Quick Reads

हिंडेनबर्ग नावामागचा स्फोटक इतिहास

१९३७ मध्ये हिंडेनबर्ग एअरशिपच्या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाला होता.

Credit : इंडी जर्नल

राकेश नेवसेकाही दिवसांपूर्वीच हिंडेनबर्ग रिसर्च नावाच्या गुंतवणूक क्षेत्रात संशोधन कंपनींनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात अदानी समूह अनेक दशकांपासून शेअर्स मार्केट आणि अकाउंटिंग रीपोर्टसची फेरफार करत असल्याचा दावा केल्यापासून भारतात या संस्थेचं नाव चर्चेत आहे. मात्र ज्या घटनेवरून हे नाव या संस्थेनं घेतलं आहे, ती घटनादेखील यानिमित्तानं चर्चेत आली आहे. काय आहे या नावामागचा इतिहास?

झेपलिन या जर्मन कंपनीनं  पॉल वॉन हिंडेनबर्ग नावाच्या एका जर्मन सैन्य अधिकाऱ्याच्या (जो नंतर जर्मनीचा राष्ट्राध्यक्षही झाला) नावानं एक एयरशिप बनवली. या एयरशिपचं वैशिष्ट्य म्हणजे तिचा हायड्रोजन वायुचा मोठा फुगा. हायड्रोजन वायुचा फायदा म्हणजे, तो खूप हलका असतो आणि हवेत अगदी सहज तरंगतो. त्यामुळं या फुग्यावर जर तुम्ही काही वजन लादलं तरी खूप कमी इंधन खर्च करून खूप जास्त अंतर पार करता येतं. याचा फायदा घेऊन झेपलिन कंपनीनं अमेरिका ते जर्मनी एक प्रकारची विमान वाहतूक सेवा सुरू केली. हा काळ १९३७ चा. त्याकाळी अक्खा अटलांटिक महासागर पार करणं काही सोपी गोष्ट नव्हती.

पण पर्यावरणपूरक असलेल्या हायड्रोजन वायुचा एक मोठा धोका म्हणजे हा वायु अत्यंत ज्वलनशील आहे. अगदी छोटीशी ठिणगी पडली की हा वायु लगेच पेट घेतो. या हिंडेनबर्ग एयरशिपमध्ये भरलेला हायड्रोजन याला काही अपवाद नव्हता. शिवाय या हिंडेनबर्गचे अनेक अपघात झाले होते. तरीही एयरशिपच्या मालकांनी तिचा वापर करायचं ठरवलं आणि जे व्हायचं होतं ते झालं. ६ मे १९३७ रोजी अमेरिकेतली मँचेस्टर इथं उतरतं असताना या एयरशिपचा अपघात झाला. या अपघातात एयरशिपवरील ९७ लोकांपैकी (३६ प्रवासी आणि ६१ कर्मचारी) ३५ मृत्यूमुखी पडले. त्यात १३ प्रवासी आणि २२ कर्मचारी होते, त्याशिवाय जमिनीवर काम करणाऱ्या कामगारांचाही मृत्यू झाला.

या अपघातबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या. अपघात जाणून बुजून घडवला गेला अशी चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. पण या अपघातामागच्या खऱ्या कारणावर तज्ञांची कधी सहमती झाली नाही. या घटनेनंतर ९० वर्षांनी नेथन अ‍ॅन्डरसन नावाच्या व्यक्तीनं हिंडेनबर्ग रिसर्च नावाची संशोधन संस्था उभी केली. अ‍ॅन्डरसननं स्थापन केलेल्या हिंडेनबर्ग संस्थेच्या मते, ‘हिंडेनबर्ग दुर्घटना म्हणजे पूर्णपणे मानवनिर्मित, पूर्णपणे टाळता येण्याजोग्या आपत्तीचं प्रतीक. ब्रह्मांडातील सर्वात ज्वलनशील वायूनं भरलेल्या फुग्यात जवळपास १०० लोकांना बसवलं गेलं, तेही त्याआधी जवळपास डझनभर हायड्रोजन-आधारित विमानांचा अपघात झाला असताना. पण हिंडनबर्गच्या मालकांनी "ही वेळ वेगळी आहे" या वॉल स्ट्रीटच्या घोषवाक्याचा अवलंब केला आणि पुढं जाण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम सर्वांसमोर आहे.’

