Quick Reads

अ लव्ह लेटर टू महेशिन्ते प्रतिकारम

मी पुष्करणच्या लेखनाच्या आणि या चित्रपटाच्या किती प्रेमात आहे, हे शब्दांत सांगणं अवघड आहे

Credit : Amazon Prime

‘बधाई हो’ चित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेल्या गजराज राव-नीना गुप्ता यांनी साकारलेल्या पात्रांना, म्हणजेच वयाच्या पंचेचाळिशीपार केलेल्या जितेंदर-प्रियंवदा कौशिक जोडप्याला तिसरं मूल होणार असतं. आयुष्मान खुरानाने साकारलेलं पात्र, नकुल हा त्यांचा सर्वांत मोठा, पंचवीस वर्षांचा मुलगा असतो. तर धाकटा मुलगा, गुल्लर हाय स्कूलमध्ये शिकत असतो. साहजिकच या दोन्ही मुलांना, आणि प्रियंवदाच्या सासूला ही पुढे वाढून ठेवलेली घटना लाजिरवाणी वाटत असते. समाज राहिला बाजूला, पण खुद्द त्यांच्या कुटुंबाने तरी त्यांना होणाऱ्या मुलाचं स्वागत करायला हवं, या संकल्पनेवर या चित्रपटाचा डोलारा उभा राहिलेला आहे. चित्रपटाचं कथानक अर्ध्याहून अधिक पुढे सरकल्यानंतर दोन्ही मुलांना, आणि सासूला आपली चूक लक्षात येते. ज्या तथाकथित लाजिरवाण्या घटनेमुळे कौशिक कुटुंब विभागलं जाणार असतं, ती घटना खरंतर किती आनंददायी आहे, याचा ते स्वीकार करतात. आता मुद्दा असतो, तो सर्वांनी मिळून समाजाला, त्यांच्यावर रोखल्या गेलेल्या नजरांना उत्तर देण्याचा. 

याच मुद्द्याच्या अनुषंगाने ‘बधाई हो’मध्ये (२०१८) एक खूप समर्पक असं दृश्य आहे. ते असं : नकुलला बरेच दिवस त्याचे समवयस्क मित्र चिडवत असतात की, ‘खुद्द पंचवीस वर्षांच्या नकुलच्या लग्न लावून देण्याच्या वयात त्याच्या आई-वडिलांनी आयतं मूल खेळवण्याची संधी दिली आहे’. आता स्वतः नकुलने परिस्थिती खुशीखुशी स्वीकारलेली असताना या लोकांना प्रत्युत्तर तर द्यायलाच हवं. मग ऐनवेळी ‘इज्जतीचा कचरा’ (पक्षी :फालुदा) व्हायला नको म्हणून प्रॅक्टिस करायला हवी. आफ्टर ऑल, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मग आयुष्मान आरशासमोर उभा राहत त्याची आणि त्याच्या पालकांची थट्टा करणाऱ्या मित्राला तो जे प्रत्युत्तर देणार असतो, त्या ‘डायलॉग’चा सराव करतो. अगदी गॉगल काढण्या-लावण्याच्या कृतीपासून. अखेर तो नाक्यावर उभा राहून टवाळक्या करत असलेल्या त्या मित्राकडे जातो. आधी त्याचं म्हणणं ऐकून घेतो, त्याने केलेली थट्टा सहन करतो. मग आधी “जुन्ने, तूने तो ले ही लेनी हैं मेरी आज” म्हणत पुढे म्हणतो “आज तूने साबित कर दिया की तू भाई हैं अपना. देखो कितना खुश हो रहा हैं भाई की ख़ुशी में.” - इतका वेळ दबलेला वाटणारा त्याचा आवाज आता चढलेला असतो. - “जब की इसके रहते ये ख़ुशी इसके घर कभी ना आएगी” ही ख़ुशी म्हणजे काय तर, गरोदरपण. “लेकिन तू चिंता मत कर. तेरे लिए हम ये भी कर लेंगे, आखिर भाई हैं तू अपना” आता तो उभा राहतो, नि समोरच्याच्या खांद्यावर हात ठेवत, आरशासमोर सराव केलेलं वाक्य स्वॅगमध्ये त्याच्या तोंडावर फेकून मारतो - “वैसे तो मेरी भी जरुरत नहीं तुझे. तेरे लिए तो मेरा बाप ही काफी हैं!” याला म्हणतात स्टायलिश प्रत्युत्तर! त्या मित्राच्या तथाकथित पौरुषत्वाची खिल्ली नि काही काळापूर्वी आपण आपल्या बापाला ज्यावरून कमी लेखात होतो, त्या आपल्या बापाचा गौरव दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य केल्या जातात. 

