Opinion

फलसफी:आनंदी राहण्यासाठी जग बदलणे आवश्यकच आहे का?

बद्यु, मार्क्स, आनंद आणि क्रांती

Credit : France Culture

आज आपण भांडवली व्यवस्थेच्या अशा अवस्थेत जगत आहोत, जिथं असं सांगितलं जातं की उपलब्ध परिस्थितीशी तडजोड करून ती परिस्थिती मान्य करणं आणि यातच समाधानी असणं याच सोबत अशक्यप्राय गोष्टीची ईच्छा न बाळगणं, विशेषतः राजकीय अशक्यप्राय गोष्टीचा विचार करणं सोडून देणं, हेच शहाणपण आहे. या परिस्थितीत अॅलन बादयु मार्क्सच्या कम्युनिझम या संकल्पनेचा विचार प्रतिपादित करतो. 

१९ व्या आणि २० व्या शतकाचा इतिहास हा जग कसे बदलायचे या प्रश्नाशी संलग्नित राहिला आहे. साहजिकच हा प्रश्न क्रांत्यानी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, इथं क्रांती म्हणजे संपुर्ण मानव समाजाची सर्वप्रकाच्या म्हणजेच अगदी आदिम गुलामगिरी पासून ते साम्राज्यवादी भांडवलशाही पर्यंत च्या सर्वप्रकारच्या अल्पसत्ताक व्यवस्थांपासून संपूर्ण मुक्ती. आणि ही मुक्तीच माणसाच्या खऱ्या आनंदाची पुर्वअट आहे.

'जग कसं बदलायचं?' या प्रश्नात तीन शब्द आहेत, पहिला शब्द 'जग', हे नाम आहे, दुसरा शब्द 'बदलणं' हे क्रियापद, तर तिसरा शब्द 'कसं' क्रियाविशेषण. या पैकी जग हे नाम आपण पाच पद्धतीने विश्लेषित करू शकतो. पहिल्या प्रकारचे जग हे मानसशास्त्रीय जग असते, हे जग व्यक्ती त्याचे मन आणि शरीर या संबंधित जग असते. दुसऱ्या प्रकारचे जग हे समाजशास्त्रीय जग असते, हे जग ठोस अस्मिता आणि बंदीस्त समूहांनी बनलेले असते उदाहरण म्हणजे कुटुंब,धर्म, जात, भाषा, संस्कृती, देश इत्यादी. तिसऱ्या पध्दतीचं जग हे इतिहासाबद्दल भाष्य करतं, हे जग बंदीस्त समूहांनी तयार झालेलं नसतं किंवा इथं ठोस अस्मिता ही कार्यरत नसतात. चौथ्या प्रकारचे जग हे जीवशास्त्रीय व परिस्थितिकी संबंधित जग आहे आणि जगाचा शेवटचा संबंध भौतिकशास्त्र आणि विश्वशास्त्राशी येतो. 

बदलणं या क्रियापदाचा वापर आपण जग या नामाच्या कोणत्या प्रकाराशी करतो यावर ठरते. पहिल्या प्रकारच्या नामात बदल नाममात्र व्यक्तिगत आयुष्यात होईल, व या बदलाचे परिणाम व्यक्तिगत आनंद काय आहे किंवा असावा हे ठरवतील. जग या नामाच्या दुसऱ्या प्रकारात आपणास विभिन्न बदल पहावयास मिळतात उदाहरणार्थ क्रांती, सुधारणा, गृहयुद्ध, नवीन राज्यसंस्थेची स्थापना किंवा भाषेचा अंत इत्यादी. तिसऱ्या पध्दतीमध्ये जग हा इतिहासाचा प्रवाह मानला तर जग दोन विरुद्ध धारणांनाच्या बदलांनी नीहीती दिसेल उदाहरणार्थ: प्रगती, आंतरराष्ट्रीयवाद आणि साम्यवाद विरुद्ध भांडवलशाही हा इतिहासाचा अंत आहे, लोकशाही हे वैश्विक उद्धिष्ट आहे आणि या प्रतिष्टीत नावांमागे दडलेला वस्तुनिष्ठ साम्राज्यवाद आणि व्यक्तिनिष्ठ नीहीलीझम. जग या नामाच्या चौथ्या प्रकारात आपण तापमान वाढ अथवा पर्यावरणाचा प्रश्न या संबधीचे बदल आपणास पहावयास मिळतात. जगाच्या शेवटच्या प्रकारात आपणास फारसा काही बदल करणे शक्य नाही कारण आपण एकूण विश्वाचा खूप छोटा घटक आहोत, फारतर इथे आपण इतकीच आशा करू शकतो की एक दिवस आपणास पर्यायी जीवन किंवा पर्यायी जगाच्या अस्तित्वाचा मागोवा लागेल.
 
या विश्लेषणातुन आपण इतकेच म्हणून म्हणून शकतो की जग हे त्याच्या एकुणत्वातुन बदलता येत नाही तर जग हे सापेक्ष आणि स्थानिक संदर्भात बदलता येतं. या स्थानिक बदलाचे परिणाम दीर्घकालीन असतात व हे परिणाम नव्या बदलाची सुरवात करण्यात समर्थ ठरतात.
 
