Opinion

आंबेडकरवाद आणि स्त्रीवाद यांत कोणतं ही द्वैत नाही, तर त्यांच्यात एकजीव असा संबंध आहे

स्त्रीवादाच्या मुद्द्यावर आपण किती गंभीर आहोत, हे तपासण्यासाठी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.

Credit : द वायर

- सचिन माळी 

 

सध्या सोशल मीडियावर स्त्रीवादाच्या अनुषंगाने जी चर्चा सुरू आहे, ही चर्चा समतेच्या चळवळीला पुढेच नेणारी आहे. प्रागतिक विचारविश्वात स्त्रीवादाच्या संदर्भात होणारी चर्चा ही, प्रमुख चर्चा म्हणून होताना दिसत नाही. स्त्रियांवर अन्याय-अत्याचार झाल्यावरच हा विषय ऐरणीवर येतो आणि पुन्हा मागे पडतो, हा माझा जवळपास दोन दशकांचा अनुभव आहे. स्त्रीवादावरील चर्चा ही दुय्यम स्थानावरच राहिलेली आहे. म्हणजे जसा शेतीचा प्रश्न, पर्यावरणाचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, बेकारीचा प्रश्न महत्वाचा आणि जीवनावश्यक आहे तसाच स्त्री प्रश्न! खरंतर भारतातील जात-वर्गीय वास्तव ध्यानात घेता स्त्रीमुक्ती हा भारतीय समाजक्रांतीच्या गाभ्यातील मुद्दा आहे! परंतु हा मुद्दा सुटा-सुटा पाहिल्याने व दुर्लक्षित राहिल्याने स्त्रीमुक्तीची एक व्यापक समज कार्यकर्त्यांमध्ये विकसितच होत नाहीये.

याचा परिणाम असा होतो की, चळवळीतील कार्यकर्त्यांमधील जेंडर डिस्कोर्सचं भान खूपच तोकडं आणि वरवरचं आहे. काहींची गुजराण तर केवळ ऐकीव माहितीवरच चाललेली असते. जातीअंताबाबतीतही यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही!

प्रागतिक चळवळीत काम करणाऱ्या पुरूषांचं लिंगभाव समता आणि एकूणच जेंडर डिस्कोर्सच्या अनुषंगाने किती प्रबोधन केले जाते? जेंडर डिस्कोर्सबाबत त्याचे भान वाढवण्यासाठी किती अभ्यासवर्ग घेतले जातात? याचा विचार साऱ्याच प्रागतिक चळवळींनी केला पाहिजे. सध्याची चर्चा जरी एका मीमवरून आणि त्यावरील एका कार्यकर्त्याच्या कमेंटमुळे जरी सुरू झालेली असली तरी हे एक सॅम्पल आहे. हे हिमनगाचे टोक आहे. 'त्या' प्रकारची कमेंट न करता ही स्वतःच्या घरी त्या अशा शेरेबाजीची रोज अंमलबजावणी करणारे पुरूष मात्र 'समतावादी' म्हणून फिरत असतातच! हे छुपेरूस्तम आपल्या बायकोला अगदी वळ उठेपर्यंत मारहाणही करत असतात. आपल्या बायकोवर, बहिणीवर संशय घेऊन नियंत्रण स्थापित करू पाहत असतात. याकडेही आपल्याला लक्ष द्यावे लागेल. 'पर्सनल इज पॉलिटिकल' हा स्त्रीवादाचा खूप महत्वाचा नारा आहे. किमान समतेच्या वाटेवरील पुरूषांशी तरी या दृष्टीकोणातून चळवळींचा संवाद आहे का? तशा संवादाची काही व्यवस्था आहे काय? या प्रश्नाचे उत्तर नाही हेच आहे. 

