Quick Reads

फलसफी: तत्त्वज्ञानाच्या पाच पूर्वअटी (भाग २)

तत्त्वज्ञान विशिष्ट ऐतिहासिक सांस्कृतिक परिस्थितीत जन्माला येतं

Credit : Vincent Muller

तत्त्वज्ञानाची चौथी पूर्वअट, ही भाषेच्या प्रश्नाशी निगडीत आहे व त्याचसोबत ही तिसऱ्या अटीशी सुध्दा निगडित आहे म्हणजेच वैश्विकतेशी निगडित आहे. तत्त्वज्ञान हे स्वतःचा संबंध फक्त एकाच भाषेशी एक विशिष्ट भाषेशी जाहीर करू शकत नाही आपण जर तत्त्वज्ञानाचा संबंध एकाच भाषेशी जोडला तर ते पहिल्या अटीनुसार तत्त्वज्ञानात्मक नाही होणार, आपण जड असे केले तर विचारांचे स्वातंत्र्य गमावून बसू. अशा परिस्थितीत तत्त्वज्ञान हे सुरवातीपासून एक बंदीस्त गोष्ट होईल. 

आपणाला जर विचारांचे संपुर्ण स्वातंत्र्य हवे असेल तर आपण असे म्हणून शकत नाही की तत्त्वज्ञान फक्त ग्रीक अथवा जर्मन अथवा संस्कृत मधेच झाले पाहिजे. सत्ताशास्त्रीय आधारावर हायडेगर जेंव्हा जाहीर करतो की तत्त्वज्ञान हे फक्त जर्मन भाषेत असले पाहिजे तेंव्हा तो तत्त्ववेत्ता ठरत नाही, कारण तो तत्त्वज्ञानाच्या बाहेरील काही तरी मांडत आहे, जे तत्त्वज्ञान नाही असं काही तरी मांडत आहे आणि त्याच सोबत असा विचार हा तत्त्वज्ञानाच्या विरोधातील विचार आहे.

बाद्युच्या मते तत्त्वज्ञान तत्त्वतः कोणतीही विशिष्ट भाषा ही पवित्र भाषा आहे असे म्हणू शकत नाही, कारण तत्त्वज्ञानाची एक विशेष अशी कोणतीही भाषा नसते. इथे महत्वाचा एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे तत्त्वज्ञानाची एक विशिष्ट भाषा असू शकत नाही तर तत्त्वज्ञानात्मक भाषेची रचना कशामध्ये असते? शेवटी तत्त्वज्ञानाची भाषा कोणती? या प्रश्नाचे उत्तर देताना बाद्यु म्हणतो की, एका अर्थाने तत्त्वज्ञानाची भाषा ही विवेकीय असते, यामध्ये चर्चा असतात, वाद असतात, पुरावे असतात इत्यादी. या अर्थाने तत्त्वज्ञानात्मक भाषा ही गणितीय भाषेच्या जवळची आहे. पण याचसोबत आपण हेही पाहू शकतो, की तत्त्वज्ञान हे कवितेच्या भाषेतदेखील लिहले गेले आहे. यामधील अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन पद्धतीमधील एक पद्धत आपण निवडू शकत नाही, उदाहरणार्थ, प्लेटो च्या लिखाणात आपणाला गणितीय भाषेनुसारचे प्रतिवाद दिसतील आणि त्याच लिखाणात आपणाला प्रतिमांचा अथवा कथांचा वापर ही दिसेल. यावरून बाद्यु म्हणतो की तत्त्वज्ञानात्मक भाषेत मुळातच अशुद्धता आहे आणि म्हणूनच तत्त्वज्ञानाची कोणतीही शुध्द भाषा अस्तित्वात नाही.

