India

विषाची परीक्षा

भारतीय शेती विषारी रसायनांचा अतिरेकी वापर करत आहे.

Credit : NULL

कीटकनाशके, पर्यावरण आणि जैविक विषसंचयन या विषयांवर काम करणा-या एका आंतरराष्ट्रीय संस्थेचा एक अहवाल परवा बुधवारी प्रसिद्ध झाला. भारतातील शेतकरी पीकांवर फवारणीसाठी जी कीटनाशकं वापरतात त्यापैकी ५३ प्रकारची कीटकनाशके अतिविषारी या प्रकारात मोडतात. पैकी दोन तृतियांश कीटकनाशक वापराताना शेतकरी कोणतीही काळजी घेत नसल्याने त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतायेत. यासह अनेक धक्कादायक बाजू या अहवालाने अधोरेखित केल्यात.

पेस्टिसाईड ऍक्शन नेटवर्क असिया पॅसिफिक (PANAP) या संस्थेने अशिया आणि दक्षिण पूर्व अशियातील देशांचा अभ्यास करून हा अहवाल तयार केलाय. ज्यात पाकिस्तान, बांग्लादेश आणि मलेशिया या देशांचाही समावेश आहे. २०१५ पासून गेली तीन वर्ष हे काम चालू होतं. भारतातल्या अकरा राज्यांतील ६५० शेतक-यांच्या दीर्घ मुलाखती घेण्यात आल्या. कीटकनाशकांची हाताळणी, दुकानातील किरकोळ विक्री, शेतक-यांच्या घरातील साठवणूक, शेतातला वापर आणि औषधाची विल्हेवाट या प्रत्येक टप्प्यावर सगळा भोंगळ कारभार चालला असल्याचे अनेक धक्कादायक निष्कर्ष अभ्यासकांनी नोंदवलेत.

दहामधे सात जणांना आजपर्यंत एकदातरी विषबाधा झाली आहे. श्वास घ्यायला त्रास होण्यापासून ते दम्यासारखे आजार, त्वचारोग, कान नाक घश्याचे आजार, ह्रदयरोग, आतड्यांचा संसर्गाबरोबरंच चेतासंस्थेचे आजार झाला आहे. काही आजार दीर्षकाळाने उद्भवल्याचं प्रमाणही अधिक आहे. भारतातील औषधकंपन्या, वितरक, किरकोळ विक्रेत यांच्या संगनमतातून अतिविषारी स्वरूपाची औषधं सरार्सपणे उत्पादित करत असून ती उत्पादनं आक्रमक मार्केटिंग करून भोळ्या भाबड्या तसंच शिकल्या सवरल्या शेतक-यांच्याही माथी मारली जाताहेत. ही औषधं पर्यारवणासाठी किती घातक आहेत याकडे होत असलेलं दुर्लक्षही यात अधोरेखित केलंय.

या अहवालातून बाहेर आलेली महत्त्वाची गोष्ट अशी की,  पीकांवर कीटकनाशके वापरण्याची परवानगी नसतानाही ती वापरली जाण्याचं प्रमाण भारतामध्ये अधिक आढळून आलं. उदाहरणार्थ. पॅराक्वाट (Paraquat) नावाचं कीटकनाशक. एका ठरावीक कीटकनाशकाचा वापर कोणत्या पीकांसाठी केला जावा हे ठरवाणारी एक समिती असते. तर या सेंट्रल इंसेक्टिसाईड बोर्ड एन्ड रिजस्ट्रेशन कमिटीने पॅराक्वाट औषध फक्त बारा पीकांनाच वापरण्याची परवानगी दिलेली आहे ज्यात कापूस, तांदूळ, गहू  आणि रबर या पीकांचा समावेश होतो. प्रत्यक्षात मात्र हेच औषध सुमारे पंचवीस पीकांसाठी आजही वापरलं जातं. फिप्रॉनिल (fipronil) नावाचं कीटकनाशक सात पीकांना वापरणं अपेक्षित असताना ते २७ पीकांसाठी त्याचा वापर होतो.

चुकीची कीटकनाशकं वापरणं आणि त्यातून जैविक विषसंचयन होणं चिंतेचा विषय आहे. Bioaccumulation मुळे आरोग्यावर होणारे परिणाम ब-याचदा उशिराने होत असतात. त्याबद्दल काळजी घेणं म्हणून महत्वाचं ठरत. कीटकनाशकं चुकीची पद्धती अन् प्रमाणात वापरली जाण्याबरोबरंच त्यांच्या वापराचं प्रमाण वाढतयं हो एक चिंतेचा विषय आहे. या अभ्यासाने हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित केला. २०१७ च्या आकडेवारीनुसार कीटकनाशकांच्या उत्पादनात भारत चौथ्या क्रमांकावर आहे. अमेरिका, जपान आणि चीन नंतर ४.९ अब्ज डॉलर्सएवढी बाजारपेठ असलेला भारत हा विषाची मोठी बाजारपेठ होऊन बसलाय.

२००२ मध्ये ४७,०२० टन असेलेली कीटकनाशकांची गरज 2014 मध्ये 60, 280 टनांवर पोहचली आहे. हे प्रमाण असंच चालू राहिलं तर २०२५ पर्यंत यात अजुन 6.5 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात १००० शेतक-यांना विषबाधा झाली. औषध कसं वापरायचं याची शास्त्रीय माहिती नसणं एवढं साधं कारण यामागं नाही. कीटकनाशकांच्या वाढत्या वापराला अनेक बाजू आहेत. ९ फेब्रुवारी २०१८ ला केंद्रसरकारने किटकनाशकांसंबंधी एका विधेयकाचा मसूदा लोकांसमोर चर्चेसाठी ठेवला होता.

याविषयीचा इंडी जर्नलचा सविस्तर रिपोर्ट वाचा इथे. रिपोर्ट

औषध कंपन्यांची खोडसाळ गणितं सामान्य शेतक-यांना समजणं कठीण आहे. पण कीटकनाशकांच्या विक्री, विपणन, साठवणूक, हाताळणी आणि विल्हेवाट यावर काटेकोर नियमांची अमंलबजावणी  करणं हे सरकारने करायला हवं. ते आवश्यक आहे. पीकांसाठी कोणतं कीटकनाशक वापरावं त्याचबरोबर पेस्टीसाइड, फंगीसाईड, हर्बीसाइड, मायक्रोन्युट्रियंट यातला फरक सोप्या शब्दात सांगणा-या यंत्रणेची गरज आहे. जमिन, पीक, हवामान, हंगाम यानुसार वापरायच्या औषधांची वस्तुनिष्ठ माहिती शेतक-यांपर्यंत पोहचायला हवी.

शेती, आरोग्य, पर्यावरण परिस्थितिकी, शेतकरी- शेतमजुरांची सुरक्षितता, खाद्यातील जैविक विषसंचयन हे मुद्दे येत्या काळात अजुन कळीचे होणार आहेत. या अहवालातून समोर आलेल्या निष्कर्षांवरून ते पुन्हा अधोरेखित आणि स्पष्ट झालं आहे.