Quick Reads

एमीझचे वारे: द मँडेलोरियन

स्टार वॉर्सचा वारसा

Credit : Disney

डिस्नेने ऑक्टोबर २०१३ मध्ये लुकास फिल्म विकत घेतल्यावर ते स्टार वॉर्स रिलेटेड नवीन चित्रपट आणतील हे तर ठरूनच गेलं होतं. आणि त्याचबरोबर त्यांचं स्टार्स वॉर्सच्या पहिल्यावहिल्या लाईव्ह अॅक्शन सिरीजवरही काम सुरू झालं. पण ती प्रत्यक्षात प्रेक्षकांसमोर यायला नोव्हेंबर २०१९ उजाडावं लागलं. २०१५ नंतर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्समधली वाढती स्पर्धा पाहता आणि ती काळाची गरज आहे हे जाणून डिस्नेने मैदानात उतरायचं ठरवलं आणि १९ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी डिस्नेप्लस ही स्ट्रीमिंग सर्व्हिस लॉन्च केली. आणि तेव्हाच प्रीमियर झाला द मँडेलोरियन या पहिल्यावहिल्या स्टार वॉर्सच्या लाईव्ह सिरीजचा. या सिरीजचा क्रिएटर आहे जॉन फॅवरो. स्टार वॉर्सचा मोठा फॅन असलेला आणि आयर्न मॅनद्वारे मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा शुभारंभ करणाऱ्या फॅवरोला निवडून डिस्नेने अतिशय उत्तम निर्णय घेतला.

स्टार वॉर्स सिरीजची माहिती नसलेला नवखा प्रेक्षक फक्त डिस्नेची मालिका म्हणून मँडेलोरियन पाहायला बसला तर त्यातील डिटेल्सनी गोंधळून जाऊ शकतो. मात्र स्टार वॉर्सचा संदर्भ न घेताही ती एन्जॉय केली जाईल ह्याची काळजी निर्मात्यांनी घेतली आहे. आठ एपिसोड असलेली सदर मालिका ओरिजिनल ट्रीलॉजीचा तिसरा भाग रिटर्न ऑफ द जेडायमध्ये एम्पायरचा पाडाव झाल्यावर पाच वर्षांनी घडते. डिन जारीन हा एक मँडेलोरियन आहे. मँडेलोरियन ही बाऊंटी हंटर्सची एक जमात असून ते अतिशय निष्णात योद्धे म्हणून विख्यात आहेत. गॅलक्सीच्या टोकावरील ग्रहांमध्ये काम करणाऱ्या डिन जारीनची साहसं हा मालिकेचा मुख्य विषय. एका मिशनदरम्यान त्याची भेट बेबी योडा या योडा जातीच्या पन्नास वर्षीय बालकाशी होते. या बेबी योडाकडे असामान्य अशी शक्ती (फोर्स) आहे. या बालकावर डिनचा जीव जडतो. त्याचं संरक्षण करणं हे त्याचं मुख्य उद्दिष्ट बनतं. हे या मालिकेचं उपकथानक. लवकरच बेबी योडाच्या निमित्ताने डिनची चित्रविचित्र लोकांशी भेट घडत जाते आणि आपण विचार केला होता त्याहून हे योडाचं रहस्य खोल आहे याची त्याला जाणीव होते.

 

 

मँडेलोरियनचा फॉरमॅट हा वेस्टर्न अॅक्शन फिल्म्ससारखा आहे. उदासी आणि निराश छटा असलेले ओसाड लँडस्केप्स इथं भरभरून आहेत. डिनचं पात्र हे सरळ सरळ बाऊंटी हंटिंग करणाऱ्या काऊबॉईजवर बेतलेलं आहे. तो कुणालाही घाबरत नाही. त्याचा मेंदू तल्लख आहे. संकटात सापडल्यावर गोंधळून जाण्याऐवजी त्यातून बाहेर पडण्याचे शक्य ते सर्व उपाय तो आजमावतो. तो जीवावर उदार आहे. मरायला घाबरणं त्याला माहित नाही. डिनची - ज्याला मँडोही म्हटलं जातं - स्वतंत्र साहसं दाखवणं आणि बेबी योडाबरोबरचे त्याचे अनोळखी ते पालकत्वच्या दिशेने जाणारे संबंध चितारणं ह्या दोन पातळ्यांवर ही मालिका घडते.

या दुसऱ्या पातळीमुळे ती नुसती देखणी आणि उत्कंठावर्धक न राहता भावनिकरित्या समृद्धही होते. शिवाय ओरिजिनल, प्रीक्वल आणि सिक्वल ट्रीलॉजीजमध्ये नायकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या पितृत्वाचा किंवा फादर फिगरचा शोध घेण्याचा भाग इथेही येतो. कसलीही शांती आणि स्थिरता नसलेला आणि क्लोन वॉर्समध्ये आपल्या आईवडीलांना गमावलेला डिन यांत्रिक ज्ञानात कुशल असलेल्या म्हाताऱ्या क्वीलमध्ये फादर फिगर पाहतो. तसंच बेबी योडाही आपल्या प्रेमळ वागणूकीतून डिनला आपला पालक मान्य केल्याचं सुचवतो. डिन आणि बेबी योडाचं सूचक शब्द आणि हालचालींमधून व्यक्त होणारं हे अनामिक नातं मनाला मोहून जातं. आणि बेबी योडा तर खूपच क्यूट आहे. मालिकेसाठी मर्चंडाईज म्हणून त्याची खास निर्मिती झालेली असली तरी त्यापलीकडे प्रभाव टाकण्यात आणि दुसऱ्या सीजनसाठी कथानकाला महत्वाचं वळण देण्यात ते कारणीभूत ठरतं. मालिकेचा दुसरा सीजन ह्यावर्षी ऑक्टोबरमध्ये येतोय.

 

 

सिक्वल ट्रीलॉजी संपल्यावर दीर्घकाळ मन रमवता येईल असं काहीतरी साधन स्टार वॉर्स फॅन्सना हवंच होतं. मँडेलोरियन हे त्यांच्यासाठी उत्तम साधन ठरणार हे पहिल्या सीजनच्या क्रिटिकल यशावरून स्पष्ट दिसतंय. शिवाय स्कायवॉकर घराण्याच्या कथांपलीकडे लाईव्ह अॅक्शन व्हर्जनमध्ये स्टार वॉर्सची चित्तचक्षुचमत्कारिक दुनिया पाहायला मिळावी ही चाहत्यांची इच्छाही ह्या निमित्ताने पूर्ण होणार आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या प्राईमटाईम एमी नॉमिनेशन्समध्ये ह्या सिरीजला तब्बल १५ नामांकनं आहेत. सिरीजचा सगळ्या आघाड्यांवरील उत्तम परफॉर्मन्स पाहता ते बऱ्याच विभागांमध्ये बाजी मारतील ह्यात शंकाच नाही.