India

हुकलेला हंगाम

यंदा रब्बी पीकांच्या उत्पादनात घट

Credit : livemint

दुष्काळामुळे प्रमुख राज्यांतील डाळ उत्पादनात कमालीची घट झाली असून त्याचा देशपातळीवर शेतकरी आणि सामान्य ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्रात गेल्यावर्षी रब्बी हंगामात डाळीची लागवड १०.६१ लाख हेक्टर होती. यावर्षी डाळ लागवडीचे क्षेत्र अवघ्या ५.६२ लाख हेक्टरपर्यंत येऊन घसरले आहे.  

साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात रब्बी हंगामासाठी पीकांच्या लागवडीची सुरवात होते. मार्चच्या आसपास पीकांची काढणी होते. गव्हाचे पीक खासकरून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे. खरीप हंगामात राहिलेली कसर या पीकामुळे भरून निघते. परंतू यंदाच्या २०१८-१९च्या रब्बी हंगामात यावेळी फक्त ५१.६३ लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली. गेल्यावर्षी हे क्षेत्र ५४.२८ लाख हेक्टर क्षेत्र होते. दोन वर्षीतल्या तुलनेतील आकडेवारीचा फरक कमी वाटत असला तरी  अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम रिकामाच गेला आहे, असा या आकडेवारीचा अर्थ आहे.

महाराष्ट्रसह इतर राज्यांनी दुष्काळ जाहीर केला आहे. राज्य सरकार दुष्काळाचे मध्यम किंवा हलका निकष ठरवत आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी २६ जिल्ह्यातल्या १५१ तालुक्यामंध्ये महाराष्ट्र शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. किती गावं दुष्काळग्रस्त झालियेत ही आकडेवारी शासनाने जाहीर केली नसली तरी हा दुष्काळ फक्त पिण्याच्या पाण्याच्या दुष्काळापुरता मर्यादित नसून मोठ्या प्रमाणावर खरीपासोबतंच रब्बी हंगामाचे नुकसान झाले आहे.

परवा शुक्रवारी कृषि मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी देशपातळीवर रब्बी हंगामात डाळींच्या लागवडीत १८ टक्क्यांची घट झाली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांचा डाळीच्या उत्पादनात मोठा वाटा आहे. या दोन राज्यात झालेल्या कमी लागवडीचा देशपातळीवर मोठा फटका उत्पादनात बसणार आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होणार आहे. सामान्य ग्राहकांसाठी डाळीचे दरही वाढू शकतील.

गेल्यावर्षी कर्नाटक राज्यात १२.९८ लाख हेक्टर क्षेत्रात झालेली डाळींची लागवड  यंदा ७.३५ लाख हेक्टर एवढ्याच क्षेत्रात झाली आहे. महाराष्ट्रात गेल्यावर्षी रब्बी हंगामात डाळीची लागवड १०.६१ लाख हेक्टर होती. यावर्षी डाळलागवडीचे क्षेत्र अवघ्या ५.६२ लाख हेक्टरवर येऊन घसरले आहे.  मध्यप्रदेश राज्यात हा फरक थोडा कमी आहे. गेल्यावर्षी ३०.९ लाख हेक्टर क्षेत्रावर असलेली डाळीच्या पीकांची लागवड यंदा २९.२३ लाख हेक्टरवर आली आहे.

देशभरातील तेलबीयांच्या पीकांची लागवड ४६.८५ लाख हेक्टरवर झाली असून गेल्यावर्षी ती ४९.५० लाख हेक्टर होती. यंदा देशातील संपूर्ण रब्बी पीकांची लागवड गेल्यावर्षीच्या २२७. ४१ लाख हेक्टरवरून घसरून १९१. १२ लाख हेक्टरवर आली आहे.

देशभरातील खरीप हंगाम डाळउत्पादनच्या बाबतीत कधीच हातचा गेलाय. द हिंदू बिजनेस लाईन ने १४ नोव्हेंबर रोजी दिलेल्या एका बातमीनुसार तूर, मुग, उडीद डाळीच्या किंमतीत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. फुलं लागण्याच्या वेळेत पाण्याची ताडन बसल्याने दुष्काळाचा फटका तूर पीकाला बसल्याने एकूण उत्पादनात ५० टक्के घटीची शक्यता असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. याच बातमीतील माहितीला दुजोरा देत कर्नाटक तूर ग्रोवर्स असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज इंगिन यांच्या म्हणण्यानुसार यंदा साठ टक्के तुरीचे उत्पादन कमी होणार आहे. ऑक्टोबरच्या  मध्यावधीत ३५०० ते ३६००च्या दरम्यान फिरणारे तुरीचे बाजारभाव ४५००च्या आसपास आले असले तरी तुरीचे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार नाही. नवीन किंमती निर्धारणानुसार यंदाच्या हंगामासाठी तूर पीकाची किमान आधारभूत ५६७५ रुपये जाहीर करण्यात आली आहे.

दुष्काळाच्या संकटाने दाळपीकांसह इतरही पीकांच्या बाबतीत खरीप आणि रब्बी ह्या दोन्ही हंगामात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी झळ बसलीये.