Quick Reads

सविस्तर । दक्षिण कोरियाचा (स्क्विड) गेम कसा झाला त्याची गोष्ट

#स्क्विड_गेमच्या_निमित्ताने या आनंद मोरे यांच्या फेसबुक पोस्टमधून संकलित लेख.

Credit : इंडी जर्नल/प्रथमेश पाटील

आनंद मोरे । २०१२ पूर्वी यूट्यूबच्या व्हिडीओखली तो व्हिडीओ किती वेळा बघितला गेला आहे याच्या काउंटरची मर्यादा होती २ अब्ज १४ कोटी ७४ लाख ८३ हजार सहाशे सत्तेचाळीस. पण १५ जुलै २०१२ ला दक्षिण कोरियातील साय (PSY) नावाच्या गायकाच्या गाण्याचा व्हिडीओ युट्युबवर प्रदर्शित झाला आणि त्याने यूट्यूबच्या प्रणालीतील व्हिडीओ किती वेळा बघितला गेला आहे, त्याच्या काउंटरची संख्या ओलांडेल हे लवकरच लक्षात आले. शेवटी गूगलला आपली व्हिडीओ काउंटर प्रणाली बदलावी लागली. 'साय'च्या त्या गाण्याचं नाव होतं "गंगनम स्टाईल". अदृश्य घोड्यावर बसून घोडदौड करतोय असा पदन्यास असणाऱ्या या गाण्यातील गंगनम म्हणजे दक्षिण कोरियातील सौल महानगरातील सर्वाधिक विकसित, उच्चभ्रू असा भाग आहे. गंगनम भागात स्वतःचे राहते घर असणे ही दक्षिण कोरियातील यशस्वीतेची व्याख्या किंवा स्वर्गाची कल्पना आहे. गंगनम भागात स्वतःचे राहते घर असणे ही दक्षिण कोरियातील यशस्वीतेची व्याख्या किंवा स्वर्गाची कल्पना आहे.

२०१९ ला इंग्रजी भाषेतील नसूनही ऑस्कर मिळवणारा पहिला चित्रपट होता 'पॅरासाईट'. कम्युनिस्ट उत्तर कोरियाचा आणि कम्युनिझमचा तिरस्कार करणाऱ्या भांडवलशाही दक्षिण कोरियातील हा चित्रपट वर्गसंघर्षांवर भाष्य करणारा आहे. त्याचं पॅरासाईट (परजीवी) हे नाव कार्ल मार्क्सने भांडवल आणि भांडवलदाराबद्दल जे निरीक्षण नोंदवले आहे त्यातून आले आहे. वर खाली जाण्याच्या जिन्यांचे प्रतीक वापरून बनवलेल्या या चित्रपटाची कथा घडते घराच्या आत जिने असलेल्या एका आलिशान बहुमजली घरात. इथे राहणाऱ्या अतिश्रीमंत चौकोनी कुटुंबाच्या घरी काम करायला एकाच गरीब घरातील वेगवेगळे सदस्य येतात. आधीच्या केअरटेकर स्त्रीला हुसकावून लावतात. त्याच आलिशान घराच्या तळघरात घरमालकाच्या नकळत, त्या केअरटेकरने लोनशार्क (कर्जवसुली करणारे गुंड) पासून लपवून ठेवलेला तिचा नवरा रहात असतो. चित्रपटाचा शेवट रक्तरंजित आहे. पण या चित्रपटात सगळ्यांच्या मनावर कोरले जाते ते गरीब वस्तीतील कुटुंबाचे तळघरात राहणे. अचानक झालेल्या पावसाचे पाणी त्या घरात घुसून त्यांचा संसार उध्वस्त होणे. आणि आलिशान घराच्या तळघरात केअरटेकरच्या नवऱ्याने कर्जवसुली गुंडापासून अनेक वर्षे लपून राहणे. चित्रपट संपतो तेव्हा प्रेक्षकाच्या मनात प्रश्नचिन्ह ठेवून जातो की, आलिशान घरात नोकर म्हणून शिरकाव करून घेऊन मालकाच्या गैरहजेरीत घरातील सुखसोयी वापरणारे गरीब कुटुंब परजीवी आहे? की इतकी प्रचंड गरिबी आणि दैन्य समाजात असताना साधनावर मालकीहक्क प्रस्थापित करून अधिकाधिक साधने आपल्या नियंत्रणाखाली आणणारे श्रीमंत कुटुंब परजीवी आहे?

आणि आता २०२१ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या स्क्विड गेम या मालिकेमध्ये दक्षिण कोरियातील काल्पनिक कथानक दाखवले आहे. एका मोठ्या रिएलिटी शोसारख्या खेळात ४५६ खेळाडूंनी भाग घेतलेला आहे. यातले सगळे खेळाडू समाजाच्या अनेक थरातून येतात. कुणी उच्चविद्याविभूषित आहे तर कुणी अगदी अल्पशिक्षित. कुणी तरुण आहेत तर कुणी वृद्ध. पण या सगळ्यांत एक समान धागा आहे. ते सगळे प्रचंड कर्जबाजारी आहेत. या सर्व खेळाडूंना रोज अगदी साधे त्यांच्या लहानपणाचे खेळ खेळायचे असतात. जो त्यात बाद होईल त्याची जीवनयात्रा तिथल्या तिथे संपवली जाते, तेही इतर खेळाडूंच्या डोळ्यादेखत. जो शेवटपर्यंत टिकेल त्याला ४५.६ बिलियन कोरियन वॉनचे (३९ मिलियन अमेरिकन डॉलर्सचे) रोख पारितोषिक मिळणार असते. पहिल्या खेळानंतर झालेला रक्तपात बघून खेळ सोडून घरी परतलेले सर्वजण नंतर पुन्हा खेळ खेळायला येतात आणि पारितोषिक जिंकण्यासाठी आपल्या इतर सहकाऱ्यांना मृत्यूच्या तोंडी देण्यासाठी तयार होतात. अतिशय रक्तरंजित आणि क्रूर कथानक असलेली ही मालिका, नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक वेळा बघितली गेलेली सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहे.

