India

ऐका: लव्ह जिहाद: ज्यांना प्रेम समजत नाही त्यांच्या डोक्यातली भाकडकथा

ऐका कथित लव्ह जिहाद या संकल्पनेतील फोलपणा, आंतरधर्मिय जोडप्यांकडून.

Credit : शुभम पाटील

 

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ आणि आंतरधर्मिय विवाहांबद्दलच्या चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या आठवड्यात अमरावतीत एक तरुणी बेपत्ता झाल्याची घटना घडल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी हे कथित लव्ह जिहाद प्रकरण असल्याचा दावा केला. अनेक भाजप नेत्यांनीही त्यांचं समर्थन केलं. 

ही तरुणी नंतर परत आली आणि ती शैक्षणिक कारणांसाठी अमरावती सोडून गेल्याचं तिनं स्पष्ट केलं तसंच लव्ह जिहादसंबंधी राणा यांनी केलेले सर्व दावेही तिनं फेटाळून लावले. मात्र तरीदेखील याचं निमित्त साधून सुरु झालेल्या चर्चा भाजप नेत्यांनी सुरूच ठेवल्या. भाजप खासदार अनिल बोंडे यांनी अमरावतीत मोठ्या प्रमाणात लव्ह जिहादची प्रकरणं घडत असल्याचे दावे करत सरळ आंतरधर्मिय विवाहांविरोधातच राज्यात कायदा आणण्याची मागणी केली आहे.

 


Also read:

Neither love nor jihad in Maha MP's controversial claim


 

२०२१ साली भारतात कोव्हीडप्रमाणेच कथित ‘लव्ह जिहाद विरोधी’ कायद्यांचीदेखील लाट आली होती. या लाटेत अनेक भाजपशासित राज्यांनी या कथित लव्ह जिहाद संकल्पनेला आळा घालण्यासाठी जबरदस्तीनं होणारी धर्मांतरं रोखणारे कठोर कायदे आणले. मात्र मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये या कायद्यांचा वापर सरसकट आंतरधर्मिय विवाहांवरच बंधनं आणण्यासाठी आणि अल्पसंख्यांक, विशेषतः मुस्लिम तरुणांना लक्ष्य करण्यासाठी केल्याचं चित्र दिसलं. यादरम्यान महाराष्ट्रात भाजप सरकार नसल्यानं राज्यात अजूनही अशा प्रकारचा कायदा आलेला नाही. मात्र भाजप राज्यात परत सत्तेत आल्यानंतर या चर्चा पुन्हा सुरु व्हाव्यात, हा काही निव्वळ योगायोग नाही.

हिंदू धर्मातील स्त्रियांना (आणि फक्त स्त्रियांनाच) इतर धर्मातले पुरुष एका सुनियोजित षडयंत्रातून ‘पळवून’ नेत आहेत, असं लव्ह जिहाद या संकल्पनेचं कथन आहे. प्रेमाला अशा द्वेषातून आणि संकुचित नजरेतून पाहायच्या परिस्थितीत याचा आढावा इंडी जर्नलनं एका ऑडिओ रिपोर्टमधून घेतला आहे. यातील आंतरधर्मिय जोडप्यांशी साधलेला संवाद कथित लव्ह जिहाद या संकल्पनेतील फोलपणा समोर आणतो.

वार्तांकन: प्रियांका तुपे