Quick Reads

राजभाषा दिनी बारकुल्या बारकुल्या ष्टो-या

प्रसाद कुमठेकर यांच्या खास उदगिरी बोलीभाषेतल्या ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ ह्या कादंबरीविषयी

Credit : प्रसाद कुमठेकर

दरवर्षी फेब्रुवारीच्या २७ तारखेला मराठी शब्दाला ‘माय’ हे विशेषण जोडत ज्ञानेश्वरांपासून ते कुसुमाग्रज, माधव ज्युलियन अन् सुरेश भटांच्या दोन ओळी स्टेटसला चिटकावून भाषा संवर्धनाच्या प्रयत्नात सामिल होतो. असं आपल्या सगळ्यांना वाटणं चांगलंच आहे. पण वर्षभऱ आपण काय करत असतो. मराठी भाषेची आणि तिला समृद्ध करणाऱ्या बोलीभाषांची आपल्याला आठवण आहे का.

पुण्यामुंबईत, वर्तमानपत्रात, चॅनेलवर, पुस्तकात, काही सिनेमात, भाषणात बोलली जाते, तेवढीच मराठीची व्याप्ती नाही. मराठीला जे काही मिळालयं त्यात ज्ञानोबांपासून तुकोबा, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, एकनाथ, नामदेव, चोखोबा, गोरोबा, सावता, जनाबाई यांच योगदान आहे. त्याचबरोबर शाहीर, पोवाडा, लावणी, जात्यावरल्या ओव्या अन् गावातल्या शिव्या यांचंही महत्त्व आहे. गावखेड्यात जगण्याशी दोनहात करत आयुष्य फकाट करुन कविता, पुस्तकं लिहणा-याबरोबरंच भाषा अशी ओठाशी आणि पोटाशी घेऊन निजलेल्या यंग्राट माणसांनी मराठीवर प्रेम केलयं.  बोलीभाषांनी तिला समृद्ध केलंय.

शहरात शिकायला आलेल्या पोरापोरींनी आपल्या बोलीभाषेचा न्यूनगंड वाटू देऊ नये. उलट मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकणातून, पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या लोकांनी आपल्याच भाषेचा आग्रह लावून धरला पाहिजे. आपली बोलीभाषा, व्यक्त होण्याची पद्धत सोडून पळत्यामागे धावू नये. कोणत्याही भाषेत त्यातल्या बोलीभाषा महत्त्वाच्या असतात. एखादी भाषेतली बोली शुद्ध आणि बाकी अप्रमाण हे वर्गीकरण मुळात पक्षपाती आहे.

बोलीभाषा हे आपलं सांस्कृतिक भांडवल आहे. ते असं टाकून देऊ नये. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे अशी मागणी करताना मराठीच्या अनेक बोली आपण अभिमानाने मिरवायला हव्यात.

बोलीभाषेला उभारी द्यायचं काम अनेकजण वेगवेगळ्या पातळ्यांवर करताहेत. आज मराठी राजभाषादिनानिमित्त प्रसाद कुमठेकर यांच्या मराठवाड्यातील खास उदगिरी बोलीभाषेत लिहलेल्या ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ ह्या कादंबरीविषयी.


बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या

गोष्टी ऐकत आपण मोठं झालो. एक होता राजा. एक होती राणी. अकबर-बिरबल. ईसापनीती. भूतखेत. आणि बरंच काही होतं. इतिहासाच्या पुस्तकात माणसाची गोष्टही होती. या झाल्या गोष्टी. पण गोष्टीबरोबर आपण ष्टोऱ्याही ऐकल्यात. ष्टोरी वेगळी. अन् गोष्ट वेगळी.

लहानपणी आपला एखादा दोस्त व्हिडीयोत पिच्चर पाहून यायचा. मग आपण त्याला विचारायचो. कसा होता पिच्चर. त्यो म्हणायचा, पिच्चर भारी होता पण मी त्यातलं मेन मेन सांगतो तुला. सगळी ष्टोरी सांगितल्यावर तुला पिच्चर बघायला काही मजा येणार नाही. कोण सगळं उघड न करता गुपित लपून ठेवतं कोपऱ्यात ती असती ष्टोरी. किंवा एखादा जवळचा माणूस बोलता बोलता सहज म्हणतो, “थांब अरे खरी ष्टोरी मी तुला सांगतो.” याउलट गोष्टी तर कुणी कुणाला सांगतं. गोष्टींची पुस्तकं असतात. पण ष्टोऱ्यांची पुस्तकं वाचली आहेत का तुम्ही. गोष्टी कधी कधी खोट्या असतात. पण ष्टोऱ्या मात्र अस्सल.

