India

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा

बीड शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बीड जिल्ह्याधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा.

Credit : Indie Journal

बीड: दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ तिन्ही कृषी कायदे रद्द करावे, सक्तीची वीजबील वसुली थांबवावी, मागील वर्षाची शेतीपंपाची वीज बिलं माफ करावी, तसंच पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, आदी मागण्यांसाठी बीड शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बीड जिल्ह्याधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

त्याचबरोबर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करावी, बीटी कापसाची बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे १४ दिवसांच्या आत ऊस बील द्यावे, वयाच्या ६० वर्षानंतर शेतकऱ्यांना १० हजार रुपये दर महिना पेन्शन घ्यावी, या मागण्यांचं निवेदन शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना दिलं.

शेकापचे भाई मोहन गुंड, दत्ता प्रभाळे, आदींनी या 'बैलगाडी' मोर्चाचं नियोजन केलं होतं. दलित भटक्या मुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक ढवळे सर यांनी केंद्रसरकार आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. यावेळी अॅड अविनाश राव देशमुख, अॅड नारायण गोले पाटील यांची भाषणं झाली, तर भाई मोहन गुंड यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरलं तर कायदा हातात घेऊ असा इशारा दिला.

या मोर्चाला माकपचे मोहन जाधव, बहुजन रयत परिषदेचे रमेश तात्या गालफाडे, काँग्रेसचे नागेश मिठे पाटील, सामाजिक कार्यकर्त्या किस्किंदा पंचखळ, संभाजी ब्रिगेडचे गणेश मस्के, अॅड संग्राम तुपे, दत्ता प्रभाळे, भीमराव कुटे, अर्जुन सोनवणे, अशोक रोडे, लहु सोळंके, सुग्रीव लाखे, शेख वजीर अशोक रोडे, अनिल कदम सर्व जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.