कसं हे क्रियाविशेषण तीन संकल्पनामध्ये मांडलं जाऊ शकतं, घटना, सत्य आणि परिणाम. घटना ही स्थानिक पातळीवर या जगात घडते, घटना ही साधारण प्रवाहित जगातील rupture, किंवा फुट, असते. सत्य म्हणजे प्रस्थापित जगाच्या परिपेक्षातुन ठरवली गेलेली अशक्यप्राय गोष्ट होय. सत्य हे घटनेतून जन्माला येत असतं जे सकारात्मकरित्या जाहीर करतं, की पूर्वी जे अशक्य होतं ते आज शक्य आहे. घटनेचे (इव्हेंट) चे परिणाम म्हणजे जगातील ठोस प्रक्रिया जी अशक्य गोष्ट शक्य करते याला घटनेप्रतीची निष्ठा असं म्हणतात आणि निष्ठावान असणं म्हणजेच बदलाचा नवीन विषयवस्तू बनणे व त्याच सोबत घटनेच्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी घेणं. हा नवीन विषयवस्तू तेव्हाच अस्तित्त्वात असतो जेव्हा लोक स्वतःला संघटनेमध्ये, स्थिरीकरणामध्ये आणि घटनेचे परिणाम स्विकारण्याच्या अवस्थेमध्ये स्वताला अंतर्भूत करतात तेंव्हाच हा नवीन विषयवस्तू जन्माला येतो.

या नव्या माणसाच्या किंवा विषयाच्या तीन अवस्था आहेत: हा नवा माणुस जगामध्ये काहीतरी निर्माण करण्यासाठी स्वतंत्र असतो, हा नवा माणुस कोणत्याही निश्चित अस्मितेमधून बनलेला नसतो, म्हणून मार्क्स मॅनिफेस्टो मध्ये म्हणतो की कामगाराला देश नसतो. इथे कोणत्याही ठोस अस्मितेचा नकारनं म्हणजे त्या गोष्टीचा नकार जी या नव्या माणसाला स्वतःपासून व इतरांनपासून विभाजित करते. शेवटी या नव्या माणसाचा आनंद हा त्यांच्याच अंतर्गतामधून निर्माण होत असतो, हा आनंद म्हणजे एखादी गोष्ट करणे शक्य नव्हतं ती गोष्ट शक्य करण्याच्या क्षमतेचा शोध लागणं होय. म्हणजेच स्वतःच्या वरवरच्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन त्या मर्यादांच्या परे जाण्यासाठीचे पर्याय शोधणं. थोडक्यात आनंद म्हणजे सर्व प्रकारच्या मर्यादांविरुद्धचा विजय होय.

बाद्यु या संदर्भात आनंद आणि समाधान या दोन विरुद्ध गोष्टीचा विचार कम्युनिझम आणि भांडवलशाही या दोन विरुद्ध संकल्पनाच्या संदर्भात प्रतिपादित करतो. बाद्युच्या मते 'समाधान' ही भांडवली संकल्पना आहे. समाधानी असणं म्हणजे उपलब्ध जगाने बहाल केलेल्या गोष्टीमध्ये स्वतःचा स्वार्थ शोधणं. या अर्थाने समाधान हे जगाच्या कायद्याने निहित असत. म्हणजेच जेव्हा मी अस्तित्वात असलेल्या जगाशी एकात्म होत असतो तेंव्हा मी समाधानी असतो. या उलट आनंद  हा समाधान या संकल्पनेचा द्वंद्वात्मक नकार आहे. म्हणजेच आनंद हा सकार आहे, आनंद नाविन्य आहे, या उलट समाधान हा मृत्यू मार्ग आहे जिथं व्यक्ती त्याची व्यक्तिनिष्ठता, वस्तुनिष्ठतेत अंतर्भूत करते. 

आनंद म्हणजे सकार किंवा नवी शक्यता हा विचार मार्क्सच्या क्रांतीच्या संकल्पनेमध्ये आपणाला सापडतो. मार्क्ससाठी सामुहिक न्यायाच्या नव्या शक्यतेचं नाव कम्युनिझम आहे. भांडवली व्यवस्थेत समानता अशक्यप्राय असतानाच्या परिस्थितीत कम्युनिझम ही संज्ञा अशक्यप्राय जगातील नव्या राजकीय शक्यतेचं नाव आहे आणि ही शक्यता म्हणजेच समानतेची शक्यता होय. मार्क्ससाठी कम्युनिझम न्यायाची अमूर्त संकल्पना नाही, तर कम्युनिझम हे ऐतिहासिक प्रक्रियेचं नाव आहे जे अस्तित्वात असलेलं जग उध्वस्त करून नव्या जगाची निर्मिती करतं. 

या दृष्टिकोनातून जेंव्हा आपण आनंदाचा विचार करतो तेंव्हा आपण म्हणू शकतो की आनंद म्हणजे सर्वांच्या समाधानाची शक्यता नव्हे. आनंद म्हणजे जिथे सर्व समाधानी आहेत, अशा अमूर्त आदर्शी जगाची संकल्पना सुध्दा नाही. या उलट आनंद ही आपल्या अवघड कृतीमधील व्यक्तिनिष्टता आहे : घटनेच्या (event) परिणामाशी एकरूप झाल्यानंतर आपल्या रुक्ष जगातील व प्रस्थापित व्यवस्थेनं व तिच्या कायद्यांनी दाबून ठेवलेल्या अशक्यप्राय शक्यतांचा शोध म्हणजे आनंद आहे. आनंद म्हणजे ते ताकदवान आणि सर्जनशील जगणे जे जगाच्या दृष्टीने अशक्यप्राय होते/आहे.
 
थोडक्यात भांडवली व्यवस्था, आहे त्या मध्ये तुम्हाला समाधानी ठेवेल, आनंदी राहायचं असेल तर आनंद निवडावा लागेल (विशेषतः ते जे भांडवली व्यवस्थेच्या मते अशक्यप्राय आहे ते) आणि त्यासाठी किंमतही मोजावी लागेल.