Quick Reads

सिनेमा: सिंग स्ट्रीट

स्पॉटलाईट सदर

Credit : Cosmo Films

स्पॉयलर्स अहेड

सदर लेखात उल्लेख केलेल्या ‘वन्स’ चित्रपटावरील लेख

सदर लेखात उल्लेख केलेल्या ‘बिगीन अगेन’ या चित्रपटावरील लेख 

 

जॉन कार्नीच्या तीन चित्रपटांविषयीच्या लेखत्रयीतील हा तिसरा आणि शेवटचा लेख. या तीन लेखांच्या माध्यमातून माझ्या प्रचंड आवडत्या चित्रपटकर्त्यांपैकी एक असलेल्या जॉन कार्नीविषयी, आणि त्याच्या या तीन चित्रपटांविषयी पुरेशा सविस्तरपणे बोलण्याचा, या नितांतसुंदर कलाकृतींची प्रशंसा करण्याचा उद्देश बऱ्यापैकी सफल झाला आहे असं वाटतं. 

१९८१ मध्ये म्युझिक टेलिव्हिजन ऊर्फ एमटीव्हीची व्युत्पत्ती झाली. ज्यानंतर संगीत क्षेत्रात बरीच उलाढाल घडली. म्युझिक व्हिडिओच्या रुपात संगीत ऐकण्यासोबतच दृश्यं पाहण्याचा नवीन पर्याय लोकांपुढे आला. सोबतच संगीतप्रेमींना शोध घेऊन, आवर्जून ऐकण्यासाठी म्हणून नवनवीन संगीतकार मिळाले. ‘डुरान डुरान’, ‘क्वीन’सारखे बँड आणि डेव्हिड बोईसारखे कलाकार घरोघरी पोचले. मादक मॉडेल्स आणि बँडमधील कलाकार टेलिव्हिजनवर एकत्रितपणे झळकू लागले. संगीत क्षेत्रातील हा नवीन बदल आणि प्रभाव केवळ अमेरिकेपुरता मर्यादित न राहता याचं वेड जगभर समप्रमाणात पसरलं. ‘सिंग स्ट्रीट’च्या निमित्ताने जॉन कार्नी हा आयरिश-अमेरिकन लेखक-दिग्दर्शक नेमके ऐंशीच्या दशकाच्या दरम्यान घडलेले हे बदल टिपतो. 

कार्नीच्या चित्रपटांचा आणि अपारंपरिक दृष्टिकोनाचा विचार करता ‘वन्स’ (२००७), ‘बिगीन अगेन’ (२०१३) आणि ‘सिंग स्ट्रीट’ (२०१५) हे तीन चित्रपट म्हणजे एक अपारंपरिक प्रकारची संगीत चित्रत्रयी मानता येते. ‘सिंग स्ट्रीट’च्या निमित्ताने कार्नीच्या ‘वन्स’ आणि ‘बिगीन अगेन’ या आधीच्या चित्रपटात दिसलेले घटक आणखी वैशिष्ट्यपूर्ण प्रकारे समोर येतात. प्रेम, योगायोग, संगीत हे घटक त्याच्या चित्रपटांशी, त्याच्या शैलीशी परिचय असलेल्या लोकांसाठी नवे नाहीत. मात्र, सदर चित्रपटाच्या निमित्ताने तो ऐंशीच्या दशकाकडे का वळतो याचं उत्तर त्याच्या पूर्वायुष्यात असू शकेल. कार्नीचा जन्म १९७२ चा, तर ‘सिंग स्ट्रीट’ घडतो १९८५ मध्ये. आणि सदर चित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेला नायक त्यावेळी पंधरा वर्षांचा असतो. परिणामी कार्नी त्याने एकेकाळी अनुभवलेल्या कालखंडाचं चित्रण करू पाहत आहे, हे साहजिक आहे. आता १९८५ सोबतच कार्नी आयर्लंडमधील डब्लिन या त्याच्या जन्मशहराकडे परततो. त्याचा ‘वन्स’ डब्लिनमध्ये घडतो, तर ‘बिगीन अगेन’ अमेरिकेत. ‘सिंग स्ट्रीट’च्या निमित्ताने तो डब्लिनमधील पौगंडावस्थेतील मुलांवर, किंबहुना एका अख्ख्या पिढीवर एमटीव्ही या अमेरिकन दृश्य-सांगीतिक प्रकाराने टाकलेला प्रभाव चित्रपटाच्या केंद्रस्थानी आणतो. 

