांचा प्रभाव तुमच्या सिनेमावर कितपत पडला?

नाटकांचा प्रभाव फारच नगण्य होता. माझ्यावर साहित्याचा आणि वाचनाचा प्रचंड प्रभाव पडल्याचं मला जाणवतं. मनोहर श्याम जोशी यांच्या लिखाणाचा चांगला प्रभाव माझ्यावर पडला. नाडीची दोनदा गाठ लागलीय असा जो सिन चित्रपटात आहे, तो सरळसरळ असाच साहित्यातून उचलून चित्रपटात घेतलाय. असे अनेक डायलॉग आणि परिच्छेद थेट साहित्यातले आहेत. मी अमेरिकी पॉप साहित्यही वाचत होतोच. त्यामुळं गुन्हेगारी आणि सेक्स यांच्याशी निगडित येणारी पिवळ्या पानांची पुस्तकं, मनोहर कहानियाँ सारखी मासिकं, स्वस्त कादंबऱ्या, पल्प फिक्शन असल्या गोष्टी वाचत होतो. छोट्या शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांचं वार्तांकन त्यात असायचं. त्यामुळं 'ओम दर-ब-दर' वर सर्वाधिक प्रभाव बातम्यांचा आणि त्यांच्या कात्रणांचा आहे.

 

 

थियोडोर रोझॅक यानं लिहिलेली फ्लिकर नावाची कादंबरी माझ्या आवडीची आहे. मॅक्स कॅसल यांच्या बी ग्रेड सिनेमांवर त्यानं लिहिलेलं मला फार भावलं. त्यात जो प्रसिद्ध न झालेला लेखक एका उदयोन्मुख दिग्दर्शकाविषयी बोलतो आहे तो म्हणजे स्पिल्सबर्ग होता. त्यामुळं अमेरिकी चित्रपट व्यवसायाचं वास्तव चित्रण त्यानं केलंय. त्याच्यासारखाच दुसरा माणूस म्हणता येईल तो म्हणजे त्यातलं ओरसन वेल्सचं पात्र. एखाद्या लिहिणाऱ्यानं स्वतःला कसं खर्च करून टाकावं याचा तो बहारदार नमुना होता. नाहीतर आपल्याइकडं लोकं काही समजून न घेता उगाचच जॅक लकां आणि इतर गोष्टी पाजळत बसतात. भारतीय परिस्थितीचं एकरूपता असणारं चित्र तो उभं करू शकला. कथा हे माहिती साचवून ठेवायचं एक डबडं असतं.

 

चित्रपटांचा खरोखर समाजावर किती प्रभाव पडतो?

चित्रपट बनवणं आणि तो लोकांना दाखवणं ही समाजात घडणारी एक रासायनिक प्रक्रिया आहे. आता इथं प्रेक्षकवर्ग बसलाय आणि इथं चित्रपट आहे असं इमॅजिन कर. हा सिनेमा तू आज बनवतो आहेस, पण हे बघणारे सगळे ३० वर्षे मागे जन्मलेले आहेत. म्हणजे आज यांना चित्रपट बघण्यापूर्वी तुला यांचा ३० वर्षांचा अंदाज घ्यायचाय. तरीही काही चित्रपट कालजयी ठरतात, काही ठरत नाहीत, त्यांच्यातून जीवनाची शक्यता बाद होते. चित्रपट हे माध्यमच असं असतं की माणसाची त्याच्याशी कधीच घट्ट जुळण बसत नाही. जर तुम्ही अजमेर शहरात राहून रॉबर्ट ब्रेसाँचे सिनेमे बघाल, तर तुमची वीण त्याच्याशी जुळणारच नाही. त्यामुळं आपल्या भोवताली असणारं द्रव्य आणि सिनेमा यांच्यात ही रासायनिक प्रक्रिया घडत असते.

 

मग तुम्ही स्वतः सिनेमा बनवताना या समाजद्रव्याचा, प्रेक्षकांचा विचार करता का?

नाही. कधीच नाही केला. मला दरवर्षी खोलीचं भाडं भरण्यापुरते पैसे मिळवायचे असायचे. अजूनही तीच स्थिती आहे. अमेरिकेतला माझा एक चांगला मित्र आहे, तो मला लिहायला-वाचायला थोडीफार मदत करतो. मी अधूनमधून पुष्कर जत्रा आणि वाराणसीत जात असतो. त्यातून वर्ष निघेल एवढे पैसे मला मिळतातच. बाकी मग कधीकधी घालवलेले पैसेही परत मिळत नाहीत.  आता मी त्याचाही जास्त विचार करत नाही, त्यामुळं प्रेक्षकांचं सोडाच. मी बरेचदा रमणीची पद्धत वापरायचा प्रयत्न करतो, पण माझ्याजवळ तेवढी कौशल्यं नाहीयेत असं मला वाटतं. चाललेल्या जिवंत जगात असणारा मजकूर शोधणं, तो वाचणं आणि दाखवणं इतकंच करूया असा माझा प्रयत्न असतो.