Americas
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना कोरोनाची लागण, दवाखान्यात दाखल
डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लिक पक्षाने आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून अवैज्ञानिक दृष्टिकोनाचा आधार घेत राजकीय प्रचार करण्यातच धन्यता मानली.
अमेरिकन निवडणूक महिनाभरावर आलेली असतानाच कोरोना म्हणजे निव्वळ अफवा आहे म्हणणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाच कोव्हीडची लागण झाल्याचं समोर आलं आहे. २ ऑक्टोबरला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प यांची कोव्हीड चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे. आपल्या अध्यक्षीय निवडणुकीतील प्रचारादरम्यान कोरोनाला अफवा आणि चीनी व्हायरस म्हणून मोडीत काढणाऱ्या ट्रम्प यांनाच आता निवडणुकांच्या तोंडावर कोरोनावरील उपचारांसाठी दवाखान्यात हलवण्याची वेळ आल्याने याचा परिणाम त्यांच्या प्रचारमोहीमेवरही होणार आहे.
अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या २ लाखांवर पोहोचली असून हा आकडा वरचेवर वाढतंच आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत आधीपासूनच आघाडीवर असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मात्र यादरम्यान कोरोनाला चीनी षडयंत्र समजून मास्क घालण्याचाही विरोधात असल्याचं जगानं पाहिलं. राष्ट्राध्यक्ष या नात्यानं लाखो अमेरिकन नागरिकांच्या जीवाशी खेळ करत राजकीय फायद्यापोटी अवैज्ञानिक दृष्टिकोन रेटणाऱ्या ट्रम्प यांनाच कोरोनाची लागण होण्याचा हा दैवदुर्विलास एकाच वेळेस विनोदी आणि हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीचे गांभीर्य दर्शवणारा आहे. नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या अध्यक्षीय चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार जो बायडन यांना मास्क घालण्यावरून हिणवलं होतं.
राष्ट्राध्यक्ष या नात्यानं कोरोनासारख्या अभूतपूर्व परिस्थितीचा सामना करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी किती गांभीर्याने पावलं उचलली, याचं बोलकं उदाहरण म्हणून या प्रसंगाकडे पाहता येईल. सुरूवातीपासूनच कोरोनाला चीनी षडयंत्र आणि साधा ताप समजून डोधाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या हलगर्जीपणाची किंमत लाखो अमेरिकन नागरिकांनी आपले जीव देऊन चुकवलेली आहे. मात्र स्वतःला कोरोनाची लागण झाल्यानंतर तरी विज्ञान, वैद्यकीय क्षेत्र, अर्थशास्त्र आणि कॉमन सेन्सच्या मूलभूत नियमांना फाट्यावर मारून पॉप्युलिस्ट राजकारणाच्या बळावर एकवेळ सत्ता मिळवता येईलही पण त्याने नैसर्गिक सत्य बदलत नाही, हा धडा किमान डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या राजकीय समर्थकांना मिळाला असेल, अशी आशाच आपण फक्त करू शकतो.
डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लिक पक्षाने आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून अवैज्ञानिक दृष्टिकोनाचा आधार घेत राजकीय प्रचार करण्यातच धन्यता मानली. कोरोनानं जगभरात हाहाकार माजलेला असतानाही त्याला साधा ताप म्हणून मोडीत काढणं, मास्क घालण्यास नकार देणं, जमावबंदीचे निर्देश धुडकावून पुरेशी काळजी न घेताच गर्दीच्या राजकीय प्रचारसभा भरवणं, अर्थव्यवस्थेच्या नावानं लॉकडाऊनच्या विरोधात उघड भूमिका घेत निदर्शने करणं अशा भूमिकांना ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षानं राजकीय बळ दिलं. यामुळे कोव्हीडचा वेगाने झालेला प्रादुर्भाव आता ट्रम्प यांच्यापाशीच येऊन थांबला आहे. निवडणुका जवळ असताना राजकीय गोळाबेरीज लक्षात घेऊन कोरोनाविषयी निष्काळपणाची वातावरणनिर्मिती करणं अंगलट येणाऱं आहे, हे माहित असूनही ट्रम्प यांनी त्यांच्या पॉप्युलिस्ट राजकारणाची कास सोडली नाही.