याखेरीज योगायोग आणि प्रेम या त्याच्या आवडत्या संकल्पनाही इथे काहीशा वेगळ्या स्वरुपात समोर येतात. म्हणजे, ‘वन्स’मध्ये अनपेक्षितपणे भेट झालेल्या दोन प्रौढ व्यक्तींचा समावेश असलेली संगीतप्रेमाची, आणि एकूणच प्रेमाची गोष्ट आपल्यासमोर मांडली होती. ज्यात प्रेम म्हणजे शारीरिक सहवासाचा, एकत्र राहण्याचा अट्टाहास नव्हे हा दृष्टिकोन दिसला. सोबतच समोरच्या पात्रांनी सगळं काही (बाळबोधपणे) बोलून दाखवण्यापेक्षा यापेक्षा ‘अव्यक्त प्रेम’ या संकल्पनेकडे असलेला लेखक-दिग्दर्शकाचा कलही आपल्याला दिसून आला होता. तर, ‘बिगीन अगेन’मध्ये बहुतांशी मध्यवर्ती पात्रांची नाती तुटलेली आहेत. त्यानिमित्ताने नातं तुटलेलं असताना त्या पात्रांची होणारी घालमेल आपल्याला दिसत राहते. मात्र, सोबतच एका नात्यातून बाहेर पडलं की आपण पुन्हा प्रेमात पडायलाच हवं, या दृष्टिकोनाच्या काहीसा विरुद्ध दृष्टिकोनही आपल्याला दिसतो. थोडक्यात, नातेसंबंधांकडे पाहण्याचा एक अपारंपरिक, प्रौढ आणि संयत दृष्टिकोन आपल्याला दिसतो. ‘सिंग स्ट्रीट’मध्ये आपल्याला प्रेमाची संकल्पना पौगंडावस्थेतील मुलाच्या दृष्टिकोनातून दिसते. पण सोबतच, त्यात एक विशिष्ट अशी परिपक्वतादेखील आहे.  

कार्नीच्या या तिन्ही चित्रपटांमध्ये मध्यवर्ती पात्राच्या गाण्याच्या निमित्ताने चित्रपटाला सुरुवात होत असते. ‘सिंग स्ट्रीट’मध्येही कॉनर लॉलर (फर्डिया वॉल्श-पिलो) हा कुमारवयीन मुलगा आपल्या बेडरुममध्ये बसून गिटार वाजवत असल्याच्या दृश्यापासून चित्रपटाला सुरुवात होते. कॉनर गाण्याचा प्रयत्न करतोय, पण लागलीच त्याच्या आवाजासोबतच आई-वडिलांमधील कडाक्याच्या भांडणाचा आवाजही आपल्याला ऐकू येऊ लागतो. तो त्यांच्या भांडणातील ओळी गाण्याच्या चालीवर गाऊ लागतो. त्याच्या सांगीतिक जाणिवा, आणि कलहाच्या निमित्ताने कौटुंबिक परिस्थिती अशा दोन्ही गोष्टींचं दर्शन आपल्याला होतं. त्यापाठोपाठ १९८५ मधील डब्लिन अशी चौकट समोर येऊन तत्कालीन आयर्लंडमधील आर्थिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या बातमीच्या निमित्ताने आयर्लंडमधील लोकांचा इंग्लंडमध्ये स्थलांतरित होण्याकडे असलेल्या कलाविषयीची माहिती आपल्याला मिळते. बदलत्या सांगीतिक जाणिवा, बदलती आर्थिक-सामाजिक परिस्थिती आणि या दोन्हींचा आपल्या मध्यवर्ती पात्रांच्या आयुष्यातील समावेश असं सगळं काही आपल्याला दिसतं. 

