Quick Reads

सिनेसमीक्षण: ‘वन्स’

स्पॉटलाईट सदर

Credit : Summit Entertainment

सांगीतिकांचा विचार केल्यास जगाच्या पाठीवर निरनिराळ्या देशांतील निरनिराळ्या चित्रपटसृष्टींमध्ये सांगीतिकांचे निरनिराळे प्रकार आढळून येतात. उदाहरणादाखल भारताचा विचार करायचा झाल्यास चित्रपट समीक्षक पीटर ब्रॅडशॉ म्हणतो त्याप्रमाणे, “मुख्य प्रवाहातील जवळपास प्रत्येक भारतीय चित्रपट म्हणजे एक सांगीतिका असतो. कारण असं दिसतं की बॉलिवुडचा सांगीतिकांवर विश्वास आहे, आणि त्याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे प्रेम आहे. त्यामुळे बॉलिवुडला सांगीतिका बनवण्यासाठी वेगळं कारण शोधावं लागत नाही. हॉलिवुडमध्ये दर काही वर्षांनी करतात तसे ठरवून सांगीतिक चित्रपट इथे (भारतात) बनवले जात नाहीत.” त्याच्या म्हणण्याचा गर्भितार्थ म्हणजे भारतात निर्माण होणारे चित्रपट हे एका वेगळ्या अर्थाने, वेगळ्या धाटणीच्या सांगीतिका म्हणता येऊ शकतात. 

तर इथे पीटरने उल्लेखलेला हॉलिवुडमधील ठरवून सांगीतिका बनवण्याचा प्रकार आणि त्यात निर्माण होणारे चित्रपट म्हणजे हॉलिवुडमधील ‘सिंगिंग इन द रेन’ (१९५२), ‘द साउंड ऑफ म्युजिक’सारख्या (१९६५) अभिजात सांगीतिका. वेळोवेळी एखाद्या ‘ला ला लँड’च्या (२०१७) निमित्ताने हा प्रकार पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न अमेरिकन चित्रपटसृष्टीत होत असतो. 

आता या पारंपरिक प्रकाराच्या पलीकडे जात सांगीतिका बनवण्याचं काम जगभरात होत असतं. मग ‘द अम्ब्रेलाज ऑफ शेबुर्ग’ (१९६४) या फ्रेंच चित्रपटामध्ये सगळी पात्रं सबंध चित्रपटभर पार्श्वभूमीवर ऐकू येणाऱ्या सांगीतिक चालीत गात राहतात, त्यातूनच संवाद घडतो, ज्यात कधीच खंड पडत नाही. (अनुराग बसूने हाच महत्त्वाकांक्षी प्रयोग आपल्याकडे ‘जग्गा जासूस’च्या (२००७) निमित्ताने करण्याचा प्रयत्न केला होता.) सांगायचा मुद्दा असा की, पारंपरिक हॉलिवुडी सांगीतिकांच्या पलीकडे जाणारे अनेक उल्लेखनीय प्रयोग जगभरात वेळोवेळी घडून आलेले आहेत. आजच्या आणि यापुढील दोन लेखांचे विषय असलेले लेखक-दिग्दर्शक जॉन कार्नीचे चित्रपट म्हणजे असेच एका निराळ्याच धाटणीचे सांगीतिक प्रयोग असतात. त्याच्या चित्रपटांमध्ये संगीत आणि गाणी काही उगाच येत नाहीत. त्याच्या चित्रपटातील पात्रांचा आणि संगीताचा, संगीत जगताचा विशिष्ट असा संबंध असतो. परिणामी त्याच्या पात्रांमध्ये आणि चित्रपटांमध्ये संगीत नखशिखांत भिनलेलं असतं. जे त्याच्या त्या त्या चित्रपटामध्ये वेगवेगळ्या प्रकारे समोर येतं. आता ते कसं हे बोलताना त्याच्या ‘बिगीन अगेन’ (२०१३) आणि ‘सिंग स्ट्रीट’ (२०१६) या इतर दोन चित्रपटांबाबत पुढील लेखांमध्ये बोलू. तूर्तास ‘वन्स’ या त्याला प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या इंडी चित्रपटाचा विचार करूयात. 

