India

कोरोना, टाळेबंदी आणि महाराष्ट्रातील आदिवासींचा न संपणारा संघर्ष

टाळेबंदीमुळे आदिवासी समाजापुढे या परिस्थितीत तग धरणं, जिवंत राहणं हे मोठं आव्हान ठरु लागलं.

Credit : Adivasi Resurgence

- अनिल साबळे

 

कोरोनाव्हायरसने जगभरच थैमान घातलं आहे. भारतातही मार्च महिन्यात या भयंकर रोगामुळे अचानक टाळेबंदी झाली. यादरम्यान आदिवासी आश्रमशाळेतील मुलं तोंडाला रुमाल बांधून घरी जाताना मला दिसली. ओतूरमधल्या आमच्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील मुलीसुद्धा घरी गेल्यामुळे वसतीगृह बंद करावं लागलं. आठ पंधरा दिवसाच्या अंतराने देशातली टाळेबंदी वाढूच लागली. आणि वाढत असलेल्या टाळेबंदीमुळे आदिवासी समाजापुढे या परिस्थितीत तग धरणं, जिवंत राहणं हे मोठं आव्हान ठरु लागलं. टाळेबंदी करताना सरकारनं गरीब जनतेचा जराही विचार केला नाही.

आमच्या ओतूर परिसरात उन्हाळा ऋतू हा आदिवासींसाठी मोठा दिलासादायक असतो. हिरडा, करवंद, रानआंबे, जांभळं विकून रोजगार मिळवून देणारा हा काळ असतो. तसंच याच ऋतुमध्ये आदिवासी माणसं रानात मोळ्या तोडून त्या आजूबाजूच्या गावात विकत असतात. पण टाळेबंदीमुळे आदिवासी समाजाला रानात जाऊन हिरडा झोडून विक्रीसाठी नेता येईना. टाळेबंदीमुळे सगळे रस्तेच बंद झाल्यामुळे, लोकांची रहदारीही बंद झाली. त्यामुळे जंगलातली करवंदं आणि जांभळं विकायची कुठं? आणि कुणाला? हा प्रश्न आदिवासी समाजाला भेडसावू लागला. साधी स्वत:च्या खोपट्यातली चूल पेटवण्यासाठी जंगलात सरपणाला जायचं की नाही, हा प्रश्नही त्यांच्यासमोर उभा राहिला. रानात चिंचा झोडणारे कातकरी तर टाळेबंदीमुळे पोलिसांना चुकवत चुकवत रानारानातून घरी पळून गेले. याच टाळेबंदीचा फायदा घेऊन ठेकेदारांनी त्यांच्या मजुरीचे पैसेसुद्धा बुडवले.

यात वीटभट्टीवर कामाला गेलेल्या कातकरी आणि ठाकर समाजाची अस्वथा फारच वाईट झाली. टाळेबंदीमुळे वीटभट्टी मालकांनी आदिवासी मजुरांना किमान जगण्यासाठी मजुरी देण्याच्या जबाबदारीतून आपले हात झटकून टाकले. गरीब कातकरी आणि ठाकर समाजाची माणसं आपलं सामान घेऊन जंगल तुडवत घरी निघाली, कारण सरळ वाटेनं चालत गेलं तर पोलीस कसलाही विचार न करता त्यांना काठीनं फोडून काढत होते. रात्र झाली म्हणजे कुठल्याही झाडाखाली मुक्काम करायचा आणि सकाळी पुन्हा आपल्या गावाची वाट धरायची. 

मंचरच्या वीटभट्टीवरुन वणी-दिंडोरी या आपल्या गावी पायी निघालेलं एक ठाकर कुटुंब मला भेटलं. पायी चालताना आपला मुरगळलेला पाय एका काठीला बांधून एक म्हातारा चालत होता आणि त्याच्यासोबत एक नवरा-बायको असं जोडपं होतं. आपल्या वडलांच्या खांद्यावर बसलेली लहान मुलगी भेदरलेल्या नजरेनं माझ्याकडे पाहत होती. अजून या कुटुंबाला दोनशे किलोमीटरचा पल्ला पायी गाठायचा होता. त्यांच्या बोलीभाषेवरुन मी लगेच ओळखलं की, हे कुटुंब ठाकर समाजाचं आहे. मंचरवरुन ओतूरला येता येता या ठाकर कुटुंबाला दोन दिवस लागले होते. आईच्या डोक्यावर काही दिवस पुरेल एवढा शिधा होता. पुढे पायी जाताना या कुटुंबाची काय अस्वथा होईल हा विचार करुन मी अस्वस्थ झालो. शेकडो आदिवासी कुटुंबांची अशी अवस्था झाली आहे.