रॉबर्ट (एडन गिलन) आणि पेनी (मारिया डॉयल केनेडी) या कॉनरच्या आई-वडिलांमध्ये खटके उडत असतात. सोबतच देशातील आर्थिक मंदीमुळे त्यांना त्यांच्या खर्चात कपात करण्याची गरज असते. कॉनरचा मोठा भाऊ ब्रेन्डन (जॅक रेनर) तसाही कॉलेजमध्ये न जाता घरीच बसून असतो. बहीण अॅनबाबत (केली थॉर्न्टन) काही घडण्याची शक्यता नसते. त्यामुळे कॉनरची रवानगी एका ख्रिश्चन शाळेत करून अतिरिक्त खर्च वाचवण्याची त्याच्या पालकांची कल्पना असते. कॉनरचा याला विरोध असला तरी त्यांच्यापुढे त्याचं काहीएक चालणार नसतं. त्यानंतर ब्रेन्डन ज्या पद्धतीने बोलतो त्यानिमित्ताने घरातील उपेक्षित, वाया गेलेला मुलगा म्हणून समोर आलेल्या ब्रेन्डनच्या प्रौढ संवेदना आणि विचारसरणीचं दर्शन आपल्याला घडतं. शाळा बदलल्यानंतर जे काही घडणार असतं ते घडतं, कॉनरच्या पूर्वीच्या शाळेहून पूर्णतः वेगळ्या आणि टाकाऊ अशा या नवीन शाळेत त्याला शिक्षक ते समवयस्क मुलं अशा सर्वांकडून हिणवलं जातं. शाळेचा पहिलाच दिवस अतिशय वाईट प्रकारे व्यतीत झालेला असतो. हेच दुसऱ्या दिवशीही घडतं. मात्र, हा कार्नीचा चित्रपट आहे, आणि त्याच्या चित्रपटात वाईट दिवसानंतर संगीत, प्रेम आणि संगीतप्रेम या तिन्ही गोष्टी एकत्र येऊन विलक्षण योगायोगाच्या आणि शक्याशक्यतेच्या निमित्ताने काहीतरी चांगलं घडण्याच्या शक्यता बळावलेल्या असतात. इथे रफीनाच्या (ल्युसी बॉयन्टन) रुपात कॉनरच्या शुष्क आयुष्यात हवेची एक मंद झुळूक येते. 

सिग्नस स्ट्रीट

शाळेच्या समोरच्या इमारतीपुढे रफीना ही तरुणी उभी असल्याचं त्याला दिसतं. डॅरेन (बेन कॅरोलन) हा नव्यानेच झालेला मित्र रफीना शाळेतील मुलांशी बोलत नाही, आणि तिला एक प्रियकर असल्याची माहिती त्याला पुरवतो. तो त्याला, ‘जर कुणाशीच बोलायचं नाही, तर ती रोज इथे उभी का राहते?’ असा प्रश्न विचारून तिच्याकडे चालू लागतो. त्याला ती एक मॉडेल असल्याची माहिती मिळते. कॉनरला स्वप्नं सत्यात उतरण्याच्या शक्यतेहून उच्च अशी ध्येयं बाळगण्याची सवय असावी (सोप्या भाषेत : He aims too high). तो तिला ‘मॉडेल आहेस तर आमच्या बँडमध्ये काम करायला आवडेल का?’ अशी विचारणा करतो, नि तीही लागलीच त्याला होकार देते. 