‘वन्स’मधील पुरुष (ग्लेन हॅन्सर्ड) हा एक गिटारवादक आहे. डब्लिनमधील रस्त्यावर उभं राहून स्वतः लिहिलेली गाणी वाजवत त्यातून तुटपुंजी कमाई करणं, नि आपल्या वडिलांसोबत राहून त्यांच्या व्हॅक्युम क्लीनर दुरुस्तीच्या दुकानात काम करणं या दोन गोष्टींभोवती त्याचं आयुष्य फिरतं. त्याच्या आयुष्याचा आणखी एक महत्त्वाचा भाग असलेली त्याची प्रेयसी अलीकडेच त्याला दगा देऊन सोडून गेली आहे. सध्या तो आपलं काम आणि आपलं ज्यावर प्रेम आहे ते संगीत भलं असं मानून चाललेला आहे. थोडक्यात, आर्थिक, सामाजिक परिस्थितीचा विचार करता तो अपयशी आहे. कुठेतरी उद्यानात किंवा रहदारीतील रस्त्यांवर गिटार वाजवून आपल्या सांगीतिक कारकिर्दीला काहीच हातभार लागणार नाही याची जाणीव असली तरी त्याच्या परिस्थितीमुळे त्याचे हात बांधले गेलेले आहेत. 

त्याचे दिवस इतके वाईट सुरु आहेत की चित्रपटाला जेव्हा सुरुवात होते, तेव्हा एक भुक्कड चोर त्याने मिळवलेली फुटकळ रक्कम, चिल्लरच खरंतर, चोरू पाहतो. ज्याच्याकडे गिटारच्या तुटलेल्या तारा नीट करण्यासाठीही पैसे नाहीत असा आपला नायक आणि त्या चोरातील परस्परक्रियेतून एक प्रकारे कारुण्यपूर्ण विनोदनिर्मिती होते. 

दिवसाच्या शेवटी तो आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीकरिता लिहिलेलं गाणं गात असतो. एक तरुण मुलगी (इर्ग्लोवा) त्याचं गाणं ऐकून त्याचं कौतुक करू पाहते. हे गाणं त्याने स्वतः लिहिलेलं आहे का विचारते. तिने त्याच्या दुखत्या नसेवर हात ठेवलेला असतो. प्रेयसी त्याला सोडून गेलेली असली तरी तिच्याविषयी त्याला वाटत असलेलं प्रेम, आणि ती निघून गेल्यानंतरचं दुःख त्याच्या डोळ्यांमध्ये स्पष्टपणे दिसत असतं. ही मुलगी त्याला डिवचते, तो दिवसा केवळ लोकप्रिय गाणी का वाजवतो असा प्रश्न विचारते. कारण स्पष्ट असतं, त्याची गाणी ऐकून कुणी फार पैसे देणार नसतं. तिनेही आता केवळ दहा सेंट्स त्याला दिल्याचं उदाहरण ताजं असतं. तो आपल्या वडिलांच्या व्हॅक्यूम क्लीनरच्या दुकानात काम करतो हे तिला कळतं. तिला नेमका तिचा व्हॅक्युम क्लीनर दुरुस्त करून घ्यायचा असतो. त्याने तिचा त्याला दोन मिनिटांत कळलेला स्वभाव पाहता नकार देऊनही ती आपलं व्हॅक्यूम क्लीनर दुरुस्त करवून घेण्यावर ठाम असते. त्याला त्याचा काही इलाज नसतो. 

once

दुसऱ्या दिवशी त्याला कळतं तीही संगीतकार आहे. ती पियानो वाजवत असल्याचं त्याला कळतं. कालच्या वाईट दिवसाच्या शेवटी काहीतरी चांगलं घडलेलं असतं. राजकुमार हिरानीचा मुन्ना भाई म्हणतो त्याप्रमाणे “फिर अपने मुहल्ले में ऐश्वर्या आई”. तो चकित झालेला असतो. हिचीही परिस्थिती बेताचीच असल्याने हिच्याकडे स्वतःचा पियानो नसतो. मात्र, एका स्थानिक म्युझिक स्टोअरमधील मालक दुकानात कुणी गिऱ्हाइक नसल्यास तिला पियानो वाजवू देत असतो. मग हे दोघे त्या दुकानात जातात. ती पियानो वाजवू लागते. पियानोच्या बटनांवर तिची बोटं अलवारपणे पडत असताना हा तिच्या, तिच्या संगीताच्या प्रेमात पडू लागल्याचं दिसतं. त्यानंतर तोही तिला सामील होतो, त्याचं ‘फॉलिंग स्लोली’ नावाचं गाणं ते दोघेही वाजवतात. तो गिटार, तर ती पियानो वाजवते. संगीत दोघांना जोडणारा समान दुवा बनतो. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडू लागतात. 