वरील तीनही गोष्टीतील कलाकृती दक्षिण कोरियातील आहेत. पहिल्यात गंगनम भागातील श्रीमंत लोकांची नक्कल करणाऱ्या अन्य दक्षिण कोरियायी लोकांची खिल्ली उडवली आहे तर दुसऱ्या आणि तिसऱ्यात दक्षिण कोरियातील श्रीमंत आणि गरीब यांच्यातील प्रचंड दरीचे चित्रीकरण आणि त्याबाबत भाष्य केलेले आहे. ज्याला सॉफ्ट पॉवर म्हणता येईल असे दक्षिण कोरियन संस्कृती, संगीत, खानपान, जीवन दाखवणारे अनेक चित्रपट, मालिका आता जगभरातील लोकांना आवडू लागल्या असल्या तरीही कोरियन समाजात आणि जागतिक पातळीवर विक्रमी लोकप्रियता ज्यांच्या वाट्याला आली त्या कलाकृती मात्र आर्थिक विषमता आणि रक्तरंजित क्रौर्य दाखवणाऱ्या आहेत.

आपल्या घरात एलजी, सॅमसंग आणि रस्त्यावर ह्युंदाई, किया यासारखे स्टेटस सिम्बॉल समजले जाणारे ब्रँड ज्या देशातून येतात, ज्यांच्या कलाकृती आता जागतिक स्तरावर नावाजल्या जातात आणि लोकप्रियतेचे अन्य कलाकृतींचे सर्व उच्चांक मोडून स्वतःचे विक्रम प्रस्थापित करतात त्या देशातील कलाकृती आर्थिक विषमता, त्यातून निर्माण होणारी हतबलता व क्रौर्य याबद्दल का बोलत आहेत? दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्य मिळालेल्या, उत्तर आणि दक्षिण अशी फाळणी सहन करणाऱ्या आणि साम्यवाद व भांडवलशाही यांच्यातील झगड्याचे मूर्त रूप असलेल्या या देशातील बहुसंख्य जनता प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली का आहे? आणि कित्येक तरुण प्रेम, लग्न आणि कुटुंब या भानगडीत न पडता एकटे राहण्याचा निर्णय का घेत आहेत? 'हान नदीकाठचा चमत्कार' असे ज्याचे वर्णन केले जाते त्या देशातील नागरिक मात्र आपल्या जीवनाला नरकवास का म्हणत आहेत? आपल्या देशातील लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी आणि देशाची आर्थिक प्रगती साधण्यासाठी या देशाने नक्की कोणते धोरण अमलात आणले आणि त्याचे काय अनपेक्षित परिणाम झाले? या प्रश्नांची आर्थिक अंगाने उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या लेखमालेत केला आहे.

१९१० पासून जपानची वसाहत म्हणून पारतंत्र्यात असलेल्या कोरियामध्ये जपानी अत्याचार व शोषणानंतरही देशव्यापी स्वातंत्र्याची चळवळ रुजली नव्हती. जपानपासून स्वातंत्र्य मिळवण्याची मनिषा बाळगणारे गट होते, पण त्यांचे प्रयत्न आणि त्यांचा जनाधार तोकडा होता. अशात दुसरे महायुद्ध संपत असताना कोरियाच्या भूमीवर उत्तरेकडून सोवियत रशियाच्या आणि दक्षिणेकडून अमेरिकेच्या फौजांनी ताबा मिळवून जपानी पारतंत्र्यातून कोरियाची सुटका केली. कोरियातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आणि अमेरिका व रशियाच्या संयुक्त समितीचे सूर जुळेनात, म्हणून शेवटी अमेरिकेने दक्षिण कोरियात निवडणूक घेऊन दक्षिण कोरियात स्वतंत्र सरकार स्थपन करून दिले आणि मग रशियाने आपल्या ताब्यातील उत्तर कोरियात कम्युनिस्ट सरकार स्थापन करून दिले. स्वातंत्र्याची चळवळ जनमानसात न रुजलेल्या कोरियन भूमीवर दोन राष्ट्रे तयार झाली. आर्थिक ताकदीच्या दृष्टीने ही दोन्ही राष्ट्रे समसमान नव्हती. उत्तर कोरियाकडे नैसर्गिक साधने आणि औद्योगिक विकास झालेले भूभाग गेले. तर मोठ्या लोकसंख्येचा आणि जुनाट पद्धतीने केलेल्या शेतीवर अवलंबून असलेला भूभाग दक्षिण कोरियाला मिळाला.

तोपर्यंत चीनमधील कोमिंटांग या राष्ट्रवादी पक्षाचे सरकार उलथवून माओ त्से तुंगच्या साम्यवादी पक्षाचे सरकार आले होते. आपल्या या लढ्यात उत्तर कोरियाने केलेल्या मदतीची परतफेड म्हणून साम्यवादी चीनने, अखंड कोरियाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उत्तर कोरियाला मदत करून नवजात दोन राष्ट्रांमध्ये पुन्हा सुरु झालेल्या युद्धात आपले बळ ओतले. चीनच्या सहाय्याने उत्तर कोरियन साम्यवादी सरकारने तीव्र केलेल्या या आक्रमणामुळे साम्यवादाच्या विरोधात असणारे दक्षिण कोरियातील जनमत भांडवलशाहीकडे अजून जोरात खेचले गेले. आणि अमेरिकन सरकारच्या कलाने चालणाऱ्या लष्करशहांचा दक्षिण कोरियातील उदय सुकर झाला.

पहिल्या सरकारने जपानी मालकीखाली असलेल्या कोरियन जमिनींचे आपल्या देशवासियांत फेरवाटप केले खरे, पण आर्थिक विवंचनेतून सुटण्यासाठी त्यांच्याकडे काही उपाय नव्हता. तोपर्यंत व्हिएतनाम युद्ध भडकून तिथे अमेरिकन सैन्य अडकून पडले होते. साम्यवादाचा तिरस्कार करणाऱ्या दक्षिण कोरियाला यात अमेरिकेच्या बाजूने भाग घ्यायचा होता पण जॉन एफ केनेडींनी त्याला नकार दिला होता. तोपर्यंत आर्थिक आघाडीवर अपयशी ठरलेल्या लोकशाहीवादी कोरियन सरकारला उलथवून तिथे "पार्क चुंग ही" हा लष्करशहा अधिकारारूढ झालेला होता.