कॉनर कामचलाऊ गिटारवादक असला तरी त्याचा आणि संगीताचा विशेष संबंध नसतो. इथे तर मुळात बँडच अस्तित्त्वात नसतो. परिणामी बँडच्या उभारणीपासून त्याला सर्व गोष्टींची जुळवणी करावी लागणार असते. एल्विस प्रिस्लेच्या ‘थिंग्ज यू वुडन्ट डू, यू डू फॉर लव्ह’ या गाण्यावर खरं उतरण्याची गरज असते. कॉनर आणि डॅरेन लवकरच एमन (मार्क मकेना), एनगिगसारखे लोक जमवत बँड उभा करतात. त्याला ‘सिंग स्ट्रीट’ असा शब्दच्छल करणारं नावही दिलं जातं. मात्र, अजून तरी त्यांनी स्वतः गाणी लिहायला सुरुवात केलेली नसते. नेमकी हीच गोष्ट ब्रेन्डनला खटकते, आणि तो कॉनरला शिव्या घालत तुला खरंच ती मुलगी हवी असेल तर स्वतः गाणी लिही असं खडसावतो. ब्रेन्डन हा संगीताचा दर्दी चाहता असतो. त्या (आणि नंतरच्याही अनेक) रात्री कॉनरला संगीताची शिकवणी दिली जाते. कॉनर ‘द रिडल ऑफ द मॉडेल’ हे गाणं लिहितो, नि दुसऱ्या दिवशी एमनसोबत बसून त्याला चाल लावतो. गाण्याच्या अर्थाविषयी आणि व्युत्त्पत्तीविषयी बोलताना तो - ‘जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला पूर्णतः ओळखत नसतो, तेव्हा ती व्यक्ती कशी प्रत्यक्षात आहे त्याहून कैकपटींनी अधिक आकर्षक आणि महत्त्वाची वाटू शकते. मात्र, त्या व्यक्तीला ओळखू लागल्यावर त्या व्यक्तीच्या मर्यादा आपल्याला उमजू लागतात’ - हे समजावून सांगतो. त्याचे हे विचार वय पाहता नको तितके परिपक्व वाटत असले तरी गाणी लिहित असताना मात्र त्यांत त्याचं वय विचारात घेतल्याचं स्पष्टपणे दिसतं. 

जॉन कार्नी आणि गरी क्लार्क या दोघांनी लिहिलेली-संगीत दिलेली ही ओरिजनल गाणी इथे महत्त्वाची ठरतात. म्हणजे कथानकाच्या वाटचालीत ब्रेन्डन हा निरनिराळ्या बँड्सशी कॉनरची ओळख करून देतो. ज्यानंतर त्या त्या बँडशी ओळख झाल्याच्या नजीकच्या काळात कॉनरच्या बँडने तयार केलेली गाणी त्या विशिष्ट अशा एक दोन बँडच्या गाण्यांच्या शैलीनं प्रेरित असतात. उदाहरणार्थ, ‘द रिडल ऑफ द मॉडेल’वर ‘डुरान डुरान’, ‘द न्यू रोमान्स’च्या गाण्यांची छाप दिसून येते. जो जॅक्सनचं ‘स्टेपिंग आउट’ आणि द जॅमचं ‘द गिफ्ट’ ऐकल्यानंतर ‘सिंग स्ट्रीट’च्या ‘अप’ची निर्मिती होते. किंवा पुढे कधीतरी कॉनर आणि पर्यायाने ‘सिंग स्ट्रीट’ हा त्याचा बँड डेव्हिड बोईच्या प्रभावाखाली असतो. या तरुणांची ही मानसिक स्थित्यंतरं सदर गाण्यांच्या निमित्ताने समर्पकपणे टिपली जातात. कधी उडत्या चालीची गाणी येतात, तर कधी संयत, अलवार भाव असलेली गाणी येतात. कार्नीच्या चित्रपटांत दिसणारी संगीत निर्मितीची प्रक्रिया आपल्याला इथे अधिक सविस्तरपणे अनुभवायला मिळते. 

सिंग स्ट्रीट

‘द रिडल ऑफ द मॉडेल’चं चित्रीकरण करून झाल्यानंतर कॉनर रफीनाला घरी सोडायला जातो. सायकलवर एकाच ठिकाणाहून दोनदा रपेट मारत आपण इथून पहिल्यांदाच जात आहोत हे भासवण्याचा त्याचा प्रयत्न, किंवा या संक्षिप्त प्रवासादरम्यान त्यांच्यात घडणारं संभाषण म्हणजे पात्रांना उसंत मिळवून देत, कुठल्याही गडबडीशिवाय निवांतपणे संवाद साधू देण्याच्या जॉन कार्नीच्या विश्वातील निवांतपणाचा एक नमुना आहे. 

