Opinion

‘औरंगाबाद नामांतराचे मुल्यभान- संभाजीनगर की अंबराबाद?’

शहराची नामांतरे ही नव्या मुल्याभानासाठी जुन्या संदर्भाची जुळवणी करुन सांस्कृतीक आत्मभानाकडे वाटचाल करतात.

Credit : Shubham Patil

- सरफराज अहमद

 

विद्यापीठ नामांतराच्या मुद्यावर नामविस्तारातून पदरी पडलेले पराभवाचे शल्य शिवसेनेला बोचणारे होते. सेनेला राजकीय वर्चस्वाचा सांस्कृतिक अहंकार दलितांवर लादून राजकारणाचा तेज मिळवता आला नाही. पण नामविस्ताराच्या या प्रकरणातून हवा असणारा जातीय अस्मिता दुखावल्यानंतरच्या जातीयद्वेषाचा अफू शिवसेनेला पुढच्या पंचवीसेक वर्षांसाठी हाशील झाला. औरंगाबाद महापालिका आणि लोकसभेच्या जागेवरील वर्चस्व हे त्याचेच फलित होते. मिळालेली ही सत्ता अबाधित ठेवण्यासाठी सेनेला सातत्याने जातीय अस्मितेचे खुराक मतदारांच्या पुढ्यात वाढणे गरजेचे होते. बाळ ठाकरे त्यात माहिरही होते. त्यांनी औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव पुढे करुन संभाजीनगर या शिर्षकाखाली हिंदू-मुस्लिम दरी रुंदावत नेली. पुढे बाबरी प्रकरण, मुंबईतील दंगली असा वादांचा, संघर्षाचा आलेख सर करत सेना राज्याच्या राजकारणात मजबूत होत गेली. सोबत भाजप आणि संघाचे शिस्तबध्द विखारी जाळे मजबूत करण्यासाठी पुरक परिस्थिती सेनेने निर्माण करुन ठेवली.

अशा विपरित अवस्थेत महाराष्ट्रातील मुसलमानांना आपले सांस्कृतिक अस्तित्व अबाधित ठेवत राजकीय हक्क मिळवण्याचे आव्हान ९० च्या दशकानंतर पेलावे लागले. त्यात ते अपयशी ठरले की त्यांच्या सांस्कृतिक समजेच्या बळावर ते यात यशस्वी ठरले हा संशोधनाचा विषय आहे. पण वर्तमानात मात्र औरंगाबाद नामांतराच्या मुद्याने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. त्यामुळे भाजप सत्तेतून दुर झाल्याचे समाधान मानणारे मुसलमान सांस्कृतिक दृष्ट्या गोंधळलेपणाच्या स्थितीत ढकलेले गेलेत.  

वर्षानुवर्षे झालेल्या मुल्यांच्या संघर्षातून निर्माण झालेल्या वर्तमानाचे उत्तर तात्काळ किंवा तात्पुरते देता येत नसते. या वास्तवाचे भान मुस्लिमांना अद्याप यावयाचे आहे. त्यामुळेच जातीय राजकारणात अडकलेल्या महापुरुषांच्या दैवतीकरणाला त्यांनीही हातभार लावला. यातून संवाद वाढला की संबधित जातीचा अस्मितावादी, सांस्कृतिक अहंकार वाढीस लागला, याचा शोध मुस्लिम समजाला घ्यावा लागेल. कारण विरोधात चाललेल्या गटाचे अहंकार हरेक प्रकारे पोसल्यानंतर समन्वय निर्माण होण्याऐवजी प्रतिस्पर्धी गटाला शरणागती स्विकारायला लावल्याचा अहंकार आणि वर्चस्वाचा माज त्या गटात दृढमुल होतो. त्यातही मुस्लिम समाजाला अशा सांस्कृतिक वर्चस्ववादाला उत्तर देण्याऐवजी सांस्कृतिक गोंडसपणा स्विकारुन दयेवर जगण्याची सवय लागली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा औरंगबाद नामांतराच्या मुद्यावर ते सांस्कृतिक गोंडसपणा स्विकारायचा की सांस्कृतिक प्रतिवाद करायचा याविषयी निर्णय घेऊ शकत नाहीत. त्याखेरीज महाराष्ट्रातील  मुस्लिमांना उत्तरेच्या मुसलमानांच्या प्रभावातून मुक्त होऊन मोकळ्या भूमिका घेता आल्या नाहीत.  त्यामुळे औरंगाबादच्या मुद्यावरुन पुन्हा महाराष्ट्रीयन मुसलमानांच्या सांस्कृतिक भुमिकांची रचना उत्तरेच्या सांस्कृतिक  प्रभावात होण्याचा धोका आधिक आहे.   

