Quick Reads

एमीझचे वारे: बेटर कॉल सॉल

इंडी जर्नल आणि सिनेमा अँड संयुक्त लेखमालिका.

Credit : नेटफ्लिक्स

-आशुतोष जरंडीकर

 

“Hi, I'm Saul Goodman. Did you know you have rights, Constitution says you do. And so do I! I believe until proven guilty, every man, woman and child in this country is innocent. And that's why I fight for you ABQ. Better Call Saul.” 

अल्बकर्कीच्या नागरिकांना संबोधणाऱ्या ह्या जाहिरातीमार्फत सॉल गुडमनची आणि आपली ब्रेकिंग बॅड मालिकेमध्ये ओळख झाली. एखादा वकील स्वतःची अशा पद्धतीने जाहिरात करतो हे पाहून सगळ्यांचे लक्ष आपसूकच सॉलकडे वळले. कोर्टाच्या बाहेर काम करणारा हा वकील ब्रेकिंग बॅड मालिकेच्या तणावपूर्ण वातावरणात एक हलकंफुलकं पात्र म्हणून समोर आला. आणि ह्या सॉल गुडमनने खूप कमी वेळात प्रसिद्धी मिळवली. 

'स्पिडी जस्टीस' अशी गुडमनची असलेली ओळख, त्याचा गोष्टींकडे पाहण्याचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा दृष्टिकोन, त्याचं उथळ सादरीकरण, भडक पेहराव, त्याच्या वावरामुळे प्रेक्षकांना मिळणारा कॉमिक रिलीफ हा जरी सॉल गुडमनचा वर्तमान असला तरी ह्या अतरंगी पात्राचा भूतकाळ असाच होता का असा विचार ब्रेकिंग बॅडचा सर्वेसर्वा 'व्हीन्स गिलीगन'च्या मनात डोकावला. त्याने खास ह्या एका पात्राभोवती मालिका निर्माण करायचं ठरवलं. आणि ती मालिका म्हणजे 'बेटर कॉल सॉल'.

व्हिंस गिलिगनने ब्रेकिंग बॅड मालिकेचे संपूर्ण कथानक केवळ दोन वर्षांच्या कथेत डिझाईन केलं होतं. पण बेटर कॉल सॉलचे कथानक ब्रेकींग बॅडच्या कथानकाच्या सहा वर्षे आधी सुरू होते आणि अर्थातच इथे सहा वर्षांची कथा सांगितली आहे. ब्रेकिंग बॅडमध्ये दाखवलेले विश्व हे ड्रग, ड्रगचा व्यवसाय करणारे लोक, त्यांच्यातील संघर्ष, ड्रगचे सेवन करणारे लोक, त्यांचे उध्वस्त झालेले आयुष्य, ड्रग माफियांचा पाठलाग करणारे डीइएचे खाते याच्या भोवताली फिरते. 

या सर्वच गोष्टी बेटर कॉल सॉलमध्ये सुद्धा येतात. पण ह्या साऱ्यात एक मोठी आणि महत्वाची भर पडते ती म्हणजे न्यायव्यवस्थेची. त्या अनुषंगाने अल्बकर्कीमधील लॉ-फर्म, त्यांच्यातील संघर्ष, कोर्ट-कचेऱ्या, वेगवेगळे खटले, न्याय ही व्यक्तिपरत्वे बदलणारी संकल्पना अशी एक वेगळी आणि इंटरेस्टिंग बाजू आपल्याला माहीत असलेल्या ब्रेकिंग बॅडच्या विश्वाशी जोडली जाते. शिवाय ब्रेकिंग बॅडमध्ये वॉल्टर व्हाइट हा कथेचा एकच नायक होता. आणि संपूर्ण मालिकेत त्याचा प्रवास दाखवला होता. तर बेटर कॉल सॉलमध्ये दोन नायक निवडले आहेत. आणि त्यांचा समांतर प्रवास दाखवला आहे. यामुळे कथानकातील क्लिष्टता आणखी वाढते. 