देशात अचानक लागू झालेली टाळेबंदी पुढे अनेक महिने चालणार आहे याची कल्पना मला कवी मंगेश नारायणराव काळे यांनी दिली होती. काळे यांनीच मला कातकरी कुटुंबाना किराणा माल खरेदी करुन देण्यासाठी पाच हजार रुपयांची मदतही लगोलग केली होती परंतु ओतूरजवळच्या डिंगोर इथं कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे मलाही ओतूरच्या बाहेर जाता येत नव्हतं. त्यामुळे मी आमच्या वसतिगृहातील कोमल मराडे या बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनीकडे ते पैसे दिले. आपल्या गावाजवळून दूर असलेल्या गावातून कोमल मराडेनं किराणा खरेदी करून तो कोल्हेवाडी इथं राहत असलेल्या कातकरी वस्तीवर जाऊन वाटून दिला.

त्यानंतर मी आमच्या शासकीय वसतिगृहात राहणा-या सगळया आदिवासी मुलींना फोन करुन, त्यांच्या गावात काय परिस्थिती आहे याची माहिती घेतली. सगळीकडेच टाळेबंदी असल्यामुळे पोलीस मजुरीला निघालेल्या बाया माणसांना काठीने बेदम मारत आहेत, अशी माहिती मला मिळाली. घरातच बसा असं सगळीकडून सांगितली जात होतं. पण घरात बसून आम्ही खायचं काय? याचा विचार कोणीच केला नव्हता. ओतूर परिसरातले आदिवासी दुर्गम भागात राहतात. सरकारी रेशन धान्याची दुकानंही दूर दूर आहेत. दहा-पंधरा किलोमीटर अंतर डोंगरावरून चालत येणं आणि तेवढंच अंतर पुन्हा चढून जाणं...म्हणजे वीस ते तीस किलोमीटरची पायपीट रेशन धान्यासाठी करावी लागते. 

 

 

एवढं करूनही कधी फक्त गहू मिळतात तर कधी तांदूळ. तेल तिखट-मीठ, साखरेचा तर पत्ताच नाही. बरं रेशन कार्डही सगळ्यांकडे नाहीत. उन्हाळ्याच्या दिवसांत हंगामी रोजगारासाठी आदिवासी स्थलांतर करतो, तेव्हा त्यांनं रेशनकार्डाचा कुठं आणि कसा उपयोग करायचा? केरळमध्ये स्वत: सरकारी अधिकाऱ्यांनी जसं आदिवसी पाड्यांवर जाऊन लोकांना घरपोच धान्य दिलं, तसं महाराष्ट्रात का घडत नाही? 

दुर्गम ओतूरपासून दहा किलोमीटरवर असलेल्या चिल्हेवाडी या गावात मजुरी करणा-या महादेव कोळी समाजाची परिस्थिती अतिशय केविलवाणी आहे. घरात खाण्यासाठी तांदूळ होता, पण इतर किराणा घरात काहीच नव्हता. प्रदिप भोईर या मुलाजवळ मी फेसबुकवरील मित्रांनी पाठवलेल्या मदतीतून पाच हजार रुपये पाठवून दिले. तेव्हा माझ्या मित्राने त्या आदिवासी कुटुंबाना किराणा खरेदी आपल्या हाताने वाटून दिला.

ठाकर, महादेव कोळी या समाजाजवळ थोडीशी शेती आहे. त्यामुळे त्यांच्याकडे किमान वर्षभर पुरेल एवढा भात तरी शिल्लक आहे. भात आणि काळया वालांची आमटी खाऊन त्यांना कसंही हे वर्ष तरी रेटता येईल. पण रानात चिंचा झोडणं तसंच हंगामी मजुरी करणा-या कातकरी समाजाची अस्वथा केविलवाणी झाली आहे. कारण त्यांना शेती नाहीच. कुठल्याही डोंगरात किंवा नदीच्या काठी ही कातकरी मंडळी झोपडी बांधून राहतात. नुकतीच पिकू लागलेली करवंंद ओरबाडून खाण्यावाचून त्यांच्याजवळ काही पर्यायच राहिला नाही. शिवाय ढगाळ हवामानामुळे करवंदसुद्धा ब-याच गावी आली नाही. यावेळी अनेक गावात ढगाळ वातावरणामुळे गावठी आंब्याचा बार सुद्धा गळून गेला होता. उन्हाळ्यात ओढे, तलाव आटल्यामुळे त्यांना मासेमारीही करता येत नाही. 