 

नामांतराचे सांस्कृतिक मुल्यभान

शहराची नामांतरे ही नव्या मुल्याभानासाठी जुन्या संदर्भाची जुळवणी करुन सांस्कृतीक आत्मभानाकडे वाटचाल करतात. राज्यावरील सत्ताबदलासह संस्कृतीच्या आकलनाची दृष्टी बदलते. किंबहूना नव्या संस्कृतीच्या स्थापनेसाठीची राजकीय मुल्ये वेगाने प्रचारीत आणि प्रसारीत केली जातात. भारतात नामांतराचा इतिहास खूप जुना आहे. नव्या संस्कृतीचे मुल्यभान घेऊन आलेल्या प्रत्येक राज्यकर्त्यांने स्वतःच्या राजकीय आणि सांस्कृतिक मुल्यनिष्ठा लादण्याचे प्रयत्न नामांतरातून केले आहेत. औरंगाबादचे नामांतर ही न टाळता येणारी प्रक्रीया आहे. या वास्तवाला स्विकारुन मुस्लिमांना औरंगाबाद शहराशी असलेले स्वतःचे नाते जपण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागणार आहेत. पण असे प्रयत्न करण्याऐवजी अनेक मुस्लिम नेते औरंगजेबचे नर्दोषत्व सिध्द करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.  

 

औरंगजेबचे निर्दोषत्व सिध्द करुन काय मिळेल?

अशावेळी औरंगजेबचे निर्दोषत्व सिध्द करण्याच्या भानगडीत न पडता नवा सांस्कृतिक पर्याय उभा करुन मुसलान या सांस्कृतिक पेचातून औरंगाबादसोबत असलेले त्यांचे कल्चरल रिलेशन अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करु शकतील. शिवाय औरंगजेबच्या निर्दोषत्वासाठी प्रयत्न करुन संघ आणि त्याच्या पुरक संघटनांच्या मुसलमानांविषयीच्या प्रचाराला बळकटी मिळू शकेल. कारण सन १६७५ मध्ये औरंगजेबकडून झालेली गुरु तेगबहादूर यांची हत्या त्यानंतर छ.संभाजीची इसवी सन १६८९ साली केलेली हत्या अनुक्रमे शिख आणि मराठा समाज विसरु शकला नाही. अशावेळी औरंगजेबच्या निर्दोषत्वासाठी संपूर्ण संस्कृतीकारण वेठीस धरायचे की कल्चरल रिलेशनशिप अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे या पेचातून मुस्लिमांना बाहेर पडावे लागेल. 