आणखी एक, डाव्या, समाजवादी, आंबेडकरी या सर्वच प्रागतिक पक्षांचा महिला आरक्षणाला पाठिंबा आहे. कुणी ३३% म्हणेल तर कुणी ५०% म्हणेल पण, नाही कुणीच म्हणत नाही. हे आरक्षण या व्यवस्थेने द्यावे अशी ही मागणी आहे. परंतु हेच आरक्षण ते त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वामध्ये देतात का? पुरोगामी म्हणवणाऱ्या सर्वच पक्षांच्या सेंट्रल कमिटी असोत किंवा राज्य कमिटी असोत, किती टक्के महिला नेतृत्वाच्या स्थानांवर आहेत? यावर ही एखादी श्वेतपत्रिका राहू दे पण ब्लॅकपत्रिका काढावीच लागेल कधीतरी! सुप्रसिद्ध स्त्रीवादी विचारवंत शर्मिला रेगे यांनी शीतल साठे यांना बी.ए. आणि एम.ए. पूर्ण करण्यासाठी सलग पाच वर्षे स्वतःच्या पगारातून स्कॉलरशीप दिलेली होती. त्यांच्याशी आमचा चांगला संवाद होता. त्या एकदा म्हणाल्या होत्या की, ‘डावे असोत, समाजवादी असोत, आंबेडकरवादी असोत किंवा कोणतेही प्रागतिक पक्ष असोत. त्यांना महिला नेतृत्वात नको आहेत. फक्त 'फुटसोल्जर' म्हणून पाहिजेत!’  

स्त्रियांनी नेतृत्व करण्याचा मुद्दा मागास जातींच्या बाबतीत सुद्धा लागू होतो. आपल्याला हा प्रश्न करता येईल की, पुरोगामी पक्षांच्या लीडरशीपमध्ये किती टक्के दलित,आदिवासी,ओबीसी होते? आज आहेत? जे पुरोगामी पक्ष स्त्रियांसाठी किंवा मागास जातींसाठी सत्ताधारी व्यवस्थेला जे आरक्षण मागतात, तेच आरक्षण हे पक्ष स्वतःच्या पक्ष नावाच्या व्यवस्थेत का देत नसावेत? 

पुन्हा मूळ मुद्याकडे वळूया.सोशल मीडियावर स्त्रीयांना उद्देशून कमरेखालचं बोलून त्यांना दुखावणं, त्यांना अपमानित करणं हे अत्यंत निषेधार्ह आहे. खरं तर राजकारणातील स्त्री, पत्रकार स्त्री, शाहीर स्त्री, कलावंत स्त्री, साहित्यिक स्त्री...यांच्याशी मतभेद व्यक्त करताना पुरूष कार्यकर्ते राजकीय टीका करण्यापेक्षा त्या महिलांच्या लैंगिकतेवर उतरतात. तिची टर उडवण्यासाठी तिचे बाईपण वेठीला धरतात. भारतीय पुरुषांचा हा बाई विरोधी मेंदू मिळेल त्या पद्धतीने बाईचे विद्रुपीकरण करतो. प्रतिमाभंजन करतो. राजकीय किंवा वैचारिक मतभेद आहेत म्हणून एखाद्या स्त्रीच्या प्रतिमेला छिन्न-विच्छिन्न करणे हा मेंदूतील ब्राह्मणी वल्लीच आहे! कोणत्याही स्त्रीशी कुणाचीही राजकीय असहमती असू शकते. राजकीय मतभेद असू शकतो पण म्हणून तिचा 'पाडाव' करण्यासाठी तिला 'जलील' करण्यासाठी, तिच्या आत्मसन्मानाला 'ठेच' पोहोचवण्यासाठी ब्राह्मणी पितृसतेने त्याला वारश्यात दिलेली शस्त्रं चालवली जाणं, हे अत्यंत वेदनादायी आहे. यातून त्याची ब्राह्मणी पितृसत्तेशी असणारी बांधिलकीच उघड होत असते. चळवळीत असणारे हे पुरूष कार्यकर्ते स्वतःला समतावादी म्हणत असतील परंतु ते जर तत्व आणि व्यवहारात स्त्रीवादी नसतील तर सगळंच पालथ्या घड्यावरील पाणी आहे एवढं मात्र नक्की.

