Quick Reads

एमीझचे वारे: ‘व्हॉट वुई डू इन द शाडोज’

व्हॅम्पायर्सची मॉक्युमेंट्री.

Credit : FX

हॉलीवूडच्या मायावी आणि व्यापारी दुनियेत येण्यापूर्वी न्यूझीलँडवासी असणाऱ्या तायका वाईटीटीने त्याच्या देशात ‘व्हॉट वी डू इन द शॅडोज’ हा चित्रपट त्याचा मित्र जेमेन क्लेमेंटसोबत दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट त्यांच्या त्याच नावाच्या २०१० मध्ये केलेल्या शॉर्टफिल्मवर आधारित होता. ही शॉर्टफिल्मही नील जॉर्डनच्या १९९४ मधील ब्रॅड पिट, टॉम क्रूज, अँटोनिओ बांडेरास आणि क्रिस्टन डंस्ट अभिनित ‘इंटरव्ह्यू विथ द व्हॅम्पायर’ ह्या चित्रपटापासून प्रेरित होती. वाईटीटीने मॉडर्न युगाप्रमाणे अपडेट म्हणून त्याचा चित्रपट सादर करण्यासाठी मॉक्युमेंट्री फॉरमॅट निवडला आणि टोन विनोदी ठेवला. परिणाम असा की ह्या शतकातील अतिशय स्मार्ट, विनोदी आणि सेल्फ अवेअर असा उत्कृष्ट व्हॅम्पायरपट पाहायला मिळाला. गेल्यावर्षी एफएक्स चॅनेलने ह्या चित्रपटाशी निगडीत त्याच नावाची सिरीज लाँच केली. सिरीजचा क्रिएटर आहे मूळ चित्रपटाचा लेखक आणि सहदिग्दर्शक जेमेन क्लेमेंट. आणि तायका वाईटीटीसोबत तो एक्झिक्यूटिव्ह प्रोड्युसरही आहे.

सिरीजच्या कथानकाची सेटिंग अमेरिकेतल्या स्टेटन आयलँडवर आजच्या काळात आहे. एका गॉथिक स्टाईल घरात चार व्हॅम्पायर्स रूममेट म्हणून राहात असतात. ‘नॅनडॉर - द रिलेंटलेस’ हा त्यांचा प्रतिनिधी कधीकाळी दक्षिण इराणमधल्या आणि आता अस्तित्वात नसलेल्या अल कोलाँडर साम्राज्याचा राजा होता. तर लाझलो आणि नादजा हे अनुक्रमे ब्रिटिश आणि रोमॅनियम वंशाचे व्हॅम्पायर नवराबायको आहेत. हे तिघेही प्रत्येकी ८०० ते १००० वयोमान असणारे आहेत. चौथा रूममेट कॉलिन रॉबिन्सन हा एनर्जी व्हॅम्पायर आहे. रक्ताऐवजी तो लोकांची एनर्जी शोषून जीवन जगतो. शिवाय सूर्यप्रकाशाचाही त्याच्यावर काही परिणाम होत नाही. यांच्याशिवाय गिएर्मो हा नॅनडॉरचा मानवी नोकरही आहे जो दहा वर्षांपासून या सगळ्यांची चाकरी बजावतोय. त्याला आशा आहे की एकेदिवशी त्याचे मास्टर त्यालाही व्हॅम्पायर बनवतील. कॉलिन वगळता इतर तिघांचा दिनक्रम ठरलेला आहे. दिवसा झोपणे, रात्री भक्ष्य शोधण्यासाठी शहरात फिरणे किंवा गिएर्मोकडून त्यांची घरच्याघरी व्यवस्था करणे, वेअरवुल्फ या त्यांच्या पारंपरिक शत्रूसोबत छोट्यामोठ्या लढाया करणे आणि फावल्या वेळात सहज गमती म्हणून काहीही उचापती करणे. हे तिघेही भूतकाळात प्रचंड रमलेले आहेत. आधुनिक काळाशी जुळवून घेणं त्यांना कठीण जातं, पण तरीही जुळवून घेण्याचा आपल्या पातळीवर ते सर्वतोपरी प्रयत्न करत असतात.

 

 

सीरिजचा फॉरमॅट मॉक्युमेंट्रीचा आहे. म्हणजे फेक डॉक्युमेंट्री. एखाद्या विषयावर किंवा चालू घडामोडीवर तिरकस भाष्य करण्यासाठी किंवा डॉक्युमेंट्री फॉरमॅटचीच गंमत उडवण्यासाठी मॉक्युमेंट्री बनवल्या जातात. हा फॉरमॅट असल्यानेच ‘व्हॉट वी डू...’ मध्ये कथानक आणणं निर्मात्यांनी टाळलंय. त्याऐवजी प्रत्येक पात्राला स्वतंत्र ट्रॅक देऊन शेवटपर्यंत तो पुरा करत नेलाय. २०-२२ मिनिटांच्या प्रत्येक एपिसोडची स्वतंत्र कथा आहे. क्वचितच एखाद्या एपिसोडमधील कथा दुसऱ्या एपिसोडमध्ये पूर्ण केली जाते किंवा त्यातूनच नव्या कथेला सुरुवात होते. श्वास रोखून घ्यायला मजबूर करतील असे क्लिफहँगर्सही इथे नाहीत. पात्रांचे विविध पैलू समोर आणणारे छोटे छोटे ट्विस्ट मात्र आहेत. फेक डॉक्युमेंट्री असल्याने इथल्या पात्रांना कॅमेराची जाणीव आहे, ते मोकळेपणाने फिल्म युनिटला त्यांच्या आयुष्याची माहिती देतात. जागोजागी प्राचीन ग्रंथातील रक्तपिपासू प्राण्यांचे दाखले दिले जातात, फोटोज दाखवले जातात, त्यांच्या मुलाखतींमधून त्यांचा भूतकाळ उलगडत जातो.

