India

बिहार विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ, विरोधी आमदारांना पोलिसांची बेदम मारहाण, विरोधकांचा तीव्र संताप

बिहार विशेष सशस्त्र पोलीस विधेयकावरुन (Bihar special armed police bill 2021) हा गोंधळ झाला.

Credit : PTI

पटना: बिहार विधानसभेत कोणालाही वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना देणाऱ्या विधेयकावरून अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. बिहार विशेष सशस्त्र पोलीस विधेयकावरुन (Bihar special armed police bill 2021) तुफान गोंधळ झाला. विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांनी या विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला. इतकंच नाही तर आमदारांना मारहाणही झाली. एक महिला आमदार विरोध करत असताना थेट विधानसभा अध्यक्षांच्या आसनापर्यंत पोहोचली. शेवटी महिला पोलिसांना पाचारण करत त्या आमदाराला सदनाबाहेर काढण्यात आलं. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना साध्या ड्रेसमध्ये सदनात तैनात करण्यात आलं होतं.

सर्वसामान्य माणसांचे अधिकार काढून घेऊ नयेत, असं म्हणत विधेयकाला विरोध केला जात होता. तर सत्ताधारी पक्षाचं म्हणणं होतं की, हे विशेष पोलिस बिल आहे. याचा सामान्य पोलिसांशी काही संबंध नाही. बिहारच्या विधानसभेत झालेल्या गोंधळावेळी काही आमदार, पोलिस कर्मचारी आणि पत्रकार जखमी झाले आहेत.

 

विधानसभेच्या आत आणि बाहेर अभूतपूर्व गदारोळ

बिहार विधानसभेच्या इतिहासात अशी घटना कधीच घडली नाही. विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभागृहा आणि सभागृहा परिसरात जोदराद गोंधळ घातला. हा गदारोळ इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला की अखेर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना मोठ्या संख्येत पोलीस बळ विधानभवनात बोलवावं लागलं. यावेळी आमदारांसोबत पोलिसांच्या झटापटीचे व्हिडिओ व्हायरल झाले. मल्ल युद्ध सारख्या स्थितीत अखेर संध्याकळी बिहार सशस्त्र पोलीस बल विधेयक २०२१ विधानसभेत मंजूर झालं. गोंधळ घालत असलेल्या विरोधी पक्षाच्या आमदारांना बाहेर काढल्यानंतर उर्वरीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केला. गदारोळ घालणाऱ्या आमदारांवर कारवाई केली जाईल, असं विधानसभेचे अध्यक्ष विजयकुमार सिन्हा यांनी सांगितलं.

दुपारी ४.३० वाजता सदनाची कामकाज सुरु होणार होतं. पण त्यापूर्वीच आरजेडीसह अन्य विरोधी पक्षाचे आमदार विधानसभा अध्यक्षांच्या गेटजवळ पोहोचले. त्यांनी अध्यक्षांना कोंडून घेतलं. त्यांना हटवण्यासाठी राज्य राखील पोलीस दलाच्या जवानांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी एक एक करुन सर्व आमदारांना सदनाच्या बाहेर काढलं आणि अध्यक्षांची सुटका केली.

 

विरोधी पक्षांच्या आमदार, कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज

बिहारमधील अनेक राजदने बेरोजगारी, भ्रष्टाचार, कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विधानसभेला घेराव मोर्चा केला. त्यासाठी तेजस्वी यादव आणि आरजेडी कार्यकर्ते पाटण्याताली जेपी. गोलंबर इथे जमले. त्यांनी विधानसभेवर कूच करण्याची तयारी केली. पण जिल्हा प्रशासनाकडून त्यांना परवानगी मिळाली नाही. त्यानंतर आरजेडी कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घालायला सुरुवात केली. विरोधीपक्ष नेते तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. जेपी गोलम्बरवर पोलिस बॅरिकेट तोडून कार्यकर्ते पुढे गेले होते. यावेळी पोलिसांनी पाण्याचा मारा केला. तेव्हा राजदच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार दगडफेक करण्यात आली. यामध्ये पोलिसांसह पत्रकार जखमी झाले. दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी राजदच्या अनेक कार्यकर्त्यांना जबर मार लागला. विधानसभेच्या आवारातून कार्यकर्त्यांना हटवण्यासाठी दोन तासांहून अधिक काळ पोलिस प्रयत्न करत होते.