केनेडींच्या हत्येनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष झालेल्या लिंडन जॉन्सन यांनी मात्र दक्षिण कोरियाच्या युध्दसहभागाला संमती दिली. व्हिएतनाम युद्धातील कोरियन सहभागाबद्दल फार कुणी बोलत नाही पण या युद्धात अमेरिकेखालोखाल सगळ्यात जास्त सैनिक दक्षिण कोरियाने पाठवले. या भाडोत्री सैनिकांच्या बदल्यात अमेरिकेने दक्षिण कोरियाला मोठी आर्थिक मदत देऊ केली. म्हणजे आर्थिक विवंचनेतून बाहेर येण्यासाठी एक प्रकारे दक्षिण कोरियाने आपल्या सैनिकांच्या प्राणांचे मोल दिले म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

पण अमेरिकेची ही आर्थिक मदत फार काळ येत राहणार नाही हे दक्षिण कोरियाच्या लष्करशहांनी ओळखले आणि इथून दक्षिण कोरियाच्या आर्थिक आयुष्याला वेगळे वळण लागले. पूर्वापार जमीनदार असलेल्या आणि शेतजमिनीच्या फेरवाटपानंतर अधिक ताकदवान झालेल्या काही घराण्यांना हाताशी धरून त्यांनी दक्षिण कोरियाची नवीन आर्थिक घडी बसवण्याचा कार्यक्रम सुरु केला. यातील सॅमसंग, डेवू, ह्युंदाई, घराणी आपल्यालाही माहिती आहेत. या घराण्यांना त्यांचे औद्योगिक साम्राज्य उभारण्यास सरकारने सर्व प्रकारची मदत करण्याचे वचन दिले. यातून जन्म झाला तो "चेबोल" (घराणेशाहीआधारित औद्योगिक साम्राज्य) नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यवस्थेचा.

 

यातून जन्म झाला तो "चेबोल" व्यवस्थेचा.

 

सरकारी करात पूर्ण सवलत, हव्या त्या सरकारी परवानग्या ताबडतोब मिळण्याची हमी, कमीत कमी सरकारी नियंत्रण, उद्योगासाठी लागण्याच्या जमिनीचे संपादन करून देण्यासाठी सरकारी हस्तक्षेप, अत्यल्प व्याजदरावर आणि दीर्घ मुदतीचे हवे तितके कर्ज, गरज पडल्यास कर्जाची पुनर्रचना, सगळे मिळेल. पण शेतीआधारित अर्थव्यवस्थेला बदलून उद्योगधारित अर्थव्यवस्था बनवा. देशात रस्ते, महामार्ग बांधा; बंदरे, विमानतळ बांधा, शहरे उभारा, त्यांची मालकी तुमच्याकडेच आहे असं समजा, पण 'आर्थिक प्रगती करा' ही अट मात्र पूर्ण करायची.

मग १९७०च्या दशकात सेमॉल उंडोंग (Saemaul Undong) नावाची सरकारी चळवळ सुरु झाली. स्वातंत्र्योत्तर भारतात 'खेड्याकडे चला' हा विचार होता त्याऐवजी दक्षिण कोरियात मात्र 'शहराकडे चला' ही सरकारी घोषणा होती. गावाकडच्या छोट्या जमिनींवर शेती करत गरिबीत राहणं सोडा आणि चेबॉल्सच्या सहाय्याने सरकारने रचलेल्या सुनियोजित शहरांत रहायला या. तुमच्यासाठी चेबॉल्सने सुरु केलेल्या उद्योगांत उत्पन्नाची हमी असलेली नोकरी मिळेल. तुमच्या मुलांसाठी सरकारने सुरु केलेल्या शाळा-कॉलेजात जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल.

एकीकडे साम्यवादी उत्तर कोरियाला मिळणारे साम्यवादी चीनचे पाठबळ, चीनमधील सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली होणारी मुक्त विचारांची गळचेपी आणि नागरी स्वातंत्र्याचा संकोच, व्हिएतनाम युद्धातून अमेरिकेने काढता पाय घेतल्यामुळे तिथे अधिकारावर आलेला साम्यवादी पक्ष, कंबोडियातील साम्यवादाचा उदो उदो करत ख्मेर रूजने केलेला भीषण नरसंहार, तर दुसरीकडे पूर्वाश्रमीच्या वसाहतवादी शासक जपानची अमेरिकेच्या छत्रछायेखाली जागतिक बाजारात चाललेली घोडदौड. या सर्व गदारोळात दक्षिण कोरियाच्या जनतेने सेमॉल उंडोंगला मनापासून साथ दिली. साम्यवादी देशांत नागरिकांकडून सक्तीने कष्ट करून घेतले जात होते, जमिनीवरचा त्यांचा हक्क नाकारून त्यावर सरकारी नियमानुसार शेती केली जात होती, सरकारी खर्चाने सर्वांना सामान शिक्षणाची संधी दिली जात होती. तर याउलट भांडवलशाहीची कास धरलेल्या दक्षिण कोरियात लोकांनी स्वतःहून, सरकारने सवलती दिलेल्या घराण्यांची चाकरी पत्करली होती. सत्तरच्या दशकात दक्षिण कोरियाने सेमॉल उंडोंगच्या कार्यक्रमात गावातील लोकसंख्येला शहरात आणले, सामुदायिक शेती करून शेतीला व्यावसायिक दृष्ट्या नफ्यात आणले. उत्तम शिक्षण उपलब्ध करून आपल्या लोकसंख्येला शेतीपासून दूर करून औद्योगिक कामांसाठी योग्य बनवले. त्यासाठी लागणारा पैसा, चेबॉल्सना दिलेल्या सवलती आणि मदतीच्या रूपाने, सरकारने उपलब्ध करून दिला होता. आता दक्षिण कोरिया औद्योगिक जगात प्रवेश करण्यासाठी सज्ज होता, फक्त गरज होती ती दक्षिण कोरियाच्या क्षमतेचा वापर करून घेणाऱ्या बाजाराची. आणि ती संधी दक्षिण कोरियाला लवकरच मिळाली. 'हान नदीकाठी चमत्कार होण्यास आंतरराष्ट्रीय परिस्थिती पोषक होऊ लागली', असेच म्हणा ना.