अशा पद्धतीची परिस्तिती ही तत्त्वज्ञानाची पुर्वअट असण्याचं कारण म्हणजे आपण हे मान्य करणे गरजेचे आहे की भाषा ही पुर्णतः अशुद्ध असू शकते. समाजात विभिन्न पध्दतीच्या भाषा असू शकतात जसे की कविता किंवा गणितीय भाषा किंवा राजकारणाची भाषा. मात्र तत्त्वज्ञानात या सगळ्याच भाषा शक्य असतात हे आपण मान्य केले पाहिजे. आणि म्हणूनच तत्त्वज्ञानाचा शोध हा औपचारिक भाषेच्या पलिकडचा शोध असतो व त्याच सोबत भाषेच्या साधारण वर्गीकरणापलीकडचा शोध असतो. तत्त्वज्ञानात भाषेचे सगळेच आकार अथवा रूप शक्य असतात आणि तरिही या तत्त्वज्ञानाच्या या अशुध्द स्वरुपात एक महत्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे संवाद आणि प्रेषण होय.

परंतु काही संस्कृतींमध्ये अशा पध्द्तीची भाषिक सरमिसळ अशक्य असते आणि म्हणून अशा संस्कृतीमध्ये तत्त्वज्ञानात्मक भाषा ही अशक्य असते. भाषेचे हे वर्गीकरण हा काही संस्कृतींमध्ये एक महत्त्वाचा कायदा असतो, जसे की प्रेषितांची भाषा ही सामान्य माणसाची भाषा असू शकत नाही किंवा ती कवींची भाषा असू शकत नाही. आपल्याकडेसुध्दा ज्ञानाची प्रमाण भाषा ही फक्त विशिष्ट समाजाची भाषा होती आणि जनमाणसाला या भाषेचा अधिकार देखील नव्हता. किंवा राजभाषा अथवा बाद्यु म्हणतो तसे जगाच्या व्यवहाराची भाषा ही लोकांची भाषा असू शकत नाही किंवा नसते देखील.  आज म्हणूनच तत्त्वज्ञान अशा पद्धतीच्या भाषेच्या वर्गीकरणाच्या विरोधात असते. हा तत्त्वज्ञानातील अजून एक महत्त्वाचा विचार आहे: तत्त्वज्ञान हे वर्गीकरणाच्या विरोधात असते आणि विशेषतः भाषेच्या वर्गीकरणच्या विरोधात असते आणि म्हणूनच खुप काळापासून तत्त्वज्ञान आणि विद्यापीठ, तत्त्वज्ञान आणि शैक्षणिक चर्चा यांच्या मध्ये विरोधाभास आढळतो. 

तत्त्वज्ञान आणि विद्यापीठ यांच्या विरोधाभास हा वरवरचा विरोधाभास नसून तो मुळातील विरोधाभास आहे. याचे कारण म्हणजे विद्यापीठासाठी वर्गीकरण हे खुप महत्त्वाचे असते जसे की विद्यापीठात विज्ञान विभाग असतात, मानवविद्याशाखा असतात, साहित्य असते आणि समाज विज्ञान देखील असतात. आणि या विशिष्ट विषयांमध्ये देखील अजून विशिष्ट वर्गीकरण असते जसे की इतिहासात विशिष्ट प्रकारचा इतिहास अथवा आधुनिक, प्राचीन, मध्ययुगीन इतिहास, किंवा 'क्ष' चा इतिहास अथवा य चा इतिहास इत्यादी. आणि हीच विद्यापीठाची खासियत किंवा बुद्धिमत्ता आहे कारण, सततच नव्या वर्गीकरणांची निर्मिती, नव्या विशेषीकरणांची निर्मिती इत्यादी द्वारेच विशिष्ट विशिष्टकरणाचे आस्थापन केले जाऊ शकते. आणि या विशिष्टकरणामध्ये आपणाला नेहमीच विशिष्ट निवडायचा पर्याय असतो, भाषेचा पर्याय असतो व त्याच सोबत भाषेच्या विशिष्ट भागाला निवडण्याचा पर्याय उपलब्ध असतो. आणि म्हणुन बाद्यु म्हणतो कि विशिष्ठीकरणं हा कायदा आहे, हा विध्यापिठाचा कायदा आहे व त्याच सोबत हा आजच्या जगाचा कायदा आहे.