 

 

पोलिसांनी छातीवर लाथ मारल्याचा आमदाराचा आरोप

या राड्यात आमदार सत्येंद्र कुमार यांनी आरोप केला आहे की, एसपींच्या सांगण्यावरुन त्यांच्या छातीत लाथ मारण्यात आली. छाती मार लागल्याची तक्रार सत्येंद्र कुमार यांनी केली आहे. हा फक्त अन्याय नाही तर लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप त्यांनी केलाय. आमदारांनी सांगितलं की, महिला आमदारांनाही मारहाण करण्यात आली आहे. हे सरकार महिला सशक्तीकरणाचं ढोंग करतेय, अशी टीकाही त्यांनी केलीय. पोलिसांनी अनेक आमदारांना मारहाण केलीय. पायाला धरुन ओढून नेत सदनाबाहेर काढण्यात आलं. या सर्व राड्यानंतर जखमी आमदारांना रुग्णवाहिकेतून दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आलं.

सत्ताधारी आमदारांनी आरजेडी आणि काँग्रेसच्या आमदारांना थप्पड मारल्या, असा आरोप विरोधी पक्षाच्या आमदारांनी केला. आरजेडीचे आमदार सुधाकर, सतीश दास आणि काँग्रेसचे आमदार संतोष मिश्रा यांना पोलिसा कारवाईत दुखापत झाली. त्यांना स्ट्रेचरवरून उपचारासाठी नेण्यात आलं.

 

आमदारांना बाहेर काढलं

विरोधी पक्षाचे आमदार अमरजीत कुशवाह, हे हा  सर्व प्रकार असतांना तिथे उपस्थित होते, त्यांनी इंडी जर्नलला सांगितले की, "सुरवातीला विरोधी पक्षाच्या आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला पण शेवटी प्रकरण हाताबाहेर जात असल्यानं जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना पाचारण करण्यात आलं. जिल्हाधिकाऱ्यांनीही आमदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमदारांसोबत झटापट झाली. त्यानंतर पोलिसांना सभागृहात बोलावण्यात आलं. अध्यक्षांना कोंडणाच्या आमदारांना हटवण्याचे आदेश मार्शलला देण्यात आले. हिंसक झालेल्या आणि बळजबरी करणाऱ्या आमदारांना फरफट विधानसभेतून पोलिसांनी बाहेर काढलं. यातील काही आमदारांना तर हाता पायाला धरून बाहेर हाकलण्यात आलं. आमदारांनी यावेळी आपल्याला मारहाण झाली."

आमदार सुदामा प्रसाद हे नितीशकुमार सरकार टीका करत म्हणाले की, "नरेंद्र मोदींच्या चालीवर नितीशकुमार सरकार चालत आहे. आम्ही आमच्या अधिकारांसाठी लढत आहोत. नितीशकुमार सरकारकडून सामान्यांची ही गळचेपी होत आहे. केंद्रात भाजप सरकार जी नीती अवलंबत आहे. तीच नीती नितीशकुमार सरकार राज्यात राबवत आहे."

 

 

पहिल्यांदाच पोलिसांना पाचारण

बिहार विधानसभेच्या इतिहासात प्रथमच पोलिसांना बोलाविण्यात आले. पोलिसांच्या उपस्थितीतच सभागृहाचे कामकाज सुरू झाले. अखेरीस 'बिहार शस्त्रास्त्र कायदा सुधारित विधेयक २०२१' पारित करण्यात आले. मंगळवारी सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी सदस्यांनी विधेयकाविरुद्ध जोरदार घोषणाबाजीस सुरूवात केली. त्यानंतर, सभागृहाचे कामकाज पाचवेळा स्थगित करावे लागले. तत्पूर्वी, विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव व त्यांचे भाऊ तेज प्रताप यादव यांच्या नेतृत्वाखाली राजद कार्यकर्त्यांनी विधानसभेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तो मध्येच रोखला. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेकही केली. पोलिसांनी पाण्याचा मारा करून त्यांना पांगविले.

 

विरोधी पक्षाच्या सभागृहाबाहेर समांतर सत्र

विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी आमदारांनी सभागृहावर बहिष्कार टाकला आणि परिसराबाहेर समांतर सत्र घेतले. सर्वप्रथम, आरजेडीचे भुदेव चौधरी विधानसभेचे सभापती म्हणून निवडले गेले, त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांच्या आदेशावरून सभागृहाची कार्यवाही सुरू केली.  या दरम्यान २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.  यानंतर पक्ष आणि विरोधी यांच्यात झालेल्या गदारोळावर मंगळवारी चर्चा सुरू झाली.  मंगळवारी झालेल्या घटनेवर कॉंग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मार्क्सवादी-लेनिनिस्ट यांच्यासह आरजेडीच्या आमदारांनी आपले मत मांडले.