औरंगजेबच्या मुद्यावर मुसलमान सातत्याने त्याच्या धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा पुढे करतात. सामंतशाही व्यवस्थेवर उभे असलेले कोणतेही सरंजामी राज्य सामंतांच्या धर्मनिष्ठांपलिकडे जाऊ शकलेले नाही. त्यामुळे मध्ययुगातील कोणताही हिंदू-मुसलमान राजा, बादशाह धर्मनिरपेक्ष असण्याचा प्रश्नच नाही. फार तर अशा राजांकडे सहिष्णूतेची अथवा मानवी मुल्यांची दृष्टी असू शकेल. राहिला प्रश्न औरंगजेबचा  तर मुसलमानांकडे  प्रतिवादासाठी ज्या पध्दतीने देणग्या दिलेल्या मंदिराची चार-दोन उदाहणे असतील तशी त्याने पाडलेल्या अनेक मंदीराचे दाखलेही त्याच्याच कागदपत्रात दडलेले आहेत.  त्याच्या या कारवाया ना इस्लामशी संबधित होत्या ना मुस्लिम समाजाशी. त्या कारवायातून त्याला त्याच्या राजकारणाचे हित साधायचे होते. ते त्याने साधले. मंदिरे पाडण्यामागे औरंगजेबच्या राजकीय भूमिका कारणीभूत होत्या. त्याच भूमिकांमुळे त्याने गोवळकोंड्याच्या कुतुबशाहची मसजिदही पाडली होती. छ. संभाजी आणि गुरु तेगबहादूर यांच्या हत्याही राजकीय विद्रोहाच्या मुद्यावरुन झालेल्या आहेत. पण त्या हत्यांचा संबधित समुदायावर झालेला सांस्कृतिक परिणाम मात्र दुरगामी आहे. 

शिवाय बहुसंख्याकातील या गटांशी सांस्कृतिक समन्वय आणि सामाजिक मैत्रीशिवाय दखनी मुस्लिमांना औरंगाबादशी निगडीत त्यांचे स्वतःचे संस्कृतीकारण विकसित करता येणार नाही. त्यामुळे या गटांशी संवाद कायम ठेऊन औरंगजेबच्या मुद्यावरुन प्रतिवाद करण्यापेक्षा औरंगाबादशी असलेल्या कल्चरल रिलेशनशीप  आणि त्याच्या उदय, विकासातील मुस्लिम समाजाच्या योगदानावरुन प्रतिवाद केल्यास मुस्लिमांना नामांतरातून होणाऱ्या आघातातून स्वतःचा बचाव करता येईल. मलिक अंबरच्या मुद्यावर मुस्लिम समाज हे सांस्कृतीक राजकारण उभे करु शकेल.

 

मलिक अंबर शोषित दखनी मुस्लिमांचा पहिला नेता

 

 

मध्ययुगीन इतिहासात महमूद गवान, युसुफ आदिलशाह यांच्यानंतर सर्वात प्रभावशाली सरदार म्हणून मलिक अंबरचा उल्लेख येतो. मराठवाडा ही मलिक अंबरची कर्मभूमी होती. गुलाम म्हणून भारतात आलेल्या मलिक अंबरला इथे स्वातंत्र्य मिळाले. त्या अर्थाने त्याची ही जन्मभूमी होती. कारण गुलामाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचा खऱ्या अर्थाने जन्म होतो. त्याला जीवन मिळते. त्या अर्थाने मलिक अंबर हा मराठवाडी अथवा दखनी मुसलमान होता. तर असा हा मलिक अंबर मुळचा कोणत्या प्रांतातला हे काही स्पष्ट होत नाही. त्याला येमेन आणि भारतात निवास केलेल्या पीटर वान डेन ब्रोके या प्रवाश्याने ‘ॲबिसिनियातील काळा काफीर’ म्हटले आहे. तर रिचर्ड इटन यांनी त्याची दखनेतील ‘शंभू’ आणि ‘चापू’ ही मुस्लिमेतर नावे नोंदवून तो कोंबाटा प्रांतातील असावा असा तर्क काढला आहे.  कोंबाटा येथेही जातीच्या उतरंडीची समाजरचना होती. त्यावरुन मलिक अंबरने मराठवाड्यात जातीच्या उतरंडी व समाजरचनेचा आधार घेउन केलेल्या राजकारणाला देखील पुष्टी मिळते. याच राजकारणाचा आधार घेउन मलिक अंबरने जहांगीरच्या उत्तरी फौजेला दक्षिणी सैन्याच्या गनिमतंत्राचा वापर करुन आस्मान दाखवले. उत्तरेच्या राजकारणाचा दक्षिणेत मुहम्मद तुघलकानंतर झालेला हा दुसरा पराभव होता. आणि तिसरा पराभव याच मलिक अंबरच्या युध्दतंत्राचा आधार घेउन मराठा सैन्याने औरंगजेबाच्या रुपाने घडवून आणला होता. दखनेच्या अस्मितेचा मलिक अंबर हा हसन बहामनी नंतरचा दुसरा प्रतिनिधी होता. दखनेच्या स्वातंत्र्यासाठी सर्वार्थाने लढणारा तो पहिला स्वातंत्र्यावीर होता. 