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 2, 2020
ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष या नात्यानं कोरोनाचा सामना करताना हाताळलेल्या परिस्थितीत खरं तर आश्र्चर्य वाटण्यासारखं काही नाही. आपल्या अंधभक्त आणि राजकीय समर्थकांना खुश ठेवत राजकीय गणितं जुळवण्यासाठी तथ्य, विज्ञान आणि तर्काला वाऱ्यावर सोडण्यात ट्रम्प यांची तुलना थेट मोदींशीच होऊ शकेल. मोदींप्रमाणंच हवामानबदल वगैरे सगळं षडयंत्र असल्याचा दावा अतिशय आत्मविश्वासानं ट्रम्प करत आलेले आहेत. कितीही अवघड परिस्थिती आली तरी प्रत्यक्षात नागरिकांची काय परिस्थिती आहे याचं काहीही भान न ठेवता आत्ममग्न राजकीय स्टंटबाजी करण्यात ट्रम्प थेट मोदींना टक्कर देत आलेले आहेत. कोरोधाबाधित देशांच्या यादीत अमेरिका आणि भारत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत, हे तथ्य यासाठी पुरेसं बोलकं आहे. पण वर म्हटल्याप्रमाणे तथ्य आणि तर्काचा या दोन नेत्यांशी आणि त्यांच्या राजकारणाशी दूरदूरपर्यंत संबंध आला नसल्याकारणानं स्वतःला कोरोना झाल्यानंतर तरी ट्रम्प परिस्थितीचे गांभीर्य ओळखत वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून उपाययोजना करतील हा आशावाद अतिशयोक्तीच ठरण्याची शक्यता जास्त आहे.
ट्रम्प यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि मुक्त बाजारपेठेला चालना देण्याच्या त्यांच्या भांडवली उपाययोजनांमुळे महासत्ता म्हणवणारी अमेरिका कोरोनासारख्या महामारिचा सामना करू शकत नाही, हे सत्य जगासमोर उघडं पडलं. तुलनेनं परिस्थितीचं गांभीर्य ओळखत वेळीच कडक टाळेबंदीसारख्या उपाययोजना करून समाजवादी आर्थिक नितींच्या आणि नियोजित अर्थव्यवस्थेच्या जोरावर चीननं कोरोनाचा सामना चांगल्या रितीने केला. मागच्या ७ महिन्यांपासून कोरोनोमुळे अमेरिकेवर ओढावलेल्या परिस्थितीचा दोषही ट्रम्प चीनवरच ढकलत आलेले आहेत. आपल्या समर्थकांना खूष ठेवत चीनला टार्गेट करण्याऐवजी कोरोनाचा यशस्वीपणे सामना करणाऱ्या चीनी आर्थिक नितींचा अवलंब करणं अमेरिकन भांडवलाचं पिल्लू असलेल्या कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला शक्य नाही. डोनाल्ड ट्रम्पही याला अपवाद नाहीत. जागतिक महासत्ता आणि भांडवलशाहीचं केंद्र असलेल्या अमेरिकेतील आरोग्यव्यवस्था इतकी तकलादू आहे, हे उघड सत्य पचवण्यासाठीचं नैतिक अधिष्ठान डोनाल्ड ट्रम्पच काय तर कोर्पोरेट्सच्या विळख्यात अडकलेल्या कुठल्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाजवळ असेल, अशी अपेक्षा करणंच अनाठायी आहे.
पुरेशा आरोग्यसुविधे अभावी जीव गमावणारे सामान्य नागरिक आणि पीपीई किट्सचीही वाणवा असणारे अमेरिकन डॉक्टर्स याबद्दल चकार शब्द न काढता कोर्पोरेट्सना अब्जावधींचं बेलआऊट पॅकेज जाहीर करण्याऐवढा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा निर्लज्जपणा हा याचंच द्योतक आहे. इतके दिवस करोनाला षडयंत्र समजत कोर्पोरेट व्यवस्थेच्या फायद्यासाठी लॉकडाऊनला विरोध करत अमेरिकन नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना आता तरी कोरोनाचं गांभीर्य लक्षात येईल. आणि भांडवलदारांच्या नफ्यापेक्षा अमेरिकन नागरिक व स्वत:चाही जीव जास्त महत्वाचा आहे, याची उपरती त्यांना होईल, ही अपेक्षा. कोरोना आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रस्ताळ्या पहिल्या कारकीर्दीने जागतिक महासत्ता म्हणून गणला जाणाऱ्या अमेरिकेचा बुरखा फाडलेला असला तरी पॉप्युलिस्ट राजकारणाच्या लाटेवर स्वार होत ट्रम्प दुसऱ्या वेळेसही निवडून येतील का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. पण त्यासाठी आधी ट्रम्प यांना विज्ञानावर विश्र्वास ठेवून जंतूनाशकांचं सेवन करण्याऐवजी योग्य त्या वैद्यकीय उपाचारानं बरं होऊन निवडणुकीच्या मैदान उतरणं भाग आहे. परिणाम काहीही आले तरी इतर लाखो लोकांप्रमाणेच डोनाल्ड ट्रम्प यांनासुद्धा लागण झालेल्या कोरोनानं भावनेच्या लाटेवर स्वार झालेल्या पॉप्युलिस्ट राजकारणाला हरवून विज्ञानाचं महत्त्व अधोरेखित केलंय, हे खरं. या निमित्तानं चीनी व्हायरस पासून आता जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षदेखील सुरक्षित नसल्याचा धडा जगाला मिळालेला आहे.