प्रसाद कुमठेकर हा लेखक आपल्याला अशाच बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या आपल्याला सांगत राहतो. हे पुस्तक संपेपर्यंत. ही कांदबरी आहे किंवा नाही. हे पुस्तक आहे किंवा नाही. ते तुम्ही वाचल्यावर ठरवा. पण हे जे काही आहे ते हातात घेतलं की तुम्ही संपूस्तोवर खाली ठेवू शकत नाही. हे वाचून झाल्यानंतर येणारी अस्वस्थता शब्दबद्ध करणं अवघड आहे. आजी अचानक आजारी पडली की म्हणायची, मला कसंतरीच होतंय. आजीला कसंतरी होतंय म्हणजे काय होतंय हे फक्त आजी आणि डॉक्टर दोघांनाच कळायचं. कुमठेकर यांच्या बारकुल्या ष्टोऱ्या वाचून कसंतरी होणं काय असतं याचा अनुभव तुम्हाला येतो.

वाट पाहूनही एसटी वेळवर येईना म्हणून नाईलाजाने शेवटी कदरलेला एखादा माणूस काळीपिवळीच्या अंगाला लोंबकाळतो. अन मग एसटीला, व्यवस्थेला अन शेवटी स्वतःच्या जिंदगीला शिव्या देत राहतो. तिथं त्यालाही असाच एखादा कदरलेला माणूस भेटलेला. दोघांच्या गप्पा रंगल्या. व्यथेच्या. सुखःदुखाच्या. वाऱ्याचा भरारा. तुटलेल्या डांबरी रस्त्यावर हेलकावे खात पोटात खड्डे पाडत जीप अंतर कापतीये. त्यात त्यो माणूस म्हणतो. सगळे पक्कं धरा रे. खाली पडलोत तर हे जीपवाले आपल्याला काहीच देत नसतेत. एसटीवाले म्हणतेन एवढी दम नव्हती का. लोकं म्हणतेन कुठं नांगुर हाणायला जायचं होतं एवढ्या घाईत. पार जीपच्या बोकांडी जाऊन बसले. तवा आपणंच एकमेकांचा आधार झालं पाहिजे. मी या लोखंडी पिंजऱ्य़ाला धरतो. तुम्ही मला धरा. अन् बोनटवर बसलेला पोऱ्या तुम्हाला धरीन. आपण पॅक धरू एकमेकायला. शेवटी स्टॉप येतो. गावच्या वाटेला दोन्ही माणसं आपापल्या मार्गाने निघून जातात. एकमेकांकडे बघत.

बारकुल्या ष्टोऱ्या आपल्याकडे असंच बघत राहतात. तिऱ्हाईत मध्यस्थासारखं. खोलवर. लवट गच भरलेल्या इहरीत दणा दणा आपटून शेंदल्यावर वंजळीत नितळ गारढन पाणी येतं तश्या या आपल्याला मोकळं करतात. त्या जीपवाल्यांच एकमेकांशी नातं नसताना ते एकमेकांना जीव लावतात. घटकाभर का होईना. ह्या ष्टोऱ्याही आपल्याला जवळच्या वाटाव्यात इतक्या त्या नितळ आहेत.

प्रत्येकाच्या अभिव्यक्तीचा आपल्याला नितांत आदर आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने नवमाध्यमाच्या उदयातून प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा, आजूबाजूचं विश्व समजलं आहे हे सांगायचा जो अवकाश निर्माण झाला आहे. मग यातूनच एकीकडे प्रत्येकाला कवी, लेखक किंवा पत्रकार  झाल्याचा आभास निर्माण होण्याची शक्यता कित्येक पटींनी वाढली आहे.

तर दुसरीकडे, “मागच्या दशकात जागतिकीकरण सक्षमपणे मराठी साहित्यात उमटलंच नाही. असंवेदनशील जाणिवांमध्ये मराठी साहित्य अडकून पडलं आहे. त्याचं सोफेस्टिकेशन झालं आहे. आजची तरुणाई वाचत नाही. ती तंत्रज्ञानाच्या आहारी गेलीये.” असं बोलणारा एखादा झापडबंद प्राध्यापकी समिक्षेच्या आहारी गेलेला कोणी मनुष्य तुमच्याकडे आला तर त्याला हे पुस्तक वाचायला सांगा.