ही कुणाला तरी प्रत्युत्तर देण्याची भावना मानवात उपजतच असावी. मग भलेही ते शारीरिक पातळीवर असो, किंवा मग शाब्दिक स्वरूपाचं. त्यातून मिळणारा आनंद, एक जेता असण्याची, समोरच्यावर कुरघोडी केल्याची भावना अनुभवणं यातच या उपजत अशा भावनेचं मूळ दडलेलं असावं. मी स्वतः कित्येकदा अशा शाब्दिक प्रत्युत्तरांची तयारी केलेली आहे. कुणासोबत तरी कधीतरी शाब्दिक द्वंद्वात हरल्याची भावना निर्माण झाल्यानंतर पुढे असं घडल्यावर किंवा हेतूपुरस्सररीत्या घडवून आणल्यावर द्यायच्या उत्तराची पूर्वतयारी केलेली आहे. आणि हे कुणा व्यक्तीसोबतच घडायला हवं, अशातलाही भाग नसते. उदाहरणार्थ, लहानपणीची एक घटना मला स्पष्ट आठवते. मी तेव्हा किंबहुना आजही कुत्र्यांपासून दोन हात अंतर राखून असतो. आपण त्यांच्या वाटेला जात नाही, तर त्यांनीही आपल्या वाटेला जाऊ नये, अशी माझी किमान अपेक्षा असते. तेव्हा मी पाचवी वगैरेत असेन. शाळेला जाताना घरापासून शंभरेक मीटर अंतरावर डावीकडे वळून, आणखी दोनशे तीनशे मीटर चालल्यावर एक वळण घेतलं की, मुख्य रस्ता लागत असे. मात्र, हे दुसरं वळण घ्यावं लागायचं त्याच भागात एक मोकाट कुत्रं हमखास असायचं. त्याला चुकवता चुकवता माझ्या नाकी नऊ यायचे. आधी म्हणालो त्याप्रमाणे, प्रत्युत्तर तर द्यायलाच हवं. सलग दोन-तीन दिवस या कुत्र्याला चुकवल्यानंतर एकदा हे कुत्रं समोर आलं नि मागे धावू लागलं. मलाही धावावं लागलं, पण तीनेक सेकंदानंतर मी जागीच थांबलो. आणि मागे वळून हातात असलेली टिफीन बॅग जोरदारपणे तोंडावर आपटली. कुत्रं निघून गेलं, नि त्यानंतर ते कधी आक्रमक पवित्र्यात माझ्या मागे धावल्याचं आठवत नाही. त्यावेळी प्रत्युत्तर दिलं होतं, नि त्यापाठोपाठ एक समाधानकारक भावना मनात निर्माण झाली होती. (‘पेटा’मध्ये कुणी तक्रार न करण्याचे ते दिवस असावेत.) तर सांगायचा मुद्दा हा की, ही वेळोवेळी अपमानजनक घटना आपल्यासोबत घडल्यानंतर प्रत्युत्तर देण्याची जी मानवाची उपजत अशी भावना आहे, ती म्हणजे आपल्या आक्रमक पवित्र्याचं मूळ असते. ‘महेशिन्ते प्रतिकारम’ची मध्यवर्ती संकल्पना नेमकी याच भावनेभोवती फिरणारी आहे. 

