India

देशभरातून भारत बंदला लक्षणीय प्रतिसाद

महाराष्ट्रासह देशभरातल्या सर्व बाजारपेठा बंद होत्या. राज्याभरात लाखो नागरिकांनी उत्स्फूर्त बंद पाळत दुकानं, हॉटेल्स इ. बंद ठेवली होती.

Credit : Sagar Gotpagar

कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी, संयुक्त किसान मोर्चानं आज भारत बंदचं आवाहन केलं होतं. देशभरातून त्याला लक्षणीय  प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रासह देशभरातल्या सर्व बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे भाजीपाला, फळांची वाहतूक आज होऊ शकली नाही. तर राज्याभरात लाखो नागरिकांनी उत्स्फूर्त बंद पाळत दुकानं, हॉटेल्स इ. बंद ठेवली होती. बंदाची हाक शेतकरी संघटनांनी दिली असली तरी अनेक राजकीय पक्षांनीही या बंदाला पाठिंबा देत ठिकठिकाणी ठिय्या आंदोलनं केली. राज्यात महाविकास आघाडीनं बंदाला पाठिंबा दिला.

महाराष्ट्रात आज मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, लातूर, जालन्यासह इतरही अनेक जिल्ह्यात कडकडीत बंद पाळला गेला. मुंबईत एपीएमसी मार्केट, दादर फुल मार्केटसारख्या महत्वाच्या बाजारपेठा बंद होत्या. एस.टी. महामंडळानंही संपाला पाठिंबा दिला, त्यामुळे आज एकही एस.टी रस्त्यावर धावताना दिसली नाही. पुणे - अहमदनगर या एरव्ही प्रचंड वर्दळ आणि वाहतूककोंडी असणाऱ्या रस्त्यावर आज अगदी तुरळक खासगी गाड्या ये-जा करताना दिसत होत्या. हायवेवरची अनेक हॉटेल्स आणि ढाबे बंद होते. टोलनाक्यावरही वाहनांची नेहमी दिसणारी मोठी रांग आज नव्हती. तर औरंगाबदमध्येही व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. पुण्यातील चाकण, आळेफाटा, जुन्नर परिसरातील बाजारपेठाही बंद होत्या, तसंच तिथल्या आडतदारांनी बंदला पाठिंबा दिला.

केवळ राज्यातच नाही तर देशभरात कार्यकर्त्यांनी, सामान्य नागरिकांनी रस्त्यावर येत निदर्शनं केली, घोषणाबाजी केली. पंजाब, हरयाणा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, बिहार, झारखंड, ओरिसा, आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटकमध्ये जवळपास कडकडीत बंद होता. पश्चिम उत्तर प्रदेशला जोडणाऱ्या अनेक महामार्गांवर आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला होता. दिल्ली - मेरठ महामार्ग चार तास बंद केला होता तर डाव्या संघटनांनी अनेक शहरांत चक्काजाम आंदोलनं केली. महाराष्ट्रात शेकडो आंदोलनकर्त्यांनी कृषी कायद्याच्या प्रती जाळून निषेध केला. भाजपशासित उत्तर प्रदेश, गुजरात, हरयाणा राज्यात शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

आजच्या भारत बंदला मिळालेला प्रतिसाद पाहून गृहमंत्री अमित शहा यांनी आज तातडीनं शेतकऱ्यांसोबत एक बैठक बोलावली आहे. तेरा शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ शहा यांना भेटायला गेलं आहे. शेतकरी संघटना, कृषी कायदे रद्द केले जावेत, या मागणीवर ठाम आहे. ही बातमी प्रकाशित होईपर्यंत शेतकरी आणि शहा यांची बैठक सुरूच होती. उद्या पुन्हा शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये सहाव्यांदा याबाबत चर्चा केली जाणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी दिल्लीला घेराव घालून सुरु केलेल्या या आंदोलनाला तेरा दिवस पूर्ण होत आहेत. सुरुवातीच्या काही दिवसांत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर लाठीमार, अश्रूधुराचा वापर केला गेला, तर कुठे शेतकऱ्यांच्या वाहनांना दिल्लीत जाता येऊ नये, म्हणून खड्डे खोदले गेले, समाजमाध्यमांवर हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु अजूनही शेतकरी त्यांच्या पवित्र्यावर ठाम आहेत. कायद्यात सुधारणा नको, कायदेच रद्द करा,या मागणीसह आज तेराव्या दिवशीही शांततामय मार्गानं आंदोलन सुरु आहे.