गंमत म्हणजे वर्गीकरणाची संकल्पना अथवा विद्यापिठीय चर्चेचा जन्म हा तत्त्वज्ञानात झाला आहे. अर्थात हे विद्यापिठीय वर्गीकरण पहिल्यांदा आपणाला Aristotle (अरस्तु) मध्ये आढळते. वर्गीकरण जे Aristotle च्या तत्त्वज्ञानाचा मुळ पाया आहे. आणि म्हणूनच बाद्यु म्हणतो की Aristotle हा पहिला प्राध्यापक आहे पण प्लेटो मात्र प्राध्यापक नाही - कारण प्लेटो च्या कोणत्याही संवादात प्लेटो नेमकं काय म्हणतोय हे कुणालाच सांगता येत नाही. कारण प्लेटो चा विचार  त्याच्या संवादमध्ये अस्पष्ट विस्खळीत स्वरूपात असतो. आणि सर्वच संवादात प्लेटो सॉक्रेटिस म्हणून बोलतो किंवा इतर कोणत्याही त्रयस्थ माणसाच्या नावाने संवाद घडतो जसे की प्रोटोगोरस, मेनो, सॉक्रेटिस इत्यादी. 

प्लेटो चे संवाद हे रंगभूमी आहेत. आणि म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की आपल्याकडे प्लेटो ची रंगभूमी आहे तर अरस्तुचे विद्यापीठ आहे. अर्थात तत्त्वज्ञानाच्या सुरवातीला भाषेची अशुद्धता आपणाला प्लेटो च्या तत्त्वज्ञानात दिसते. बाद्युच्या मते भाषेच्या अशुध्दतेचा वापर आपणाला वर्गीकरणाच्या पलीकडे जाण्यासाठी केला पाहिजे व त्याचसोबत विद्यापीठाच्या पलीकडे जाण्यासाठी केला पाहिजे. आपल्या देशात सुध्दा शुद्ध भाषेच्या विशेषतः शुध्द संस्कृतच्या अट्टाहासा विरुध्द बौद्धांनी अशुध्द संस्कृत किंवा व्हलगर संस्कृतीची निर्मिती करून भाषेच्या प्रभुत्वाला विरोध केला आहे. आणि नंतर संत साहित्यात ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांचा जनभाषेचा अट्टाहास आपणास सर्वश्रुतच आहे. 

सांस्कृतिक अंगाने विचार केल्यास अशुध्द भाषेचा जन्म देखील ग्रीस मधेच झाला आहे त्याच सोबत आपणाला भाषेचे सर्वच प्रकार सुध्दा ग्रीस मध्ये आढळून येतात. उदाहरण म्हणून बोलायच झालं तर पार्मेनिडीझ आणि हेरॅक्लिटस हे दोन्ही तत्त्ववेत्ते कवी होते तर वर उल्लेख केल्या प्रमाणे आपणाला अरस्तु मध्ये विद्यापीठीय भाषा देखील आढळते. आणि प्लेटो मध्ये आपणाला ला गणितीय भाषा देखिल आढळते त्याच सोबत याच प्लेटो च्या लिखाणात दंतकथा, कथा, प्रतिक इत्यादी देखील आढळतात. या आधारे आपण असे म्हणू शकतो की ग्रीक तत्त्वज्ञानात, तत्त्वज्ञानाच्या भाषेचे अस्तित्व आढळते.