एका कार्यकर्त्याच्या चुकीच्या कमेंटवरून सुरू झालेली चर्चा काहींनी आंबेडकरवादावर प्रश्न उपस्थित करण्यापर्यंत नेली. त्याला उत्तर म्हणून एका कार्यकर्त्याने "तुमच्या स्त्रीवादाला पुरून उरण्यासाठी माझा आंबेडकरवाद पुरेसा आहे."अशी पोस्ट केली. ही पोस्ट उदाहरण म्हणून घेतली आहे. खरं तर मार्क्सवाद, आंबेडकरवाद, स्त्रीवाद, किंवा जात-वर्ग-स्रीदास्यांत हे केवळ शब्द नाहीत. त्यामागे ज्ञानाचे, संघर्षाचे ऐतिहासिक संदर्भ आहेत. त्यामागील तत्त्वज्ञान, क्रांतीव्यवहार यातील सखोल ज्ञान किंवा माहितीही नसतानाही सरळधोपटपणे एकतर समर्थन करायचं किंवा विरोध करायचा, अक्षरशः तुटून पडायचं असला प्रकार हा चळवळींसाठी घातकच आहे.

इथं ध्यानात घेतलं पाहिजे की, आंबेडकरवाद आणि स्त्रीवाद यांत कोणतं ही द्वैत नाही. त्यांच्यात एकजीव असा संबंध आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘कास्ट इन इंडिया’मध्ये जातिव्यवस्थेच्या निर्मितीचा सिद्धांत मांडताना मांडले की, ‘गटांतर्गत विवाह करणाऱ्या रुढीने स्वगटाबाहेर लग्न करण्याच्या रूढीवर मिळवलेला विजय म्हणजे जातीची निर्मिती होय!’ जातीची निर्मिती, जातीचे अस्तित्व आणि जातीचे सातत्य हे स्त्रियांच्या लैंगिक नियंत्रणावर टिकलेले आहे. स्त्री ही पुरूषाची खासगी मालकी ठरवून तिच्या श्रमावर, प्रजननावर ताबा घेऊन जातपितृसत्ता उभी ठाकली. या जातपितृसत्तेचे ब्राह्मणी धर्म, कला, साहित्य, संस्कृती आणि तत्त्वज्ञानाने वैचारिक पालनपोषण केले. त्यासाठी सांस्कृतिक यंत्रणा उभी केली. ती अव्याहतपणे राबवली. धर्म-संस्कृतीची कवचकुंडले परिधान केलेल्या या ब्राह्मणी पितृसत्तेविरुद्धचा संघर्ष हा आंबेडकरवादी क्रांतीविज्ञानात गाभ्याच्या स्थानी आहे. 

'स्त्रिया जातिव्यवस्थेच्या द्वार आहेत!' हे एक विधान नसून तो एक सिद्धांत आहे. जातिव्यवस्था आणि स्रीदास्य यांचा अविभाज्य असा संबंध असल्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विजातीय विवाह हा जात्यंताचा एक कृती कार्यक्रम असू शकतो असे मानले. पण त्यासाठी धर्माच्या दास्यातून मुक्त असणे ही पूर्वअट सांगितली. कारण धर्मग्रंथ हे ब्राह्मणी पितृसत्तेची संरक्षक भिंत आहे! ब्राह्मणी धर्म-संस्कृतीच्या गुलामीचा चक्रव्यूह भेदून होणारे आंतरजातीय विवाह हेच खऱ्या अर्थाने जात्यंतक असतील हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारव्यूह आपल्याला ‘एनिहिलेशन ऑफ कास्ट‘मध्ये दिसतो. बाबासाहेबांचा हा विचारव्यूह त्यांना तथागत गौतम बुद्धाच्या मार्गाकडे वळवतो. 'हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती' ही पुस्तिका या दृष्टीने खूपच महत्वाची आहे. परंतु अजूनही भारतातील ब्राह्मणी स्त्रीवादी चळवळींनी या पुस्तिकेची म्हणावी तशी दखलच घेतलेली दिसत नाही. बाबासाहेब स्त्रियांना कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाकारणाऱ्या मनूस्मृतीचे दहन करतात. तर बुद्धाला स्त्री स्वातंत्र्याचा उद्गाता मानतात. या दोन्ही कृतीतील कार्यकारणभाव 'हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती' या पुस्तिकेत उलगडतो. 