दुसऱ्या महायुद्धातील विनाशकारी पराभवानंतर जपानने अमेरिकेच्या प्रभावाखाली आपल्या कष्टाळू नागरिकांच्या जोरावर जागतिक अर्थव्यवस्थेत प्रचंड मोठी मुसंडी मारली होती. ज्याप्रमाणे चीन आज जगाची फॅक्टरी बनला आहे त्याप्रमाणे त्याकाळी जपान जगाची फॅक्टरी बनला होता. "मेरा जूता है जपानी" म्हणत राजकपूरच्या पायातील फाटक्या बुटाचा जमाना संपला होता. आता जपानी कार्स, वॉकमन, बाईक्स, टीव्ही आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी जगाची बाजारपेठ ओसंडून वहात होती. जपानी अर्थव्यवस्थेला सुगीचे दिवस आले होते. जपानी येनची किंमत वाढली होती. पण त्यामुळे जपानने निर्यात केलेल्या वस्तूंची किंमत वाढू लागली होती. जपानकडून आपली कामे करून घेणे अमेरिकन कंपन्यांना महाग वाटू लागले होते. त्यांना जपानपेक्षा स्वस्त पण त्याच दर्जाचे काम करणारा देश हवा होता. सेमॉल उंडोंगने स्वतःला अंतर्बाहय बदलवून टाकणाऱ्या दक्षिण कोरियाचे भाग्य पालटू लागले. अमेरिकन कंपन्यांना आता उत्पादनासाठी जपानऐवजी दक्षिण कोरिया जास्त फायदेशीर वाटू लागला. जणू यासाठीच स्वतःला तयार करत असलेल्या दक्षिण कोरियाने ही संधी साधली. १९८२ मध्ये सेऊलमध्ये ऑलिम्पिकचे आयोजन झाले. त्यानिमित्ताने संपूर्ण दक्षिण कोरियात पायाभूत सुविधांवर अजून मोठा खर्च करण्यात आला. जगाने दक्षिण कोरियाचे अगत्य अनुभवले आणि शिस्त बघितली. शिस्तप्रिय नागरिक आणि उद्योगस्नेही धोरणे राबवणारे सरकार. आता अमेरिकनच काय पण जपानी कंपन्यांनाही आपले उत्पादन दक्षिण कोरियाकडून करून घ्यावेसे वाटू लागले.

आणि मग १९८५ मध्ये प्लाझा करार होऊन अमेरिकेने आपल्या डॉलरची किंमत जपानी येनच्या तुलनेत घटवली. त्यामुळे जपानी वस्तू अमेरिकेत अजून महाग होऊ लागल्या. जपानच्या "हरवलेल्या दशकाची" (Lost Decade) सुरवात झाली होती. 'पंत मेले राव चढले'च्या न्यायाने आता जपानची जागा दक्षिण कोरियाने घेतली. जपानी वस्तूंपेक्षा दक्षिण कोरियात तयार झालेल्या वस्तू अमेरिकेला आणि जगाला स्वस्त वाटू लागल्या. आणि दक्षिण कोरियाला तंत्रज्ञानाचा, भांडवलाचा पुरवठा होऊ लागला. त्याचबरोबर या भांडवलातून व तंत्रज्ञानातून तयार झालेल्या उत्पादनासाठी जागतिक बाजारपेठ दोन्ही हात पसरून तयार होती. एका पिढीत गावातून शहरात येऊन, शिक्षण घेऊन, शेती सोडून, उद्योगात नोकऱ्या घेऊन दक्षिण कोरियातील जनतेने राहणीमानात प्रचंड बदल घडवून आणला. हा खरंच 'हान नदीकाठचा चमत्कार' आहे अशी जागतिक पातळीवर समजूत होऊ लागली. त्या काळातील दक्षिण कोरियात कुणी पॅरासाईट किंवा स्क्विड गेमची कल्पना केली असती तर त्याला लोकांनी मूर्खात काढले असते. पण हान नदीकाठच्या चमत्काराचा पुढचा टप्पा अजून यायचा होता.

निर्यात आणि तंत्रज्ञानाधारित उद्योग असल्याने चेबॉल्सना प्रचंड नफा होत होता. तो नफा जर पुन्हा संशोधनात वापरला तर सरकारकडून कर नाममात्र होते. त्यामुळे संशोधनावर जास्त खर्च होत होता. नवनवीन उत्पादने आणि नवनवीन उत्पादनपद्धती तयार होऊन, चेबॉल्सचा नफा आणि दबदबा वाढत चालला होता. लोन घेऊन उद्योग वाढवण्यात चेबॉल्सना करसवलती मिळत होत्या. त्यांना लोन देण्यासाठी बँकांवर अप्रत्यक्ष सरकारी दबाव होता. चेबॉल्सचा निर्णय चुकला तरी त्यांचे उद्योग बुडू नयेत म्हणून सरकारी मदत मिळेल याची खात्री मिळत होती. त्यामुळे चेबॉल्स, राजकीय पक्ष, नोकरशाही यांची अभद्र युती झाली. आपल्या उद्योगाला अधिक सवलती मिळाव्यात किंवा आपल्या चुकीच्या निर्णयामुळे उद्योगाला झालेल्या नुकसानाला सहन करण्यासाठी सरकारकडून मदत मिळावी म्हणून चेबॉल्सकडून राजकीय पक्षांना निवडून आणण्यासाठी, त्यांच्याकडून हवे तसे निर्णय करवून घेण्यासाठी पैसा चारला जाऊ लागला. अन्य देशांतील साम्यवादी सरकारांच्या अत्याचारांना घाबरून, आपले भविष्य आधी आर्थिक प्रगतीचा उदोउदो करणाऱ्या लष्करशहांच्या आणि नंतर चेबॉल्सच्या पैशाच्या तालावर नाचणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या हाती केलेल्या कष्टाळू दक्षिण कोरियन नागरिकांच्या भविष्यात मोठे धक्के लिहिले जात होते.

