Quick Reads

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं: होमी भाभा

याला भारताचा अप्पेनहायमर म्हणतात!

Credit : The Print

अल्बर्टची स्पेशल थेअरी ऑफ रिलेटिव्हीटी धुमाकुळ घालत होती आणि चारच वर्षांनी इकडं भारतात माझ्या पाचव्या अफेयरने जन्म घेतला होता. लोक त्याला 'भारतीय ओप्पेनहायमर' म्हणत होते. माझ्याच दुसऱ्या आयटमच्या नावानं त्याचं बारसं ही घातलं, पण कधी? ज्यावेळेस तो 'भारतीय न्युक्लीअर सायन्सचा बाप' झाला त्यावेळी. तिथंपर्यंत जाण्याचा प्रवास कुणालाही सहज वाटावा असा पण चालणाऱ्यालाच कळावा किती अवघड, असाच होता. आणि असा हा अस्सल भारतीय मातीत भारताच्या न्युक्लिअर सायन्सचा बापमाणुस माझ्या नजरेतुन सुटुच कसा शकतो?

अगदी शाळेपासुनचा क्रश हा माझा. म्हणजे मामाची किंवा आत्याची मुलगा मुलगी कसं फिक्स असतं आपल्या चिडवण्याच्या यादीत तसा हा भारतीय हिरो आधीपासुनच लिस्टमध्ये होता. शाळेत विज्ञान दिनाला हमखास भाषणातुन हा भेटायचाच. आणि मग शाळेतली प्रेमकहानी फुलतच चालली. वय अल्लड असलं तरी प्रेम बिलकुलच अल्लड नव्हतं. रोज नव्याने शाळेच्या त्या छोट्याशा लायब्ररीत भेटण्याची,घराच्या गच्चीवर भेटण्याची मजा पण काही औरच असते नाही? टिपीकल शाळेतली प्रेमकहानी जशी असावी अगदी तशीच माझीही होती.

३० ऑकटोबर १९०९ लाच एका श्रीमंत, फक्त पैशानेच नाही तर शिक्षणाची परंपरा असणाऱ्या पारसी कुटुंबात झाला. होमुच्या कुटुंबात शिक्षणक्षेत्रात शिकण्याची आणि सेवेची दीर्घ परंपरा होती. त्यांचे आजोबा म्हैसूर राज्यात शिक्षण महाविद्यालयाचे महापौर होते. त्याचे वडीलही जहांगीर होरमुस्जी भाभा ऑक्सफर्डमध्ये शिकलेले, पेशानं वकिल होते आणि आई मेहेरन.

आम्ही भेटलो ते शाळेतच. मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कोंन स्कूलमध्ये होता तो. वर्गात हमखास एखादा हुश्शार पोरगा असतोच असतो ज्याच्यामुळं आपल्याला आपल्या पालकांकडुन शिव्या बसत असतात अभ्यास करत नाही म्हणून. १५व्या वर्षी कुणी वरिष्ठ केंब्रिज परीक्षा पास होतं का? हा झाला. खडुस होम्या कुठला!  बरं झाला तो झाला. आधी मुंबईतील एलफिन्स्टन कॉलेज आणि नंतर रॉयल इंस्टिट्यूट ऑफ़ सायन्स ला गेला. लगेचच साहेब १९२७ ला कॅंब्रिजमधील गोंव्हविले आणि कैयस महाविद्यालयात गेले. होय तिथंच जिथं यांचे काका दोराब जे. टाटा यांनी १९२० साली शिक्षण घेतलेलं. मला सोडुन. माझ्यापासुन दुर. म्हटलं होतं ना की एकदम टिपिकल लव्हस्टोरी म्हणून? शाळा संपली की शाळेतली प्रेमपाखरं दुर निघुनच जातात. हाही गेला.