भारतातील स्रीदास्याच्या संदर्भात हे लक्षात घेतले पाहिजे की, ब्राह्मणी परंपरा ही स्त्रियांना दास्यात ठेवणारी आहे, तर बौद्ध परंपरा ही स्त्रियांच्या मुक्तीला बांधील असणारी परंपरा आहे. महाप्रजापती गौतमी, भिक्खूसंघात तथागताने स्त्रियांनाही प्रवेश द्यावा, म्हणून ५०० परिव्राजक स्त्रियांसह कपिलवस्तूहून वैशालीपर्यंत पायी चालत आल्या. (महाप्रजापती गौतमी ही बुद्धाची मावशी. बुद्धाची आई महामाया वारल्यावर मावशीनेच बुद्धाचा सांभाळ केला. हे वाचल्यावर 'माय मारावी आणि मावशी उरावी' ही म्हण आठवली. मला प्रकर्षाने वाटतंय की, ही म्हण निःसंशयपणे बुद्धाशीच संबंधित असावी.) बुद्धाचा सर्वोत्तम शिष्य आनंदशी झालेल्या महासंवादानंतर बुद्धाने महिला भिक्खूसंघाची स्थापना केली. त्यावेळी आनंदून महाप्रजापतीने जे उद्गार काढले ते थेरीगाथेत आलेले आहेत...(हे बुद्धविरा, तू सर्व जीवमात्रांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेस ज्याने मला सर्व दुःखापासून मुक्त केले, तसेच इतर बहुजनांना देखील दुःखातून सोडविले अशा तुला माझे वंदन) ब्राह्मणी परंपरेने स्त्रियांवर जी ज्ञानबंदी लादलेली होती ती उठवून स्त्रियांना परिव्रज्या देणारे गौतम बुद्ध हे भारतातील स्त्रियांच्या मुक्तीचे जनक आहेत. हे स्त्रियांच्या मुक्तीदायी राजकारणाची उभारणी करताना ध्यानात घ्यावे लागते. त्यामुळे आंबेडकरवाद आणि स्त्रीवाद यांत काहीतरी भेद आहे अशी कोणीही मांडणी करण्याचा प्रयत्न करू नये. लिंगभेद आणि जात यांवर आधारलेल्या शोषणव्यवस्थेचा विनाश हा आंबेडकरवादाच्या केंद्रस्थानी आहे.

सोशल मीडियावर स्त्रीवादाच्या अनुषंगाने सुरू झालेल्या चर्चेत 'एजन्सी' चा मुद्दा दलित स्त्री कार्यकर्त्यांकडून ऐरणीवर आला. 'सर्व भारतीय स्त्रिया एकसारख्याच आहेत' हा सबगोलंकारी स्टँड आंबेडकरवादी स्त्रियांना मान्य नाही. जातीच्या श्रेणीबद्ध उतरंडीला लिंगभावाची ही उतरंड कशी बांधील आहे आणि सवर्ण स्त्रिया यांच्या दुःखात आणि दलित स्त्रियांच्या दुःखात मुळातच महदंतर आहे. याकडे दलित स्त्रीवादाने किंवा आंबेडकरवादी स्त्रीवादाने प्रकाश टाकलेला आहे. जातिव्यवस्था आणि स्त्रियांचे शोषण हा संबंध उतरंडीनुसार कसा बदलतो, हे जोतिबा फुल्यांनी त्यांच्या 'कुळंबिन' अखंडामधून सर्वप्रथम उलगडलेले आहे.