तत्त्वज्ञानाची शेवटची अट ही तत्त्वज्ञानाच्या प्रेषणाशी संबंधित आहे. बाद्यु म्हणतो की तत्त्वज्ञान हे लिखित शब्दांत घटित करू शकत नाही. तत्त्वज्ञानात मुख्यतः प्रेषण हे शब्दांनी होत नसून शाररिक स्वरूपाने होत असते म्हणजेच तत्त्वज्ञानात तत्त्ववेत्त्याचे शरीर त्याचा आवाज आणि त्याच अस्तित्व अस्तित्वात असत. बाद्यु म्हणतो तत्त्वज्ञानाच्या प्रेषणात तत्त्ववेत्त्यांचा आणि तत्त्वज्ञानाचा प्रभाव अथवा परिणाम पडलेला असतो : तत्त्वज्ञानाच्या प्रेषणात काही तरी हस्तांतरणीय असते, काही तर प्रेमा सारखे असते, कारण प्रेमातच आपणाला दुसऱ्या व्यक्तीच ठोस अस्तित्व प्रत्यक्ष असणं अपेक्षित असते. आणि म्हणून तत्त्वज्ञानात नाम असतात जसे कि प्लेटो, अरस्तु, हायडेगर, सात्र इत्यादी आणि ही सर्वच नाव खूप महत्त्वाची आहेत. काही अंशी तत्त्वज्ञान हे कले सारखे आहे कविते सारखे आहे कारण कविता अथवा कला विशिष्ट व्यक्तीची असते जसे की व्हॅन गॉ, नेरुदा, पिकासो, ढसाळ इत्यादी. पण तत्त्वज्ञान मात्र विज्ञाना सारख नसत कारण विज्ञानात नाम असतात पण ती महत्वाची नसतात, विज्ञानात प्रमेय महत्त्वाची असतात. आणि म्हणूनच तत्त्वज्ञानात आपण नामापासून दूर जाऊ शकत नाही ; आपण जर बाद्यु बद्दल बोलत आहोत बाद्यु बद्दलच बोललं पाहिजे.

प्राचीन ग्रीस मध्ये ग्रीक तत्त्वज्ञानाच्या उदयानंतर जवळजवळ  सर्वच ग्रीक तत्त्ववेत्त्याबद्दल पुस्तक लिहण्यात आली, हा पुस्तक लिहण्याचा नवा प्रकार हा साहित्यातील शैली होती. या पुस्तकांमध्ये नावीन्य होते पण ही नाविन्यता अस्तित्वात असलेल्या तत्त्ववेत्त्याबाबत होती त्याच्या जीवनाबाबत होती आणि हीच नाविन्यता आपल्या सोबत आज ही आहे.

तत्त्ववेत्ता काही तर सांगत असतो बोलत असतो पण ते पुस्तकात नसते, तत्त्ववेत्ता जे काही बोलतो ते जे आहे ते महत्वाचं आहे आणि तेच तत्त्वज्ञानाच गुपित आहे. आणि हे अस्तित्वात असण्याचं कारण इतकंच कि तत्त्वज्ञानाच्या प्रेषणात काही तरी विशेष असत हे विशेष शुध्द विवेकिय असू शकत नाही ते परिणामकारक असत, ते भौतिक असत किंवा शारीरिक असते किंवा इतरांप्रतीच्या प्रेमा सारखे असते.

तत्त्वज्ञान हे मुळातच व्यक्तिनिष्ठ परिवर्तन असते, याच सोबत तत्त्वज्ञानाच्या मुळात विवेकीय परिवर्तन ही असते, पण या विवेकीय परिवर्तनाचे साधन मात्र पुर्णतः विवेकीय नसते. याचे कारण म्हणजे व्यक्तिनिष्ठता ही शुद्ध विवेक असू शकत नाही, विवेक आणि वैश्विकता हा हे माणसाचे घटक आहेत/असतात पण ते संपूर्णतः नसतात. शेवटी तत्त्वज्ञानाचा उद्देश फक्त विवेकीय मत निर्माण करणे नाही, तर त्याचसोबत नवीन ईच्छा निर्मिती करणे हा देखील आहे. तत्त्वज्ञान हे पुस्तकांमध्ये घटित करू शकत नाही. तत्त्वज्ञानाचे पुस्तक वाचणे म्हणजे पुस्तकाच्या प्रतिवादाशी स्वताला घटित करणे नव्हे. तर सुरवातीलाच प्रेम असणे गरजेचे आहे,  कारणं प्रेम हेच तत्त्वज्ञानाची मुळ सुरवात आहे. इथे काही तरी आहे, काही तरी चैतन्यमयी आहे.