या पुस्तकाने सगळं प्रेमाने अन शिस्तीत मोडायला घेतलयं. पहिल्यांदा भाषा. थेट उदगिरी. भाषा ही प्रमाण, अप्रमाण, शुद्ध आणि अशुद्ध कशाला म्हणायचं ते आम्ही ठरवणार अशी मक्तेदारी मूठभर लोकं धरून बसल्यासारखं होण्याच्या  काळात प्रसाद कुमठेकर उदगिरी भाषेला कवटाळून बसलाय. अख्ख्या कादंबरीत. वानरीन पिल्लाला पोटाशी धरून बसावं तसं.

पण म्हणून एखादी अवघड बोली तुमच्या गळी उतरवली आहे. बळंच. असंही नाही. तुम्हाला अडून आणेल. समजणार नाही. असं अवघड यात काही नाही. आपण मराठी शिकलो. मग झाडाचा बेपारी, आपल्याला शिरखुरमा खाऊ घालणारा एखादा सादेकभाई, हिंदी पिच्चर अन मालिका पाहून म्हाताऱ्या कोताऱ्या बायांसह आपण सगळे हिंदी शिकलोच. पुढची पिढी मोडकी तोडकी का होईन पण इंग्लिश बोलायला लागलीच. काही आपल्यातलेच परकीय भाषाही ही शिकायलेत. तर ही उदगीरी भाषाही तुम्हाला आपली वाटेल. सुरवातीला थोडी ह्या बोलीची वैशिष्ट्ये अन शेवटी बोलीतल्या शब्दांची यादी दिली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी फक्त दर सत्तावीस फेब्रुवारीला जोर धरते. या काळात बोलीभाषा वाचवण्याचा ती टिकवण्याचा, संवर्धन करण्याचा महत्त्वाचा आग्रही प्रयोग माझ्या मर्यादित वाचनात मी पहिल्यांदाच पाहीलोय. आपल्या बोलीचा कोणी न्यूनगंड बाळगू नयेच उलट अभिमान बाळगावा हे नव्या पिढीत मुरायला असे प्रयोग जाणीवपूर्वक व्हायला हवेत. मूळता कंटेट कामाचा असेल तर तुम्ही इस्राईलमध्ये बसून हिब्रू भाषेत लिहणारे युवाल नोव्ह हरारी असलात तरी तुमचं लिहलेलं इंग्लिशसह जगातल्या प्रमुख भाषेत अनुवादित होऊ शकतं.

असो तर दुसरा मुद्दा असा की या लेखकाने कादंबरीचे सगळे प्रस्थापित एका चौकटीतले फॉर्म मोडीत काढलेत. ही कादंबरी बारकुल्या ष्टोऱ्यांमध्ये विभागलेली आहे. त्यातले निवेदन कर्ते पुरूष आहेत. वेगवेगळे. ते बदलतात. अचानक. सुरवातीला थोडं गरबडल्यासारखं होतं. पण नंतर हीच वेगळ्या प्रकारची बदलती निवेदनशैली तुम्हाला सवयीची होत जाते. अन हे सगळं तुमचं-आमचं वाटायला लागतं.

कांदबरीत अनेक माणसंयेत. वेगवेगळ्या वयाची. छटाची. सहज कुणाला गावाची आठवण यायली असं म्हणलं का लोकं विचारतेत मंग शहरात कशाला आलास. कच्च्या बच्च्या शिक्षणाने बोळवण होऊन फाटक्या खिशाने पुण्यातल्या एफसीरोडवर गोऱ्या गोमट्या पोरी पाहून मग मन  बावचाळल्यावानी झालेली, मेसचं खाऊन खंग्री झालेली अन् ठाव ठिकाणा शोधत इतं-तिथं मरमर करणारी पोरं आहेत या पुस्तकात. गावाकडंच्या घरातलं स्त्रीसबलीकरण कांद्यापोह्याच्या प्लेटातंच अडकलंय म्हणून बेजार होणारा पुरूषही यात आहे.

