Asia

चीनमध्ये कोरोनाव्हायरस साथीमुळं भीती, ४ जणांचा मृत्यू २९१ जणांना लागण

अशी भीती २००३ साली SARS विषाणूनं निर्माण झाली होती.

Credit : Reuters

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार, चीन सरकारनं कोरोनाव्हायरसच्या साथीनं ४ मृत्यू झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. आत्तापर्यंत चीनमध्ये २९१ जणांना या आजाराची लागण झाल्याची माहिती कळते. हा व्हायरस, म्हणजेच विषाणू, मानवी संपर्कानं पसरू शकत असल्याचं सिद्ध झाल्यानं अनेक आंतरराष्ट्रीय विमानतळांवरती तपासणीच्या सुविधा तैनात करण्यात आल्या आहेत. 

याबाबतचं गांभीर्य लक्षात घेऊन, संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक आरोग्य संघटनेनं या विषाणूच्या साथीला अंतरराष्ट्रीय आरोग्य आपत्कालस्थिती घोषित करता येईल का, याचा आढावा घेण्यासाठी बुधवारी एका बैठकीचं आयोजन केलं आहे. मानवी संपर्कातून पसरू शकणाऱ्या आजारांचा सर्वत्र पसरण्याचा वेग जास्त असल्यानं आणि पूर्व आशियामध्ये पारंपरिक नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो प्रवासी  पर्यटक गर्दी करणार असल्यानं सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं आहे. 

२००३/२००४ मध्ये चीनमधूनच पसरलेल्या SARS या विषाणुमुळं जगभर जवळपास ८०० लोक मृत्युमुखी पडले होते. चीनच्या वुहान शहरात या विषाणूच्या लागणीच्या सर्वात जास्त परिणाम आढळला आहे. अशाप्रकारची लागण फिलिपिन्स मधल्या १ व्यक्तीला, जपान आणि दक्षिण कोरिया मध्ये १ व्यक्तीला, तर थायलंडमध्ये २ व्यक्तींना झाल्याचं आढळलं आहे. चीन सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, १५ आरोग्य कर्मचाऱ्यांना या विषाणूची लागण झाली आहे. या घबराटीचा परिणाम चिनी व्यापार व बाजारावरही दिसून आला.

या आजाराची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये न्यूमोनियाशी साधर्म्य असलेली चिन्हं, जसं की श्वास घेण्यात अडचण, अचानक वाढणारा ताप, खोकला इ. दिसून येतात. हा आजार सध्या उपलब्ध असणाऱ्या जैव-प्रतिबंधक औषधांना प्रतिसाद देत नाही. कोरोनाव्हायरस हे सहसा प्राण्यांमध्ये आढळून येणारे विषाणू आहेत, जे क्वचितच मानवी संपर्कात येतात. चिनी आरोग्यतज्ञांच्या मते, हा आजार वुहानच्या प्रसिद्ध मासळी बाजारात पसरून अन्नावाटे मानवी शरीरात गेला असावा. चीनमध्ये व अनेक आंतरराष्ट्रीय विमानतळ व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तपासणी सुरु आहे. काही विमान कंपन्यांनी वुहान शहराकडं जाणाऱ्या प्रवाशांना तिकीट रद्द करायचं असल्यास संपूर्ण शुल्क परत करण्याची खात्रीही दिली आहे.