मलिक अंबरच्या काळात हजारोंच्या संख्येने अफ्रिकन हबशी दखनेत होते. या अफ्रिकन हबशी आणि मराठ्यांचे एकमुखी नेतृत्व त्या काळात मलिक अंबरने केले.  हिंदू निम्नवर्णीय मराठे आणि गुलामी लादलेले हबशी हे ज्या स्वातंत्र्यासाठी लढत होते, त्याची आखणी मलिक अंबरने केलेली होती. मराठ्यांनी परधर्मीय अभिजनांच्या विरोधात लढलेला हा पहिला लढा होता, आणि विशेष म्हणजे त्याचे नेतृत्वही परधर्मीय गुलामांच्या नेत्याकडे होते. त्यांनी ज्या गुलामांच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली हा लढा लढला त्या नेत्यानेही आणलेली व्यवस्था सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून निर्मिलेली होती. त्यामुळेच मलिक अंबर कित्येक वर्षांनी स्थापन झालेल्या मराठ्यांच्या स्वराज्याला देखील पार्श्वभूमी देउन गेला असे शरद पाटील सांगतात. त्यासाठी मलिक अंबरच्या सामान्य शेतकरीकेंद्री धारा पध्दतीचा ते संदर्भ देतात.   

 

खडकीची स्थापना व जलव्यवस्थापनातील क्रांती

दक्षिणी अस्मितेचा नेता आणि अहमदनगरच्या निजामशाहीचा तारणहार ठरलेल्या मलिक अंबरने खडकी म्हणजे आजच्या औरंगाबाद नगराची इसवी सन १६१० मध्ये स्थापना केली. त्याची नगररचना तत्कालीन जगातल्या नामांकीत शहरांसारखी होती. वापरलेले तंत्रज्ञान तत्कालीन जगाच्या खूप पुढचे होते. जोनाथन गिल हॅरिस यांनी खडकीच्या पाणीपुरवठा योजनेच्या दिलेल्या माहितीवरुन त्याची कल्पना येईल.  ‘‘१६१२ मध्ये जेव्हा खडकीच्या उभारणीचा आरंभिक टप्पा पूर्ण झाला त्यावेळी नहर ही जगातील सर्वांत आधुनिक, सुसज्ज अशा जल-आपुर्ती व्यवस्थांपैकी एक होती. त्यात कालवे, पाट, प्रपात, भूमिगत कालवे, कृत्रीम तलाव यांचे जाळे होते. खडकीमधून खाम हा एक लहानसा ओढा कायम वाहत असे, मलिक अंबरला खूप मोठे शहर अपेक्षित होते. एवढेच नव्हे तर तिथे लष्कराचाही खूप मोठा तळ असणार होता. या सगळ्यासाठी ओढ्याचे पाणी पुरणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याला खडकीच्या पाणी पुरवठ्यासाठी इतर काही मार्ग शोधणे आवश्यकच होते. आणि तेही असे की, जे कोणत्याही बाहरेच्या हल्ल्याला बळी पडू शकणार नाहीत. त्याने जेव्हा अहमदनगरच्या इतर सरदारांपाशी नहरच्या योजनेचा विषय काढला, तेव्हा वजीर मुल्ला मोहम्मदसहीत त्यांच्यापैकी काहींनी त्याची टर उडवली.