मधल्या काळात कॉनर आणि त्याचं कुटुंब अनेक स्थित्यंतरांमधून जातं. ज्यामध्ये कॉनरसोबतच ब्रेन्डनचीही मानसिकता आपल्याला संक्षिप्त, तरीही प्रभावीरीत्या कळेल असं पाहिलं जातं. पुन्हा एकदा कार्नीचा मानवी नातेसंबंधांचा, त्यांच्या चित्रणाचा एक परिपक्व दृष्टिकोन इथे अनुभवायला मिळतो. आई-वडिलांमध्ये भांडणं घडत असताना भावंडांनी दार लोटून या एव्हाना नेहमीच्या झालेल्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणं असो, किंवा मग या सर्व घटनांवर मानसिक, भावनिक ते अगदी शारीरिक पातळीवर व्यक्त होणं असो, ही सगळी दृश्यं आपल्यापुढे उभी राहताना दरवेळी तितकीच अचूक आणि नेमकी असतात. 

एका दृश्यामध्ये रफीना ‘हॅपी-सॅड’ अशी आनंदमिश्रित दुःखाची एक संकल्पना कॉनरपुढे मांडते. त्याला नेमकं या सुख आणि दुःखाच्या मधल्या अवस्थेत जगणं जमत नसल्याचं बोलून दाखवते. सोबतच प्रेम ही संकल्पनाच मुळात या मधल्या अवस्थेतील आहे, असंही म्हणते. ही अवस्था, ही संकल्पना म्हणजे कार्नीच्या या तिन्ही सांगीतिक चित्रपटांतील आणखी एक समान मुद्दा मानता येईल. अकस्मातपणे दोन किंवा त्याहून अधिक लोकांची भेट होणं, ती माणसं संगीताने जोडली जाणं यासोबतच त्या माणसांची मानसिकता अशीच आनंदमिश्रित दुःख प्रकारात मोडणारी असणं त्याच्या चित्रपटांमध्ये हमखास आढळून येतं. अर्थात इथे मेख अशी की या व्यक्ती कधीच या संमिश्र भावनेतून बाहेर पडण्याचा अट्टाहास, आटापिटा करत नसतात. त्यांच्या आयुष्यात जे काही घडायचं ते अशक्यप्राय योगायोग आणि शक्याशक्यतेच्या बळावर घडतं. इथे कॉनरचं रफीनाला भेटणं, ‘वन्स’मधील पुरुष (ग्लेन हॅन्सर्ड) आणि तरुणीची (इर्ग्लोवा) भेट आणि ‘बिगीन अगेन’मधील डॅन (मार्क) आणि ग्रेटाची (किएरा नाइटली) भेट या सगळ्या भेटी आकस्मिकपणे घडतात. त्यामुळे या सगळ्या घटनांमध्ये एक उपजत सहजता असते. कार्नीच्या चित्रपटांमध्ये संगीत आणि प्रेम या दोन्ही संकल्पना एकमेकांच्या हातात हात घालून किती प्रभावीपणे समोर येतात. 

अशावेळी पात्रांवर आपल्या जगाचे, कथे-पटकथेचे नियम न लादणं हे त्याचं वैशिष्ट्य इथं महत्त्वाचं ठरतं. ज्यामुळे आधीच्या चित्रपटांप्रमाणे ‘सिंग स्ट्रीट’मध्येही पारंपारिक आणि पात्रांच्या भविष्याची निश्चित अशी दिशा दर्शवणाऱ्या शेवटाचा अभाव आहे. पण, ही परिपूर्ण भासणारी अपरिपूर्णताच तर कार्नीच्या चित्रपटांना वैशिष्ट्यपूर्ण आणि खास बनवते. या अपरिपूर्णतेमुळेच तर त्या पात्रांचं विश्व, त्यांचे अनुभव अधिक नैसर्गिक भासतात. आणि या अपारंपरिक दृष्टिकोनामुळेच त्याचे चित्रपट कुठल्याही संवेदनशील माणसाने आवर्जून पहावेसे ठरतात.