India

लहानग्याला फरशीचे चटके देणाऱ्याला अटक

राजकीय दबाव वाढताच पोलिसांकडून कारवाई

Credit : अण्णाभाऊ साठे ट्रस्ट

- विनायक होगाडे 

६ वर्षाच्या चिमुकल्या मुलाला मंदिराच्या दानपेटीतून पैसे चोरी केल्याच्या संशयावरून जबर इजा करण्यात आली होती. वर्धा जिल्ह्यातील आर्वी या शहरातील मातंग समाजाच्या आर्यन खडसे या लहान मुलाला मंदिरात गेल्याच्या कारणावरून रखरखत्या उन्हात गरम टाईल्सवर नग्नावस्थेत बसवण्यात आले. आर्यनला पार्श्वभागी भाजल्यामुळे जबर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा प्रकार जातीयवादी मानसिकतेतून घडल्याची भावनासमाजमाध्यमातून व्यक्त होत असून त्याबाबत तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.
 
सविस्तर घटना अशी की, शनिवार दिनांक १५ जून रोजी चिमुकला आर्यन नेहमीप्रमाणे जोगणा माता देवीच्या मंदिर परिसरात खेळत होता. मंदिरातील दान पेटीतील पैसे चोरल्याचा आळ घेत अमोल ढोरे नामक व्यक्तीने नग्न करून तापत्या फरशीवर बसविले. तो रडत होता, जोराने ओरडत होता. तरीही त्याला हलू देण्यात आले नाही. त्याचे हातपाय बांधून त्याला मारहाणही केली गेली. जखमी आर्यन धावत घरी जाऊन आईसमोर ओक्साबोक्सी रडू लागला. आईने वडीलांना संपर्क साधून त्याला रुग्णालयात नेले. याबाबत चिमुकल्याच्या आईवडिलांनी अमोल ढोरे या आरोपीला जाब विचारला असता त्याने चिमुकल्यावर मंदिरात चोरी केल्याचा आळ घेतला आणि शिवीगाळ करून उडवाउडवीची उत्तरेही दिली असे चिमुकल्याच्या आईने सांगितले.
 
आर्यनवर झालेल्या या अमानुष अत्याचाराचा निषेध सर्व स्तरातून होत असून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक समाजिक संघटना कुटुंबियांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत.

यासंदर्भात आम्ही वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते धनराज वंजारी यांच्याशी बातचीत केली. “वंचित बहुजन आघाडीने हे गांभीर्याने घेतलेलं प्रकरण असून मी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून घडलेल्या घटनेबाबत न्याय मिळण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सुरवातीला पोलिसांची भूमिका ही प्रकरण मिटवण्याची होती परंतु वंबआने न्यायाची मागणी लाऊन धरून आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर ताबडतोब गुन्हा नोंद व्हायला हवा असं ठणकाऊन सांगितलं. अन्यथा पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात येईल अशी रोखठोक भूमिका घेतली. कारण एका मातंग समाजाच्या अल्पवयीन मुलाला ज्याप्रकारे त्रास देण्यात आला तर त्याची गंभीर दखल घेऊन न्याय मिळण आम्हाला आवश्यक वाटतं.” असे ते म्हणाले.

 “अमोल ढोरे हा जो आरोपी आहे तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून अशाच प्रकारे लहान मुलांना छळतो. सध्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, ही मागणी लाऊन धरल्यामुळे त्याच्यावर बालअत्याचार प्रतिबंधक आणि अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल केला गेला आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असला तरीही जातीयवादी मानसिकतेतून घडणाऱ्या अशा अन्यायाला वाचा फुटली पाहिजे आणि आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.” असे वर्धा येथील सामाजिक कार्यकर्त्या नूतन माळवी यांनी सांगितले.

“महात्मा गांधीनी सेवाभाव व सर्वसमावेशकतेची पेरणी केलेल्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे घडलेली ही घटना विषण्ण करणारी आहे. या प्रकरणी चौकशी होऊन संबंधितांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे”, अशी मागणी खा. सुप्रिया सुळे यांनी केली आहे. विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनीदेखील आज विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून सरकारने या घटनेबाबत आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा दिली पाहिजे आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, म्हणून प्रयत्न केले पाहिजेत, अशी मागणी केली.

या घटनेबाबत पोलीसांकडून माहिती घेतली असता “आरोपीची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची असून त्याच्यावर बेकायदा दारूविक्रीचे गुन्हे नोंद आहेत. त्या बालकाच्या वडिलांच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता अॅट्रोसिटी अॅक्ट, बालसंरक्षण अधिनियम या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.” अशी माहिती पोलीसांकडून मिळाली.

 

विनायक होगाडे इंडी जर्नलचे प्रशिक्षणार्थी पत्रकार आहेत.