Quick Reads

ईब आले ऊ: व्यवस्थेच्या भयावह अमानुषतेच्या बळी ठरलेल्या नागरिकांची कथा

स्पॉटलाईट सदर

Credit : Na Ma Productions

शिक्षण, नोकरी आणि इतर सोयीसुविधा तसेच आर्थिक, सामाजिक स्थिती आणि राहणीमान उंचावण्याच्या अपेक्षांमुळे शहरं आणि महानगरांमध्ये स्थलांतर केलेले मजूर हा मुद्दा काही आपल्यासाठी नवीन नाही. मात्र, स्थलांतरितांच्या प्रश्नातून निर्माण होणारं लोकसंख्येचं एककेंद्रीकरण थांबू शकेल असं काही करण्यात आपली व्यवस्था वेळोवेळी अपयशी ठरलेली आहे. ज्याचं कारण बेरोजगारीच्या समस्येत आणि शहरीकरणात दडलेलं आहे. गेल्या काही महिन्यांत कोरोनाच्या उद्रेक झाला. त्यानंतर शहरातील स्थलांतरित कामगार आणि मजूर मोठ्या संख्येने आपल्या मूळ गावी परतत असल्याची दृश्यं आपण पाहिली. आता हा समकालीन संदर्भ लक्षात घेतला तर प्रतीक वत्स दिग्दर्शित ‘ईब आले ऊ’ या चित्रपटातील आशय-विषय अधिक प्रखर बनतो. कारण, इथे असलेला विषयही प्रामुख्याने याच समस्येभोवती फिरणारा आहे. 

 

 

‘ईब आले ऊ’ हा आपल्या व्यवस्थेकडे एका चित्तवेधक दृष्टिकोनातून पाहतो. हे करत असताना दिल्लीमध्ये उभ्या राहिलेल्या एका वेगळ्याच व्यवसायाकडे आणि व्यवस्थेकडे पाहिलं जातं. हा व्यवसाय आणि ही व्यवस्था दिल्लीमध्ये माकडांनी मांडलेल्या उच्छादाभोवती फिरणारी आहे. आता ही समस्या जरी अगदीच विशिष्ट अशा शहरातील असली तरी त्याभोवती उभारलं जाणारं कथानक आणि नाट्य हे तितकंच वैश्विक प्रकारचं आहे. कारण, या नाट्यामध्ये एक समकालीन व्यवस्था उभारली गेल्याचं दिसतं. सोबतच ही व्यवस्थादेखील कशा प्रकारे शोषण करणारी ठरू शकते, याकडे अगदी जवळून पाहिलं जातं. 

ही व्यवस्था म्हणजे काय तर, माकडांपासून होणारा उपद्रव टाळण्यासाठी आणि त्यांना पळवून लावण्यासाठी सरकार काही माणसांची नियुक्ती करतं. मग यात कामाचं कंत्राट दिलं जाण्यापासून ते या स्तरांतील शेवटचं टोक असलेल्या, माकडांना प्रत्यक्ष पळवून लावणाऱ्या व्यक्तींपर्यंत सर्व घटकांकडे पाहिलं जातं. अंजनी (भारद्वाज) हा तरुण दिल्लीमध्ये स्थलांतर करून आलेला आहे. त्याच्या बहिणीचा पती, (शशी भूषण) त्याला अशाच एका कंत्राटदाराकडे कामाला लावतो. मात्र, मुळातच या कामात रस नसलेल्या अंजलीची विफलता आणि निराशा उत्तरोत्तर वाढत जाते. अगदी माकडं पळवून लावण्याच्या कामासाठी लागणारं कसबही त्याच्याकडे नाही. जमेल त्या पद्धतीने मिळालेलं काम करणं आणि ते टिकवून ठेवण्याची अविरत धडपड करणं इतकंच काय ते त्याच्या हातात उरतं. त्यासाठी तो जे काही करतो त्या सगळ्या प्रकरणाला व्यंगाचं रूप असलं तरी हा विनोद बोचरा आणि अंगावर येणारा आहे. इथे एकीकडे व्यवस्थेपुढे हतबल होणारे अंजनीसारखे नागरिक दिसतात, तर दुसरीकडे त्यांचा फायदा घेणारे, एका अर्थी शोषण करणारे कंत्राटदार आणि अधिकारी दिसतात. त्यानिमित्ताने समकालीन व्यवस्थेकडे अगदी परखडपणे पाहिलं जातं. शहरात स्थलांतरित होणाऱ्या मजूराला परिस्थितीमुळे मिळेल ते काम करावं लागणं, ते करायचं नसेल तर लागणाऱ्या कौशल्यांचा किंवा शिक्षणाचा अभाव असणं असे बरेचसे अंतःप्रवाह त्यामागे आहेत. 