देअर आर नो बॅड स्टुडंट बट ओन्ली बॅड टीचर असं कराटे किड पिच्चरमधलं वाक्य पुन्हा आठवावं, शिक्षणव्यवस्थेला आपण पुन्हा प्रश्न विचारावेत अशी शाळकरी पोरं या ष्टोऱ्यात आहेत. नोकरी एक नोकरी न करता गावाकडे स्टार्टअप उभारायला झटणारी, वास्तवाने बेजारलेली नान्या अन् सुश्या बेरोजगारीच्या प्रश्नाला अन समाजव्यवस्थेच्या  ढुंगणानाला चिमटा घेतेत. यात बापाच्या हो ला हो म्हणणारे लेकं आहेत. तर बापाला प्रश्न विचारून बापाशी विद्रोह करणारे पोरंही आहेत. फसव्या जातीअभिमानाच्या चौकटीत अडकलेल्या खोट्या अस्मिता, एकत्र कुटूंब व्यवस्थेच्या, गावगाड्याच्या निव्वळ नॉस्टेलिजिक आठवणी यात नाहीत. तर शहर जवळ करताना येणारी अपरिहार्यता त्यातून आलेलं तुटणं जुळणं, आणि गावात जे भंपक वाटतयं त्याला प्रश्न विचारणं असं दोन्हीही यात आहेय. नोकरी करून झुरायंच का शेती करून मरायचं हा अंगावर येणारा येड्या काटेरी बाभळीचा प्रश्नही आहे. यात ती आहे. त्याला कधीच न भेटलेली. अनेकींच्या लग्नात मुबारक मुबारक गाण्याच्या तालावर बुंदी वाढणारा तो आहे.

भूत, वर्तमान अन् भविष्यकाळ या व्यतिरिक्ततही माणसाच्या आयुष्यात काळ असतात हे या ष्टोऱ्या वाचल्यावर कळतं. मराठीबरोबरंच आजची पोरंपोरी फारुकी, मुराकामी, एटगर कॅरेट वाचतेत. फ्रान्झ काफ्का अन दोस्तोस्की वाचतेत. टीव्हीवर रविशकुमार पाहतेत. गणेश देवी या बोलीभाषेच्या संवर्धनासाठी अवघं आयुष्य वेचलेल्या भाषातज्ञाची पुस्तकंही उगाळून पेतेत, हे कुमठेकरांना कळलयं. यातंच बारकुल्या ष्टोऱ्यांच वेगळेपण आहे. मराठीत असं काही होतयं हे भारीये. जागतिकीकरण उशाला घेऊन जन्मलेल्या आमच्या नव्या पिढीचं जुन्या पिढीशी अंतर वाढण्याऐवजी दोन पिढ्यांना एकत्र आणण्याचा लेखकाचा प्रयत्न नेमका साधला आहे.

आपण ज्याच्यावर उभे आहोत त्याकडे तिरकसपणे बघायची इष्टाईल ही प्रत्येक ष्टोरीत अन एकूणंच अख्ख्या कांदबरीत कायम आहे.

नातेवाईकातलं एक म्हातारं. रिटार्यड झालेलं. त्याला विचारलेलं एकदा. बाबा, तुम्ही लई हूशार असतान त्यामुळं तुम्हाला शिक्षकाची नोकरी लागली असंन. तेव्हा ते म्हणलेलं. भावश्या, तवा माळावरल्या दगडाला बी तू मास्तर ह्योय म्हणलं असतं तर त्यो झाला असता. मायच्यान, खरं सांगायंच म्हंजी मी मास्तर होतो यात माझी काही हूशारी नव्हती. पगाराशी इमान राखलं. दररोज शाळेत जायचो. पोरं पासं होत गेले. मोठं झाल्यावरही मला मास्तर म्हणत राहिले. तसा तर ईमानदारीनं सांगायचं तर मी मास्तर कधीच नव्हतो. इतकं प्रामाणिक नितळ म्हातारं मला पुन्हा कधीच भेटलं नाही. तुम्हालाही भेटले असतेन असे माणसं. कधीतरी. जे उगाच इमानदार होते. व्यवस्थेकडे, स्वतःकडे बघण्याचा तिरकसपणा त्यांच्यात होता आहे. अशा नितळ व्यक्ती, घटना अन् प्रसंगांना तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्ही बारकुल्या ष्टोऱ्या वाचायला पायजेल.

