India

बंगाल भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचंच कार्यालय फोडलं

अशीच घटना आणखी एका ठिकाणी झाल्यानं बंगाल भाजपच्या अंतर्गत कलहावरून चर्चा सुरु झाली.

Credit : PTI

बुर्द्वान: बंगाल भाजपच्या तरुण आणि जुन्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादावादीत एका गटाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाचं कार्यालय फोडल्याची घटना गुरुवारी पूर्व बुर्द्वान इथल्या भाजप पक्ष कार्यालयात झाली. अशीच घटना आणखी एका ठिकाणी झाल्यानं बंगाल भाजपच्या अंतर्गत कलहावरून चर्चा सुरु झालेली असली तरी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याची पावती तृणमूल काँग्रेसवर टाकली आहे. 

गुरुवारी पूर्व बुर्द्वान येथील भाजप कार्यालयात काही वयस्कर नेते व कार्यकर्ते आपली तक्रार घेऊन आले होते. 'वर्षानुवर्ष पक्षासाठी काम केलेल्या वरिष्ठांना नवख्या नेतृत्वाकडून डावललं जात आहे आणि नवख्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कामकाजावर आपली पकड ठेवली' असल्याचा आरोपवजा तक्रार घेऊन ते कार्यालयावर पोहोचले असता त्यांचा तिथल्या दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्यांशी वाद झाला. हा वाद आणि चर्चा निष्कर्षापर्यंत जायच्या आधीच त्यातला एक गट उठून बाहेर पडला आणि बाहेरून पक्ष कार्यालयावर दगडफेक केली आणि जवळच थांबलेल्या दोन मोटारगाड्या पेटवून दिल्या. कोणत्या गटानं हे केलं हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. 

भाजपची व्हर्च्युअल राष्ट्रीय पक्षीय बैठक सुरु असतानाच हा सर्व घटनाक्रम घडला. भाजपच्या वरिष्ठांच्या मते या घटनेमागे तृणमूल कार्यकर्त्यांचा हात आहे. तृणमूलच्या नेत्यांनी याचं स्पष्ट खंडन करत असं म्हटलं आहे की 'त्यांचेच कार्यकर्ते एकमेकांवर हल्ले करत असताना आम्ही त्याच्यात पडण्याचा काहीच संबंध येत नाही'. या घटनेनंतर जी तणावाची परिस्थतीती निर्माण झाली होती ती पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर शांत झाली. 

बंगाल भाजपच्या असनसोल विभागीय कार्यालयातही केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो आणि भाजप नेते अरविंद मेनन आलेले असतानाच काही कार्यकर्त्यांनी बैठक उधळून लावत त्यांच्याशी वादावादी केली जिचं रूपांतर झटापटीत झाल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं म्हटलं आहे. यावर स्पष्टीकरण देताना सुप्रियो म्हणाले की 'काही कार्यकर्त्यांना त्यांचे प्रश्न मांडायचे होते, त्यातून भावनिक गैरसमज झाले याला फार महत्त्व देऊ नये'. या घटनांमुळं बंगाल भाजपच्या कार्यकर्त्यांमधली धुसफूस समोर आली असल्याची चर्चा आहे.