Americas

डॉनल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीसाठी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला: डॉ फौची

अमेरिकन प्रशासनाचे आघाडीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अँथनी फौची यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारमोहीमेवर टीका केली आहे.

Credit : Getty/W McNamee

अमेरिकन प्रशासनाचे आघाडीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अँथनी फौची यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारमोहीमेवर टीका केली आहे. ट्रम्प यांचा प्रचार करणाऱ्या टीमनं बनवलेल्या व्हिडिओत फौची यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचं समोर आलं आहे. ट्रम्प यांच्या निवडणूक कॅम्पेनसाठी बनवण्यात आलेल्या या व्हिडीओत फौची ट्रम्प यांनी कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात उत्तम काम केल्याचं बोलताना दिसत आहेत.

"मी मागच्या ५ दशकांपासून आरोग्य क्षेत्रात काम करत आहे. मागच्या ५० वर्षांच्या कारकीर्दीमध्ये मी कधीही कुठल्याही राजकीय उमेदवाराचा प्रचार करणं कटाक्षानं टाळल़ं आहे. ट्रम्प यांच्या प्रचाराच्या व्हिडिओत माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलेला असून तो वापरण्याआधी माझी परवानगी सुद्धा घेतली गेली नाही," असं म्हणत फौची यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या इलेक्शन कॅम्पेनवर नाराजी व्यक्त केली.

कोरोनावरील उपचार घेऊन ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर आठवडाभरानं हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आलाय. ३० सेकंदाच्या या व्हिडिओत ट्रम्प यांच्या नेतृत्वगुणांचं गुणगाण करण्यात आलेलं आहे. यात फौचीसुद्धा 'डोनाल्ड ट्रम्प उत्तम काम करत आहेत', असं बोलताना दिसतात. प्रत्यक्षात मार्च महिन्यात फॉक्स टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत हे शब्द फौची यांनी व्हाईट हाऊसमधल्या डॉक्टरांच्या टीमसाठी वापरले होते. या व्हिडिओत व्हाईट हाऊसमधल्या डॉक्टरांऐवजी फौची डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक करत असल्याचं दाखवून लोकांची दिशाभूल करण्यात आली आहे.

कोरोनावरून डोनाल्ड ट्रम्प आणि अँथनी फौची यांच्यात मतमतांतरे असल्याचं मागच्या काही महिन्यापासून दिसून आलेलं आहे. कोरोनाला किरकोळ आजार म्हणून मोडीत काढणाऱ्या राष्ट्राध्यक्षांवरची आपली नाराजी फॉचींनी वेळोवेळी दर्शवली होती. अमेरिका कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत जगात आघाडीवर असून ट्रम्प सरकारने या काळात हाताळलेल्या परिस्थितीवर तिथली बहुतांश जनताही नाराज आहे. याचं प्रतिबिंब म्हणून अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुका मोजून ३ आठवड्यांवर आलेल्या असताना रेटिंग्समध्ये जो बायडन यांनी ट्रम्पना पछाडत आघाडी घेतली आहे. 

याउलट वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून कोरोनाबद्दल सातत्यानं अमेरिकन जनमानसात जागरूकता निर्माण करणाऱ्या ट्रम्प यांच्याच प्रशासनातील डॉक्टर फौची यांची लोकप्रियता मागच्या काही महिन्यात वाढताना दिसते. डॉक्टर फौची यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा निवडणुकीत फायदा घेण्याच्या हेतूनंच ट्रम्प यांच्या इलेक्शन कॅम्पेन गटानं फौची यांच्या 'त्या' विधानाचा विपर्यास केला. मात्र, यावर वेळीच दक्षता घेत डॉक्टर फॉची सदरील प्रकाराचा निषेध केल्यानं डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या इलेक्शन कॅम्पेनची चलाखी उघडी पडली.