हिंडनबर्ग संस्था आर्थिक क्षेत्रात काम करते. संस्थेनं आतापर्यंत बऱ्याचं कंपन्यांचा आर्थिक अहवाल सादर केला आहे. नुकताच तिनं भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानीच्या अदानी समूहाचा आर्थिक अहवाल सादर केला, ज्यात अदानी समूहानं भ्रष्टाचार करून, शेल कंपनीनमधून गुंतवणूक करून, संपत्ती कमावल्याचा दावा करण्यात आला आहे. या अहवालानंतर अदानी समूहाला चांगलंच आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे. या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअरची किंमत सरासरी २० टक्के कमी झाली आहे.

 

 

असे अहवाल सादर करण्याशिवाय हिंडेनबर्ग संस्था शेयर मार्केटशी निगडीत कामसुद्धा करते. हिंडनबर्ग स्वतःला ऍक्टिविस्ट शॉर्ट सेलिंग संस्था म्हणवते. एखाद्या कंपनीतील शेअरचा वापर कंपनीच्या व्यवस्थापनावर दबाव आणण्यासाठी करणाऱ्या शेअरहोल्डर्सना अक्टिविस्ट शेअरहोल्डर म्हणतात. शॉर्ट सेलिंग म्हणजे, एखादा शेअर अगोदर जास्त किंमतीत विक्री करायचा आणि शेअरची किंमत कमी झाली की तो पुन्हा खरेदी करायचा. समजा तुमच्याकडे एखाद्या कंपनीचे १० शेअर्स आहेत, त्यांची किंमत ५०० रुपये आहे. तुम्हाला माहिती मिळाली की त्यांची किंमत कमी होणार आहे, म्हणून तुम्ही ते शेअर्स विकता. बातमी खरी ठरते आणि त्या शेअर्सची किंमत ४५० रुपये होते. मग तुम्ही ते शेअर्स परत विकत घेता. म्हणजे तुमच्याकडे १० शेअर्स परत आले आणि एका शेअर मागे ५० रुपये नफासुद्धा मिळवला. हिंडेनबर्ग संस्था अशी ऍक्टिविस्ट शॉर्ट सेलिंग करणारी संस्था आहे.

हिंडेनबर्ग रिसर्च सुमारे १० गुंतवणूकदारांसाठी काम करते. सहा किंवा त्याहून अधिक महिन्यांत लक्ष्य कंपनीचा तपास अहवाल, तिच्या सार्वजनिक नोंदी आणि अंतर्गत कॉर्पोरेट दस्तऐवज, तसंच तिच्या कर्मचार्‍यांशी बोलून तयार करते. हा अहवाल प्रथम संस्थेच्या गुंतवणूकदारांना सादर केला जातो, ज्यामुळे अहवाल सार्वजनिक होण्याआधी त्यांना शेअर्स घेण्याची संधी मिळते. अहवाल सार्वजनिक केल्यानंतर शेअर्सची विक्री केली जाते आणि किंमत कमी झाल्यावर पुन्हा विकत घेतले जातात. त्यामुळे गुंतवणूकदारांचा कंपनीतील सहभाग तितकाच राहून त्याला वेगळा नफा मिळतो. हिंडेनबर्गनं अदानी समूहाबद्दल सादर केलेल्या अहवालामुळे समूहाच्या शेअर्सची किंमत कमी झाली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे या समूहाचे शेअर्स आधीच होते ते त्यांचे शेअर्स विकून पुन्हा स्वस्तात घेऊ शकतात. त्यातून हिंडेनबर्गच्या गुंतवणूकदारांचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

हिंडेनबर्ग संशोधन संस्था हिंडेनबर्ग एक्स्पलोजन सारखी घटना शेअर मार्केट मध्ये टाळण्यासाठी काम करण्याचा दावा करते. पण त्यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर अनेकदा स्फोट घडतात आणि त्यातून शॉर्ट सेलिंग करणाऱ्यांना त्यांच्या गुंतवणूकदारांना फायदा होतो.

नेथन अ‍ॅन्डरसन स्वतः एक सनदी लेखापाल आहे. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार ते संपत्ती व्यवस्थापनात अनेक श्रीमंत लोकांना सल्ला देण्याचं, संपत्ती वाढण्यासाठी गुंतवणुकीचा सल्ला देण्याचं काम करतात. त्यांचे ग्राहक जास्त करून श्रीमंत व्यावसायिक असतात. एखाद्या कंपनीचे शेअर्सना कधी विकावे, कधी खरेदी करावे, इत्यादी बाबीतही सल्ला देण्याचं काम ते करतात.

त्यामुळं अदानी समूहाबद्दलचा अहवाल हिंडेनबर्गसारखा अपघात टाळून खरंच सर्वसामान्यांचं नुकसान थांबवण्यासाठी प्रसिद्ध झालायं की संस्थेच्या गुंतवणूकदारांच्या फायद्यासाठी, याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.