मुलगा मुलगी भेटत, नि एकमेकांच्या प्रेमात पडतात ही रटाळ वाटणारी कथाही जॉन कार्नी कशा रीतीने समोर मांडतो ते इथं महत्त्वाचं ठरतं. इथे एक विलक्षण सांगीतिक अनुभूती आहे, ती दोघंही पडद्यावर वावरत असताना त्या पात्रांच्या क्रिये-प्रतिक्रियेदरम्यानचे सुंदर, अबोल क्षण आहेत. हे सगळं इतकं साधं सोपं तरीही वैश्विक असं आहे की लेखक-दिग्दर्शक कार्नीला त्याच्या मुख्य पात्रांना नावं देण्याचीही गरज भासत नाही. तो मुलगा आहे, ती मुलगी आहे. बस्स. 

तरी मुलगा-मुलगी भेटतात, नि प्रेमात पडून सुखाने नांदतात अशी ही कथा नाही. म्हणजे म्हटलं तर आहे, कारण ते प्रेमात पडतात. पण, हे प्रेमात पडणं कथेला अनिवार्य आहे म्हणून घडत नाही. किंवा कार्नीला त्याचा शेवटही ठरवून, अट्टाहासाने काहीतरी घडवून आणत करावा लागत नाही. योगायोगानेच या दोन पात्रांची भेट होते, नि ती काही काळ एकमेकांसोबत घालवतात. इथली सोबतही शारीरिक अशी नाही. ते एकत्र गाणी वाजवतात, एकमेकांना ऐकत राहतात, एकमेकांच्या घरी जाऊन एकमेकांच्या कुटुंबांना भेटतात. मुलीचा एक मुलगा असतो, नि तिचं लग्न झालेलं असतं. पण त्याने त्याला, किंवा खरंतर ‘त्यांना’ फरक तसा काय पडणार असतो? ते प्रेमात पडून सुखाने नांदायची स्वप्नं पाहत एकत्र आलेले असतात का, तर नाही. ते फक्त एकत्र असतात, नि तितकं त्यांच्यासाठी पुरेसं असतं. कल का कल देख लेंगे यार! 

once

ते दोघे एकत्र गाणी लिहितात. त्याचं लंडनला जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्यात ती त्याला मदत करत असते. तिच्या मदतीनं ते एका स्टुडिओत गाण्यांची रेकॉर्डिंगही करतात. त्याचं त्याच्या पूर्वाश्रमीचा प्रेयसीवर असलेलं प्रेम पाहून त्याने तिच्याशी पुन्हा संपर्क साधावा असं तिला वाटतं. तोही त्याला होकार देतो. दरम्यान तिचा चेक रिपब्लिकमध्ये असलेला नवराही लवकरच परतणार असल्याचं कळतं. पण, पुन्हा एकदा त्याने ‘त्यांना’ फरक तसा काय पडणार असतो? त्यांनी एकत्र घालवलेले क्षण कुठेच जाणार नसतात. त्यांनी एकत्र गायलेली, वाजवलेली गाणीही त्यांच्या स्मरणात राहणार असतात. 

प्रेमाला, आणि आपल्या साथीदाराला कुठल्याही चौकटीत अडकवणं कार्नीच्या विश्वात घडत नाही. तो प्रेम या संकल्पनेकडे इतक्या तरल भावनेतून पाहतो की त्याची पात्रं आपल्या प्रेमाच्या ऐहिक संकल्पनांच्या पल्याड पोचलेली भासतात. ती फक्त जगत राहतात. प्रेम, विनोद, कारुण्य सगळं काही अनुभवतात, नि फक्त जगतात. आता आपल्या पारंपरिक ‘हम जीते हैं एक बार… और प्यार भी एक बार करते हैं’ विचारसरणीनुसार ही कथा म्हणजे कारुण्यपूर्ण असेल. पण, ‘वन्स’ हा कार्नीच्या पुढे आलेल्या चित्रपटांप्रमाणेच पारंपरिक कथांच्या पलीकडे जातो. चित्रपट निर्मितीच्या पातळीवर ‘वन्स’ची विशिष्ट अशी काही शैली नाही. मात्र, तो एक सहज सुंदर चित्रपट आहे. नि जॉन कार्नीचे चित्रपट पाहिले नसतील तर यापासून ते पहायला सुरुवात करावी असा आहे.