तंत्रज्ञानाधारित अर्थव्यवस्थेत स्वयंचलित यंत्रांचे महत्व वाढत जाते. त्यामुळे अशा अर्थव्यवस्थेतील सकल राष्ट्रीय उत्पन्नात मोठ्या उद्योगांचा वाटा मोठा असला तरीही मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या निर्माण करण्यात असे उद्योग असमर्थ असतात. त्यामुळे कुठल्याही अर्थव्यवस्थेचे यश केवळ तेथील मोठ्या उद्योगांच्या हातात नसून त्या यशाचा एक मोठा भागीदार तिथले लघु आणि मध्यम उद्योग असतात. दक्षिण कोरियात चेबॉल्सना मिळणाऱ्या करसवलती, सोप्या अटींवरची कर्जे व सरकारी मदत, लघु आणि मध्यम उद्योगांना मिळणे अशक्य होते. आणि चेबॉल्स सर्व क्षेत्रात होते. इलेक्ट्रॉनिक वस्तू, सेमी कंडक्टर चिप्स, गृहनिर्माण, वाहतूक आणि वाहन उद्योग, मनोरंजन, अम्युजमेंट पार्क, हॉटेल्स सगळीकडे चेबॉल्सचा वरचष्मा होता. त्यामुळे स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा करून चेबॉल्सबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा चेबॉल्समध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळवणे, गंगनम भागात आलिशान घर घेणे, कंपनीच्या खर्चाने जगप्रवास करणे आणि उत्तमोत्तम ब्रँड्सच्या वस्तू वापरत आयुष्य साजरे करणे हे दक्षिण कोरियाच्या सर्वसामान्यांचे स्वप्न बनले. ज्यांना नोकऱ्या मिळाल्या त्यांनी आपल्या भल्यामोठ्या पगारातून घरे घेतली.

चेबॉल्सच्या हाती असलेल्या गृहनिर्माण उद्योगाला चालना मिळावी म्हणून सरकारने गृहकर्जे उपलब्ध व्हावीत अशी धोरणे आखली. चेबॉल्सनी सरकारी मदतीवर आणि बँकांकडून उभारलेल्या कर्जांवर बांधलेली घरे नफ्यात विकण्यासाठी किमती चढ्या ठेवल्या. गंगनम स्टाईलने राहण्यासाठी लोक मोठमोठाली कर्जे घेऊन घरे घेऊ लागले. आता सरकारी मदतीवर मोठ्या झालेल्या चेबॉल्सनी सरकारी धोरणांच्या सहाय्याने सर्वसामान्यांच्या डोक्यावर कर्जे चढवायला सुरवात केली.

स्वयंचलित यंत्रांमुळे कमी होत चाललेल्या नोकरीच्या संधीत आपण मागे राहू नये म्हणून कष्टाळू दक्षिण कोरियन लोक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अतिशय जागरूक झाले. दोन वर्षे वयापासून लहान मुलांच्या शिक्षणाला सुरवात झाली. आधीपासून कष्टप्रद असणाऱ्या शालेय अभ्यासासाठी, शाळेनंतर पुन्हा खाजगी शिकवणी हा अगदी सर्वमान्य रिवाज झाला. मुलांवर निकालाचा आणि नोकरदारांवर कामाचा व नोकरी टिकवण्याचा, कुटुंबांवर राहणीमान टिकवण्याचा ताण वाढू लागला. तो सहन न होणारे लोक आत्महत्या करू लागले.ज्यांना घरांचे हफ्ते भरणे अशक्य होत होते त्यांच्या मागे लोन शार्क्स लागले.

जपानी येनच्या तुलनेत दक्षिण कोरियाचा वॉन स्वस्त होता म्हणून जपानच्या जागी दक्षिण कोरिया जगाची फॅक्टरी बनत होता. तोपर्यंत चीनने आपल्या रेनमेनबीचे अवमूल्यन करून सहा-सात वर्षे लोटली होती. दक्षिण कोरियाला उत्पादनासाठी मोठा स्पर्धक तयार झाला. त्याच्याकडे प्रचंड मोठी भूमी होती, निसर्गाची आणि नैसर्गिक साधनांची हानी होऊ देण्याची तयारी होती, लोकसंख्या होती, त्या लोकसंख्येला आपल्या तालावर नाचायला लावणारे निर्दयी सरकार होते. आता दक्षिण कोरिया पंत आणि चीन राव बनणार होता. जागतिक भांडवलाला उत्पादनासाठी भांडवलशाही दक्षिण कोरियापेक्षा साम्यवादी चीन जास्त फायदेशीर वाटू लागला.

जमिनीचे फेरवाटप, औद्योगिकीकरण, सार्वत्रिक उत्तम शिक्षण, सातत्याने उत्पादनाची नवनवीन तंत्रे विकसित करण्याचा ध्यास, अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत स्वस्त चलन आणि आपल्याकडे मुक्त बाजारपेठेची भांडवलशाही नाही तर सरकारी पाठिंबा मिळालेल्या घराण्यांची मक्तेदारी असलेली भांडवलशाही आहे या सत्याकडे केवळ साम्यवादाच्या भयामुळे व तिरस्कारामुळे दुर्लक्ष करून या सदोष भांडवलवादाचा उदो उदो करणारी जनता; या कारणांमुळे दक्षिण कोरियाने हान नदीकाठी एका पिढीत चमत्कार घडवायला सुरवात केली होती. पण आता या चमत्काराला जागतिक भांडवलाच्या नफ्याच्या लोभाचे ग्रहण लागले.

 

या चमत्काराला जागतिक भांडवलाच्या नफ्याच्या लोभाचे ग्रहण लागले.

 

“जगाचा कारखाना” हे ब्रीद, याच नफ्याच्या लोभामुळे आधी जगज्जेता झालेल्या भांडवलशाही अमेरिकेकडून पराभूत असूनही कष्टाळू असलेल्या भांडवलशाही जपानकडे मग जपानकडून कष्टाळू असलेल्या घराणेशाहीआधारीत भांडवलशाही दक्षिण कोरियाकडे आणि सरतेशेवटी साम्यवादी सरकारप्रणीत नियंत्रित भांडवलशाही राबवणाऱ्या चीनकडे गेले.

