Quick Reads

दिनू रणदिवे नावाचं पत्रकारितेचं विद्यापीठ

दिनू रणदिवेंचं नुकतंच निधन झालं.

Credit : इंडी जर्नल

- संध्या नरे-पवार

 

वर्तनामपत्रांची रचून ठेवलेली चळत, त्यांची बहुतेक पानं जीर्ण झाली आहेत, पिवळी पडली आहेत, तरीही ती तिथे आहेत. एकावर एक. जशी आहेत तशी. जपलेली. या नेपथ्यात काहीच बदल नाही. वर्षानुवर्ष. अखेरपर्यंत.

नेमका काय अर्थ होतो याचा?

वीसेक वर्षांपूर्वी दिनू रणदिवेंच्या घरी पहिल्यांदा गेले होते त्यावेळी वर्तमानपत्रांचे हे मनोरे पाहिले होते. रणदिवेंच्या मृत्यूनंतर आलेल्या लेखांमधूनही अनेकांनी त्यांच्या घरी असलेल्या या वर्तमानपत्रांच्या उंच ढिगांचा उल्लेख केला. पत्रकाराच्या घरच्या वर्तमानपत्राच्या ढिगांचा नेमका अर्थ काय? पत्रकाराच्या घरची वर्तमानपत्रं कधीच जुनी होत नाहीत, पानं पिवळी पडली तरी त्यांची कधीच रद्दी होत नाही, हे उत्तर मला खुद्द रणदिवेंच्या घरच्या त्या ढिगानेच पहिल्या भेटीच्या वेळी दिलं होतं. आता पुन्हा विचार करताना जाणवत गेलं की, पत्रकाराच्या घरचा वर्तमानपत्राचा ढिग हे संदर्भ साहित्य असतं. त्यात भूतकाळ, घडलेल्या घटना जिवंत असतात. वर्तमानकाळात घडणाऱ्या घटनांचे संदर्भ, अन्वयार्थ, क्वचित प्रसंगी पुरावेही तिथे असतात. बातमी कधीच मरत नसते, वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या स्वरुपात तिची पुनरावृत्ती होत असते. अशावेळी आधीची आवृत्ती पत्रकाराच्या हाताशी असणं आवश्यक असतं. म्हणून तुम्हाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या बातमीची कात्रणं काढून बाजूला ठेवणं, ज्यादिवशी महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत, अशा दिवसाचं संपूर्ण वर्तमानपत्रं बाजूला काढून ठेवणं आवश्यक असतं. वर्षानुवर्ष पत्रकार म्हणून तुम्ही सातत्याने हे काम करत राहाता त्यावेळी त्याचे ढिग तयार होतात. थोडक्यात कात्रणाचे हे ढिग म्हणजे तुमच्या कामाचं सातत्य असतं. ढिग वर्षानुवर्ष वाढत जाणं, त्यांचं घरभर पसरणं म्हणजे तुमचं जिवंतपणीचं स्मारकंच असतं. आपलं हे असं स्मारकंच दिनू रणदिवेंमधला सच्चा पत्रकार सतत रचत राहिला. 

आजच्या डिजिटलायझेशनच्या, गुगुल सर्च इंजिनाच्या जमान्यातल्या तरुण पत्रकारांना कदाचित हे कात्रणांचे ढिग निरर्थकाचे डोंगर वाटतील. पण या ढिगांमध्येच खरी पत्रकारिता गाढलेली आहे. तुम्ही स्वतःच्या हाताने जेव्हा एखादी बातमी, एखादा लेख कापून बाजूला काढून ठेवता, त्यावर स्वतःच्या म्हणून काही खूणा करता, नोंदी करता त्यावेळी तो सगळा डाटा तुमच्या मेंदूमध्ये साठत जातो. काही वर्षांनी वर्तमानकाळातल्या एखाद्या बातमीसाठी जेव्हा ते कात्रण परत तुमच्या हातात येतं तेव्हा तुमच्या त्यावेळच्या त्या नोंदी, त्या खुणा तुम्हाला वर्तमानकाळातल्या बातमीची, लेखाची पुढची दिशा दाखवतात. तुमच्या नोंदी, तुमच्या खुणा, त्यामागची तुमची भूमिका गुगलवरच्या त्या डिजिटल बातमीमध्ये नसते. डिजिटल बातमीमध्ये तुम्ही नसता, मात्र कात्रणांमध्ये तुम्ही असता, तुमचं अस्तित्त्व असतं. पत्रकार ही व्यक्ती त्याच्या-तिच्याजवळच्या कात्रणांमध्ये कणाकणाने पसरलेली असते. कुठच्या पत्रकाराच्या फाईलमध्ये कुठची कात्रणं आहेत, यावरुन त्या व्यक्तीचं पत्रकार म्हणून असलेलं मूल्यमापन करता येते. त्याचा-तिचा वैचारिक कल, असलेली-नसलेली सामाजिक बांधिलकी जोखता येते. दिनू रणदिवेंच्या घरच्या वर्तमानपत्रांच्या, त्यांच्या कात्रणांच्या ढिगाने या इतक्या गोष्टी अधोरेखित केल्या आहेत.

मी पत्रकारितेत आले तेव्हा दिनू रणदिवे या नावाचा एक दबदबा होता. त्यावेळी रणदिवे पत्रकारितेच्या नोकरीतून मुक्त झाले होते पण त्यांची शोध पत्रकारिता सुरुच होती. सुचेता दलालांच्याही आधी हर्षद मेहताचा घोटाळा दिनू रणदिवेंनी उघडकीस आणला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सक्रीय असलेले रणदिवे कायम पुरोगामी चळवळीशी जोडलेले ऱाहिले. निवृत्तीनंतरही सातत्याने लिहित राहिले. महानगर सायंदैनिकात काम करताना तिथे रणदिवेंना प्रथम पाहिलं आणि ऐकलंही. निवृत्तीनंतरही लिहिणारे रणदिवे महानगर सायंदैनिकात लिहित असत. कार्यालयात आले की, आम्हा तरुण पत्रकारांशी संवाद साधत. महानगरमध्ये सुरुवातीच्या काळात काम करणारे आम्ही सगळे विशी-पंचिवशीत होतो. मी, वैशाली रोडे, मुकुंद कुळे, संयोगिता ढमढेरे, युवराज मोहिते, रविंद्र राउऴ, सुभाष शिर्के. आमच्या कारकिर्दीच्या, पत्रकारितेच्या पायाभरणीत दिनू रणदिवेंचा महत्त्वाचा वाटा आहे, हे यापैकी सगळेच मान्य करतील.

दिनू रणदिवेंनी या काळात पत्रकारितेसंदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या. मुंबई पायी फिरा, मुंबईचे वेगेवेगळे भाग पायी फिरुन पहा, पायी फिरताना दिसणारी गल्लीबोळातील मुंबई वेगळी आहे, ती खरी मुंबई आहे, हे त्यांचं नेहमीचं सांगणं असे. आमच्यापैकी प्रत्येकाला त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टींपैकी वेगवेगळ्या गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या असतील. माझ्या लक्षात त्यातली एक गोष्ट कायम राहिली. किंबहुना माझ्या पुढील काळातल्या पत्रकारितेचं सूत्र बनली. पत्रकारितेत नव्याने आलेल्या, वार्ताहराचं काम करणाऱ्या बहुतेक सगळ्या पत्रकारांना मंत्रालयाचं बीट हवं असतं. राजकीय पत्रकारितेला एक वलय आहे, त्यामुळे त्या क्षेत्रात आपण असावं, अशी बहुतेक वार्ताहरांची इच्छा असते. दिनू रणदिवे मात्र कायम राजकीय पत्रकारितेपेक्षा सामाजिक पत्रकारिता अधिक महत्वाची आहे, किंबहुना राजकीय पत्रकारिता हा सामाजिक पत्रकारितेचा एक भाग आहे, अशी मांडणी करत. महानगर सोडल्यावर मी आणि जयंत त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो त्यावेळीही झालेल्या गप्पांमध्ये ते सामाजिक पत्रकारितेचं महत्त्व अधोरेखित करत राहिले.

लोकांमध्ये जा, लोकांशी बोला आणि लोकांचे प्रश्न मांडा, असे सामाजिक पत्रकारितेचं सूत्रच ते सांगत. फोनवरुन माहिती घेऊन बातमी करणं किंवा लेख लिहिणं ही खरी पत्रकारिता नाही, पत्रकाराने कायम फिल्डवर असलं पाहिजे, हे त्यांचं सांगणं असे. सामाजिक पत्रकारितेचा आशय-विषय मोठा आहे. राजकीय घडामोडींपासून ते सांस्कृतिक घटनांपर्यंत प्रत्येक गोष्टीमागे एक सामाजिक विचारविश्व उभं असतं, त्याचा वेध घेता यायला हवा, असं ते सांगत असत. आणि ते किती खरं आहे. स्त्रीप्रश्नापासून ते बालमजूरीपर्यंत आणि भिन्न् लैंगिक ओळखींपासून ते जातीय-धार्मिक अत्याचारांपर्यंत प्रत्येक गोष्ट ही एका विशिष्ट सामाजिक विचारविश्वात घडत असते. या प्रश्नांचा नीट मागोवा घ्यायचा असेल तर पत्रकाराला आधी स्वतःला तयार करावं लागतं. विविध विषयांचा अभ्यास करावा लागतो. रणदिवे हा असा अभ्यास करत होते आणि इतर पत्रकारांनाही अभ्यास करा, असं सांगत होते.

पत्रकाराने बोलावे कमी आणि पहावे जास्त, हे रणदिवेंचं आणखी एक सांगणं होतं. नीट निरीक्षण करा, असे ते सांगत. पत्रकाराने बोलावं ते फक्त समोरच्याला बोलतं करण्यापुरतं, बाकी त्याने ऐकावं आणि पहावं व मग लिहावं हे पत्रकारितेतलं महत्त्वाचं तत्त्व आहे. पत्रकाराचं हे पाहाणं इतरांच्या नजरांपेक्षा वेगळं असलं पाहिजे. यालाच पत्रकाराची नजर असं म्हणतात. बारकाईने केलेल्या निरीक्षणातून, अभ्यासातून ही नजर घडते. सांगितलेल्या गोष्टींइतकीच न सांगितलेल्या गोष्टींमध्येही बातमी असते. ती पकडता यायला हवी. मला ‘तिची भाकरी कोणी चोरली’ आणि ‘डाकीण प्रथाः एक शोध’ ही दोन्ही पुस्तकं लिहिताना, त्यासाठी फिल्ड वर्क करताना निरीक्षणाचं हे तत्त्व खूप उपयोगी पडलं. या दोन्ही पुस्तकांच्या केंद्रस्थानी स्त्री आहे. स्त्रियांच्या सार्वजनिक बोलण्यावर, कथनावर खूप बंधनं असतात. एकटं असताना स्त्रिया जे आणि जसं बोलतात तसं त्या पुरुषांच्या उपस्थितीत बोलत नाहीत. मात्र अशा वेळी त्यांची देहबोली खूप काही सांगत असते. इथे या गावात अजून थांबायला हवं, या स्त्रीला एकटं गाठून तिला बोलतं करायला हवं, हा निरोप ही देहबोली आपल्याला देत असते. पत्रकारितेत  हे असे अनेक निरोप, सांगावे येत असतात. मात्र त्यासाठी पत्रकाराच्या नजरेला शोधकाम करावं लागतं. पत्रकाराची शोधक नजर हे रणदिवेंचं वैशिष्ट्य होतं आणि हे वैशिष्ट्य जपा, असाच त्यांचा सांगावा होता.

आज रणदिवे नाहीत पण त्यांनी रचून ठेवलेला तो वर्तमानपत्रांचा ढीग काही सांगू पाहातोय. पत्रकारिता करणं आणि पत्रकारिता जगणं यामध्ये जे काही अंतर आहे ते अंतर कापायचं तर मध्ये वर्तमानपत्रांचं हे असं स्मारक उभारायला लागतं, गल्लीबोळातून पायी फिरावं लागतं, नजर चौफेर फिरती ठेवावी लागते आणि आपलं लक्ष्य हेरून तिथे रोखावी लागते. मगच लेखणी हाती घ्यायची असते. 

हे असं बरंच काही शिकायला मिळालं रणदिवेंकडून. आज वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये पत्रकारितेचे अभ्यासक्रम शिकवले जातात. या अभ्यासक्रमांचा दर्जा, तिथली प्रमुख मंडळी हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. आम्हाला मात्र प्रत्यक्ष पत्रकारितेच्या विद्यापीठाकडून शिकण्याची संधी मिळाली.