Quick Reads

आर्सेनिक अल्बम गोळ्यांची सत्यता जाणून घ्या, खरंच त्यांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढते?

कोणीही अशा गैरसमजुतीखाली राहू नये, की हे औषध घेतल्याने कोविड-१९ चा संभाव्य धोका बऱ्यापैकी कमी होईल.

Credit : The Logical Indian

- डॉ. अनुपम बाम

साधारण तीनेक आठवड्यांपुर्वी, अमेरिकेत कोविड-१९ वर संशोधन करणाऱ्या माझ्या एका मित्राचा त्रासलेल्या स्वरातला मेसेज आला, ‘हे काय भलतंच राव?’ त्याने एक जाहिरात पाठवली होती, ज्यात आयुष मंत्रालयाने ‘आर्सेनिक अल्बम-३०’ नामक एका होमिओपथी औषधाची कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी शिफारस केली होती. ते पाहून मीही एक क्षण चक्रावलोच, पण त्यावेळी मी ती बाब हसण्यावारी नेली. परवा मला त्या घटनेची आठवण झाली. मुंबईत राहणाऱ्या एका मित्राने फोन करून विचारलं, ‘या गोळ्या घेऊ का रे भाऊ?’ तेव्हा लक्षात आलं की काही ठिकाणी सरकारी यंत्रणांनी या औषधाचं वाटप सुरु केलंय. अजून एक दोघांनी माझ्याकडे याविषयी चौकशी केली, तेव्हा मी ठरवलं की, हा विषय सर्वांना समजावून सांगूया. या लेखातून समजून घेण्याचा प्रयत्न करुया की, आर्सेनिक अल्बम-३० ची नेमकी उपयुक्तता काय आहे.

 

होमिओपथीचा थोडक्यात इतिहास

सर्वप्रथम आपण थोडं इतिहासात डोकावून पाहूया. होमिओपॅथीचा जर्मन जनक सॅम्युअल हानमॅन हा स्वत: एक एलोपथीचा डॉक्टर होता. त्याने अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात होमिओपॅथीचे दोन मुख्य सिद्धांत मांडले ते म्हणजे ‘लाईक क्युअर्स लाईक’ (like cures like) आणि ‘सिरियल डायल्युशन’ (serial dilution). याच काळात औद्योगिक क्रांतीमुळे नवनवीन वैज्ञानिक शोधामुळे आधुनिक वैद्यकशास्त्राची घौडदौड सुरु झाली. सुरुवातीला एलोपथीमध्ये काही अघोरी उपचार होते, उदा: रुग्णाच्या शरीरातून जाणीवपूर्वक रक्तस्राव होऊ देणे, ज्यामुळे काही काळ होमिओपथी ही लोकांना अधिक सौम्य, सोपी व आपलीशी वाटली. पण पुढे एलोपथीने तंत्रशुद्ध पद्धतीने केलेल्या प्रगतीपुढे होमिओपथीचा बराच काळ निभाव लागला नाही. इतकंच काय हानमॅन हयात असताना होमिओपथी आणि एलोपथीच्या काही तुलनात्मक चाचण्या केल्या गेल्या, ज्यात होमिओपथी विशेष गुणकारी सिद्ध होऊ शकली नाही. (संदर्भ)

 

तरीही होमिओपथीने चिवट झुंज देत नंतरच्या काळात जगभर आपले बस्तान बसवले. अमेरिकेसारख्या आधुनिक विचारसरणीच्या देशात होमिओपथीला समर्पित जगातील पहिलीवहिली संस्था उदयास आली, हे विशेष. आणि आज भारतामध्ये कोविड-१९ सारख्या भयंकर रोगाचा मुकाबला करण्यासाठी एका होमिओपथी औषधाचा वापर सुरु झालाय, हे एलोपथीसोबतची स्पर्धा होमिओपथीने तात्पुरती का होईना, जिंकल्याचे एक द्योतक आहे !

 

होमिओपथी आणि वैज्ञानिकता 

होमिओपथीला एक पर्यायी वैद्यकशास्त्र (alternative medicine) संबोधलं जातं. खरंच त्यात काही शास्त्रीय किंवा वैज्ञानिक असं काही आहे, का? खाली पाहूया: 

बऱ्याचदा विज्ञान, वैज्ञानिक दृष्टीकोन अशा संज्ञाचा वापर, त्यांचा अर्थ नीटसा माहीत नसताना केला जातो, कारण आपल्याला विज्ञान ही ज्ञानशाखा आणि त्यात शिकवले जाणारे विषय इतपत व्यवहारी माहिती असते. पण एखादी गोष्ट वैज्ञानिक आहे की नाही, हे कसं ठरवावं, याचा आपण कधी गंभीरपणे विचार केलेला नसतो.  