मुल्ला मोहम्मदला तर मलिक अबंरची योजना ‘मूर्खपणा’चीच वाटली मलिक अबंर ‘कल्पनेचे घोडे दौडवतो आहे’ असेच त्याला वाटले. वजिराच्या म्हणण्यात तथ्य होते. खडकीभोवतालचा डोंगराळ प्रदेश पाहता तिथे उंच खांब उभे करुन त्यावर पाण्याचे पाट वाहते ठेवणे कठीण होते. त्याऐवजी गुरुत्वाकर्षण आणि पाण्याचा दाब यांचा उपयोग करीत वेगवेगळी तंत्रे वापरुन उंचावरुन तसेच जमिनीखाली बोगदे खणून त्यातून पाण्याचा प्रवाह खेळवणे आवश्यक होते. नाना शंका-कुशंकांना दाद न देता मलिक अंबरची योजना यशस्वी झाली. खडकीच्या सात लाख लोकसंख्येच्या गरजा भागवू शकेल इतक्या पाण्याची व्यवस्था त्याने केली. 

सर्व शहरवासियांना पाणी पुरवायचे तर नहरला पाण्याचा एकच स्त्रोत असून आणि एकाच दिशेने प्रवाहित करुन भागण्यासारखे नव्हते, तसेच एकाच मध्यवर्ती ठिकाणी त्याची योजना करुनही चालणार नव्हते, तर त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पाणी येउन साठेल आणि तिथून विविध ठिकाणी वितरित होईल अशी योजना करावी लागणार होती. म्हणजेच पाणी पुरवठ्याचे विकेंद्रीकरण करावे लागणार होते. नहरच्या वेगवेगळ्या उपकालव्यांचा नकाशा पाहिला तर तो आजच्या मेट्रो रेल्वेच्या जाळ्यासारखा दिसतो. त्यात एकूण बारा कालवे असून मधून मधून वेगवेगळीअनेक स्टेशन्स आहेत, जंक्शन्स आहेत. तिथून शहराच्या शक्य तितक्या सर्व भागांत पाणी पोहोचू शकेल अशी योजना केलेली आहे.मुख्या कालव्यातून दोन दिशांना जाणारे दोन उपकालवे आहेत. पहिला उपकालवा शहराच्या मध्यभागी एका टेकडीवर जिथे मलिक अंबरचे मुख्यालय होते तो नौखंडा महाल (हाही मलिक अंबरनेच बांधला), जवळच्याच जुना बाजार आणि विविध श्रीमंती वस्त्यांना पाणी पुरवत असे. दुसरा उपकालवा शाहगंज भागाला पाणी पुरवठा करीत असे. या उपकालव्याला आडवा छेद देउनजाणारे बरेचसे सिरॅमिकचे पाईप होते. मूळच्या बारा कालव्यांपैकी चार आजही वापरात आहेत.’’

खडकीच्या नगररचनेसोबतच कर संकलन, जमीन धारणापध्दती, युध्दनिती, जलव्यवस्थापन आणि प्रशासनात घडवून आणलेल्या परिवर्तनाने मलिक अंबर मध्ययुगीन मराठवाड्याच्या इतिहासातील आकर्षणाचा केंद्र ठरला आहे.  खडकी परिसरात उभ्या केलेल्या उद्योगांमुळे देखील मलिक अंबर मराठवाड्याच्या विकासाचा पहिला संकल्पक ठरतो. त्याच्या काळात या भागामध्ये कागद कारखाने, कपड्याचे कारखाने, सुती कपड्याचे उद्योग, रेशीम उद्योग, शस्त्रास्त्र कारखाने, शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांची निर्मिती करणारे कारखाने, पैठण परिसरात उभे केलेले रंगकाम, लाकुडकटाई आणि रेशमी वस्त्रांच्या कारखान्यांमुळे परिसरामध्ये त्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली होती. 

