Quick Reads

एमीझचे वारे: ब्रूकलीन ९९

आन्द्रे ब्रॉअरचं नामांकन

Credit : Fox

‘एनबीसी’च्या लोकप्रिय पोलिसी प्रक्रियात्मक नाट्य असणाऱ्या ‘ब्रुकलिन नाइन-नाइन’ला यावेळीही एमी पुरस्कारातील ‘कॉमेडी सिरीज’ श्रेणीमधून डावललं गेलं आहे. असं असलं तरी, अभिनेता आन्द्रे ब्रॉअरने चौथ्यांदा ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता’ या श्रेणीत नामांकन मिळवलं आहे. २०१४ ते २०१६ दरम्यान एमी पुरस्कारातील या श्रेणीत सलग तीनदा नामांकन मिळवणारा अभिनेता ठरूनही तीनही वेळा त्याचा पुरस्कार हुकला आहे. अशात चौथ्यांदा मिळालेलं नामांकन पाहता यावेळी का होईना, पण त्याला हा पुरस्कार मिळावा, अशी अपेक्षा आहे. साहजिकच हा लेख ‘ब्रुकलिन नाइन-नाइन’बाबत कमी आणि आन्द्रे ब्रॉअर या गुणी अभिनेत्याबाबत अधिक असणार आहे. 

 

 

मालिका ब्रुकलिनमधील ‘नाइन-नाइन’ या एका काल्पनिक पोलीस प्रीसिन्क्टमध्ये (स्टेशन) घडते. जवळपास सगळं कथानक वर्कस्पेसमध्ये घडत असल्याने कामाच्या ठिकाणी पात्रांमध्ये निर्माण होणारे निरनिराळ्या प्रकारचे नातेसंबंध हाताळले जातात. मालिकेचं स्वरूप पोलिसी प्रक्रियात्मक कारवायांच्या विडंबनाचं अधिक असलं तरी लवकरच कथानकात गंभीर आशय-विषय पहायला मिळतो. 

पहिल्या सीझनच्या सुरुवातीला ‘नाइन-नाइन’ या प्रीसिन्क्टमधील जुन्या कॅप्टन (स्टेशनमधील सर्वोच्चपद) निवृत्त होतो, आणि त्याच्याजागी नियुक्त झालेला रेमंड होल्ट (आन्द्रे ब्रॉअर) हा कर्तव्यदक्ष अधिकारी स्टेशनमध्ये येतो. या पात्राचा भूतकाळ फारच इंटरेस्टिंग असा आहे. होल्टने आपल्या तरुणपणी म्हणजे १९८७ मध्ये आपण समलिंगी असल्याचं जाहीर केलं होतं. ज्यामुळे तो न्यूयॉर्क पोलिस दलात, आपण समलिंगी असल्याचं जाहीर करणारा पहिला कृष्णवर्णीय अधिकारी ठरला होता. मात्र, वंशद्वेष आणि समलैंगिक व्यक्तींप्रतीचा द्वेष अशा दुहेरी द्वेषामुळे त्याला वेळोवेळी मानहानीकारक वागणूक सहन करावी लागली होती. त्याच्या कारकिर्दीतील यशाच्या अनेक संधी नाकारल्या गेल्या होत्या. या साऱ्या पार्श्वभूमीवर ‘नाइन-नाइन’मध्ये कॅप्टन म्हणून रुजू झाल्यानंतर गुन्ह्याचा दर आटोक्यात आणून आपली कार्यक्षमता दाखवणं हा त्याचा मुख्य उदेश असतो. मग त्याच्या नाइन-नाइनमधील टीमशी जुळवून घेण्याच्या घटनाक्रमापासून मालिकेची सुरुवात होते. 

‘नाइन-नाइन’मधील टीम ही बऱ्याचशा विक्षिप्त पात्रांनी बनलेली आहे. शोच्या सुरुवातीपासूनच या सर्वांची वैशिष्ट्यं अधोरेखित केली जातात (ती चांगली की वाईट हे ठरवणं फारसं अवघड नसतं). ‘डाय हार्ड’सारख्या हॉलिवूडच्या सिनेमांतील नायकांना आदर्श मानणारा जेक पराल्टा हा अल्लड आणि विक्षिप्त, मात्र कुशल पोलीस अधिकारी असतो. मात्र, सर्व नीतीनियम फाट्यावर मारून आपलं काम करणाऱ्या अप्रौढ पराल्टाचा प्रवास हा लवकरच अधिक प्रौढ आणि परिपक्व माणूस बनण्याच्या दिशेने होतो. पराल्टाशी असलेल्या मैत्रीपोटी काहीही करायला तयार असणारा चार्ल्स बॉयल त्याच्याइतकाच विक्षिप्त आहे. कुठल्याही संभाषणाला एम्बॅरॅसिंग बनवण्यात त्याचा हातखंडा आहे. एमी सान्तियागो ही (अति)कर्तव्यदक्ष, नियमांना धरून चालणारी महिला पोलीस अधिकारी आहे. रोजा डियाझ स्वतःभोवती गूढतेचं वलय बाळगणारी, कणखर पोलीस अधिकारी आहे. या सर्वांना वरिष्ठ असलेला सार्जंट टेरी जेफर्ड्स हा पीळदार शरीरयष्टी असलेला, पण मनाने मृदू असलेला कृष्णवर्णीय अधिकारी आहे. जिना लेनेटी, स्कली आणि हिचकॉक ही कुठल्याही सिटकॉममध्ये असतात तशी निव्वळ विनोदनिर्मितीकरता अस्तित्वात असणारी अतिविक्षिप्त पात्रं आहेत. 

