India

काश्मीरमधून स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्या 'द कश्मीर वाला'वर जाचक कारवाई

काश्मीरमध्ये उरलेल्या स्वतंत्र पत्रकारितेच्या काही मोजक्याच माधम्यांपैकी ‘द कश्मीर वाला’ एक प्रमुख नाव मानलं जातं.

Credit : इंडी जर्नल

 

जम्मू-काश्मीरमधील ‘द कश्मीर वाला’ (thekashmirwalla.com) या माध्यमसंस्थेची वेबसाईट आणि त्यांची समाज माध्यमांवरील हॅण्डल्स केंद्र सरकारनं कारवाई करत शनिवार १९ ऑगस्ट रोजी बंद केली. काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर तग धरू शकलेल्या स्वतंत्र पत्रकारितेच्या काही मोजक्याच माधम्यांपैकी ‘द कश्मीर वाला’ एक प्रमुख नाव मानलं जातं. मात्र गेल्या जवळपास दीड वर्षांपासून द कश्मीर वाला आणि तिथे काम करणाऱ्या पत्रकारांना सरकारकडून जाच आणि सेन्सॉरशिपचा सामना करावा लागत होता.

संस्थेला वेबसाईट संबंधित सेवा पुरवणाऱ्या कंपनीनं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आयटी कायदा, २००० च्या अंतर्गत ही कारवाई केली गेली असल्याचं त्यांना सांगितलं. याचबरोबर जवळपास ५ लाख फॉलोअर्स असणारं फेसबुक पेज तसंच त्यांचं एक्स म्हणजेच ट्विटर हॅन्डलदेखील बंद करण्यात आलं असल्याचं, ‘द कश्मीर वाला’नं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

विशेष म्हणजे श्रीनगरमधील ‘द कश्मीर वाला’चं कार्यालय ज्या जागेत चालतं, ती जागा खाली करण्याची नोटीस नुकतीच जागेच्या मालकानं त्यांना बजावली होती. त्यानुसार तिथून कार्यालय स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरु असतानाच ही कारवाई घडली असल्याचं या पत्रकात पुढं म्हटलं आहे.

जवळपास १२ वर्षांपासून काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या या माध्यमसंस्थेला गेल्या १८ महिन्यांपासून अनेक नवीन आव्हानांना सामोरं जावं लागत होतं. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ‘द कश्मीर वाला’चे संस्थापक संपादक फहाद शाह यांना पुलावामामध्ये अटक झाली. ते समाज माध्यमांवर ‘राष्ट्रविरोधी मजकूर’ टाकून दहशतवादी कारवायांचं उदात्तीकरण करत असल्याच्या आरोपाखाली सार्वजनिक सुरक्षा अधिनियम कायद्याअंतर्गत त्यांना अटक झाली. या कायद्याअंतर्गत एक वर्षापर्यंत कोणत्याही सुनावणीशिवाय अटक झालेल्यांना तुरुंगात ठेवता येतं. त्यांच्या विरोधात युएपीए अंतर्गतसुद्धा २ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पुलवामामधील एका कुटुंबानं त्यांचा निर्दोष मुलगा एन्काउंटरमध्ये मारला गेल्याचा दावा केला होता, यासंदर्भातील बातमी केल्याबद्दल शाह यांना अटक झाली असल्याचं म्हटलं जातं.

 

 

शाह यांना अटक होण्यापूर्वी ‘द कश्मीर वाला’च्या सजाद गुल या प्रशिक्षणार्थी पत्रकारालादेखील अटक झाली, तेदेखील अजून उत्तर प्रदेशमध्ये अटकेत आहेत. श्रीनगरमध्ये एका कुटुंबानं त्यांचा नातेवाईक चकमकीत मारला गेल्यानंतर ‘देशविरोधी’ घोषणा दिल्या होत्या. त्याचा व्हिडियो समाज माध्यमांवर टाकल्याबद्दल गुल यांना अटक करण्यात आली.

‘द कश्मीर वाला’च्या सर्वच पत्रकारांना सतत पोलीस आणि सरकारकडून अत्याचारांना सामोरं जावं लागत असल्याचं त्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अटकेच्या आधी जवळपास २ वर्षांपासून शाह यांना सतत प्रतिबंधात्मक अटका आणि पोलिसांकडून चौकशीला तोंड द्यावं लागत होतं.

केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार जम्मू-काश्मीरमधील जनतेच्या कथित भल्यासाठी २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्यापासून काश्मीरमध्ये माध्यमसंस्थांसाठी टिकून राहणं जिकिरीचं काम झालं आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी लागलेल्या भारतातील सर्वाधिक काळ सुरु राहिलेल्या इंटरनेट बंदीमुळं माध्यमांना त्यांचं काम करणं अतिशय कठीण झालं होतं, अनेक स्वतंत्र माध्यमसंस्था या काळात बंद पडल्या.

याव्यतिरिक्त अनेक काश्मिरी पत्रकारांना गेल्या ४ वर्षांत वेगवेगळ्या प्रकारे सरकार आणि काश्मिरी पोलिसांकडून दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. पत्रकार असिफ नाईक आणि सलीम पंडित यांच्याविरोधातील तक्रारी काश्मीर उच्च न्यायालयानं रद्द केल्या. न्यूजलॉन्ड्रीनं केलेल्या एका बातमीनुसार विशेष म्हणजे अटक करताना या पत्रकारांना पत्रकार म्हणून नाही, तर समाज माध्यमांवर त्यांनी केलेल्या पोस्टसाठी अटक केलं गेलं असल्याचं म्हटलं जात आहे. शाह आणि गुल यांच्यासोबतही हेच घडलेलं दिसतं.

‘द कश्मीर वाला’ची कथा एका अर्थानं ‘काश्मीरमधील माध्यम स्वातंत्र्याच्या उदय आणि अस्ताची कथाच आहे’, असं त्यांनी जारी केलेलं पत्रक शेवटी म्हणतं.