पण म्हणून काय प्रेम कमी होईल? ना जी ना. हा खडुस. हो हेच नाव ठेवलेलं मी याचं. त्याने १९३० मध्ये मेकॅनिकल सायन्सेस ट्रिपो शिकत होता. त्याचं झालं असं होतं की कितीही शिकले तरी त्याचे वडील हे भारतीय पालक होते ना, तुमच्या माझ्या पालकांसारखे. डॉक्टर हो नायतर इंजीनियर हो. च्यायला, काय किरकिरी असते राव. आमचे फादर पण बसलेच होते हो इंजिनियर हो म्हणून. पण आपण नाय ऐकलो ब्वा त्यांचं. पण आमचा हुश्शार होम्या, पप्पा सांगतेत, काका सांगतेत म्हणलं की झाला तयार. त्यांच्या पप्पांचं पण इतर भारतीय पप्पांसारखं सेमच होतं. हाय काकाचा कारखाना, हो इंजिनियर. टाकु चिटकवुन तुला तिथंच. लाइफ सेटल ना मग. काका म्हणजे आपले दोराब टाटा त्यांच्याबद्दलच सांगत होते. हा होय म्हणला. गेला केंब्रिजला. जमशेदपूर येथे टाटा आयर्न आणि स्टील कंपनीत कामाला लावतो म्हाणलेत तर ठिकै म्हणला. पण तिकडं गेल्यावर त्याला कळलं की आपलं क्रशच आपलं खरखुरं प्रेमै. म्हणजे मी तर आहेच वो पण आमचं फिजिक्स पण हैच कि. मग काय केंब्रिजमध्ये भाभाच्या आवडी हळूहळू सैद्धांतिक भौतिकशास्त्राकडे वळल्या. आणि राडा तर होणारच. घरी सांगुन टाकलां प्रेमाबद्दल. एक पत्र मला पाठवताना घरी पण पाठवलं, "हे बघा पप्पा,आपल्याला हे मेकॕनिकल इंजिनियर बियर जास्त नै आवडत...आपल्याला फिजिक्सच पायजे..."

पप्पा आमच्या पप्पासारखंच. म्हणले आधी चांगल्या मार्कानं डिग्री ऑल क्लिअर हो. बॅक नाय ठेवायचा, तरच फिजिक्सकडं जायचं. ती मेकॕनिकलची ट्रायपॉस परिक्षा पास हो. झाला ना गडी. आता फिजिक्स पायजे म्हणल्यावर एवढं तर करावंच लागतंय. केलं ना. १९३२ ला डिग्री पुर्ण केलीच. मग झालं सुरु आमचं फिजिक्स प्रेम. केंब्रिज विद्यापीठात संशोधन सुरुच केलं लगेच. १९३४ मध्ये Cosmic Ray Shower बद्दल पहिला पेपर पब्लिश झाला. त्यानंतरही scattering, electric exchange बद्दल त्याचे उद्योग सुरुच होते.  याचा परिणाम असला भारी झाला की आख्खी दुनिया आश्चर्यचकित झाली. एवढी, की ३१ व्या वर्षीच ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे सहकारी म्हणून निवडून आले. पॉली, डिराकसोबत गणिताचा अभ्यास केला. कॉकक्रॉफ्ट, पॉली सोबत काम करुन, मेहनत करुन नंतर ते नोबेल विजेते झाले. एवढं सगळं करुन दमला ना बिचारा. खरंतर कामाला कंटाळला नाही तो पण माझ्या मोठमोठया पत्रांना वैतागला असणारे, ये बाई भेटुन बोल काय बोलायचं ते पण तुझी पत्रं आवर म्हणला असणारैआणि आला की भारतात.

