India

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्याचं देशभरात चक्काजाम

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातही चक्का जाम आंदोलन करण्यात आलं.

Credit : Indie Journal

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी मागच्या अडीच महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज देशभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. 

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचं दिल्लीत विविध सीमांवर आंदोलन सुरुच आहे. आज शेतकरी आंदोलनाचा 72 वा दिवस आहे. मोठ्या संख्येनं शेतकरी दिल्लीतील सीमांवर तळ ठोकून बसले आहे. सिंघू, टिकरी आणि गाजीपूर या मुख्य सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकरी आपल्या मागणीवर ठाम असून, केंद्र सरकारनं हे कायदे तात्काळ रद्द करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून, संसदेत शेतकरी आंदोलनावर विरोधक सरकारला जाब विचारत आहेत. सरकारनं तात्काळ हे कायदे रद्द करावे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

फक्त राष्ट्रीय आणि राज्य मार्ग जाम करण्याचं आवाहन भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी केलं होतं. दिल्लीच्या सीमेवर दाेन महिन्यांहून अधिक कालावधीपासून दिल्लीतील विविध सीमांवर कडाक्याच्या थंडीतही शेतकरी आंदाेलन सुरू आहे. त्यावर ताेडगा न निघाल्यामुळे शेतकरी संघटनांनी आंदाेलन तीव्र करण्यासाठी आज शनिवारी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत देशव्यापी चक्का जाम आंदाेलन केलं. यावेळी राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं की, जे शेतकरी दिल्लीला येऊ शकले नाहीत, त्यांनी आपापल्या ठिकाणी आंदाेलन करावं. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहनं तसंच खासगी वाहनातून काेणी आजारी व्यक्ती जात असल्यास अशा वाहनांना रोकू नये. चक्का जाम आंदाेलनाबाबत काेणतीही सूचना देण्यात आलेली नाही, असे पाेलिसांचे म्हणणे आहे. मात्र, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरयाणातील पाेलीस सतर्क होते.

 

तर देशासमोर मोठे संकट - शरद पवार

शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकार असंवेदनशील भूमिका घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केला. "भव्य बॅरिकेडस्‌, तारा आणि रस्त्यावर खिळे ठोकण्यावरून त्यांनी सरकारची निंदा केली. ब्रिटिशांच्या राजवटीतदेखील असं झाल्याचं पाहाला मिळालं नाही. सरकारला शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात रस नाही," अशी टीका त्यांनी केली.

 

शिवसेनेच्या बुद्धीचा चक्काजाम झालाय का? आशिष शेलार ट्विटरवर 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा सन्मान केला त्या व्यक्तींवर शिवसेना शिंतोडे उडवून महाराष्ट्रद्रोह का करतेय, असा सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे. काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा चक्काजाम झालाय का? असा टोलाही त्यांनी लगावला.

शेलार यांनी ट्विटद्वारे आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, "देशांतर्गत विषयात उगाच ढवळाढवळ करणाऱ्या रिहाना, ग्रेटा थ्युनबर्ग, मिया खलिफा या परदेशी सेलिब्रेटिंच्या तालावर काँग्रेस-शिवसेनेनं 'पॉप डान्स' केला. तर या परदेशी सेलिब्रेटिंना सचिन तेंडुलकर, लतादीदींनी खडसावलं, अण्णा हजारेंनी लोकशाहीचा सन्मान केला तर त्यांच्याविरोधात धिंगाणा घातला."

वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा प्रचंड सन्मान केला त्या भारतरत्न, महाराष्ट्रभूषण व्यक्तींवर शिवसेना शिंतोडे उडवून महाराष्ट्र द्रोह का करतेय? काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा 'चक्काजाम' झालाय? सत्तेसाठी महाराष्ट्र धर्मावर 'ट्रॅक्टर' फिरवणार का? असे अनेक प्रश्नही शेलार यांनी शिवसेनेला विचारले. 

 

महाराष्ट्रात चक्काजाम, महिलांचाही सहभाग

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातही चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात शेतकरी संघटनांसह राजकीय पक्षांचाही सहभाग होता. पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथे दुपारी साडे बाराच्या सुमारास चक्का जाम आंदोलन सुरु करण्यात आलं. यावेळी नाशिक-पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर परिसरात रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात शेतकरी संघटनासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. केंद्र सरकारनं केलेले कृषी कायदे त्वरीत मागे घेण्यात यावे, अशी मागणी यावेळी या आंदोलकांनी केली. 

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात पवनार येथील चौरस्ता शेतकऱ्यांनी रोखला. वर्ध्यात दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी गेल्या 53 दिवसापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्यामुळे शेतकरी कामगार आंदोलन समन्वय समितीतर्फे आज शेतकरी पवनार येथे रस्त्यावर उतरलेत. इथे हातात तिरंगा झेंडा घेऊन चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात महिलाही सहभागी झाल्या आहेत. मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्यात आला. नागपूर – तुळजापूर महामार्गही शेतकऱ्यांनी रोखून धरला. नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील निफाड येथे चांदोरी चौफुलीवर किसान सभा आणि छावा क्रांतीवीर सेनेच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.