आता चीनबरोबरच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आणि आपली आर्थिक घोडदौड सुरु रहावी म्हणून चेबॉल्सना जागतिक भांडवलाचा पुरवठा व्हावा असे दक्षिण कोरियन सरकारला वाटू लागले. आणि त्यांनी जागतिक भांडवलासाठी दक्षिण कोरियाचे दरवाजे खुले करण्याचे धोरण स्वीकारले. पण हे ‘भांडवल’ होते, व्हिएतनाम युद्धातील सहभागासाठी अमेरिकेकडून मिळालेला मेहनताना नव्हता. मेहनताना परत करायचा नसतो आणि त्यावर परतावाही द्यायचा नसतो. आता मेहनताना नाही तर ‘भांडवल’ आले होते.  त्यावर परतावा द्यायची जबाबदारी होती.  मेहनताना परत करायचा नसल्याने स्थिर असतो. भांडवल परत करायचे असल्याने अस्थिर असते. ज्याने भांडवल दिले त्याचा तुमच्यावरचा विश्वास डळमळीत झाला तर तो आपले पैसे परत मागू शकतो किंवा मग जुने भांडवल परत करायला नवे भांडवल उभारणे अशक्य होऊ शकते. अशा वेळी अर्थव्यवस्थेचे चाक कर्णाच्या रथाच्या चाकासारखे भूमीने गिळल्याची स्थिती येते आणि परकीय भांडवलाचा अर्जुन मग अर्थव्यवस्थेचे प्राणहरण करतो. श्रीमंत लोकांची श्रीमंती घटते आणि गरीब लोकांची गरिबी वाढते आणि अर्थव्यवस्थेची गती मंदावते. नवीन मिळवण्याऐवजी आहे तेच टिकवूया अशी तिची दिशाही बदलते.      

जागतिक वित्त बाजारात थायलँड, मलेशिया आणि दक्षिण कोरिया या तीन विकसनशील देशांना ‘एशियन टायगर्स’ असे संबोधले जाऊ लागले. आता जागतिक भांडवलाचा ओघ या तीनही देशांकडे वाहू लागला. पर्यटनाधारित थायलँड आणि पर्यटन, रबर व खनिजतेलाधारित मलेशियाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा, उत्पादन आणि निर्यातीवर उभारलेली दक्षिण कोरियाची परिस्थिती चांगली होती. पण दीर्घ मुदतीच्या भांडवलाऐवजी दक्षिण कोरियन सरकारने प्रथम अल्प मुदतीच्या भांडवलासाठी आपली दारे उघडली. भांडवल वापरण्याचा एक साधा नियम आहे की, जे भांडवल दीर्घ मुदतीचे आहे ते दीर्घ मुदतीच्या प्रकल्पांवर वापरायचे आणि अल्प मुदतीत परत करायचे भांडवल अल्प मुदतीच्या कामांसाठी वापरायचे. दीर्घ मुदतीचे भांडवल अल्प मुदतीसाठी किंवा अल्प मुदतीचे भांडवल दीर्घ मुदतीसाठी अशी गडबड करायची नाही. म्हणजे दक्षिण कोरियान सरकारच्या परवानगीने तिथे आलेले अल्प मुदतीचे भांडवल चेबॉल्सनी वस्तू आणि सेवांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांसाठी वापरणे अपेक्षित होते. पण झाले भलतेच. त्यांनी अल्प मुदतीचे हे भांडवल दीर्घ मुदतीच्या योजनांत गुंतवले.

दक्षिण कोरियातील नियंत्रक संस्था, बँका आणि अकाउंटिंग व ऑडिटिंग (पुस्तकपालन व लेखापाल) करणारे व्यावसायिक यांना जागतिक वित्त बाजाराचा, त्यासाठी लागणाऱ्या नियंत्रणाचा आणि नियंत्रणव्यवस्थेचा सखोल अनुभव नव्हता. त्याशिवाय चेबॉल्सने काहीही केले तरी चालून जाते याचा मात्र सगळ्यांना अनुभव होता. त्यामुळे खरेदी विक्रीच्या व्यवहारांसाठी उचलण्याची अल्प मुदतीची कर्जे वापरून जेव्हा चेबॉल्स दीर्घ मुदतीची गुंतवणूक करू लागले तेव्हा याकडे कुठल्याच नियंत्रकांचे लक्ष नव्हते. आता जागतिक भांडवलाचा पैसा हाती खेळू लागल्यामुळे चेबॉल्स आणि तिथे काम करणाऱ्या लोकांची आर्थिक ताकद प्रचंड प्रमाणात वाढली. परिणामी गृहनिर्माण क्षेत्रात आणि पायाभूत सुविधा निर्माण क्षेत्रात अजून तेजी आली. घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेल्या. आधी आठ वर्षांचा संपूर्ण पगार घरावरील कर्जे फेडण्यासाठी लागत होता (हे गुणोत्तरही अवाजवी होतं) पण आता तो चौदा वर्षे लागतील इतक्या मोठ्या प्रमाणावर घरांच्या किमती वाढल्या. आता पॅरासाईटमध्ये दाखवल्याप्रमाणे अनेक दक्षिण कोरियन कुटुंबांची वाटचाल खाली जाणाऱ्या जिन्याने सुरु झाली होती.

गृहनिर्माण क्षेत्राची हीच अवस्था थायलँडमध्येही होती. जागतिक भांडवलाला दरवाजे खुले करताना तिथल्या सरकारने थाय बहात आणि अमेरिकन डॉलर यातील विनिमय दर स्थिर ठेवला होता. १९९७ मध्ये जेव्हा थाय बहातच्या बदल्यात ठरलेल्या विनिमय दराने अमेरिकन डॉलर्स देणे थायलँडला जमणार नाही हे दिसू लागले तेव्हा थायलँडच्या अर्थव्यवस्थेवरचा जागतिक वित्त बाजाराचा विश्वास उडाला आणि त्यांनी आपले पैसे थायलँडमधून काढून घ्यायला सुरवात केली. थायलँडचा बहात कोसळला. मलेशियन रिंगिटही कोसळला. आणि एशियन टायगर्सची डरकाळी जागतिक बाजारपेठेत घुमण्याऐवजी तिची घुसमटलेली गुरगुर होऊ लागली.