ओतूरजवळच्या डिंगोर येथील रुग्ण बरा झाल्यावर ओतूरमधली संचारबंदी शिथिल झाली. तेव्हा मीच आदिवासी गावात मदत करण्यासाठी फिरु लागलो. फेसबुकवरील मित्रांनी केलेल्या मदतीतून मी जमेल तेवढा किराणा विकत घेऊन तो वाटण्यासाठी अनेक आदिवासी गावामध्ये गेलो. तेव्हा गावातली परिस्थिती पाहून मन हेलावलं टाळेबंदीमुळे आजूबाजूच्या गावातले बागायत शेतकरी, पीकाला बाजारभाव नसल्यामुळे पीक घेण्यास तयार नाहीत, त्यामुळे एरव्ही उन्हाळ्यात आदिवासींना मिरच्या, कांदे काढण्याचं रोजंदारीने मिळणारं कामही बंद झालंय आणि सगळयाच मजूर अड्ड्यावर पोलीस काठ्या घेऊन उभे असल्यामुळे आदिवासी समाजाला मजुरीसाठी मजूर अड्डयावर जाता येईना. पायात चप्पल जरी नसली तरी आपल्या लुगड्याच्या पदराने तोंड बांधलेल्या अनेक आदिवासी स्त्रिया मला अनेक ठिकाणी वणवण करताना दिसू लागल्या.

नुकतीच अकरावीची परीक्षा देऊन बारावीत गेलेल्या एका कातकरी मुलीला मी सहज चौकशी करण्यासाठी फोन केला तेव्हा ती सांगू लागली – ‘सुट्टीत मी आईवडिलांना मदत करण्यासाठी वीटभट्टीवर आले आणि आम्ही सगळे आता इकडेच अडकून पडलोय. आमच्याजवळचं सगळंच अन्नपाणी संपत आलंय. वीटभट्टीचा मालक रुपयासुद्धा उसना देत नाही. आता आम्ही काय करायचं?’ मी त्या मुलीला किराणा घेण्यासाठी काही मदत पाठवणार होतो. पण मदत नेमकी पाठवणार कशी? ती मुलगी कल्याणपासून दहा-पंधरा किलोमीटर लांब असलेल्या खेडेगावातल्या वीटभट्टीवर अडकून होती. जवळच्या किराणा दुकानादाराला मी ऑर्नलाईन पैसे पाठवणार होतो पण त्या दुकानादारांचं खातं साध्या बँकेत असल्यामुळे मला ते पैसे पाठवणं जमलं नाही. गावातला कोणताही माणूस त्या कातकरी मुलीला आणि तिच्या कुटुंबाला जवळसुद्धा उभं करत नव्हता. नंतर त्या मुलीला पुन्हा फोन करायचं धाडसच मला झालं नाही.

आदिवासी वाडीवस्तीवर किराणा वाटताना काही आदिवासी मुलं मला म्हणाली, “आम्ही आमच्या सरांना फोन करुन पैसे उसने मागितले तर, त्या दिवसापासून सरांनी आमचा फोन घेणंच बंद करुन टाकलं. उलट तुम्ही वर्ग-चारचे काम करणारे कर्मचारी वाईट वेळेला आमच्या घरी मदत घेऊन आले”. आदिवासी मुलांचा कसलाही सण असला की, आपल्या बायकापोरांसोबत जेवायला येणारे शिक्षक आज आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आल्यावर आदिवासी मुलाला साधे पैसेसुद्धा उसने देऊ शकत नाहीत, ही गोष्टीच प्रंचड संताप आणणारी आहे.

अनेक वेळा उन्हाळयामध्येच आदिवासी मुला-मुलींची लग्न ठरवताना जावळाचा कार्यक्रम केला जातो. जावळाचा कार्यक्रम म्हणजे ज्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न असेल तिच्या घरी एक बोकड कापला जातो. त्यावेळी अनेक शिक्षकांना इंग्रजी दारुसोबत भरपेट मटन खायला मिळतं. पण जमावबंदीमुळे हे कार्यक्रम बंद असल्याची खंत मात्र अनेक शिक्षकांनी मला बोलून दाखवली. आता त्या शिक्षकांना काय उत्तर द्यावं, हे मला समजत नव्हतं. इथं आदिवासी अन्नाला पारखा झालाय तरी अनेक शिक्षकांच्या मनात दारु-मटनांचेच विचार येत होते, या मध्यमवर्गीय जाणिवेनंच तळातल्या माणसाच्या प्रश्नांकडे सगळीकडून जाणीवपु्र्वक डोळेझाक केली जाते आहे.

