Quick Reads

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं: ओपेनहायमर

अलबर्ट कॉलेजचा क्रश होता, मात्र ओपेनहायमर 'मॅच्युर' प्रेम

Credit : थॉटको

फारच उशीर झालेला त्या दिवशी. C++ चा क्लासच उशीरा सुटला. गडबडीनं दोन घास खाऊन कॉलेजला पळाले. भयंकर टेंशन आलेलं, कारण पहिलाच तास गावंडे मॅडमचा. त्यांना उशीरा आलेलं आवडायचं नाही आणि मला त्यांची एकही लाईन मिस करायला आवडायची नाही आणि मूळातच न्युक्लिअर फिजिक्ससारखा इंटरेस्टींग टॉपिक शिकवायच्या त्या.

तर त्या दिवशी नाही म्हणता मला जरा उशीरच झाला. अपराधी होऊन दारात उभी. मॅडमनी नजरेनंच एन्ट्री दिली. मॅडम मोठ्या तल्लीनतेनं अणुबाँबची कहाणी सांगत होत्या. मीही रमले त्यात. मॅडम कहाणी सांगताना सतत एका कोपऱ्यात बघत होत्या. सहाजिकच माझंही लक्ष तिकडं गेलं आणि बघतच राहिले. डोक्यावर हैट, भारीतला कोट आणि चेहऱ्यावर रुबाब असणारा, देखणा, डिसेंट, तो, तिथं होता. आधीही पाहिलेलं, पण आज जरा वेगळाच दिसत होता. जास्त ओळख नव्हतीच तशी. आम्ही पण मागे वळून त्याच्याकडे बघतोय म्हणल्यावर मॅडमनी त्याची जरा डिटेलच ओळख करून दिली. तो देखणाआहेच पण किती हुशार आहे हे सांगताना मी मॅडमचा शब्द न् शब्द कानात साठवत होते. अर्थात त्याच्याकडे बघतच ऐकत होते. क्लास सुटला, कहाणी संपली, तरी मी त्याच्याकडेच बघत होते. जाता जाता मॅडमनी चिमटा काढलाच,

"प्रियु,प्रेमात पडशील त्याच्या एक दिवस जर असंच बघत राहिलीस तर."

पडशील कसली? आपटलेच होते. त्या चिमट्यासरशी लाजुन चूर झाले होते. सगळा वर्ग हसत होता आणि मी मात्र डोळ्यांच्या कोनातून तो हसतोय का बघत होते. आणि नेमकं त्यानं हेच हेरलं असावं. माझ्या पोटात गोड गुदगुल्या करणारं आणि अंगभर शहारे आणणारं कातिल हसला होता तो. अजुनही आठवलं की शहारे येतात. माझ्यातला जासुस विजय जागा झाला आणि मी याची पुर्ण माहिती काढायचं ठरवलं. शेवटी काही झालं तरी मॅच्युरिटीवालं प्रेम होतं हे!

नाव- जे. रॉबर्ट ओपेनहायमर
जन्म-  २२ एप्रिल १९०४
गाव- न्युयॉर्क( मूळचा जर्मन,अल्बुरखाच)
काम- संशोधक

लहानपणी अतिशय गुणी होता माझा राजा. एका सुट्टीत त्याच्या आजोबांनी दिसेल्या वेगवेगळ्या दगडांपासुनच तो खनिजांच्या प्रेमात पडला. कित्ती आवडी निवडी जुळतात ना आमच्या. याला दगडांचा शौक आणि मला 'खड्यांचा'. आणखीही बऱ्याच गोष्टी जुळतात आमच्या. त्यालाही कुणाच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला आवडत नव्हती आणि  कुणी त्याच्या आयुष्यात केलेलेही चालायची नाही. आपण आपल्या मस्तीत.

जशी मी माझ्या 'खड्यांना' प्रेमाची कबुली लगेचच देते तसं हाही बाराव्या वर्षापासुनच भुगर्भशास्त्रज्ञांना पत्रं पाठवायचा. फरक एवढाच की मला शिव्या बसतात आणि त्याला व्याख्यानाची आमंत्रणं यायची. आणखी एक महत्त्वाचं साम्य म्हणजे, केमिस्ट्रीशी केमिस्ट्री जुळवुन घेण्यापेक्षा आणि गणिताचं गणित कळवून घेण्यापेक्षा फिजिक्समध्ये जास्ती रस होता. आढे गुण जुळलेत म्हणल्यावर सुत न जुळलं तरच नवल.