 

 

ब्रेकिंग बॅड मालिका सुरू होते तेंव्हा काही गोष्टी आधीच माहीत असतात. सालामांका आणि गस फ्रिंग हे अल्बकर्कीमधील दोन मोठे व्यावसायिक आहेत. एका बाजूला सालामांकाचा व्यवसाय दिवसेंदिवस कमी होत आहे. तर दुसरीकडे फ्रिंगचे व्यापारावर वर्चस्व वाढत आहे. गस फ्रिंगच्या यशामागे मोठा हात आहे तो ‘माईक अरम्ह्ंट्रॉट’चा. तो फ्रिंगच्या खास विश्वासातील माणूस आहे. ह्या सर्वांच्या विरोधात उभा आहे हँक श्रेडर. 

हँक पोलीस डिपार्टमेंट मोठ्या पदावर काम करत आहे. आणि अल्बकर्कीमधील ड्रगच्या व्यापाराचा तपास करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. आणि ह्या सगळ्या समीकरणात उतरतो सॉल गुडमन, तो गुन्हेगाराना न्याय मिळवून देणारा वकील म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या नमूद केलेल्या बाबी लक्षपूर्वक पाहिल्या तर त्या मुख्यतः न्यायव्यवस्था आणि ड्रगचा व्यापार या दोन भिन्न कक्षांच्या अंतर्गत येतात हे आपल्या लक्षात येते. ड्रगचा व्यापार हा ब्रेकिंग बॅडमध्ये आला होता. 

तर बेटर कॉल सॉलमध्ये न्यायव्यवस्थाही तेवढीच महत्वाची आहे. पण बेटर कॉल सॉल केवळ न्यायाची बाजू दाखवून थांबत नाही. ती न्यायव्यवस्थेचा प्रतिनिधी म्हणून सॉलला (जिमी मिकगील) उभी करते तर ड्रगच्या व्यापाराशी निगडीत असणारा गस फ्रिंगचा उजवा हात असणाऱ्या ‘माईक अरम्ह्ंट्रॉट’ला दुसऱ्या बाजूला उभी करते. अशा प्रकारे बेटर कॉल सॉलमध्ये दोन वेगवेगळ्या क्षेत्रातले नायक एकमेकांसमोर उभे राहतात. 

जिमी मिकगील हे सॉल गुडमनचं खरं नाव! आणि ही मालिका म्हणजे त्याचा सॉल गुडमन होण्यापर्यंतचा प्रवास आहे. सुरुवातीला जिमी अल्बकर्कीमध्ये एक वकील म्हणून स्वतःचा जम बसवण्याचा प्रयत्न करतो. तेंव्हा तो त्याचा भाऊ चार्ल्सच्याच फार्ममध्ये क्लार्क म्हणून काम करत असतो. तिथे त्याला वकील म्हणून काम करायचं आहे पण सुरुवातीला ते शक्य होत नाही. (तिथेच त्याला किम वेक्सलर ही त्याची गर्लफ्रेंड भेटते.) 

जिमीचा भाऊ चार्ल्स मिकगील हे अल्बकर्कीच्या न्यायव्यवस्थेतील मोठं प्रस्थ आहे. चार्ल्स आणि हॉवर्ड हॅमलिन ह्या त्याच्या मित्राने मिळून 'एचएचएम' नावाची अल्बकर्कीमधील मोठी लॉ-फर्म सुरु केली होती. पण काही कारणाने चार्ल्सचं ऑफिसमध्ये येणं बंद होतं आणि हॉवर्ड जिमीलाही तिथून काढून टाकण्याचा प्रयत्न करायला लागतो. इथून खरा जिमीचा संघर्ष सुरु होतो आणि ह्या पार्श्वभूमीतून जिमी मिकगीलचा सॉल गुडमनकडे जाण्याचा प्रवास सुरु होतो. 