महेश भावना (फहाद फाझिल) केरळमधील इडुक्की जिल्ह्यातील रहिवासी आहे. हा निमशहरी भाग म्हणजे गावातील निसर्गरम्य देखावा, आणि शहरातील मूलभूत सुविधांचं मिश्रण आहे. चित्रपटाला सुरुवात होते तीच मुळी या निमशहराला अर्पण केलेल्या, त्यातील वैशिष्ट्य आणि सौंदर्याचा गौरव करणाऱ्या एका गाण्याच्या पार्श्वभूमीवर. ज्यात गीतकार रफीक अहमद ‘इडुक्की’ला रूपवान तारुण्यवतीची उपमा देतो. सुंदर असे शब्द, आणि त्याला जोड देणाऱ्या समर्पक, रूपकात्मक दृश्यचौकटींच्या माध्यमातून दिग्दर्शक दिलीश पोथान इडुक्कीचं भावात्म चित्र उभं करतो. सोबतच, या गाण्याच्या माध्यमातून सिनेमाचा नायक असलेल्या महेशची अलवार अशी अभिव्यक्ती दिसून येते, आणि त्याची प्रतिमा अगदीच ठळकपणे समोर उभी केली जाते. महेश आपल्या वडिलांचा, व्हिन्सेंटचा (के. एल. अँटनी कोची) वारसा पुढे नेत त्यांचा फोटोग्राफी स्टुडिओ चालवतो. असं असलं तरी त्याची फोटोग्राफी म्हणजे पासपोर्ट साइझ फोटोपासून ते कामचलाऊ फोटोपर्यंत मर्यादित असते. कुणाच्याही अध्यात-मध्यात न पडता ठरावीक तऱ्हेचं आयुष्य जगत असतो. तो आपल्या वडिलांसोबत राहतो. रात्री आपल्या प्रेयसीशी, सौम्याशी (अनुश्री) फोनवर बोलतो. घराबाहेर बांधलेल्या आपल्या कुत्र्याची देखभाल करतो. लोकांशी मिळून मिसळून वागतो. आपल्या स्टुडिओशेजारी असलेल्या फ्लेक्स प्रिंटिंग प्रेसच्या मालकाशी, बेबीशी (अलेनसार ली लोपेझ) असलेली त्याची मैत्री अबाधित राखतो. 

लेखक स्याम पुष्करणचं लेखन म्हणजे त्याची पात्रं नखशिखांत वास्तववादी असूनही रंजक असू शकतात याचा जिवंत नमुना आहे. महेश, त्याचे वडील व्हिन्सेंट, बेबी, बेबीचा नवनियुक्त सहाय्यक क्रिस्पीन, सौम्या ही सविस्तरपणे चितारलेली पात्रं तर ‘गर्ल/बॉय/मॅन नेक्स्ट डोअर’ स्वरूपाची आहेत, पण सोबत कथानकाच्या ओघात समोर येणारी इतर संक्षिप्त पात्रंसुद्धा तितकीच अस्सल भासणारी आहे. त्यांना असं बनवण्यात पुष्करणच्या सूक्ष्म निरिक्षण शक्तीवर आधारित असलेल्या, छोट्या छोट्या घटनांच्या निमित्ताने पात्रांच्या प्रतिक्रियांतून फुलणाऱ्या तीक्ष्ण विनोदाचा महत्त्वाचा वाटा आहे. 

उदाहरणार्थ, पुढे जाऊन क्रिस्पीन (सौबीन शाहीर) जेव्हा पहिल्यांदा बेबीला भेटण्यासाठी त्याच्या घरी येतो, तेव्हा बेबीची मुलगी, सोनिया (लिजोमोल जोसे) आणि त्याच्यात घडणाऱ्या संवादाकडे पाहता येईल. ते मुख्यत्वे एकमेकांना फारशा न ओळखणाऱ्या दोन पात्रांमध्ये घडणाऱ्या संवादात पॉप कल्चरचा किती महत्त्वाचा वाटा असू शकतो यावरून. म्हणजे इथे टीव्हीवर प्रसिद्ध अभिनेता मोहनलालचा एक चित्रपट सुरु असतो. क्रिस्पीन “तू मोहनलालची फॅन आहेस का?” म्हणत संवादाला सुरुवात करतो, तर सोनिया किंचित हसत “नाही, मी मामुट्टीची फॅन आहे” असं उत्तर देते. आता वास्तविक पाहता एकमेकांना न ओळखणारी ही पात्रं एकमेकांशी फ्लर्ट करत असल्याचं दाखवताना सिनेमा त्यांना जोडणारा दुवा कसा ठरवला जातो, यात लेखकाच्या (आणि परिणामी त्याच्या पात्रांच्या) अंगभूत सहजतेचं मर्म दडलेलं आहे. पुष्करणने लिहिलेले (आजवर मी पाहिलेले मोजके) सिनेमे म्हणजे लेखनातील अशी सहजता, आणि चित्रपटभर विविध रुपकं पेरत ती कथानकाच्या ओघात निरनिराळे प्रसंग जोडण्यासाठी वापरणं यासाठीचे मास्टरक्लास आहेत असं मला वाटतं. 