१९३९ ला आला तो सुट्टीला भारतात आला. तो एक लहान सुट्टीसाठी आलेला. पण दुसरं महायुद्ध संपल्याचा काळ होता हा. त्यानं परत जाण्याचा प्लॕन बदलला.  इंग्लंडमधील बहुतेक शास्त्रज्ञांना युद्ध कामांमध्ये भाग घ्यावा लागला आणि मूलभूत संशोधन करण्याच्या संधी कमी झाल्या. त्यामुळे भाभा यांना केंब्रिजमध्ये संशोधन सुरू करण्यासाठी इंग्लंडला परत जाण्याचा प्लॕनच सोडुन दिला. १९४० मध्ये भाभा बेंगलुरू येथे भारतीय विज्ञान संस्थान येथे काम करु लागला. मी तर असली खुश झाले की बास. देवदास परत आल्यावर पारो पण इतकी खुश झाली नसेल. खडुस असला तरी जीव जडलाय ना त्याच्यावर. प्रेमात माणुस असंच वागतो. तो बेंगलोरला होता. Indian Institute Of Science मध्ये चंद्रशेखर वेंकट रमन  संस्थेचे संचालक होते. भाभा यांना १९४४ मध्ये प्राध्यापक बनवलं. भाभा तेथे असताना विक्रम साराभाई पण काही काळ तिथंच होते . भारतीय विज्ञान संस्था होम्यानं cosmic rays संशोधनाचे मार्गदर्शन केले. भारतात काही वर्षे घालवल्यानंतर भाभाला इंग्लंडला परत जाण्यात रस नव्हता. कदाचित हे त्याला कळलं होतं कि आता भारतात त्याची जबाबदारी वाढतेय. हळूहळू त्याला खात्री पटली की वैज्ञानिक ज्ञानांच्या सीमेवर संशोधन गट उभारणे ही त्याचं कर्तव्यच होतं. २० एप्रिल १९४४ रोजी भाभानं सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांना लिहिलेल्या एका पत्रात असे लिहिले होते: "आपल्याला संशोधन शाळेची गरज आहे..."

कारण सोप्पं. १९४० च्या दशकाच्या सुरुवातीला भाभा भारतीय विज्ञान संस्थान येथे काम करीत होते, त्यावेळी देशात असे कोणतेही संस्थान नव्हते ज्यात  quantum physics, cosmology आणि भौतिकशास्त्रातील इतर मूलभूत कार्यासाठी आवश्यक सुविधा होत्या. यामुळे त्यांनी मार्च १९४४ मध्ये सर दोराब जे. टाटा ट्रस्टला "Basic physics school" स्थापन करण्यास प्रस्ताव पाठवला. त्यांच्या प्रस्तावामध्ये त्यांनी लिहिले: "भारतामध्ये या क्षणी theoretical आणि practical, दोन्ही भौतिकशास्त्रातील मूलभूत समस्यांमधील संशोधनाची कोणतीही मोठी शाळा नाही. त्यामुळं संपूर्ण भारतातील सक्षम कामगार योग्य काम करु शकत नाहीत. आज भारतात केले जाणारे बहुतेक संशोधन निराशाजनक किंवा अत्यंत निपुण दर्जाचे असेल तर पुरेसे उत्कृष्ट संशोधन कार्यकर्ते नसल्यामुळेच. त्यासाठी आपण योग्य लोकं, योग्य जागा आणि योग्य काम एकत्रितपणे करण्यासाठी संस्था उभारु. ते चांगल्या संशोधनाचे मानक ठरवतील आणि तेच लिडरही असतील. तसंच आतापासून दोन दशकात वीज निर्मितीसाठी परमाणु ऊर्जा यशस्वीरित्या वापरता येईल. भारताला तज्ञांकरिता परदेशात पाहण्याची गरज पडणार नाही. आपणच तयार करुत. हीच है की नै खरी make in India?  किती दुरदृष्टी बघा राव होमुची.

आता प्रस्ताव तर आधी दोराबकाकांना पाठवलेला. काका मान्यता तर देणारच. आर्थिक जबाबदारी तर संपली. जागा पण ठरली. मुंबई! आणि अशाप्रकारे टाटा इंस्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे (TIFR) उद्घाटन १९४५ साली भाड्याने घेतलेल्या जागेत, ५४० स्क्वेअर मीटरमध्ये करण्यात आले. औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) आणि नैसर्गिक संशोधन आणि वैज्ञानिक मंत्रालयाच्या माध्यमाने संस्थानला त्याच्या दुसर्या वर्षापासून भारत सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळायला सुरुवातही झाली. संशोधन आज संस्थेसाठी मुख्य आर्थिक सहाय्य परमाणु ऊर्जा विभागाद्वारे भारत सरकारकडून येते. टीआयएफआरसाठी भविष्यातील विकासासाठी कोणतेही संस्थात्मक चार्ट तयार केलेले नाही यावर जोर दिला पाहिजे. भाभांनी सर्वप्रथम योग्य प्रकारचे लोक निवडले आणि नंतर त्यांना वाढण्याची संधी दिली.