 

 

ज्या तालुक्यांत कोरोनाचा रुग्ण नाही, त्या तालुक्यांत टाळेबंदीत थोडी शिथिलता आल्यामुळे आता आता काही ठिकाणी रोजगार मिळायला सुरुवात झाली आहे. जुन्नर तालुक्यातील मुथाळणे येथील एक आदिवासी तरुण बनकर फाटयाजवळच्या चाळीतले कांदे भरुन, आपली दिवसभरांची मजुरी मोजत रस्त्याच्या कडेनं घरी जात होता, तेव्हा एक भरधाव ट्रक त्या मुलाला जोरदार धडक देऊन सुसाट निघून गेला. तो आदिवासी मुलगा जागीच ठार झाला. ट्रकचालक काही काळाने पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. मात्र “आमच्या मित्राला ठार करणारा ट्रक चालक कुठे आहे?” असा प्रश्न काही आदिवासी तरुणांनी पोलिसांना विचारला असता पोलिसांनी त्या मुलांना मारहाण करुन हुसकावून दिले. त्यानंतर मुथाळणे येथील बरेच गावकरी पोलीस स्टेशनला जमा झाल्यावर पोलिसांनी त्याची दखल घेत पुढील तपास सुरु केला. आता तपास झाल्यावर, गुन्हा सिद्ध झाल्यावर आरोपीला शिक्षा झाली तरीही त्या आदिवासी मुलाचा जीव पुन्हा परत येणार नाही. आदिवासींच्या जीवाचं मोल ते किती? 

आता कालपरवाची गोष्ट…. मी खिरेश्वरजवळच्या सांगणोर येथील एका आदिवासी वस्तीवरल्या घरी गेलो होतो. तेव्हा जवळच्या गावात एका शेतकऱ्याला कांदे काढण्यासाठी काही मजूर हवे होते. या गोष्टीमुळे घरातली सगळी माणसं काम मिळालं… म्हणून आनंदात विळे घेऊन कामाला निघाली. मजुरीला जाणाऱ्या या कुटूंबानं आपल्या स्वत:च्या शेतात थोडी चवळी पेरली होती. पिंपळगावजोगा धरणाचं पाणी जवळ असल्यामुळं त्यांना स्वत:च्या शेतात थोडंसं काहीतरी पिकवण्याची आशा होती. त्यादिवशी त्यांच्या शेतात पेरलेली चवळी खायला वानरं घुसलं होती. त्या वानरांना हुसकावून लावण्यासाठी, त्या घरात राहणारी आणि आमच्या वसतिगृहात राहून शिकणारी एक मुलगी पाळलेलं कुत्रं सोबत घेऊन वानरांना दगडं हाणत हाणत भराभर डोंगर चढत होती. 

तिनं चवळी उकरुन खाणारी वानरं दूर हुसकावून लावली. या झाडावरुन त्या झाडावर उडया मारत पळणारी भुरकी वानरं मला त्या मुलीच्या घरापासून दिसत होती. डोंगरावरुन मला पाहिलं तसं ती मुलगी मला चहा देण्यासाठी धापा टाकतच खाली पळत आली. घाईघाईत चुल पेटवूर त्या मुलीनं भरकन मला काळा चहा करुन दिला. नंतर ती मुलगी सुद्धा कांदे काढण्यासाठी आपल्या घरातल्या कुटुंबासोबत हातात विळा घेऊन निघाली. घर राखायला मागे फक्त एक म्हातारी आजीच राहिली. ती आजी कामाला जाणा-या माणसांना आपल्या लुगड्याचा पदर टरकन फाडून देताना म्हणाली, “हे चिंधुक राहूद्या. बोटबिट कापल्यावं बांधायला”. घरात मागं एकटंच राहावं लागणाऱ्या आजीचं बोलणं ऐकून मी वाचा गेल्यासारखा एका जागेवरच उभा राहिलो. कुठं दुखलं खुपलं तर साधं बोटभर बॅंडेज आदिवासींना मिळत नाही, तिथं सॅनिटायजर, मास्क, ग्लोव्हज हे सगळं त्यांच्यासाठी स्वप्नवतच आहे.

 

लेखक मराठीतील नामवंत कवी असून ओतूर येथील शासकीय आश्रमशाळेत चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून काम करतात. सध्या ओतूर परिसरातील आदिवासी वाडीवस्तीवर जाऊन ते मदत पोहोचवण्याचं काम करत आहेत. आपणही त्यांना खाली दिलेल्या बॅंक डिटेल्सनुसार मदत करू शकता. मदत म्हणून आलेल्या रकमेचा विनियोग कसा केला जातो, याचा सविस्तर तपशीलही ते त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवरून जाहीर करतात. 

मदतीसाठी बँक खात्याचा तपशील

Anil Dadasaheb Sabale

State Bank of lndia: Junnar

A/c No: 31950897520

IFSC code: SBIN0006443

MICR code: 410002813

Contact: 9561890444

Email: anildsable80@gmail.com