दरम्यान चित्रपटातील सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये व्हिन्सेंटच्या गायब होण्याचा प्रसंग सोडल्यास महेशचं आयुष्य तसं सुरळीत चालू आहे. सौम्या आणि त्याच्यातील प्रेमसंबंधांची कल्पना तिच्या घरच्यांनादेखील आहे, नि त्यांचा कशालाच विरोध नसून त्यांनी सगळं काही तिच्या मर्जीवर सोडलेलं आहे. अशातच चित्रपटातील घटनाक्रमाचा आलेख चढता बनू लागतो. चित्रपटात समांतरपणे दोन तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर अशा काही घटना घडतात की ज्या महेशच्या आयुष्याला स्पर्शून थेट त्याच्यावर परिणाम करणाऱ्या असतात. अशातही एक चांगली बाब घडते ती अशी की, बेबीचा नवीन सहाय्यक असलेला क्रिस्पीन त्याच्याही ओळखीचा निघून तो लागलीच त्याचा एक चांगला मित्र बनतो. 

या समांतर पातळीवर घडणाऱ्या दृश्यामध्ये पुष्करण सगळ्या घटना कशा उभारतो, आणि आधी पेरलेले संदर्भ आणि पात्रांचा वापर किती कल्पकतेनं करतो हे दिसून येतं. सुरुवातीच्याच गीतातून आणि एव्हाना कथानकाच्या घडलेल्या प्रवासातून इडुक्कीचं एक निमशहरी प्रदेश म्हणून उभं केलेलं चित्र इथे अधिक सुस्पष्ट आणि बहारदार होतं. एखाद्या गावात किंवा निमशहरी भागात बहुतांशी लोक एकमेकांच्या परिचयाचे असतात, हे सूत्र लक्षात घेत एका चेन रिअॅक्शन-वजा दृश्याची निर्मिती केली जाते. ज्यात कथानकाशी सुसंगत अशा प्रसंगांतून विनोदनिर्मिती करत कथानक पुढे नेलं जातं. इथूनच एक साधं सरळ पात्र कथानकाच्या केंद्रस्थानी असलेल्या चित्रपटाला त्याचं ‘महेशिन्ते प्रतिकारम’ (भाषांतर - ‘महेशचा बदला’) असं नाव का मिळालं हे स्पष्ट होत जातं. आता इथे काय घडतं यापेक्षा त्याचं वर उल्लेखलेल्या, प्रत्युत्तर देण्याच्या मानवी भावनेशी असलेलं नातं लक्षात घेणं अधिक गरजेचं आहे. कारण, यानंतर घडणाऱ्या घटना या म्हटल्या तर विनोदी आहेत, नि म्हटल्या तर गडद विनोदाच्या छटा असलेल्या गंभीर घटना आहेत. शेवटी आपण त्यांच्याकडे कशा दृष्टीने पाहतो, यात त्यांचं गांभीर्य असणं-नसणं दडलेलं आहे. 