विज्ञान हे मानवाने निसर्गातील भौतिक घटकांना अर्थ लावण्यासाठी विकसित केलेले एक साधन किंवा तर्कशुद्ध पद्धती आहे, ज्यात काटेकोर प्रयोगांद्वारे जमा झालेल्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढले जातात म्हणजेच ज्या गोष्टीला अशी कठोर प्रायोगिक पार्श्वभूमी नसते, तिला अवैज्ञानिक समजावे. याशिवाय, पूर्वपक्षी ज्ञात असलेल्या वैज्ञानिक तथ्यांच्या आधारेही एखाद्या वक्तव्याची वैज्ञानिकता पडताळून पाहिली जाऊ शकते. आपण या दुसऱ्या कसोटीवर होमिओपथिक सिद्धांताना तोलून पाहणार आहोत. 

हानमॅनने होमिओपथीचा प्रथम सिद्धांत, ‘लाईक क्युअर्स लाईक’ मांडला, तो मुळातच चुकीच्या निष्कर्षावर आधारित होता. १७९० च्या दरम्यान त्याने स्वत:वर एक प्रयोग केला. त्या काळात सिंकोना झाडाचं साल हे हिवतापावर औषध म्हणून वापरलं जायचं. स्वत: ठणठणीत असलेल्या हानमॅनने सिंकोना सालीचं सेवन केल्यावर त्याला स्वत:मध्ये हिवतापासारखी, मात्र सौम्य लक्षणं दिसली. या अनुभवातून त्याने असा निष्कर्ष काढला, ज्या वस्तूंचं निरोगी व्यक्तीने सेवन केल्यावर एखाद्या आजाराची लक्षणं, त्या व्यक्तीत सौम्य प्रमाणात दिसून येतात, त्या वस्तूचा वापर - त्या आजारावर उपचार म्हणून होऊ शकतो. त्याने पुढे जाऊन असंही म्हणलं की, सर्व आजारांच्या उपचाराची ही एकमेव वैश्विक पद्धत आहे. (संदर्भ)

आधुनिक वैद्यकशास्त्राचा अभ्यास असणारे कोणीही सांगू शकेल की, हा सिद्धांत केवळ चुकीचाच नाही तर धोकादायक आहे. उदाहरण द्यायचं झालं तर, अनिमियावर उपचार म्हणून बऱ्याच जणांना लोहाच्या गोळ्या दिल्या जातात. लोह समजा निरोगी माणसाने कमी प्रमाणात घेतले तर काहीच परिणाम दिसून येणार नाही. मात्र अति प्रमाणात घेतले तर मळमळ, उलटी किंवा जुलाब होऊ शकेल. यातील एकही लक्षण अनिमियात दिसून येत नाही, म्हणजेच होमिओपथी सिद्धांतानुसार लोहाचा वापर मळमळ, उलटी, जुलाब यासाठी करायला हवा, पण हे निश्चितच घातक ठरू शकेल. 

अशाप्रकारे एलोपथी आणि होमिओपथी यांच्या उपचाराच्या तत्वज्ञानामध्ये मूलभूत तफावत आहे आणि बहुतांशी ते परस्परविरोधी आहे. एकीकडे एलोपथी ही रोगाचा उगम, स्वरुप, त्यामध्ये होणारे आंतरिक आणि बाह्य बदल, उपचारांचे रोगावर आणि शरीरावर होणारे परिणाम इ. च्या प्रामाणिक मीमांसेवर आधारित आहे. तर दुसरीकडे होमिओपथीचा यातील कशाशीही सुतराम संबंध नाही. होमिओपथीत रोगांचं निदान करण्याची शास्त्रोक्त पद्धत विकसित नाही. त्यातील उपचार हे मुख्यत्वे आजारांच्या लक्षणांवर आधारित असतात. दोन्हीही उपचार पद्धतींमध्ये अजून एक महत्वाचा फरक म्हणजे एलोपथीचं प्रवाही असणं आणि होमिओपथीचं ते नसणं. एलोपथीमध्ये ज्या निदान व उपचारपद्धती एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला मान्यताप्राप्त होत्या, त्या आज कालबाह्य आहेत, याचं कारण म्हणजे वैज्ञानिक प्रगतीसोबत पुराव्यांवर आधारित एलोपथीमध्ये होत गेलेले क्रांतिकारी बदल. (संदर्भ) याउलट होमिओपथी आजही त्याच कालबाह्य सिद्धांतावर आधारित आहे. 

