Quick Reads

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं: मारिया गोपर्ट

माझं ‘लेस्बो’ प्रकरण

Credit : Nobel Prize

मारिया, मारिया...ओ मेरी मारिया..!!

ती दिसली कि हे गाणं ओठावर येणार म्हणजे येणारच. खरंतर ती माझ्यापेक्षा वयाने १०३ वर्षांनी मोठीय. मारिया गोपर्ट. जेव्हा अल्बर्टची स्पेशल थेअरी आली तेव्हा माझं स्पेशल अफेयर जन्मलंही नव्हतं. एक वर्षानं म्हणजे  २८ जून १९०६ रोजी पोलंड मध्ये जन्मलेली ही ग्गोड कार्टी काळजात घुसेल हे कुणाला माहित होतं? तिचे वडील गौटिंगेन विद्यापीठात बालरोगचिकित्सेचे प्राध्यापक होते. तिथंच हॉरे टेक्निकिसमध्ये आम्ही शिकत होतो. खरंतर ती मुलींची शाळा असल्यानं फारसं काही वाटत नव्हतं. तेव्हा नेमकंच धोक्याचं सोळावं वरीस संपलेलं आणि गणित नावाचा राक्षस बोकांडी बसला.

आधीच शिकवायला असणाऱ्या शिक्षकांची कमतरता होती आणि शिक्षण घेणारेही फक्त डिग्रीसाठीच शिकत होते. म्हणतात ना,आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. खरंच होतं हे. यामुळं झालं असं कि आम्ही गणिताला बाय बाय केलं अन फिजिक्सच्या प्रेमात आपटलो. एकसाथच! साला काय करायचं ते यातच. मास्टर्स तर झालेलंच. आता पीएचडी करायची. त्यात आमच्या महाराणीचा विषय काय तर न्यूक्लियर फिजिक्स.

तिनं सांगितलेली फोटॉन अब्झॉर्पशन थियरी तर फारच सोपी आणि सरळ होती. एवढी कि युजीन वियनरनेही कौतुक केलं पण अजून प्रयोगानं हे सिद्ध व्हायचं होतं. तोवर किती ती धाकधूक आमच्या बाल्य जीवाला. प्रत्येक क्षणी टेंशनच. शेवटी एकदाचा निर्णय घेतलाच की कितीही अशक्य वाटो, प्रयोग करायचाच. १९६१ मध्ये पहिला प्रयोग केला. यश तर मिळणारच अशी खात्री होती. किती दिवसांची मेहनत होती ती. दिवस रात्र मेहनत करत होती माझी बाय ती. आणि तिची बेस्ट फ्रेंड म्हणून मलाही थांबावंच लागत होतं लॅबमध्ये. पण याचाही फायदाच झाला. हिच्यासोबतच न्युक्लियर फिजिक्सवरही जीव जडला.

सगळं अगदी मस्त मजेत चाललेलं ना? पण हाय रे मेरी किस्मत फुटी...आमच्या सोबतच असणाऱ्या त्या कार्ट्या जोसेफनं माझी बेस्टेस्ट दोस्त पळवली ना! तो केमिस्ट्रीवाला, ही फिजिक्सवाली. कसं जमावं गणित याचं? पण जमलंच ना यांचं. असला राग आलेला तेव्हा याचा कि बस्स... जीवच घेतला असता पण मेरी मारिया मारिया खुश होती ना. मग काय सोडावं लागलं.

एकटी कंगनाच नेपोटीझमच्या विरोधात नाहिये राव. अख्खं मारीयाचं जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ वंशपरंपरेचा विरोध करत होतं आणि फक्त एवढ्या कारणासाठी ती तिथली फॕकल्टी मेंबर नाही होऊ शकली कारण तिचा नवरा तिथला फॕकल्टी मेंबर होता. तिथंच तिला क्लार्कसारखं काम देऊन पगारही कमी दिला. एवढ्यावरच हा अन्याय संपत नाही तर तिला नंतरही कामं मिळाली नाहीत. काही ठिकाणी तर पगार पण नाही दिला वर तिला टिपिकल 'बायकी' कामं दिली.एकट्या शिकागोनं तिला जरा सिरियसली घेतलं.त्यातच तिच्या नवऱ्याला कामावरुन काढलं. भलेही मला आधी नव्हताच आवडला जोसेफ तरी ती खुश असायची त्याच्यासोबत. तोही जीव तोडून शिकवत होता. काम करत होता. अशातच मारियाला मॅनहॅटन हा अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट मिळाला. ओप्पुसोबतचं (ओपेनहायमर) काम.

या दरम्यान जोसेफ युद्धात भाग घेऊन परत आला. तिथंच शिकागोला शिकवायला लागला आणि मेरी मारिया फिजिक्स शिकवू लागली लगेचंच. ती थोडंफार शास्त्रज्ञ म्हणूनही काम करत होती. तिथं तिनं फार छान काम केलं. फर्मीसोबत न्युक्लियरवर काम केलं. अणुंच्या केंद्रकावरती. महिला शास्त्रज्ञांमध्ये मेरी क्युरीनंतर नोबेल मिळवणारी माझी राणी होती ती. हा अभिमानय तिच्याबद्दलचा. दरम्यान ती प्रोफेसर म्हणून नोकरीत कायम झालेली. पण जशी ती कॅलिफोर्नियाला पोहचली तसं तिला झटका आला. त्यानंतरही ती काम करतच होती. २० फेब्रुवारी १९७५ रोजी गेली ती आणि त्याच तारखेला फक्त १९७२ ऐवजी २०१८ ला मी लग्न केलं, असं वाटतं त्या दिवशी ती त्या हॉलमध्ये कणाकणांचा अभ्यास करत असावी.

मारिया मारिया...ओ मेरी मारिया!

तू खुप सुंदर होतीस…जगानं या प्रेमाला काहीही म्हणू दे.. कुणी याला लेस्बोचाळे असंही म्हणेल पण मला मात्र हे प्रेम खूप आवडलंय. आवडतं!

बस इतनी सी थी ये कहानी.

अगले हफ्ते नई होगी कोई!