 

औरंगबाद परिससरातूनच दखनेत मुस्लिम संस्कृतीची मुहर्तमेढ 

 

आमिर खुसरो आणि हजरत निजामुद्दीन

 

इसवी सनाच्या १० व्या शतकापासूनच दखनेत सुफींच्या आगमनाला सुरुवात झाली होती. १० व्या शतकाच्या मध्यापासून सुफी चळवळीतील दरवेश, मुरीद आणि संत दखनी लोकसंस्कृती, प्रादेशिक, भौगोलिक व समाजरचनेच्या अभ्यासासाठी दखनेत कधी दरवेशाच्या रुपात तर कधी व्यापारी म्हणून येत होते. सुफी चळवळीचे दखनेतील सुरुवातीच्या काळातील प्रसारक म्हणून हजरत मोमीन आरिफ बिल्लाह आणि हजरत जलालुद्दीन गंजरवा सहरवर्दी या दोघांचा उल्लेख अनेक ग्रंथात उल्लेख येतो. ते औरंगाबादजवळ खुल्ताबादेत बराच काळ वास्तव्याला होते. खुल्ताबादेत त्यांची दर्गाह आहे. या दोन्ही सुफींच्या वास्तव्याचा इतिहास अलाउद्दीन खिलजीने केलेल्या स्वारीच्या शतकभरापुर्वीचा आहे. या सुफी साधकांच्या माध्यमातून इस्लामी मुल्यांच्या प्रसारासाठीचे सुफी आंदोलन दखनेत उभे राहिले होते. खिलजीपूर्व सुफी चळवळीमध्ये शेकडो सुफी साधकांचा उल्लेख येतो. त्यामध्ये हजरत बुरहानुद्दीन गरीब, मंसूर शाह, ख्वाजा सय्यदशाह अहमद हुसैनी, सिद्दीकशाह कल्लेशेर शाह, ख्वाजा दाऊद चिश्ती, सैफुल मुल्क चिश्ती, हजरत हाजी रुमी बिजापूरी, हजरत पीर मुबरी, शेख सुफी सरमस, असदुल औलीया यांच्यासह अनेक सुफी संताचा समावेश होतो.

या सुफींच्या माध्यमातून दक्षिणेत मुस्लिम समाजाची संस्कृती, त्यांची जीवनमुल्ये आणि तत्वज्ञानाचा विकास झाला आहे. दखनेतील मुस्लिमांच्या दखनी भाषेच्या विकासात आणि त्याला निरनिराळे आयाम देण्यातही औरंगाबाद परिसराचे मोठे योगदान आहे.  डॉ. श्रीराम शर्मा यांनी ‘दखनी – हिंदी का उद्भव और विकास’ हा ग्रंथ लिहीला आहे. या ग्रंथात त्यांनी दखनीच्या जन्माची पार्श्वभूमी सांगितलेली आहे. सदर ग्रंथाच्या उर्दू आवृत्तीची प्रस्तावना डॉ. मसूद हुसैन खान यांनी लिहीली आहे. त्यामध्ये ते लिहीतात, ‘‘जुन्या उर्दुचा जन्म हजरत अमीर खुसरो यांची दिल्ली व त्याच्या आसपास झाला आहे. जन्माच्या एका शतकापश्चात ही भाषा मोहम्मद तुघलकद्वारे १४ व्या  शतकाच्या सुरुवातीला दखनेत पोहोचली. दखनेत त्याचे पहिले केंद्र दौलताबाद होते. जो मराठी मुलुखात येतो. १४४७ मध्ये बहमनी सल्तनतीच्या स्थापनेनंतर जवळपास ३०० वर्षे ही भाषा हिंदुई/दखनी या नावाने उत्कर्षाला पोहोचली.’’ अशा पध्दतीने दखनी मुस्लिमांच्या भाषेचा उदय देखील औरंगाबाद परिसरात झाला आहे. त्यामुळे औरंगाबादशी असलेले मुस्लिम समाजाचे सांस्कृतिक नाते दहाव्या शतकापासूनचे आहे. याच कारणाने औरंगाबाद शहर हे दखनी मुस्लिम समाजाच्या सांस्कृतिक आयडेंटीटीशी जुळलेले आहे. या  कल्चरल आयडेंटीटीपासून मुस्लिम समाजाला तोडून त्यांना उपरे ठरवणे योग्य ठरणार नाही. 