जर्मनीचे मॅक्स प्लॅंक इन्स्टिट्यूट तयार करताना कॅसर विल्हेल्म सोसायटीची पद्धत स्वीकारली, वापरली, ती पद्धत म्हणजे आणि योग्य व्यक्तींची निवड आणि नंतर इमारत बांधणी, बाह्य दिखाव्या पेक्षा गुणवत्तेला प्राधान्य देणं म्हणातात याला. या संदर्भात भाभा ऑक्टोबर १९६३ मध्ये भारतीय राष्ट्रीय विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक बैठकीमध्ये म्हणाले होते की: "मला असे वाटते की आम्ही भारतातील शासकीय आदेश किंवा आदेशानुसार चांगल्या वैज्ञानिक संस्था स्थापन करू शकतो असा विश्वास योग्य आहे. एक वैज्ञानिक संस्था, ते प्रयोगशाळेत किंवा अकादमी असो, वृक्षाप्रमाणे काळजीपूर्वक वाढली पाहिजे. गुणवत्ता आणि उपलब्धतेच्या बाबतीत त्याचा विकास केवळ मर्यादित प्रमाणात वाढू शकतो पण  हे असे क्षेत्र आहे ज्यात मोठ्या संख्येने मध्यम किंवा द्वितीय श्रेणीचे कर्मचारी काही उत्कृष्ट व्यक्तींसाठी तयार होऊ शकत नाहीत तर काही उत्कृष्ट लोकंच वाढतात. फक्त लागणारा कालावधी किमान १०-१५ वर्षे असतो. आता अनेक राष्ट्रीय प्रयोगशाळा स्थापन केल्या आहेत ज्यांना या क्षेत्रात काम करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी संस्थात्मक चार्टमधील पोस्ट जाहिरातीद्वारे भरल्या जाऊ शकतात, योग्य आणि उच्च पातळीवरील कामगार भारतातच तयार केले जातील."

एवढं करुन होमी शांत नव्हताच मुळी. अणुऊर्जा भारतातच तयार केली जाऊ शकते आणि त्यासाठी युरेनियमच वापरावं असं काही नाही. पर्याय म्हणून होमुनं थोरिअमचा वापर दिला जगाला. महान शास्त्रज्ञ तर होताच होता पण कलेचा उत्तम भोक्ताही होता. गाणी नृत्य त्याला आवडायचे, चित्रं आवडायची. ऑलराऊंडर होता तो!

"मला माझ्या आयुष्यापासून काय हवे आहे ते मला स्पष्टपणे माहित आहे. मला जगण्याची चेतना आवडते आणि मला जितके मिळते तितके पाहिजे.मी मिळवेन!"

पण एखाद्याचे आयुष्य मर्यादित आहे. मृत्यूनंतर काय होतं हे कोणालाच ठाऊक नाही. मलाही काळजी नाही. म्हणूनच, मी आयुष्य वाढवून आयुष्याची लांबी वाढवू शकत नाही, मी जगण्याची तीव्रता वाढवेन, कला, संगीत, कविता आणि इतर सर्व काही मी करतो ते यामागे एकच उद्देश आहे..जगण्याची तीव्रता वाढवणं."

जगण्याची ही अशी अचाट आसक्ती मलाही आवडते म्हणूनच माझं होमुशी जुळलं. पण असा हा अवलीया माणुस मात्र लवकर गेला. अवघ्या ५६ व्या वर्षी switzerland च्या विमान क्रैशमध्ये गेला तो. भारताचा ओपेनहायमर! होमी, तु आजही भारताला खुप काही देतोयस. प्रेरणा आणि जगण्याची आसक्ती आणि सर्वात महत्त्वाचं, ध्येय!

सलाम!

पुढचा आठवडा, पुढचं अफेयर!