 

उरापोटावर पाण्यास वाहती ।। कचरा घालीती ।। शेणामध्ये ।।१।।

सोटा घालून शेण तुडवीती ।। गोवऱ्या थापीती ।। उन्हामध्ये ।।२।।

पळी बसून भटणीच्या परी ।। मौज नच मारी ।।छायेमध्ये ।।३।।

अशा उद्योगीस म्हणे कुळंबिन ।। भटा धनीपण ।। जोती म्हणे ।।४।।

 

भटीण शूद्रांची करीना मजूरी ।। काढणी न करी ।। शेतामध्ये ।।१।।

पेंढ्याचे ते ओझे खळ्यांत नेईना ।। कणसे मोडीना ।।त्यांच्यासंगे ।।२।।

धान्य उपसीता पाट्या ती देईना ।। बनग्या वारीना ।। हतणीने ।।३।।

शुद्रांचीया खळीं मजुरी करीना ।। नखरा सोडीना ।। जोती म्हणे ।।४।।

 

नांगराचा मागे भटीण फिरेना ।। काशा उपशीना।। लागोपाठ ।।१।।

भटीण फोडीना शेती ढेकळांना ।। खतास घालीना ।। डोईवर ।।२।।

खुरपून टाकीना बैलापुढे चारा ।। नेईना बाजारा ।। विकावया।।

भटीण शेतात धंदा नच करी ।। चाळे चाळे करी ।।जोती म्हणे ।।४।।

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ही महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी परिषदेत केलेल्या भाषणाने ब्राह्मण स्त्रिया आणि अस्पृश्य स्त्रिया यांच्यातील फरक स्पष्ट केलेला आहे. बाबासाहेबांनी अस्पृश्य महिलांना प्रश्न विचारला की, " या सभेत बसलेल्या कायस्थ व इतर स्पृश्य बायांच्या पोटी जन्मलेल्या मुलांमध्ये व आम्हा मुलात काय अंतर आहे?...असे असताना ब्राह्मण स्त्रीच्या पोटी जन्मलेले बालक का सर्वसामान्य व्हावे व तुमच्या पोटी जन्मलेले बालक का अवमानले जाते? त्याला साध्या माणुसकीचा हक्क का मिळू नये? तुमच्या पोटी जन्म घेणे पाप का ठरवले जावे?" बाबासाहेबांचा हा प्रश्न जातिवास्तवाचा अचूक वेध घेणारा आहे.

कॉ. शरद पाटील यांनी वर्ग समाजातील स्त्रियांचे दुःख-शोषण आणि जात-वर्ग समाजातील स्त्रीच्या दुःख-शोषण याचा उलगडा केला आहे. तो करताना त्यांनी अब्राह्मणी साहित्य व कलांचे सौंदर्यशास्त्र या अभिजात ग्रंथात बाबुराव बागुलांच्या सूड कादंबरीचे परीक्षण लिहिले आहे. श.पा. म्हणतात की, " वर्ग समाजात श्रमिक स्त्रीचे शोषण-पीडन जसे वर्गप्रभुत्वामुळे होते, तसे पुरुषप्रभुत्वामुळेही होते. श्रमिक पुरुषाचे दुःख एकेरी असते, तर तिचे दुहेरी. वर्गीय जातीय समाजात दलित स्त्रीच्या शोषणपीडनात भरीला जातिप्रभुत्व आहे. दलित पुरुषाचे दुःख दुहेरी असते, तर दलित स्त्रीचे तिहेरी."

डॉ.उमेश बगाडे हे जात-लिंगभावाची सूक्ष्मता आंबेडकरांनी कशी उलगडली आहे हे दाखवताना म्हणतात, 'भारतात उच्चजातीय निम्नजातीयांचे दास होऊ शकत नाहीत, तर निम्नजातीयांच्या दिशेने जातीदास्य वाढत जाते' हे बाबासाहेबांचे प्रतिपादन अधोरेखित करतात. पुढे डॉ. उमेश बगाडे एक महत्वाचे निरीक्षण नोंदवतात की, "ब्राह्मण जातीच्या अतंर्गत स्त्रियांना अशुद्धी, हीनत्व, अधिनता, पत्करावी लागली. मात्र, जातिव्यवस्थेच्या सार्वजनिक परिवेशामध्ये ब्राह्मण वा उच्चजातीय स्त्रियांना ज्येष्ठता वा सन्मान लाभला, तर निम्नजातीय पुरुषांना उच्चजातीय स्त्रियांच्या तुलनेत कनिष्ठता प्राप्त झाली."