मग पाळी आली दक्षिण कोरियाची. थायलँड आणि मलेशियाच्या बाजारात तोंड पोळलेल्या जागतिक भांडवलाने दक्षिण कोरियाचे ताकही फुंकून प्यायला सुरवात केली. तिथेदेखील जागतिक बँकांनी आपली अल्पमुदतीची कर्जे परत मागायला सुरवात केली. नवीन पत पुरवठा करण्यास नकार दिला. या कर्जांची रक्कम दीर्घ मुदतीच्या कामात वापरली गेलेली असल्याने ती परत करणे चेबॉल्सना अशक्य होते. मग दक्षिण कोरियाचे सरकार मधे आले. सरकारने स्वतःकडील परकीय चलनाची गंगाजळी वापरली. पण ती खूप तोकडी होती. मग जागतिक वित्त संस्थांचे पाय धरणे याशिवाय कुठलाच उपाय नव्हता. आता जर पतपुरवठा झाला नसता तर दक्षिण कोरियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार होता. आशियायी वित्त संकटाने (Asian Financial Crisis) भयकारी रूप घेतलं. शेवटी दक्षिण कोरियात केलेली गुंतवणूक आणि तिथे असलेले आपले ३८,००० सैनिक, या सगळ्याचा विचार करून अमेरिकेने जागतिक वित्त संस्थांवर दबाव आणल्यावर दक्षिण कोरियाला पत पुरवठा झाला आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेचा कपाळमोक्ष होता होता वाचला.

१९९७च्या पुढे अर्थव्यवस्थेला मार्गी लावायचे म्हणजे निर्यातीबरोबर देशांतर्गत मागणी वाढवणे आवश्यक होते. मग बँक ऑफ कोरियाने 'इझी मनी पॉलिसी' राबवली. त्याचाच परिणाम म्हणजे २००१च्या सुमारास क्रेडिट कार्ड्सचा व्यवसाय जोरात चालू झाला. क्रेडिट कार्ड्स वापरणारे लोक दोन प्रकारचे असतात. वेळच्यावेळी पूर्ण रक्कम भरणारे आणि पूर्ण रक्कम भरू न शकल्याने थोडी थोडी रक्कम भरणारे. यातील पहिल्या प्रकारच्या लोकांकडून क्रेडिट कार्ड कंपन्यांना फार उत्पन्न मिळत नाही. पण दुसऱ्या प्रकारच्या लोकांकडून व्याजाच्या रूपात भरपूर उत्पन्न मिळते. त्यामुळे अजून परिपक्व न झालेल्या क्रेडिट कार्ड कंपन्यांनी अंदाधुंदपणे क्रेडिट कार्ड वाटण्यास सुरवात केली. त्याशिवाय क्रेडिट कार्डवरून रोख रक्कम काढणाऱ्यांची संख्याही दक्षिण कोरियात फार मोठ्या प्रमाणावर वाढली. यावर कार्ड कंपन्यांना अजून जास्त व्याज मिळते. त्यामुळे त्यांचा नफा वाढू लागला. अर्थात पुढे मुद्दल वसूल होईल का? हा प्रश्न गुलदस्त्यात ठेवून, या कंपन्यांनी आपले ताळेबंद व नफा तोटा पत्रक बनवण्यास सुरवात केली. त्यावर ऑडिटर्सच्याही सह्या असल्याने त्यांच्या भविष्याचे अतिशय आकर्षक चित्र तयार होऊन, त्यांना भांडवली बाजारातून स्वतःच्या व्यवसायवृद्धीसाठी कर्जे उचलणे सोपे गेले. या वाढीव ताकदीमुळे क्रेडिट कार्ड्स वाटण्याला काही धरबंद राहिला नाही. बँका आणि सर्व नियंत्रक संस्थांना यातील गांभीर्य कळले तरी नव्हते किंवा मग कळूनही त्यांनी त्याकडे कानाडोळा केला.

अर्थव्यवस्थेत फिरणाऱ्या या जास्तीच्या पैशामुळे महागाईच्या दराने उच्चांक गाठला. लोक कर्जावर, क्रेडिट कार्डावर, क्रेडिट कार्डावर घेतलेल्या रोख रकमेवर अवलंबून आला दिवस ढकलू लागले. शेवटी गुलाबी रंगात रंगवलेल्या क्रेडिट कार्ड व्यवसायाचा फुगा २००३ मध्ये फुटला. सगळ्यात मोठा फटका बसला तो एलजी कंपनीच्या क्रेडिट कार्ड उपकंपनीला. शेवटी सरकारी मदतीने तिला तारण्यात आले. अनेक छोट्या क्रेडिट कार्ड कंपन्या बुडीत खाती गेल्या. तिथल्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या. आणि अनेक घरे कर्जाच्या बोज्याखाली अडकली. अशा तऱ्हेने सरकारी मदतीने चालू झालेल्या चेबॉल्सनी स्वतःची कातडी वाचवून शेवटी कर्जाचा प्रत्यक्ष डोंगर गोरगरिबांच्या आणि अप्रत्यक्ष डोंगर सर्व कोरियन जनतेच्या डोक्यावर ठेवला.

 

तरीही चेबॉल्सच्या पोलादी पकडीतून अजूनही कोरियन अर्थव्यवस्था मोकळी झालेली नाही.

 

त्यानंतर कोरियन अर्थव्यवस्थेत विशेषतः बँकांचे नियमन, कर्जाचे वाटप, अकाउंटिंग आणि ऑडिटिंगचे व रिपोर्टींगचे नियम बदलण्यात आले. क्रेडिट रेटिंग संस्थांच्या कामात सुसूत्रता आणण्यात आली. तरीही चेबॉल्सच्या पोलादी पकडीतून अजूनही कोरियन अर्थव्यवस्था मोकळी झालेली नाही.

