Quick Reads

एमीझचे वारे: ब्रेकिंग बॅड ते ओझार्क

बदलत्या (न) नायकांचा प्रवास

Credit : Oliver Kruszka, Quora

-आशुतोष जरंडीकर

 

"Say my Name" हे शब्द ऐकले की आपल्या डोळ्यासमोर काय येतं. काळ्या रंगाची हॅट आणि तपकिरी रंगाच्या फ्रेमचा चष्मा घातलेली एक व्यक्ती! आणि ती असते 'हाईजेनबर्ग'! हे सर्व अर्थातच 'ब्रेकिंग बॅड' या मालिकेशी संबंधित. २०१३ मध्ये संपलेल्या या मालिकेची लोकप्रियता सात वर्षांनंतर अजूनही कायम आहे. म्हणून तर वरचं वाक्य म्हणणारा ब्रायन क्रँस्टन आजही लगेच डोळ्यसमोर उभा राहतो. पण मग सात वर्षांपूर्वी संपलेल्या मालिकेचा आत्ता उल्लेख का करावा? सध्या सुरू असलेली, ब्रेकिंग बॅडची 'स्पिन ऑफ' असलेली 'बेटर कॉल सॉल' ही मालिका. बरोबर? पण नाही. आपण या मालिकेबद्दलसुद्धा बोलणार आहोत पण आजचे ब्रेकिंग बॅडचा उल्लेख करण्याचे कारण वेगळे आहे. ते कारण म्हणजे नेटफ्लिक्सची मालिका 'ओझार्क'!

 

 

ओझार्क या मालिकेचा २०१७ मध्ये पहिला सिजन प्रदर्शित झाला. त्यावेळी सर्वांनीच ओझार्कची ब्रेकिंग बॅड सोबत तुलना केली. ही तुलना होणे अगदी साहजिक होते. पण ओझार्कचा पुढचा सिजन आला तसं हे प्रकरण ब्रेकिंग बॅड पेक्षा वेगळं आहे, त्याला एक स्वतंत्र अस्तित्व आहे हे सर्वांनी मान्य करायला सुरुवात केली. ब्रेकिंग बॅड इतक्या मोठ्या मालिकेसोबत तुलना होणे आणि त्यापुढे जात  ओझार्कचे स्वतंत्र अस्तित्व असणे मान्य करणे या दोन्ही बाबी ओझार्कचे महत्व अधोरेखित करतात. 

असे असूनही ओझार्कला ब्रेकिंग बॅड इतकी लोकप्रियता मिळत नाही. ओझार्क पाहण्यापूर्वी समांतर कथानक असलेली ब्रेकिंग बॅड लोकांनी पाहिली आहे, त्यामुळे ओझार्कची लोकप्रियता कमी आहे असे नक्कीच नाहीये. याची कारणमीमांसा करण्यासाठी आपल्याला ओझार्कचे कथानक, ओझार्क आणि  ब्रेकिंग बॅड यांच्यामधील साम्य - फरक पाहावा लागेल. आणि हे करत असताना त्या दोघांमध्ये असलेला 'चांगला' फरक हेच ओझार्कच्या कमी असलेल्या लोकप्रियतेचे कारण असण्याची शक्यता निर्माण होते. या साऱ्याचा आढावा आपण आजच्या लेखात घेऊ. 

ब्रेकींग बॅडची संपूर्ण कथा अल्बकर्की शहरात घडते. ब्रेकिंग बॅडचा नायक वॉल्टर व्हाइट अत्यंत हुशार आणि रसायनशास्त्रामध्ये निपुण आहे. कर्करोगाचे निदान झाल्यामुळे आपल्याकडे अत्यंत कमी वेळ शिल्लक आहे आणि त्या वेळेत आपल्या पश्चात कुटुंब व्यवस्थित राहावे यासाठी आपण पैसे जमा करावेत असा विचार त्याच्या मनात येतो. हा विचार घेऊन वॉल्टर त्याचा शाळेतील विद्यार्थी जेसी पिंकमन सोबत ड्रग बनवायला सुरू करतो. दरम्यान वॉल्टरला आपली पत्नी स्कायलरचे विवाह बाह्य संबंध असल्याचं समजतं. यामुळे वॉल्टर-स्कायलर यांच्या संबधांमध्ये एक तणाव येतो. वॉल्टर पुढे जाऊन एका मोठ्या उद्योजकासाठी काम करायला सुरुवात करतो आणि अवैध व्यापाराच्या दुष्टचक्रात अडकत जातो. ड्रगचा व्यापार, पैशांची अवैध अफरातफर, एका शहरात अथवा गावात घडणारे कथानक, त्यामुळे त्या शहराचं कथानकात असलेलं महत्व, कथेच्या नायकांमध्ये असलेलं साधर्म्य, मृत्यू हे सत्य स्वीकारून त्यांनी त्याच्यापासून दूर पळण्याचा केलेला प्रवास अशा अनेक साम्यस्थळांमुळे ब्रेकिंग बॅड आणि ओझार्क या मालिका समांतर भासतात. जे की ओझार्कचे कथानक समजून घेतल्यानंतर ही साम्यस्थळे आणखी स्पष्ट होतील.