 

 

परस्परविरोधी स्वभाव आणि कार्यपद्धती असलेल्या व्यक्तिरेखा एकत्र येणं कुठल्याही वर्कस्पेसमधील सामान्य घटना असते. पॉप कल्चरचा प्रभाव असलेला पराल्टा आणि क्लासिकल संगीत ऐकणारा होल्ट अशा व्यक्तिरेखा इथेही एकत्र येतात. कॅप्टन होल्टचं नियम पाळून चालणं, साहजिकच जेकच्या स्वैर स्वभावाच्या विरुद्ध असतं. अगदी एमी सान्तियागो आणि जेक पराल्टादेखील परस्परविरोधी स्वभाव असलेल्या व्यक्तिरेखा आहेत. मात्र, ‘ब्रुकलिन नाइन-नाइन’ लवकरच या वरवरच्या संघर्षाच्या पलीकडे जाते. इथे हा संघर्ष पात्रांना भावनिक, मानसिक पातळ्यांवर जवळ आणण्यासाठी आणि हे करत असतानाच विनोदनिर्मितीसाठी वापरला जातो. मुळात इथला सेट अपच अतिशयोक्तीपूर्ण असल्याने इथली पात्रंदेखील तशीच असणं काहीसं स्वाभविक आहे. मात्र, लवकरच ते या ठराविक वैशिष्ट्यांच्या आणि कुठल्याही इतर एखाद्या सिटकॉममधील ठोकळेबाज व्यक्तिरेखांच्या साच्यांमधून बाहेर पडतात. या साऱ्या व्यक्तिरेखा भावनिक, मानसिक पातळीवर विकसित होण्यात कॅप्टन रेमंड होल्ट या पात्राची भूमिका महत्त्वाची आहे. कारण, संपूर्ण मालिकेत निर्विकार चेहरा घेऊन वावरणारा रेमंड होल्ट हा इथल्या पात्रांना समजून घेऊन त्यांना त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांनुसार वागणूक देत त्यांची कार्यक्षमता वाढेल असं पाहतो. 

जेक पराल्टाने लहानपणी आपल्या आई-वडिलांचा घटस्फोट होताना आणि त्यांचं नातं संपुष्टात येताना पाहिलं होतं. व्यभिचारी वडिलांमुळे त्याच्या मनावर झालेल्या परिणामांमुळे तो सतत ‘फादर फिगर’च्या शोधात असतो. या सगळ्या भावनिक गुंत्याकडे दुर्लक्ष करण्याचा त्याने शोधलेला उपाय म्हणजे कुठलीही गोष्ट गांभीर्याने न घेता टिंगलटवाळी करणं हा होय. (हे काहीसं ‘फ्रेंड्स’मधील चॅन्डलर बिंग या व्यक्तिरेखेच्या जवळ जाणारं कसं आहे हे पहावं.) त्यामुळे कणखर नि निर्विकार असणारा, मात्र खोलवर कुठेतरी सर्वांशी आपुलकीने वागणारा रेमंड होल्ट हा त्याच्या आयुष्यातील फादर फिगरची उणीव भरून काढतो. 

जिची ‘फ्रेंड्स’मधील मोनिकाशी नेहमी तुलना केली जाते ती एमी सान्तियागो प्रत्येक गोष्टीत अव्वल कामगिरी करणारी असते. नियम पाळणं, वेळेचं काटेकोर नियोजन आणि पालन करणं, इत्यादी गोष्टींतून तिला आनंद मिळतो. बाइन्डर्स, नियमावल्या, इत्यादींवर तिचं विशेष प्रेम आहे. असं असलं तरी तिलाही मार्गदर्शकाची गरज असते. सार्जंट टेरी जेफर्ड्सबाबतही हेच घडतं. तो सर्वांशी प्रेमाने वागणारा, आणि प्रीसिन्क्ट, त्यामधील टीमवर आपल्या दोन लहान मुलींइतकंच प्रेम करणारा आहे. त्याच्यामध्ये नेतृत्त्वगुण असले तरी वेळप्रसंगी कठोर पावलं उचलणं, कामाच्या तणावाखाली असताना काम करणं यात येणाऱ्या अडचणींबाबत त्याला मार्गदर्शनाची गरज भासते. होल्ट त्याच्यातील नेतृत्त्वगुण हेरून हेदेखील काम पूर्णत्वास नेतो. या पात्रांमधील संबंधांतून अमेरिकन समाजात आणि त्यातही पुन्हा पोलिस यंत्रणेत कृष्णवर्णीय व्यक्तींना मिळणाऱ्या वागणुकीबाबत विस्तृत भाष्य येतं. 