 

 

ब्रेकिंग बॅडमध्ये सुद्धा रसायनशास्त्र शिकवणारा वॉल्टर व्हाइट ते ड्रगचा व्यापार करणारा हाईजनबर्ग असा प्रवास आहे. पण वॉल्टरचं बदलतं रूप आपल्याला पहिल्या एक-दोन एपिसोडमध्येच लक्षात येतं. बेटर कॉल सॉलमध्ये हा प्रवास मोठा आहे, सावकाशपणे उलगडणारा आहे आणि सर्वात महत्वाचा म्हणजे खडतर आहे. जिमीचा प्रवास पाहून Life is a tragedy to those who feel. And a comedy to those who think या वाक्याचा खरा अर्थ समजतो.

कथेचा दुसरा नायक आहे माईक अरम्ह्ंट्रॉट. ब्रेकिंग बॅडमध्ये माईक आपल्याला पहिल्यांदा दिसतो तेंव्हा तो सॉलच्या सांगण्यावरून जेस्सीला मदत करायला आलेला असतो. शिवाय गस फ्रिंगचा व्यापार सुरळीत चालण्याची मदार देखील त्याच्यावरच असते. पण बेटर कॉल सॉल सुरू होते तेंव्हा माईक नुकताच फिलाडेल्फिया मधून अल्बकर्कीमध्ये आलेला आहे. एका बाजूला त्याच्यावर स्वतःच्या मुलाच्या मृत्यूचे खूप मोठे ओझे आहे, तर दुसऱ्या बाजूला सून आणि नात यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आहे. 

सून आणि नात यांच्या सांभाळासाठी त्याला अधिक पैशांची गरज आहे. यासाठी तो छोटीमोठी अवैध कामं स्वीकारत आहे. मुलाच्या मृत्यूचे ओझे आणि सून-नात यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी अशी दुहेरी कसरत करत तो कधीही न संपणाऱ्या अल्बकर्कीच्या ड्रग व्यापाराच्या गडद विश्वामध्ये स्वतःच्या मर्जीने शिरत आहे.

 

 

जिमी मॅकगिल आणि माईक अरम्ह्ंट्रॉट हे विरुद्ध स्वभावांचे, विरुद्ध पार्श्वभूमीचे, विरुद्ध कार्यक्षेत्रातील नायक निवडून, त्यांचा प्रवास दाखवत व्हीन्स गिलीगन बेटर कॉल सॉलची कथा गुंफत जातो. यांच्या कार्यक्षेत्राची वर्तुळे भिन्न असली तरी ती अनेकदा एकमेकांना छेदत राहतात आणि मालिकेचे कथानक पुढे सरकत राहते. ह्या कथानकातील बहुतांशी प्रत्येक पात्राचा शेवट ब्रेकिंग बॅड पाहिल्याने प्रेक्षकांना माहीत असतो. त्यामुळे ह्या पात्रांबद्दल, कथानकाबद्दल असणारी उत्सुकता कायम ठेवणे हे अत्यंत अवघड काम होतं. आणि असं असूनसुद्धा बेटर कॉल सॉल पाहताना प्रत्येक पात्राबद्दल वाटणारी उत्सुकता, नवीन पात्रांचं जुन्या पात्रांइतकच मनाला भिडणं, प्रत्येक प्रसंग पाहताना जागृत होणारे कुतूहल हे सारंच कौतुकास्पद आहे. आणि त्यामुळेच व्हीन्स गिलीगन ब्रेकिंग बॅडच्या यशाची पुनरावृत्ती करण्यात समर्थ ठरतो. 

ब्रेकिंग बॅड तशी क्राईम-थ्रिलर होती. त्या वेगाने म्हणा किंवा उत्सुकता वाढवणाऱ्या जॉनरमुळे ती प्रेक्षकांना आवडण तसं सोपं होतं. बेटर कॉल सॉल मात्र प्युअर ड्रामाकडे झुकते. आणि तरीही ती हे यश मिळवते. म्हणूनच मला म्हणावसं वाटतं की, ब्रेकिंग बॅड जर एखादी वाईल्ड बियर आहे, तर बेटर कॉल सॉल संथपणे चढत जाणारी दर्जेदार वाईन आहे.