होमिओपथीचा माझ्या मते, सर्वात वादग्रस्त सिद्धांत म्हणजे, ‘सिरियल डायल्युशन’ या संकल्पनेवर आधारित असलेला. हाही मूळचा हानमॅनचाच, त्यानुसार होमिओपथिक सक्रीय घटक (active ingredients, उदा., आर्सेनिक ट्रायऑक्साईड)  हे साधारणपणे विशुद्ध पाणी (distilled water) किंवा अल्कोहोल यांसारख्या विद्रावकांमध्ये विरघळवले किंवा मिसळले जातात. ही प्रक्रिया वारंवार केली जाते, ज्यामध्ये सक्रीय घटकांचं सुरुवातीचं प्रमाण तेच राहतं, पण प्रत्येत पुनरावृत्तीत विद्रावक घटकांचं (solvent) प्रमाण अधिकाधिक वाढत जातं. 

उदा. सुरुवातीला एक भाग सक्रीय घटक - शंभर भाग विद्रावक घटकामध्ये मिसळला जातो. अशा प्रकारे बनलेलं मिश्रण/द्रावण त्याच्या आकारमानाच्या शंभरपट विद्रावक घटकांमध्ये मिसळलं जातं. (संदर्भ) एखाद्या होमिओपथी औषधाच्या निर्मितीमध्ये ही प्रक्रिया किती वेळा केली गेली, हे त्या औषधाच्या नावामधून प्रतीत होतं. आर्सेनिक अल्बम-३० तयार करताना वरील प्रक्रियेची तीस वेळा पुनरावृत्ती होते. थोडी आकडेमोड केल्यावर लक्षात येईल, अंतिम मिश्रणामध्ये आर्सेनिक ट्रायऑक्साईडचे रेणू आणि विद्रावक घटकाचे रेणू यांचं प्रमाण एकास दहाचा साठावा वर्ग इतकं व्यस्त असतं. हे खरं असल्यास सक्रीय घटकाचा एक अणू किंवा रेणू विरघळवायला अख्ख्या पृथ्वीतलावरचं पाणी अपुरं पडेल. (कारण पृथ्वीतलावर पाण्याचे दहाच्या पन्नासाव्या वर्गापेक्षा कमी रेणू असावेत, असा अंदाज आहे. (संदर्भ))

म्हणजेच, होमिओपथी औषधांमध्ये सक्रीय घटकांचा एकही अणू/रेणू असू शकत नाही. वर पाहिल्याप्रमाणे होमिओपथीचे दोन्ही मूलभूत सिद्धांत तर्काच्या कसोटीवर खरे उतरत नाहीत. माझ्या मते, होमिओपथी अवैज्ञानिक आहे या निष्कर्षाप्रती पोहोचायला इतकी चर्चा पुरेशी आहे.

 

 

आर्सेनिक अल्बम - ३० आणि रोगप्रतिकारक शक्ती 

आताच आपण बघितल्याप्रमाणे आर्सेनिक अल्बम-३० मध्ये आर्सेनिक ट्रायऑक्साईडचा एकही रेणू असू शकत नाही (हा भाग निराळा की, आर्सेनिक ट्रायऑक्साईड मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहे. हे रसायन काही कीटकनाशकांमध्ये आढळतं, ज्यांचं सेवन केल्यास मळमळ, पोटदुखी, उलट, जुलाब, मेंदूला सूज येणे, मज्जासंस्थेचे विकार, मूत्रपिंडाचे विकार असे आणि याहून भयंकर परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात.(संदर्भ) त्यामुळे प्रस्थापित वैज्ञानिक तथ्यांनुसार या औषधाचा होमिओपथीच्या मूळ सिद्धांताप्रमाणे अपेक्षित असा परिणाम होऊ शकत नाही. सगळीच होमिओपथी औषधे थोड्याफार फरकाने अशीच डायल्यूटेड (diluted) असल्याने, हे त्या सर्व औषधांना लागू होते. 