ओझार्कची कथा सुरू होते शिकागो शहरात. शिकागोमध्ये मार्टी बर्ड आणि ब्रूस लिडेल हे दोघे आर्थिक सल्लागार असल्याचा दिखावा करत त्याअंतर्गत मेक्सिकन ड्रग कार्टेलचे पैसे लॉन्डर करत असतात. एके दिवशी पैशाची अफरातफर केल्यामुळे ब्रूस लिडेलला मेक्सिकन ड्रग कार्टेलचे लोक मारून टाकतात. मार्टीसमोर आता दोनच पर्याय उरतात, एक तर संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू अथवा मेक्सिकन ड्रग कार्टेलचे पैसे लॉन्डर करणे. मार्टी अर्थातच दुसरा पर्याय निवडतो. आणि त्यासाठी आपल्या कुटुंबासोबत शिकागो सोडून मिसुरी येथील जंगल आणि तलावांनी वेढलेल्या 'ओझार्क' या गावात स्थलांतरीत होतो. दरम्यान मार्टीची बायको विंडी हिचे विवाहबाह्य संबंध आहेत याची मार्टीला कल्पना असते.

त्यामुळे त्यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. (परत एकदा ब्रेकिंग बॅडमधील स्कायलर प्रमाणेच) शिवाय त्याच्या संपूर्ण कुटुंबाला म्हणजेच बायको आणि दोन मुले यांना मार्टी मेक्सिकन ड्रग कार्टेलसाठी काम करतो याची कल्पना आहे. यामुळे बर्ड हे संपूर्ण कुटुंब (?) मेक्सिकन ड्रग कार्टेलचे पैसे लॉन्डर करण्याच्या प्रवासात सहभागी होते. ह्या बर्ड कुटुंबाच्या प्रवासात ओझार्कमधील रहिवासी, स्थानिक गुन्हेगार, व्यापारी, मिसुरी येथील अधिकारी वर्ग, एफबीआय, मेक्सिकन ड्रग कार्टेलचे प्रतिनिधी असे अनेकजण जोडले जातात आणि हा प्रवास वेगवेगळी वळणे घेत प्रत्येक एपिसोडगणिक खडतर होत जातो. या दोन्ही मालिकांमधील कथानक, पात्रे आणि त्यांच्यासमोर असलेली परिस्थिती सारखी दिसत असली तरी हे साधर्म्य खूप वरवरचं आहे. 'Small figures can cast large shadows' म्हणतात त्याप्रमाणे दोन्ही मालिकांच्या कथानकात असलेले अगदी लहान-लहान बदल मालिकांना स्वतंत्र अस्तित्व देऊन जातात. ते कसे ते आपण पाहूया.

 

 

ब्रेकिंग बॅडच्या पहिल्याच एपिसोडमध्ये आपल्याला वॉल्टर व्हाइटची पार्श्वभूमी समजते. त्याच्या खोलीमध्ये रसायनशास्त्रातील संशोधनासाठी त्याला मिळालेले नोबेलचे प्रशस्तीपत्र आहे. शैक्षणिक पात्रता इतकी उच्च असूनही तो शाळेत मुलांना रसायनशास्त्र शिकवतो आहे. उरलेल्या वेळेत तो अधिक पैशासाठी एका गॅरेजमध्ये काम करतो. त्याला शाळेत विद्यार्थ्यांकडून, गॅरेजमध्ये मालकाकडून आणि घरी कुटुंबाकडून अपेक्षित आदर मिळत नाहीये. आणि या साऱ्यात भर म्हणून त्याला कर्करोगाचे निदान होते. वॉल्टरच्या आजूबाजूची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल, त्याच्या हुशार व्यक्तिमत्वासाठी हानिकारक आणि त्याचे मानसिकरीत्या खच्चीकरण करणारी आहे. यामुळेच वॉल्टरची ड्रगच्या व्यवसायाकडे वळण्याची प्रक्रिया चुकीची असली तरी ती प्रेक्षकाला पटते. आपणही हेच केले असते असा विचार आपल्या मनात पेरणारी असते. आणि वॉल्टरसोबत प्रेक्षकांचा प्रवास सुद्धा सुरू होतो.

