India

आसामच्या धौलपूरमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाईत २ आंदोलकांचा मृत्यू

सोबतच ५ आंदोलक गंभीर जखमी झाले आहेत.

Credit : इंडी जर्नल

आसामच्या धौलपूर भागात गुरुवारी सकाळी कथित अनधिकृत बांधकाम विरोधी कारवाईच्या विरोधात नागरिक आंदोलन करत असताना पोलिसांनी गोळीबार केला, ज्यात दोन आंदोलकांचा मृत्यू झाला. सोबतच ५ आंदोलक गंभीर जखमी झाले. असम पोलिसांच्या मते त्यांनी बचावात्मक हिंसा केली कारण आंदोलकांनी त्यांच्यावर आधी हल्ला केला. या घटनेत मृतकांचं कथित चित्रण करणारे काही विचलित करणारे व्हिडियो सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत, ज्यामध्ये पोलीसांच्या उपस्थितीत काही व्यक्ती एका आंदोलकांच्या निर्जीव शरीराशी अमानवी वर्तन करत आहेत. 

आसाम सरकारनं धौलपुर भागात सरकारी जमिनीवर असलेली अनधिकृत घरं सोमवारी २० सप्टेंबरला पाडली होती. कारवाई झालेल्या धोलपुरच्या भागात पूर्व बंगाल मधील मुस्लिम नागरिक बहुसंख्येनं होते. आसाम सरकारनं दिलेल्या माहितीनुसार या लोकांनी सरकारी जमिनीवर अनधिकृत घरं बांधली होती आणि या लोकांना त्या जमिनी रिकाम्या करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. सुमारे ५००० लोक यामुळं रस्त्यावर आले आहेत, ज्यामध्ये लहान मुलांचा आणि वयस्कर माणसांचादेखील समावेश आहे. 

मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांनी आसाम पोलीस आणि दारंग जिल्हा प्रशासनाला पाठिंबा देणारं करत म्हटलं की, "त्यांनी सुमारे ४५०० बिघा साफ केल्याबद्दल व त्यासोबतच ८०० घरांना खाली केल्याबद्दल मी दारंग पोलिसांचे आणि जिल्हा प्रशासनाचं कौतुक करतो. बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात आमची मोहीम सुरू ठेवू," सरमा यांनी मोहिमेची छायाचित्रेही अपलोड केली आहेत.

 

 

याआधी जिल्हा प्रशासनानं जूनमध्ये पहिली कारवाई केल्यानंतर त्या भागात सत्य तपासणी समिती पाठवली होती. या समितीनं म्हटल्याप्रमाणं, या भागात ४९ मुस्लिम कुटुंबं आणि एक हिंदू कुटुंबियांची घरं पहिल्या सरकारी कारवाईत पाडण्यात आली. या भागात एक 'प्राचीन शिव मंदिर'ही असल्याचा या समितीनं केला होता. 

रोजगार आणि मोठ्या प्रमाणात महसूल निर्माण करण्यासाठी सरकार या भागात अनेक कृषी प्रकल्प बांधण्याची योजना आखत आहे, ज्याची अंदाजे किंमत ९ कोटी ६० लाख रुपये आहे. सध्या ५०० युवक इथं प्रशिक्षण घेत आहेत.