 

'भारतीय स्त्रीवादाच्या संदर्भात मुक्ता साळवेचा निबंध' या लेखात प्रा.सचिन गरूड यांनी तर खूपच क्रांतिकारी मांडणी केलेली आहे. ते म्हणतात की, "भारतीय स्त्रीमुक्तीसाठी आवश्यक असलेल्या प्रबोधन चळवळीची उद्गाती प्रामुख्याने जातीव्यवस्थाविरोधात बंड करणारी स्त्रीच राहू शकते. भारतीय समाजात दलित जाती या आर्थिक सर्वहारा आहेत, त्याचप्रमाणे त्या सामाजिक सर्वहाराही आहेत. दलित स्त्री मात्र आर्थिक सर्वहारा + सामाजिक सर्वहारा + पितृसत्ताक सर्वहारा आहे. त्यामुळे भारतातील जातीअंताच्या क्रांतीच्या नेतृत्वस्थानी ती राहणार आहे. या सांस्कृतिक क्रांतीची सुत्रेही तिच्या हाती असतील.

'स्त्रीवादी आंबेडकरवाद' हे अत्यंत मौलिक पुस्तक लिहिणाऱ्या आणि स्त्री अभ्यास या ज्ञानशाखेत पी.एच.डी केलेल्या धम्मसंगिनी रमागोरख यांचेही 'एजन्सी' या मुद्द्यावरील प्रतिपादन अत्यंत टोकदार असे आहे.त्या म्हणतात की, "आपण जसं 'नुसतं दलित नसतो' तसंच 'नुसती स्त्री' पण नसतो ना! 'दलित म्हणून बोलताना स्त्री असणं आणि स्त्री म्हणून बोलताना दलित असणं', याचं भान कायमच ठेवावं लागतं. ते कधी कधी का सुटतं? (सार्वजनिक चर्चाविश्वातील वाद -प्रतिवाद वरकरणी आपल्या प्रश्नांना बरोबर अधोरेखित करत आहेत, असा समज होण्यातून. ही विनाचिकीत्सा, सहज सहमती आपल्या मूळावर येते किंवा प्रस्थापित, ब्राह्मणी निव्वळ स्त्रीवादी प्रवाहांना काही मुद्द्यांवर साथसोबत करण्याची भूमिका घेताना पण मतभेदांचं भान सुटता कामा नये)"

यादृष्टीने धम्मसंगिनी यांनी सोशल मीडियावर दोन प्रश्न विचारले आहेत. १.आमच्या प्रश्नांवर का बोलला नाहीत? २.आमच्या प्रश्नांवर का बोलताय? आमचं आम्ही बघून घेऊ! हे आपले जातीदत्त सनातनप्रश्नैत!" ही टोकदार नेणीव आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. "कुणी कुणाच्या प्रश्नावर कधी बोलावं? हा एजन्सीच्या सत्ताकारणामधील पेच आहे. तो पेच आपण सोडवल्याशिवाय प्रगल्भ आणि टिकाऊ क्रांतिदोस्ती अशक्य आहे." हे धम्मसंगिनी रमा गोरख यांचे प्रतिपादन विचारप्रवृत्त करणारे आहे. 

कमला भसीन 'व्हॉट इज फेमिनिझम' यां पुस्तकात स्त्रीवादाची व्याख्या करतात. भारतातील स्त्री-पुरुष समतेसाठी लढणाऱ्यांची नोंद घेताना त्या १९ व्या २०व्या शतकातील राजा राममोहन रॉय, पंडिता रमाबाई, ईश्वरचंद्र विद्यासागर, रामकृष्ण परमहंस, रवींद्रनाथ टागोर, गांधी, नेहरू व सय्यद अहमद यांचा उल्लेख करतात.परंतु जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची साधी नोंदसुद्धा घेत नाहीत. छाया दातार यांनी 'स्त्रीमुक्ती चळवळीचे बदलते आयाम' या पुस्तकात भारतीय स्त्रीमुक्तीचे जनकत्व बुद्धालाही दिले नाही अन सावित्री-जोतिबालाही दिले नाही. उच्चजातीय स्त्रियांच्या चळवळी अब्राह्मणी स्त्री चळवळींची दखल घेत नाहीत. त्यांची उपेक्षा करतात. अनुल्लेखानेच मारतात. ही वस्तुस्थिती आहे. प्रा.प्रतिमा परदेशी आणि सरोज कांबळे यांनी मात्र स्पष्टपणे सांगून ठेवलेलं आहे की, "भारतीय स्त्रियांच्या हक्कांसंदर्भात झालेल्या लढ्याचा इतिहास जेव्हा निरपेक्षपणे लिहिला जाईल तेव्हा डॉ.आंबेडकरांनी एका जाती-धर्माच्या नव्हे तर समस्त स्त्रियांसाठी केलेल्या कामगिरीची नोंद सुवर्णाक्षरांनी घेतली जाईल. भारतातील सर्व स्त्रिया जात, धर्म, प्रांत, भाषा हे भेद ओलांडून त्यांच्या जातिस्त्रीदास्यांतक विचार व्यवहाराचे ऋण मान्य करतील हे निश्चित."