एवढी सगळी माहिती काढुन एके दिवशी प्रपोज केलंच त्याला होकार न देऊन कसं होईल? जुळलं होतं आमचं. एकमेकांकडे बघत न्युक्लीअर फिझन, फ्युजन, न्युक्लीअर पार्टीकल्स, युरेनियमचं फिझन आणि न्युक्लीअर बाँबची संकल्पना शिकण्यात वर्ष कसं गेलं कळलंच नाही. कधी लायब्ररीत भेटायचो तर कधी कॉलेज गार्डन. कधीकधी तर फ्रेंड्सबरोबरच्या कँटीनमधल्या गप्पांमध्येही हा असायचा. त्यानेही त्याच्या मित्रांशी, हैजनबर्ग, फ्रान्सिस, नील्स बोर सोबत ओळख करून दिली. आमचा छानसा ग्रूपच जमलेला. नील, हैजुला सोबत घेऊन भेटायचो कधी, तर कधी एकेकटेच. गुलाबी, सॉरी सॉरी सायटिंफिक दिवस होते ते.

सगळं काही ठीक ठाक सुरु होतं. जे.जे.थॉम्सनच्या बेरिलियम फिल्म बनवण्याच्या वेळीच तो एका भागात त्याचंही काम करायचा. पण काय बिनसलं काय माहीत, थोडासा विक्षिप्त झाला तो. त्यात M.Sc entrance मुळं मलाही वेळ मिळत नव्हता म्हणावा तसा. नंतर तो बरा झाला आणि त्याचवेळी त्याच्या वाचनात डिरॅकचा quantum theory of radiation हा पेपर आला. तो तिकडं वळला. मी मात्र इकडं आड तिकडं विहीर. ओप्पु quantum कडं वळत होता आणि अल्बुला quantum मान्यच नव्हतं. ओप्पु अल्बुला विक्षिप्त बोलला. खुप वाईट वाटलेलं. क्षणभर वाटलं ब्रेकअपच करावं पण दोघांवरही अफाट प्रेम.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ओप्पुनं ब्लैक होल concept अप्रत्यक्षरित्या मांडली.पण त्याचवेळी किटीशी लग्न केलं. तरीही माझ्या सोबत तो होताच. वैयक्तिक आयुष्य सुरु झालं आणि लेस्ली ग्रोव्हजशी त्याची भेट झाली. अणुबाँबची सुरूवात इथुनच नाही. माझ्या आयुष्यात किटी नावाचा अणुबाँब आणून हा त्या अणुबाँबच्या तयारीला लागला. मॅनहॅटन प्रोजेक्ट सुरु झाला. काही काळ ओप्पु कम्युनिस्ट असल्याच्या शंकेवरून त्याला त्रासही दिला गेला. पण रिचर्ड फायमनची एन्ट्री यात झाली आणि काम फत्ते झालं. इकडं ओप्पु गुप्तपणे मॅनहॅटन पुर्ण करत होता न् तिकडं जर्मनीत हैजुनं तेच काम हिटलरच्या सांगण्यावरून सुरु केलं. यात ओप्पु जिंकला आणि १६ जुलै १९४५ ला पहिली चाचणी झाली. तो स्फोट बघून ओप्पु स्वतःच बोलला,

"मी आज स्वतःच मृत्यू बनलोय."


याचा वापर युद्धात होऊ नये हे मनोमन वाटलं त्याला.त्याने बोलुनही दाखवलं.रोखायचा प्रयत्न केला.पण त्याचं काम झाल्यानं त्यांचं कोण ऐकतंय?
बाकी इतिहास तर माहीतच आहे...यानंतर मात्र तो पुरता हादरला.हिरोशिमा नागासकी नंतर तो मनातुन मेलाच होता. त्यानंतरही बरेचसे research papers केले, कोर्टकचेर्यांना सामोरं गेला अन् घशाच्या कॅन्सरनं त्याला ग्रासलं.

माझा लाडका ओपेनहायमर, १८ फेब्रुवारी १९६७ ला मातीत फ्युज झाला. पण माझ्या प्रेमकहाणीत तर तो आजही जिवंत आहे....चिरंतर असेल. हो हो, तोच आहे हा, मृत्युचा बादशहा. अणुबाँबचा जनक. ज्याचे पडसाद आजही जपानमध्ये दिसून येतात. हा असा विध्वंसक आवडलाय? तर हो, मला आवडलाय. कारण त्यानं जे केलं ते त्याच्या काळाची आणि परिस्थितीची गरज म्हणून, मनावर दगड ठेवून!
पण असो, परत भेटुया, हैजु जानसोबत!