 

 

यासोबतच समकालीन राजकीय, सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणं आणि निरीक्षणं नोंदवणं हेही इथे कायम घडतं. अंजनीच्या कामाकडे काहीतरी हलक्या दर्जाचं काम म्हणून पाहणारी व्यक्ती माकडाची हनुमान जी म्हणून पूजा करताना दिसते. इतर ठिकाणीदेखील अलीकडील काळात धार्मिक रितीरिवाज आणि कृतींना प्राप्त झालेलं अनन्यसाधारण महत्त्व दिसत राहतं. यावेळी मुख्य पात्राचं नाव ‘अंजनी’ असल्याचं लक्षात घेतलं तर ‘अंजनी सूत’चा संदर्भ लावणं फारसं अवघड जाणार नाही. याखेरीज इथे वेळोवेळी राजकारणावर टिप्पण्या केल्या जातात. व्यवस्थेतील दोष स्वीकारून त्याबाबत परीक्षण करण्याऐवजी त्यांवर पांघरूण घालण्याचा सोयीस्कर मार्ग अंगिकारला जाण्याचे प्रसंगही इथे कमी नाहीत. दांभिक प्रवृत्ती बाळगून असलेले तथाकथित उच्च वर्गातील नागरिकांचं दर्शनही वेळोवेळी होत राहतं. 

हे सगळं घडत असताना वैयक्तिक पातळीवर अंजनी या पात्राची हतबलता, विफलता वेगवेगळ्या प्रकारे पडद्यावर समोर मांडली जाते. घडणाऱ्या घटनांना त्याने दिलेला प्रतिसाद हा अस्वस्थ करणारा ठरतो. त्याच्यासोबत किंवा इतरही काही पात्रांना जी वागणूक दिली जाते ती साधारण माणूस म्हणून आपल्या नैतिक मूल्यांचा इतका ऱ्हास झाला आहे का असा प्रश्न निर्माण करणारी ठरते. त्याचे त्याच्या बहिणीसोबत (नूतन सिन्हा) असलेले संबंध कालानुरूप कसे बदलत जातात आणि त्यात त्याच्या कामातील तणावाचा किती भाग असतो हे पाहिलं तरी ही व्यवस्था आणि व्यवसाय त्याच्या मनावर किती परिणाम करतो हे लक्षात येते. तिच्या नवऱ्याबाबतीतही कमी अधिक फरकाने हेच घडतं. महिन्याला हजार रुपये इतकी पगारवाढही त्यांच्या चेहऱ्यावर स्मित आणते खरी. मात्र, त्या हजार रुपयांपोटी कराव्या लागणाऱ्या कामातून येणारा अतिरिक्त ताणही येतो. पुन्हा एकदा वर्गवाद आणि आर्थिक मोबदल्यापोटी काहीही करण्याची तयारी ही या व्यवस्थेचीच अपत्यं यामागे दिसून येतात. 

केन लोच या दिग्दर्शकाच्या ‘आय, डॅनियल ब्लेक’ (२०१६) नावाच्या चित्रपटात व्यवस्थेपुढे हतबल होणारा एक नागरिक दिसला होता. तिथे चित्रपटभर एका विलक्षण संयत अशा निराशावादाचं, अगम्य खिन्नतेचं अस्तित्त्व होतं. इथे व्यवस्थेवरील टीका असली तरी ती लोचच्या चित्रपटाहून सर्वस्वी वेगळी, अधिक प्रखर आणि अंगावर येणारी आहे. (तिच्या या अंगावर येण्यात बिग्य्ना भूषण दहालच्या ध्वनी आरेखनाचाही तितकाच महत्त्वाचा वाटा आहे.) ‘आय, डॅनियल ब्लेक’ आठवण्यामागील कारण म्हणजे या दोन्ही चित्रपटांमध्ये अस्वस्थ करण्याची एक विलक्षण ताकद आहे. याखेरीज दोन्हीकडे असलेली बेरोजगाराची समस्यादेखील समान आहेच, भलेही त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन भिन्न असला तरीही. व्यवस्थेच्या भयावह अमानुषतेच्या बळी ठरलेल्या नागरिकांची कथा सांगणारे हे दोन्ही चित्रपट म्हणजे वेळात वेळ काढून आवर्जून पाहावेत असेच आहेत. 

ता. क.

१. ‘वुई आर वन’ चित्रपट महोत्सवाचा भाग असलेला ‘ईब आले ऊ’ २९ मे रोजी युट्युबवर स्ट्रीम झाला असला तरी सध्या पाहण्यास उपलब्ध नाही.

२. ‘आय, डॅनियल ब्लेक’ नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.