या तार्किक आक्षेपाला प्रतिवाद म्हणून असा तर्क दिला गेला की, डायल्यूशनच्या प्रत्येक क्रियेनंतर औषध अधिकाधिक प्रभावी होत जाते (या प्रक्रियेला हानमॅनने Potentization असं नाव दिलं). इतकेच नव्हे तर त्या औषधाचा गुणकारी प्रभाव एका अमूर्त आध्यात्मिक शक्तीच्या स्वरुपात कायम राहतो. (संदर्भ) याचाच अर्थ त्या औषधामध्ये सक्रीय घटकाचा एकही कण नसतानाही ते गुणकारी ठरू शकते. यापेक्षा मोठा विरोधाभास असावा तो काय? 

तर अशा या वैज्ञानिक पाया डळमळीत असलेल्या औषधाबद्दल दावा केला गेलाय की, त्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अशा दाव्याचा गंभीरपणे विचार करण्यासाठी त्यामागे प्रस्थापित, शास्त्रीय स्पष्टीकरण असावे लागते; ज्यामध्ये 'आर्सेनिकचे मानवी शरीरावर होणारे विविध परिणाम' याबद्दल शास्त्रोक्त माहिती असणे अपेक्षित असते. वर म्हटल्याप्रमाणे, आर्सेनिक हे मानवी शरीरासाठी विष आहे आणि त्याचा कुठलाही सकारात्मक परिणाम विज्ञानाला ठाऊक नाही. दुसरं म्हणजे, अशा दाव्यांना सिद्ध करण्यासाठी शिस्तबद्ध वैज्ञानिक प्रयोग करण्याची आवश्यकता असते; ज्यामध्ये प्रयोगाशाळेतल्या चाचण्या, प्राण्यांवरचे प्रयोग, अधिकाधिक जटील स्वरुपाचे माणसांवरचे प्रयोग अशा सर्व पायऱ्या चढून जावे लागते. 

यातील माणसांवरचे प्रयोग (clinical trial) ही शेवटची पायरी पार केल्याशिवाय कुठल्याही औषधाची विक्री करण्याची अधिकृत परवानगी मिळू शकत नाही. इंटरनेटवर थोडी शोधाशोध केल्यास सहज ध्यानात येईल की, ‘आर्सेनिक अल्बम - ३० रोगप्रतिकारक शक्ती वाढवते’ हे सिद्ध करणारी एकही क्लिनिकल ट्रायल आजवर झालेली नाही, शिवाय होमिओपथीशी निगडित ज्या काही ट्रायल्स झाल्यात, त्यांचा गोषवारा एक सिस्टमिक रिव्यू (systemic review) मध्ये मांडलाय तो असा ‘होमिओपथीच्या प्रतिबंधात्मक किंवा उपचारात्मक परिणामांसंबंधी जो काही पुरावा उच्च दर्जाच्या क्लिनिकल ट्रायल्सद्वारे जमलाय, तो होमिओपथीची शिफारस कुठल्याही आजारामध्ये करण्यासाठी पुरेसा नाही’ (संदर्भ)

याच कारणाने ब्रिटीश सरकारने २०१७ मध्ये सार्वजनिक निधीचा वापर होमिओपथी उपचार पद्धतीसाठी न करण्याचा निर्णय घेतलाय. (संदर्भ) इतकंच नाही तर, त्यांच्या राष्ट्रीय आरोग्यसेवेच्या (नॅशनल हेल्थ सर्विस) संकेतस्थळावर स्पष्टपणे म्हटलंय, ‘होमिओपथी औषधांचा परिणाम बनावट प्लासेबो (Placebo) औषधांपेक्षा अधिक नसतो.’ (संदर्भ

या सगळ्याचा सारासार विचार केल्यावर काय निष्कर्ष निघतो, तर होमिओपथीला ठोस वैज्ञानिक आधार नाही. तिचे मूलभूत सिद्धांत तर्काच्या कसोटीवर खरे उतरत नाहीत. शिवाय होमिओपथी औषधांमध्ये सक्रीय घटकांचा लवलेशही नसतो. त्यामुळे सरकारद्वारे या औषधाचा प्रतिकारवर्धक औषध म्हणून प्रचार आणि वाटप होणे हे अतिशय दुर्दैवी आहे. 

सरतेशेवटी मी इतकंच म्हणेन-कोणीही अशा गैरसमजुतीखाली राहू नये, की हे औषध घेतल्याने कोविड-१९ चा संभाव्य धोका बऱ्यापैकी कमी होईल, कारण तसा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. हा आजार टाळण्यासाठी गर्दी टाळणे, हात स्वच्छ धुणे, मास्क लावणे इ. बाबींचं काटेकोर पालन करण्यातच आपणा सर्वांचं हित आहे.

 

डॉ. अनुपम बाम एमबीबीएस, एमटेक.