हा प्रवास असतो वॉल्टरचा यशाची शिखरे पदांक्रात करण्याचा. प्रत्येक संकट अत्यंत हुशारीने, असलेल्या ज्ञानाचा संपूर्ण वापर करून, नैतीकतेची चौकट मोडून, धुडकावून लावण्याचा. या संपूर्ण प्रवासामध्ये वॉल्टर हा त्याच्या गुणदोषांसहित स्वीकारलेला कथेचा नायक असतो. वॉल्टरने त्याच्या व्यवसायाबद्दल कुटुंबाला अंधारात ठेवल्याने त्याच्या कुटुंबातील समीकरण हे काहीसे एकरेषीय होते. ज्यामध्ये वॉल्टर कुटुंबासाठी हे सगळं करतो आहे आणि कुटुंबाला त्याची किंमत नाही असे चित्र उभे राहते. आणि या साऱ्यामुळे आपल्याला वॉल्टर टोकाच्या चुकीच्या गोष्टी करत असला तरी त्याच्याबद्दल एक 'सहानुभूती' निर्माण होते. नैतिकतेच्या चौकटीत जगणाऱ्या प्रेक्षकांना त्या चौकटी मोडणारा नायक आपला वाटतो. प्रेक्षक स्वतःला वॉल्टरमध्ये शोधतात. हेच ब्रेकिंग बॅडचे मोठं यश आहे आणि त्याच्या प्रसिद्धीचे कारण देखील.

ब्रेकिंग बॅड बाबत वर नमूद केलेली प्रत्येक बाब ओझार्कमध्ये वेगळ्या  पद्धतीने समोर येते. मार्टी बर्ड स्वतः श्रीमंत आहे. केवळ पैशाच्या मोहापायी त्याने ड्रग कार्टेलसाठी पैसे लॉन्डर करण्याचा निर्णय घेतला आहे. हे करताना त्याने बायकोची संमती घेतली आहे. कुटुंबाला महत्व देणे, स्त्रियांचा सन्मान करणे, त्यांना सारखे महत्व देणे या पुरुषत्वाच्या बदललेल्या संकल्पनांचे प्रतिबिंब आपल्याला मार्टीमध्ये दिसून येते. त्यामुळे तो त्याच्या कुटुंबापासून वॉल्टरप्रमाणे काही लपवत नाहीये. विंडीचे विवाहबाह्य संबंध आहेत हे मार्टीला माहीत असले आणि मार्टीचे ड्रग कार्टेलसाठी काम करणे विंडीला पटत नसले तरी ते दोघे एकमेकांचा आदर करतात. कुटुंबाला एकत्र ठेवणे आपली जबाबदारी मानतात. बर्ड कुटुंबातील दोन लहान मुले हे समजल्यावर भिन्न भूमिका स्वीकारतात. या साऱ्यामुळे कुटुंबामध्ये तणाव असले तरी ते ब्रेकिंग बॅडप्रमाणे एकरेषीय होत नाहीत. याशिवाय ओझार्कची कथा मार्टीचा प्रवास इतकी मर्यादित राहत नाही. ती स्वतःच्या कथेमध्ये तीन नायक निवडते. मार्टी, विंडी आणि रूथ लँगमोर. 

मार्टीने केवळ मोहापायी पैसे लॉन्डर करण्याचा निर्णय घेतल्याने वॉल्टरबद्दल वाटणारी टोकाची सहानुभूती आपल्याला मार्टीबद्दल वाटत नाही. मार्टी हुशार असला तरी वॉल्टरप्रमाणे तो प्रत्येक संकटावर मात करू शकत नाही. तो चुका करतो, घाबरतो, मोठमोठ्या संकटात सापडतो, त्यातून बाहेर येण्यासाठी दुसऱ्यांची मदत घेतो. या मदतनीसांपैकी सर्वात महत्वाची असते रूथ. रूथ ही ओझार्कमधील एक स्थानिक गुन्हेगार आहे. ती बर्ड कुटुंबाची रहिवासी नसली तरी मार्टीच्या आणि कथेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. तिची तुलना आपण ब्रेकिंग बॅडमधील जेसीसोबत करू शकतो. पण तिचा स्वभाव जेसीच्या अगदी टोकाचा आहे. ती शब्दशः मार्टीला 'मदत' करते. वॉल्टरप्रमाणे मार्टी या दुष्टचक्रात गुरफटण्याऐवजी यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि इथं विंडी बर्ड कथेची नायिका म्हणून समोर येते. विंडीच्या भूतकाळाला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यामुळे आपल्या क्षमतेचा वापर होत नाहीये असं तिला वाटत असतं. यातूनच ती मार्टीच्या कामामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात करते. आणि विंडीला मार्टीची पत्नी यापेक्षा मोठे आणि स्वतःचे असे अस्तित्व निर्माण होते. यातून मार्टी आणि तिच्या संबंधांमध्ये आणखी क्लिष्टता येते. आणि ओझार्कच्या कथेतील पदर वाढत जातात. 