 

 

‘ब्रुकलिन नाइन-नाइन’मधील पात्रं, इतर लोकप्रिय चित्रपट-मालिकांमधून कुठल्याही लिंग किंवा वर्ण असलेल्या व्यक्तीविषयी निर्माण झालेल्या, पूर्वकल्पित मतं आणि कल्पनांना छेद देतात. शोमध्ये आफ्रिकन-अमेरिकन पात्रांसोबतच इतरही वंशाची पात्रं येतात. एमी सान्तियागो ही क्युबन-अमेरिकन, तर रोझा डियाझ हे स्पॅनिश-अमेरिकन आहे. इथली स्त्री-पात्रं वेळोवेळी पुरुषप्रधान समाजात वाढणं म्हणजे काय असतं याबाबत बोलताना दिसतात. वर्कप्लेसमधील लैंगिक शोषणासारखे गंभीर मुद्देही येतात. कामाबाबत समान संधी न मिळण्याच्या घटनांचा उल्लेख स्त्री आणि समलिंगी, दोन्ही व्यक्तिरेखांच्या अनुषंगाने येतो. 

चार्ल्स बॉयल, रोझा डियाझदेखील रेमंड होल्टकडे एक अथॉरिटी फिगर म्हणून पाहतात. त्याचा सल्ला, त्याचं मार्गदर्शन त्यांना महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे एका एपिसोडमध्ये आपली प्रेयसी होल्टला आवडेल की नाही, याची चिंता रोझाला सतावत असते. आणि समजा ती त्याला आवडली नाही, तर ती आपल्यालायक आहे की नाही, यावर शंका घ्यावी इतपत महत्त्व होल्टच्या मताला असतं. त्यामुळे मालिकेच्या सुरुवातीला अती-नियंत्रित, कुठल्याही भावनांचं अस्तित्त्व न दाखवणाऱ्या अपटाईट कॅप्टन होल्टचा प्रवास प्रीसिन्क्टमध्ये सर्वांशी निरनिराळ्या पातळ्यांवर जोडल्या जाणाऱ्या व्यक्तिरेखेपर्यंत कसा होतो, हे पाहणं फारच इंटरेस्टिंग आहे. 

साहजिकच रेमंड होल्टला कम्पॅशनेट आणि एम्पथेटिक रुपात समोर आणण्यात ही भूमिका साकारणारा आन्द्रे ब्रॉअर इथे महत्त्वाचा ठरतो. त्याने ऐंशीच्या दशकात ‘होमसाईड: लाईफ ऑन द स्ट्रीट’सारख्या पोलिसी कारवायांकडे गंभीररीत्या पाहणाऱ्या शोमध्ये त्याने मुख्य भूमिका निभावली होती. अशात तीसेक वर्षांनंतर सिटकॉममध्ये काम करणं आणि विनोदी भूमिका करणाऱ्या अभिनेत्यांची ऑनसांब्ल कास्टमध्ये प्रभावी ठरणं, अशा दोन्हीही गोष्टी तो करताना दिसतो. कॅप्टन होल्ट आणि त्याचा जोडीदार केव्हिन म्हणजे अगदीच निर्विकार, धीरगंभीर आणि संयत व्यक्तिरेखा आहेत. या दोघांव्यतिरिक्त येणारी समलिंगी पात्रंदेखील अशाच प्रकारची आहेत. त्यामुळेच मालिकेला तिच्यातील समलिंगी व्यक्तिरेखांच्या उत्तम चित्रणासाठी वेळोवेळी गौरवलं गेलं आहे. मुळात या पात्रांच्या अशा समर्पक चित्रणामुळेच आन्द्रे ब्रॉअरने ही भूमिका स्वीकारली. कारण, एरवीही तो कृष्णवर्णीय व्यक्तिरेखांचं स्टीरियोटिपीकल चित्रण करणाऱ्या भूमिका साकारणं नाकारताना दिसतो. ‘थीफ’सारखी मिनी-सिरीज किंवा ‘हाऊस एम. डी.’मध्ये त्याने साकारलेल्या भूमिकांमध्येही हे दिसून येतं. 

या वर्षी ‘ब्रुकलिन नाइन-नाइन’करिता ब्रॉअरला मिळालेलं नामांकन हे त्याचं या सिरीजसाठीचं चौथं, तर एकुणात अकरावं नामांकन आहे. कागदावर एका इंटरेस्टिंग प्रकारे लिहिल्या गेलेल्या पात्राला पडद्यावर तितक्याच समर्पकरीत्या उभं करणाऱ्या ब्रॉअरला या वेळी का होईना, पण एमी मिळावं ही इच्छा यातूनच आलेली आहे. अर्थात त्याने यापूर्वीही दोन एमी मिळवले असले तरी ‘ब्रुकलिन नाइन-नाइन’करिता हा पुरस्कार मिळाल्यास तो त्याचा जास्त योग्य सन्मान असेल.