चित्रपटातील सर्वांत पहिली दृश्यचौकट म्हणजे महेश त्याची चप्पल धुवत असल्याचं दृश्य. मग चित्रपट जेव्हा त्याच्या मध्यबिंदूजवळ येतो तेव्हा या दृश्यचौकटीची समर्पकता लक्षात येते. आणि या दोन बिंदूदरम्यान जे काही घडतं ते महेशच्या बदल्याचं उत्प्रेरक. तर त्यानंतर जे घडतं, ते म्हणजे त्याच्या मनातील भावना आणि योजनांचं उपयोजन. आता सदर लेखाचा एक तृतीयांश भाग समोर घेतला, तर त्यात चर्चिलेल्या वेगवेगळ्या बाबींमध्ये चित्रपटाच्या उत्तरार्धात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब आढळेल. म्हणजे अगदी नाही नाही म्हणता एका छोट्याश्या घटनेचं आणि तिच्या परिणामांचं रूपांतर जणू एखाद्याच्या जीवन मरणाचा प्रश्न बनावा अशा गोष्टींमध्ये घडतं. याचं कारण काय, तर मनुष्यस्वभाव. ज्यामुळे निर्माण होणारी, अपमान झाल्यानंतर समोरच्या व्यक्तीला प्रत्युत्तर द्यायलाच हवं, ही भावना. ‘महेशिन्ते प्रतिकारम’ची रचनाच अशी केलेली आहे की तो या भावनेच्या मुळाशी जाऊन तिचा परामर्श घेतो. तो आपल्यापुढे नायक उभा करतो. पण, तो नायक खरंतर आपलंच एक रूप वाटावा, इतक्या अस्सल मानवी भावना त्याला बहाल करतो. ज्यामुळे महेश रडत असेल तर आपण रडतो, तो प्रेमभावनेत न्हाऊन गेलेला असेल तर आपणही त्यासोबत ते अनुभवतो. ज्यामुळे त्याचा होणारा अपमान आणि मानहानी आपल्यालाही टोचते. त्यामुळेच जेव्हा पुढे वाढून ठेवलेल्या घटना घडतात, तेव्हा आपण त्याच्याशी एकरूप होत त्याची होणारी घालमेल अनुभवतो. त्याने बदला घ्यावा असं आपल्यालाही वाटू लागतं. तो घेतो की नाही हा भाग वेगळा, पण त्यादरम्यान मनात दाटून येणारी ही भावना म्हणजे लेखक स्याम पुष्करण नि दिग्दर्शक दिलीश पोथान यांचं यश. 

खुद्द पुष्करणच्या गावी घडलेल्या सत्य घटनेचा संदर्भ चित्रपटातील मूलभूत कथेला आहेत. त्यामुळे लहानपणी ऐकलेल्या या गोष्टीचे उपकरण लिखाणात करत असताना त्यामध्ये त्याला गरजेचा असा निमशहरी तऱ्हेचा बॅकड्रॉप मिळेल हे पाहिलं गेलं. त्यामुळे चित्रपटामध्ये हा सभोवताल कसा टिपला गेला आहे, यालाही कथेच्या अनुषंगाने महत्त्व होतं. अशावेळी दिग्दर्शक दिलीश आणि छायाचित्रकार शायजू खालिद इडुक्कीचं सौंदर्य नि लेखकाला अपेक्षित असलेला सभोवताल कशा रीतीने टिपतात, हाही चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग ठरतो. तर बिजिबलचं सुमधुर असं संगीत, आणि रफीक अहमद-संतोष वर्मा यांनी लिहिलेली गाणीही महेशच्या आणि एकूणच चित्रपटाच्या अभिव्यक्तीला साजेशी ठरतात. 

मी पुष्करणच्या लेखनाच्या आणि या चित्रपटाच्या किती प्रेमात आहे, हे शब्दांत सांगणं अवघड आहे, असं म्हणणं खरंतर चुकीचं ठरेल. कारण, हा लेख म्हणजे त्या प्रेमाचंच तर एक फलित आहे. भलेही काही गोष्टी सुटल्या असतील, किंवा काही मुद्दामहून टाळल्या असतील, पण जे लिहिलंय ते त्यावरील प्रेमच तर आहे. तूर्तास तरी सदर लेख संपवत पुष्करणने लिहिलेला आणखी एक चित्रपट पहायला घेतोय, हा ताजा कलम या चित्रपटाला लिहिलेल्या या प्रेमपत्राचा शेवट म्हणून चालून जाईल.