व्हॅम्पायर म्हणताच डोळ्यांसमोर रक्ताचा चिखल, पाट, ओघळ, धार उडवणारे, वाहवणारे, पिणारे भयानक आणि बीभत्स अमानवी जीव म्हणून जी प्रतिमा उभी राहते त्याला काही प्रमाणात तडा द्यायचं काम ही सिरीज करते. आणि त्यासाठी विनोदी हाताळणीचा अचूक वापर करण्यात आलाय. इथले व्हॅम्पायर हे खूपच नॉर्मल आणि कूल आहेत. गरजेपुरतं रक्त मिळालं की बाकी ते माणसांना कुठलाही त्रास देत नाहीत. त्यांना शांततेने त्यांचं अविनाशी आयुष्य जगायचंय. आपला वंश वाढवण्यात किंवा मानवांवर राज्य करण्यात त्यांना काडीचाही इंटरेस्ट नाही. आपल्या जातभाईंशीही जेवढ्यास तेवढ्या प्रमाणात ते संबंध राखून आहेत. थोडक्यात “जगा आणि जगू द्या” हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. फक्त अधूनमधून त्यांचं नॉर्मल आयुष्य बिघडवणारे काही प्रसंग घडतात ज्याच्याशी भिडताना त्यांच्या जुनाट विचारांमुळे, वागण्याच्या पद्धतींमुळे विनोद निर्माण होतो जो खळखळून हसवतो. आजच्या मॉडर्न माणसाची लाईफस्टाईल त्यांना समजत नाही. ज्यावर ते त्यांच्या मुलाखतींमध्ये कंटाळलेल्या सूरात सौम्य टीका करतात जी त्यांच्या अॅक्सेंटमुळे, एक्सप्रेशन्समुळे आणि हातांच्या हालचालीमुळे आपोआप विनोदी होऊन जाते. उदाहरणार्थ, माणसं चारी बाजूंनी बंद असलेल्या बसमधून न गुदमरता कसा काय प्रवास करतात हे त्यांना समजत नाही किंवा भटक्या प्राण्यांना अॅनिमल वेल्फेअर सेंटरच्या गोंडस नावाखाली पिंजऱ्यात बंद करतात याचा त्यांना राग येतो. हे आणि प्रत्येकाने टाईमपास करण्यासाठी सुरू केलेल्या नमुनेदार कामांमधून चुकून कॉमिक बाईट्स मिळत जातात.

 

 

‘व्हॉट वी डू इन द शॅडोज’ ही इतर व्हॅम्पायर मालिकांहून फक्त तिच्या मॉक्युमेंट्री फॉरमॅटमुळे उठून दिसत नाही तर त्यात दाखवलेली व्हॅम्पायर जमातीची जीवनशैली ज्या सहज पद्धतीने समोर येते. त्यामुळेही ती वेगळी ठरते. प्रत्येक व्हॅम्पायरकडे रूपांतराचं वेगवेगळं माध्यम असणं, वार्षिक ऑर्जीची प्रथा आणि त्यात असणारं व्हर्जिन मानवांचं महत्व, मानवी अन्न आणि चर्चची त्यांना असणारी अॅलर्जी हे इथं मोजक्या डिटेल्समध्ये आणि अगदी हँडी पद्धतीने दाखवत त्यांचं मानवांशी असलेलं साम्य अधोरेखित केलं जातं. सातव्या एपिसोडमध्ये ह्या तिघांवर व्हॅम्पायर्सच्या न्यायालयात एका प्राचीन व्हॅम्पायरच्या खूनाबद्दल जो खटला भरला जातो ते प्रकरण मुळातूनच पाहायला हवं. इथं वायटीटीच्या मूळ चित्रपटातील पात्रं ज्यूरींच्या रोलमध्ये दिसतात तर टिल्डा स्विंटन न्यायाधीशाच्या भूमिकेत आहे. आणि अजून बरीच स्टार मंडळी आहेत ज्यांनी काही इतर सिरीज आणि फिल्म्समध्ये व्हॅम्पायरच्या भूमिका केल्या आहेत. हे सगळे खटला कमी आणि विरोधाभासी जबानी देऊन एकमेकांशी भांडूनच जास्त विनोद करत राहतात. शिवाय मार्व्हलच्या पण MCU चा भाग नसलेल्या एका सुपरहीरो फिल्मचाही इथे संदर्भ येतो. फॅन्सलोकांनी तो आवर्जून पाहावा आणि ही सरप्राईज व्हिजिट अनुभवावी.

मालिका विनोदी असली तरी कथानक नसल्याने आणि मॉक्युमेंट्री फॉरमॅट थोडा ढिलाईने वापरलेला असल्याने इथल्या घटनांची मांडणी विस्कळीत आहे, ज्यामुळे सगळंकाही खूप स्लो चालू आहे असं वाटू शकतं. पण साधारण चौथ्या एपिसोडपासून मालिका मनाची पकड घेते आणि मग ती संपवल्यावरच आपण उठतो. यंदाच्या एमी अॅवॉर्डसमध्ये ‘व्हॉट वी डू...’ ला बेस्ट कॉमेडी सिरीजसाठी नॉमिनेशन मिळालंय. इतर नामांकित मालिका मी पाहिलेल्या नाहीत पण व्हॉट वी डूची गुणवत्ता आणि विनोदाची दर्जेदार पातळी पाहता निदान माझ्यासाठी तरी ती क्लिअर कट विनर आहे.