 

 

ब्रेकिंग बॅड आणि ओझार्क मध्ये असलेले साम्य, फरक आणि त्याचा आधार घेऊन केलेली तुलना या दोन मालिकांपूर्ती मर्यादित राहत नाही. या दोन मालिका दोन वेगळ्या काळाचे, त्यावेळीच्या एकंदर कलाचे, प्रेक्षकांच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व करतात. ब्रेकिंग बॅडमध्ये दाखवली गेलेली एका नायका/न-नायकाच्या यशाची, दुष्टचक्रात गुरफटण्याची कथा आपल्याला सोप्रानोस, मॅडमेन अशा महत्वाच्या मालिकांमध्ये सुद्धा दिसून येते. तर ओझार्क मध्ये असलेले तीन नायक या प्रकाराला एक पायरी पुढे घेऊन जातात. त्यांच्यातील क्लिष्टता वाढते. त्यांच्यासारखं व्यक्तिमत्त्व आपल्या आजूबाजूला असू शकेल अशी शक्यता निर्माण होते. याची सुद्धा अनेक उदाहरणे सध्याच्या मालिकांमध्ये पाहायला मिळतील. बेटर कॉल सॉल, हाऊस ऑफ कार्ड्स, बोजॅक हॉर्समन, शार्प ऑब्जेक्ट्स, मिस्टर रोबोट, पिकी ब्लाइंडर्स इत्यादी. पण या मालिकांमध्ये असलेले नायक हे केवळ मालिकेचे नायक राहतात. या नायकाचे लार्जर दॅन लाईफ या चौकटीच्या पलीकडे जाऊन झालेले मानवीकरण हे त्यामागील महत्वाचे कारण. त्यांच्याबद्दल निर्माण होणारी सहानुभूती ही केवळ कथेपुरती मर्यादित असते. आपण त्यांना आपल्या आयुष्यातील नायक म्हणून स्वीकारत नाही. त्यांची प्रशंसा करत नाही. आपण स्वतःला त्यांच्यामध्ये दिसत असतो पण ते सत्य आपण स्वीकारत नाही.

हा बदलता कल नकळतपणे सॉफोक्लीझच्या आणि शेक्सपिअर यांच्या भिन्न मार्ग स्वीकारणाऱ्या शोकांतिकांकडे घेऊन जातो. सोफोक्लीझच्या (ग्रीक) शोकांतिकांमध्ये नायक हा चुकीचा नसतो. त्याच्या भोवतालची परिस्थिती चुकीची असते. आणि त्या परिस्थितीला बळी पडल्याने नायक चुका करायला सुरुवात करतो. ब्रेकिंग बॅड, सोप्रानोस या २०१०च्या दशकातील मालिकांमध्ये आपल्याला या विचारधारेचे प्रतिबिंब दिसून येते. यामुळे नायकाचे स्वतःच्या मूल्यांपेक्षा भोवतालाशी असलेलं द्वंद्व अधिक दिसून येते. याच्या अगदी उलट विचार शेक्सपिअरच्या (इंग्रजी) शोकांतिकांमध्ये दिसून येतो. इथं नायकच चूक करतो. त्याच्या चुकांचे खापर परिस्थितीवर नाही तर त्याच्या स्वभाव, इच्छा, अपेक्षा, आकांक्षा यांच्या माथी फोडले जाते. आणि स्वतःच्या चुकीची शिक्षा भोगत त्याला उर्वरित आयुष्य जगावे लागते. गेल्या दशकातील बहुतांशी मालिका या विचारधारेचा अवलंब करत आहेत असे दिसून येते. यामध्ये नायकाची मूल्ये जपण्याची धावपळ असते, नैतिकतेची चौकट मोडताना त्याला अतीव वेदना होतात. त्याचे सभोवतालच्या परिस्थितीपेक्षा स्वतःशी असलेले द्वंद्व मोठे असते. मालिकांमध्ये, तिच्या नायकांमध्ये दिसणारा बदल हा प्रशंसनीय आहे. नायकाच्या होणाऱ्या मानवीकरणामुळे त्यांना कमी प्रसिद्धी मिळत असली तरी त्यांची क्लिष्टता आणि गुणवत्ता या दोन्ही बाबी नक्कीच वाढल्या आहेत. आणि ओझार्क ही मालिका या बदलाचे मूर्तिमंत उदाहरण आहे.