२००७ मध्ये ऍपलच्या आयफोननंतर २००८ मध्ये घाईघाईत आलेल्या अँड्रॉइड फोनच्या उत्पादनात आघाडी घेतल्यामुळे सॅमसंग कंपनीचे आणि दक्षिण कोरियाचे भाग्य पुन्हा एकदा उजळले. त्यानंतर के-पॉपने (म्हणजे मनोरंजनाचे कोरियन कलाप्रकार (यात कोरियन संगीत, चित्रपट आणि टीव्ही मालिका येतात) जागतिक पातळीवर वाहवा मिळवून मनोरंजन क्षेत्राला उर्जितावस्था आणली. पण आर्थिक विषमता आणि तद्जन्य असंतोष मात्र तिथे अजूनही धुमसतो आहे. कुठल्याही आर्थिक संकटातून सरकारी मदतीने बाहेर पडून आपल्या उच्च राहणीमानाचे कायम प्रदर्शन मांडणाऱ्या चेबॉल्सच्या वारसदारांबद्दल कर्जबाजारी सर्वसामान्य कोरियन नागरिकांच्या मनातील असंतोष आता कोरियन कलाकृतीतून दिसू लागला आहे.

सॅमसंग कंपनीच्या मालकाच्या नुकत्याच झालेल्या मृत्यूनंतर त्याच्या जागी आलेल्या त्याच्या मुलाने आपल्यानंतर आपल्या कुटुंबातील वारसदार कंपनीच्या प्रमुखपदी वारसाहक्काने येणार नाहीत असे जाहीर केले आहे. पण चेबॉल्सकडे असलेली पैशाची अमर्याद ताकद आणि त्यापुढे एकटे पडलेले अनेक सर्वसामान्य नागरिक यामुळे पॅरासाईट सारख्या चित्रपटाची किंवा स्क्विड गेम सारख्या मालिकेची निर्मिती का होते? आणि तिला त्याच देशात अमाप लोकप्रियता का लाभते? या प्रश्नाच्या असंख्य उत्तरांमागील आर्थिक आणि राजकीय निर्णयांची एकसूत्रता लक्षात येऊ लागते.

आपला देशही सध्या आर्थिक स्थित्यंतरातून जातो आहे. दक्षिण कोरियाबरोबर तुलना करायची झाल्यास आपल्या देशानेही फाळणीचे चटके सोसले आहेत, आपल्यालाही एक कुरापतखोर शेजारी आहे, आपलीही गाठ साम्यवादी आणि युद्धखोर चीनबरोबर आहे, आपल्याकडेही मुंबई, दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद सारखी महानगरे पावसाळ्यात तुंबू लागली आहेत. तेथील उत्तुंग इमारतीत राहणाऱ्या लोकांकडे काम करणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या घरात पाणी घुसून त्यांचे संसार उध्वस्त होऊ लागले आहेत. क्रेडिट कार्ड कंपन्या आणि लोन देणाऱ्या एनबीएफसी सध्या जोरावर आहेत. 'लोन घ्या' चे फोन भरमसाठ प्रमाणात वाढले आहेत. अशा वेळी आपले सध्याचे सरकार जी उद्योगस्नेही धोरणे राबवत आहे, ती लघु आणि मध्यम उद्योगांपेक्षा मोठ्या आकाराच्या उद्योगांना धार्जिणी आहेत. आपल्याकडचे सरकारी मदत मिळणारे हे मोठे उद्योग, उत्पादनक्षेत्राऐवजी विक्री आणि सेवाक्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. त्यासाठीचे तंत्रज्ञानही परदेशातून आयात करत आहेत. नवीन संशोधनाऐवजी आपला रोख आता गतकालीन ज्ञानाच्या, ऐश्वर्याच्या अस्तित्वाचे पुरावे शोधण्याकडे वळत आहे. आणि नवीन शैक्षिणक धोरण कालसुसंगत असूनही जागतिक बाजारपेठेत टिकाव धरण्यासाठी आवश्यक त्या शिक्षणाऐवजी, कालविसंगत परंपरांचा उदो उदो करणाऱ्या ठिकाणी लोकांची गर्दी वाढते आहे. अशा ठिकाणी जागतिक भांडवल येण्याची शक्यता कमी असते. पण कुठ्ल्याही जागतिक अडचणीमुळे ते आलेच तर त्याचा योग्य विनियोग करण्यासाठी आवश्यक ते ज्ञान असणारी पिढी तयार करण्यात आपण अपुरे पडतो आहोत.

म्हणजे भांडवल जर आलेच तरीही आपल्या अर्थव्यवस्थेच्या रथाचे चाक ऐनवेळी अज्ञानाच्या चिखलात रुतेल, अशी परिस्थिती निर्माण होते आहे. आपल्याकडे अमेरिकन कंपन्यांची फार मोठी गुंतवणूक नाही. आपल्याकडे अमेरिकन सैनिक, दक्षिण कोरियाप्रमाणे तळ ठोकून नाहीत. त्यामुळे आपल्या संभाव्य अडचणीत अमेरिका आपल्यासाठी जागतिक वित्त संस्थांवर दबाव टाकेल की थायलँडप्रमाणे आपल्याला वाऱ्यावर सोडेल याबद्दल शाश्वती नाही. शिवाय विश्वगुरु बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या देशाने असे अमेरिकन मदतीच्या शक्यतेवर अवलंबून रहाणेही भूषणावह नाही.    

त्यामुळे आपल्या देशाची स्वातंत्र्य चळवळ कोरियन समाजापेक्षा जास्त प्रमाणात तळागाळात झिरपलेली असली, आपल्या देशातील क्रेडिट रेटिंग एजन्सीज कोरियापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे काम करीत असल्या, तरी राजकीय घराणेशाहीच्या विरोधात आपण एकवटलो आहोत असे वाटणाऱ्या भारतीय जनतेने आणि तिला वैचारिक नेतृत्व देणाऱ्या सर्वानी दक्षिण कोरियाची, चेबॉल्सची, पॅरासाईटची आणि स्क्विड गेमची गोष्ट दुर्लक्षून चालणार नाही.