दलित स्त्रियांच्या लढ्याची दखल न घेणाऱ्या ब्राह्मणी स्त्रीवादाच्या डोळ्यांत अंजन घालणारा 'आम्हीही इतिहास घडवला' हा ग्रंथ उर्मिला पवार आणि मिनाक्षी मून यांनी संपादित केलेला आहे. 'आम्हीही इतिहास घडवला' हे शीर्षकच बोलके आहे! उच्च जातीयांच्या स्त्रीवादाचा जागतिक महिलांच्या संघर्षाशी भगिनीभाव स्थापित होतो पण दलित-आदिवासी महिलांशी होत नाही. दलित महिलांनी २५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिनाला 'स्त्रीमुक्ती दिन' घोषित केलेला आहे.त्याकडे ब्राह्मणी स्त्री चळवळीने पाठच फिरवलेली आहे.

दिल्लीतील निर्भया प्रकरण हे अत्यंत अमानुष होते. त्यावेळी आंबेडकरी स्त्रियांनी या क्रूरतेविरुद्ध आवाज बुलंद केला होता. परंतु खैरलांजीतील प्रियांका आणि सुरेखा भोतमांगे या दलित स्त्रियांवरील क्रूरतेचा कळस करणारी अत्याचाराची घटना घडली त्यावेळी स्त्री चळवळीच्या नेतृत्वातील ब्राह्मणी स्त्रिया मात्र मौन धारण करून होत्या. पण त्याचवेळी उर्मिला पवार, प्रज्ञा पवार यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील महिलांनी महाराष्ट्राच्या मंत्रालयात उड्या घेऊन देशाचे लक्ष खैरलांजी प्रश्नांकडे वेधून घ्यावे लागले.डॉ. निशा शेंडे यांना जवळपास महिनाभर भूमिगत व्हावे लागले होते.

पुण्याजवळील वीटभट्टीवर घडलेली अत्याचाराची घटना असो किंवा नांदेड जवळ मातंग मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना असो. या दलित स्त्रियांवरील अमानुष अत्याचारांच्या घटनांवर चर्चा का झाली नाही? आपल्या देशात अत्याचार झालेल्या स्त्रीची जात बघून ठरवलं जातं की आवाज उठवायचा की नाही? उठवायचा तर किती उठवायचा? जाती उतरंडीनुसार निषेधाच्या आवाजाचा डेसिबल बदलत जातो, दलित स्त्रियांसाठी तर डेसिबलच उरत नाही असे का होते? हा सिलेक्टिव्हनेस कुठून येतो? भारतातील ब्राह्मणी स्त्रीचळवळीने जातीचा मुद्दाच अदृश्य करून स्त्रीवादाचे समीकरण युरोपीय स्त्रीवादाशी केल्याने त्यांचा भगिनीभाव हा उच्चजातीपुरता मर्यादित होतो. या पार्श्वभूमीवर आंबेडकरवादी स्त्रियांनी उचललेला 'एजन्सी' चा मुद्दा यादृष्टीने क्रांतिकारी शक्यता घेऊन उभा आहे. त्यामुळे जात-वर्ग-स्रीदास्यांताच्या समग्र क्रांतीच्या दृष्टीने ही 'एजन्सी' मूलभूत ठरते.