 

नामांतराप्रश्नी मुस्लिमांनीही प्रतिवादास सिध्द व्हावे

मुस्लिम समाजानेही दखनेतील त्यांच्या सामाजिक, धार्मिक, साहित्य- संस्कृतीचे आणि इतिहासाचे केंद्र असलेल्या औरंगाबादशी त्यांचे असलेले सांस्कृतीक संबंध जपण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. नेहमी प्रमाणे मुस्लिम समाज सांस्कृतिक गफलतीत राहून याकडे दुर्लक्ष करत राहिला तर त्यांच्या सर्वात जुन्या अशा कल्चरल आयडेंटीटीवर कायमचा आघात होउ शकेल. त्यातून मुसलमान समाजावर नव्या राजकीय-सांस्कृतिक मुल्यांचा अतिरेक होण्याचा धोका आधिक वाढेल. औरंगाबादच्या नामांतराला विरोध केलाच पाहिजे. १९४७ च्या नंतर कोणत्याही शहराच्या नावात बदल करणे योग्य नाही. पण सांस्कृतिक अपरिहार्यता म्हणून जर औरंगाबादचे नामांतर होणार असेलच तर त्याला अंबराबाद हा पर्याय देऊन मुस्लिमांनी आपली कल्चरल आयडेंटीटी टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  

दुसऱ्या बाजूने मराठा समाज आणि बहुजनांतील इतर जातवर्गांनी मुस्लिमांचा औरंगाबादशी असलेला हा सांस्कृतिक संबंध लक्षात घेऊन औरंगाबादच्या तिसऱ्या नामांतरात त्यावर अन्याय होउ न देण्याची खबरदारी घ्यायला हवी. कारण कोणत्याही समाजाला हा देश आपला वाटावा, या देशावर त्याच्या निष्ठा वाढीस लागाव्यात म्हणून त्याच्या सांस्कृतिक खाणाखूणा जपाव्याचा लागतील. त्यांना  उपरे ठरवणारा कोणताही कार्यक्रम जसा त्या समाजावर आघात करेल तसा तो देशाच्या एकसंधतेवरही परिणाम करणारा ठरेल. त्यातही छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पार्श्वभूमी निर्माण करणारा, मराठ्यांमध्ये स्वातंत्र्याची भावना जागवणारा आणि मराठवाड्यात जलक्रांती, उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी प्रयत्न करणारा औरंगाबादचा संस्थापक मलिक अंबरचे नाव शहराला देऊन महाराष्ट्राला त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. सरतेशेवटी भालचंद्र नेमाडेंच्या मते, ‘‘इतिहास पाहिला तर मराठा साम्राज्याची स्थापना कुणी केली असेल तर आपण शहाजीपर्यंत जातो. शहाजीच्या मागे जाणं आपल्याला परवडत नाही. कारण शहाजीच्या आधी मराठी साम्राज्याचा कर्ता मलिक अंबर असतो. मलिक अंबरने प्रथम मराठ्यांना राष्ट्रीयत्वाचं भान दिलं. उत्तरेकडच्या ‘हिंदुस्थानी’ मोगलांविरुध्द मराठे संघटित केले. गनिमी कावा पहिल्यांदा यशस्वी रितीनं शोधून वापरला. शहाजीसारखे सरदार तयार केले. खंडागळे विरुध्द जाधव, जाधव विरुध्द भोसले, दरोडेखोर, लुटारु आणि पुंड असे परस्परांशी लढणारे सगळे दखनी मराठे एकत्र करणारा मलिक अंबर महाराष्ट्राच्या आपल्या मध्यवर्ती संस्कृतीत धरायचा नाही का?’’ या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राला या सांस्कृतिक पेचातून द्यावे लागेल.