प्रसाद कुमठेकर यांची ही कादंबरी वाचल्यावर तुम्हालाही वाटत राहतं की ह्या गोष्टी आपुनबी जगलोत. आपलंही काहीतरी तुटत गेलं. वाहवत गेलं. जे परत कधी मिळालं नाही. आपल्या लहानपणी कोणाचा तरी नोकियाचा जुनाट फोन आपल्या हातात आला. त्यातला अळीचा गेम खेळत आपण मोठे झालो. अळी जेवढी मोठी झालीये तितकं तिला वळणं आणि भिंतीच्या कोपऱ्याला धडकू न देणं हे अवघड होतं. ती अळी मरू नये अशी हुरहूर वाटायची.  तो गेम संपू नये असं वाटत राहायचं. एखादी कविता किंवा धडा असायचा मराठीच्या पुस्तकात. दमडी, पाखऱ्या किंवा शंकर पाटलांच दावं किंवा गोनी दांडेकरांची शितू. गोदावरी परूळेकर यांचा पाड्यावरचा चहा. त्यो धडा आपुन कित्येकदा वाचला. हा धडा ज्या मूळ पुस्तकात असेल अशी सगळी पुस्तकं आपण विकत घेऊन वाचू असं आपण सगळ्यांनी ठरवलेलं. पण धडा संपल्यावर झालेली ती हूरहूर आपल्याला बारकुल्या ष्टोऱ्या वाचून हे पुस्तक संपताना होते.

तर बारकुल्या ष्टोऱ्या काय आहेत. याचं उत्तर, एका वाक्यात उत्तरे द्या, शास्त्रीय कारणे द्या किंवा रिकाम्या जागा भरा असं देता येत नाही. अमुक लेखकाची तमुक कादंबरी मानवी जीवनाचे बदलते कंगोरे एका वेगळ्या प्रतलावर नेऊन बदलत्या काळातला संघर्षमय प्रवास व नात्यांची घुसमट अधोरेखित करते किंवा पद्यप्राय तपशीलाला गद्यात बसवतील असे प्रचंड ताण, अध्यात्माची प्रचंड बेहोशी ही लेखकाची वैशिष्ट्ये आहेत. अशा भाषेत या पुस्तकाची समिक्षा तर सोडा प्रतिक्रियापण देणं अशक्य आहे, हे तुम्हालाही जाणवेल.

ह्या पुस्तकाला मनोगत आहे तेही बारकुलं. लेखकाला कंटाळा येतो लांबडं लिहण्याचा.अनुक्रमणिका नाही यात अशी तक्रार तुम्ही आधी कराल. पाहिजे ती ष्टोरी आपल्याला वाचता आली असती पान नंबर पाहून असं वाटेल. पण तेही तितकंस गरजेचं नाही हे तुम्हाला शेवटी पटेल. यात काय आहे हे खरंच आपण एकमेकांना सांगून ष्टोऱ्या उघड्या पाडायच्या नाहीत. म्हणून मी यातलं काहीच लिहलो नाही. पण माझ्या मनातल्या दोनचार ष्टोऱ्या सांगायचा चान्स हाणून घेटला.

मोह आवरायचा नसतोस. म्हणून या कांदबरीतली ही वाक्ये. “गणू माय हाय रं ही आपली. टेक खाली काई हुईना. अरे राज्या आपल्या समंद्यांचीच माती व्हनाराय एक दिस. तिची सवं ठेव. असं तिला आंतर दिऊनक बाबा.”

“तसं लय नुस्कान नाही झालं. सरकारी बिल हाय आज ना उद्या. इलंच. अन आलं का आधी सुश्याचा गहाण पडलेला तुकडा काढू... धंदा म्हणलं कि होतंच आस्तंय असं.”

“न्यान्याचं एका बोटानं डब्बीतला चुन्ना काढून तंबाखूला लावणं चाल्ल होतं. अन् मला वाटलालंत या चुन्याइतक्याच पांडऱ्या शीपट दिलाचा हाय आमचा हा दोस्त.”

तर व्हिडीयोच्या टाकीत आपुन बघितलेल्या मिथूनच्या कराटे फायटिंगची शपथ घेऊन सांगायलो ह्या बारकुल्या ष्टोऱ्या तुम्ही वाचल्याच पायजेत.


कादंबरीः बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या.

लेखकः प्रसाद कुमठेकर

प्रकाशकः पार पब्लिकेशनस्

किंमतः १८० रुपये

पुस्तक बुकगंगावर खरेदी करण्यासाठी क्लिक करा