शेवटी समग्र समता आणि समग्र लोकशाहीकडे जात असताना ब्राह्मणी पितृसत्तेचा पाडाव करण्यासाठी जो आवाज आमच्या मैत्रिणी उचलत आहेत. तो समतेच्या चळवळीला निसंशयपणे पुढेच नेईल. चुकणाऱ्या पुरुषांनी बदलायला तयार राहणे आणि त्यांना बदलण्यासाठी संधी देऊन समग्र समतेसाठी भगिनीभाव-बंधुभाव निर्माण होणे, ही काळाची गरज आहे. हा मुद्दा कुणाच्या हारजितीचा मुद्दा मुळीच नाही. ही एक बदलाची प्रक्रिया आहे. माझ्यासाहित पितृसत्तेचे कमी जास्त प्रमाणात वाहक असणाऱ्या चळवळीतील पुरुषांशी होणारा संघर्ष हा शत्रूभावी नाही तर मित्रभावी आहे, हेही काही मैत्रिणींनी सांगितले आहे.  या भूमिकेचे स्वागत करताना हेच वाटतं की, मैत्रीपूर्ण आणि प्रेमपूर्ण संवादच समतेचा संगर पुढे नेईल.

दलित पुरुषापेक्षा दलित स्त्रीची नेणीव जास्त भेदक आणि टोकदार असते असे कॉ.शरद पाटील म्हणतात."स्त्री-पुरुष समता हीच समतेची निर्णायक कसोटी आहे" हा कॉ. शरद पाटील यांचा सिद्धांत आपल्या लढ्यासाठी नेहमीच मार्गदर्शक राहील. त्यांनी आपल्याला गण ते जात या प्रवासात स्त्रीसत्ता-मातृसत्ता ते ब्राह्मणी पितृसता ही स्थित्यंतरे उलगडून दाखवलेली आहेत. रामायणातील संघर्ष हा राम आणि रावण यांच्यातील संघर्ष नसून तो मावळती स्त्रीसत्ता आणि उगवती पितृसत्ता यांच्यातील संघर्ष आहे, हे सप्रमाण दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे आपली समतेची लढाई तांत्रिकीच्या वाटेने निऋतीपर्यंत जाणारी आहे. जात-वर्ग-स्रीदास्यांताचे महाप्रबोधन पुढे नेणारी सांस्कृतिक क्रांती आपल्या सर्वांची वाट पाहत आहे!

 

संदर्भ ग्रंथ :

१. एनिहिलेशन ऑफ कास्ट, डॉ. बाबसाहेब आंबेडकर

२. अब्राह्मणी साहित्य व कलांचे सौंदर्यशास्त्र, कॉ. शरद पाटील

३. जातिव्यवस्था व स्त्रीमुक्ती, प्रतिमा परदेशी - सरोज कांबळे

४. नवस्त्रीवाद, रूपा बोधी-कुलकर्णी

५. स्त्रीवादी आंबेडकरवाद, धम्मसंगिनी रमा गोरख

६. ब्राह्मणी पितृसत्ता उकलण्याचा पेच, डॉ.उमेश बगाडे (अक्षरगाथा, १० ऑक्टोबर २०१६)

७. पितृसत्ता व स्त्रीमुक्ती, वंदना सोनाळकर - शर्मिला रेगे

८. आंबेडकरी स्त्रीवाद, डॉ.निशा शेंडे

९. स्त्रीवादी सामाजिक विचार, विद्युत भागवत

१०. महाराष्ट्रातील स्त्रीविषयक सुधारणावादाचे सत्ताकारण, डॉ. नारायण भोसले

११. मुक्ता साळवे : भारतीय स्त्रीवादी परिदृष्टी, सचिन गरूड (संपादन : निर्मला जाधव, किशोर जाधव)

१२. हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती, डॉ.बाबसाहेब आंबेडकर

 

लेखक मराठीतील नामवंत कवी, शाहीर आणि सांस्कृतिक चळवळीत महत्वाचं योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत.