India

पंढरपुर निवडणुकीत प्रचार सभांना गर्दी, कोरोनाच्या संकटाचं भान विसरुन प्रचार

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत तुफान गर्दीमुळं कोरोना नियमांचे तीन तेरा वाजल्याचं विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

Credit : Facebook

‘मी जबाबदार! माझा मास्क माझी सुरक्षा,’ असं सांगत खुद्द मुख्यमंत्री आणि राज्य सरकार नागरिकांना मास्क वापरासंबधी प्रबोधन करीत आहे. मास्क न वापरणाऱ्यांना प्रशासनाकडून दंड केला जात आहे. परंतु, पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत तुफान गर्दीमुळं कोरोना नियमांचे तीन तेरा वाजल्याचं विदारक चित्र पंढरपूर मध्ये पाहायला मिळत आहे. एका बाजूला पोटासाठी धडपड करणाऱ्या गोरगरीब टपरीवाल्यांना पोलीस आणि प्रशासनाकडून कोरोनाचे नियम दाखवत त्रास दिला जात आहे. दुसरीकडे नेत्यांच्या सभेत मात्र सर्व नियमांची पायमल्ली होत असताना प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून पाहत राहत असल्याचा आरोप होत आहेत.

 

मतदानासाठी संचारबंदी शिथिल, जमावबंदी लागू

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सोलापूर जिल्ह्यात जारी करण्यात आलेली संचारबंदी १६ एप्रिल २०२१ रोजीच्या रात्री आठ वाजल्यापासून ते १८ एप्रिल २०२१ रोजीच्या सकाळी सात वाजेपर्यंत शिथील करण्यात आली आहे. मात्र जमावबंदीचे आदेश लागू राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जारी केले आहेत. पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिलला मतदान आहे. त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश जारी केला आहे.

 

काय आहे आदेश?

आदेशात नमूद केलं आहे की, १० आणि ११ एप्रिलला कोणत्याही वैध कारणाशिवाय किंवा परवानगी शिवाय सार्वजनिक ठिकाणी संचार करण्यास बंदी आहे. तथापी या आदेशानुसार निवडणूक प्रचार आणि अनुषांगिक कामकाजास्तव १० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते ११ एप्रिलच्या रात्री ८ वाजेपर्यंत सदरची संचारबंदी पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या क्षेत्रासाठी शिथील करण्यात येत आहे. मात्र जमावबंदीचे मनाई आदेश लागू राहतील.

पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा, रॅली यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी परवानगी द्यावी. मात्र त्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं. कार्यक्रम बंदिस्त ठिकाणी असल्यास उपलब्ध जागेच्या ५० टक्के परंतु २०० पेक्षा जास्त व्यक्ती नसतील या मर्यादेत परवानगी द्यावी. असे कार्यक्रम खुल्या जागेत असल्यास जागेच्या ५० टक्के क्षमतेपर्यंत परवानगी द्यावी, असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे. 

सभेच्या ठिकाणी कोविड विषयक नियमांचं पालन होतं किंवा कसं याची खात्री करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी, कर्मचारी नियुक्ती करण्यात यावी, असं नमूद करण्यात आलं आहे. उमेदवारांकडून नियमांचा दोनपेक्षा जास्त वेळेस भंग केल्यास अशा उमेदवारांना पुढील राजकीय मेळाव्यासाठी परवानगी देता येणार नाही, असंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे. सर्व राजकीय कार्यक्रमात कोविड विषयक नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.

 

दोन पॉझिटिव्ह सभेला उपस्थित; रणधुमाळीत कोरोनाचं भान विसरले

मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या प्रचार सभेला उपस्थित असलेले आठ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्यचं  उघड झालं आहे. त्यामुळं या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गेले दोन दिवस अजित पवार पंढरपूर पोटनिवडणुकीचा प्रचार करत आहेत. त्यांच्या विविध ठिकाणी सभा होत असून सभेला मोठी गर्दी होत आहे. 

पंढरपूर-मंगळवेढा  विधानसभा पोटनिवडणुकी रणधुमाळीत आता कोणाचा विजय होते याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पंढरपूर तालुक्यातील गादेगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी घेतलेले भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी काल आठ एप्रिलला अजित पवार यांनी सभा घेतली. यावेळी पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोबतच पंढरपुरात अजित पवारांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाला फक्त २०० लोकांची परवानगी होती. मात्र प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग लांब लांब पर्यंत दिसून येत नव्हतं. यातील अनेक जण तर मास्क न घालताच सभेला आले असल्याचं दिसत होतं. यावेळी कोरोना निर्बंधांना धुळीस मिळवण्यात आलं.

 

वाघ, पडळकर, फडणवीस यांच्याही सभेत नियमांची पायमल्ली

अलीकडे करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसेंदिवस प्रशासन कठोर निर्बंध लावत आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांबरोबर विरोधी पक्षातील नेत्यांनाही कोरोनाचा विसर पडला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ, पडळकर यांच्या सभांनाही मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांना, अन्य नियम मोडणाऱ्यांना दंड केला जात आहे, अशा परिस्थितीत बेजबाबदारपणे वागणाऱ्या लोकप्रतिनिधीसंबंधी प्रशासन काय भूमिका घेणार?