India

निवडणूका आणि टू स्टेप थेअरी

आपण वाचत असलेलं वर्तमानपत्र, रेडियोवरल्या बातम्या आणि टीव्ही, मोबाईल इंटरनेट यांचा नकळत परिणाम आपल्यावर होत असतो

Credit : kimawa

एखाद्या माध्यमातून पाठवलेला संदेश एकाच वेळी असंख्य लोकांपर्यंत पोहचतो या महत्वाच्या वैशिष्ठ्यावरून त्या माध्यमाला ढोबळमानाने जनमाध्यम (Mass Media) असं म्हटलं जातं. वर्तमानपत्रे, रेडियो आणि टीव्ही ही जनमाध्यमाची काही उदाहरणे.

तर जनमाध्यमे समाजावर, लोकांवर परिणाम करत असतात. हा परिणाम मुख्यतः दोन प्रकारचा असतो. एक हळूहळू होणारा. तर दुसरा थेट. कधी हा परिणाम मर्यादित असतो किंवा संपूर्णपणे होणार असतो. माध्यमांचा लोकांवर होणारा परिणाम हा फार मोठा अभ्यासाचा विषय आहे त्यावर आपण कधीतरी विस्तृत बोलू. सध्या आपल्याकडे निवडणुका होताहेत तेव्हा त्याविषयी माध्यमांच्या परिणामाची एक थेअरी आपण बघू.

सन १९४०. अमेरिकेतल्या राष्ट्रअध्यक्षपदाची निवडणूक होते. माध्यमांतून येणाऱ्या वार्तांकनाने मतदारांवर किती आणि कश्या प्रकारे प्रभाव होतो यावर अभ्यास करायचा असं पॉल लझारर्स्रफेल्ड या संशोधकांनी ठरवतो. तो कोलंबिया ब्युरो ऑफ अप्लाइड सोशल रिसर्चमध्ये त्याच काम करायचा. त्याच नाव पॉल लाझार्सफिल्ड. मतदान करताना माध्यमांची भूमिका काय असते यावर अनेक मह्त्वाची निरिक्षणे लाझार्सफेल्डने त्याचा अभ्यासात मांडली. त्यातून त्याने एक संकल्पना आणि थेअरी जन्माला घातली. त्याने मांडलेल्या या थिअरीला जनसंज्ञापनात टू स्टेप फ्लो म्हटलं जातं.

आपण वाचत असलेलं वर्तमानपत्र, रेडियोवरल्या बातम्या आणि टीव्ही, मोबाईल इंटरनेट यांचा नकळत परिणाम आपल्यावर होत असतो. समजा तुम्ही एखाद्या वर्तमानपत्रातला अग्रलेख वाचला. थोड्या वेळाने किंवा नंतर कधी तरी त्याच विषयावर तुम्ही मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करताना वाचलेला अग्रलेख तुमची मते तयार होण्यावर परिणाम करत असतो.

अनेक लोकांपर्यंत एकाचवेळी संदेश पोहचवण्याची ताकद जनमाध्यमांमध्ये असते असं आपण गृहित धरलं तरी सगळ्या लोकांकडे ही जनमाध्यमे पोहचलेली असतीलंच असं नाही. दुसरा मुद्दा असा की जनमाध्यमांतून येणारा प्रत्येक संदेश तत्परतेने बघण्याची तयारी प्रत्येकात असेलंच असं नाही. मग ही माणसं माध्यमातून येणारा असा संदेश, माहिती मिळवण्यासाठी दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून असतात.

समजा एक गाव आहे. तिथे टीव्हीवर बातम्या चालू आहेत. एका माणसाने टीव्हीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या किसान सन्मान योजनेची एक बातमी पाहिली. त्यांच्या भाषणाचा व्हिडियो पाहिला. एका शेतकऱ्याला किती पैसे मिळणार, ह्या योजनेच्या अटी शर्ती काय अशी बरीच माहिती त्याला मिळाली. काही वेळाने हीच बातमी तो जेव्हा दुसऱ्या चार शेतकऱ्यांना सांगतो तेव्हा त्या चार लोकांचा संबंध टीव्हीशी म्हणजेच माध्यमांशी आलेला नसतो. त्यांच्यासाठी ती बातमी सांगणाराच माध्यम असतो. इतर चार लोकांना ही बातमी सांगणाऱ्या माणसाला टू स्टेप थिअरीमध्ये ओपिनयन लीडर्स म्हणतात.

लाझार्सफिल्डने त्या काळात मांडलेल्या टू स्टेप थिअरली वर्तमान चौकटीत बसवण्यात मर्यादा असल्या तरी त्याची मूळ मांडणी महत्त्चाची आहे.

समजा टीव्हीवरच्या बातमीपत्रात उद्या पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवणारी बातमी ही हवामान विभागाकडून आलेल्या माहितीच्या आधारावर केलेली असते. हवामान खात्यातल्या तज्ञ लोकांनी कालचं तापमान, आर्द्रता शास्त्रीय पद्धतीने मोजून हा अंदाज वर्तवलेला असतो. ही बातमी लोकं थेट टीव्हीवर बघतात तेव्हा त्यांना लक्षात येतं की उद्या आपल्या शेतात, भागात पाऊस पडू शकतो. याउलट ही बातमी जेव्हा एक माणूस टीव्हीवर पाहतो आणि थेट लोकांना तुम्ही उद्या सगळ्या शेतात येताना छत्र्या घेऊन या म्हणतो तेव्हा तो ओपिनियन लिडर्सच्या भूमिकेत असतो.

१९४४ च्या अमेरिकिन निवडणुकीत केलेल्या या संशोधना लाझार्सफिल्डच्यासोबत कार्टझ हा संशोधकही होता. प्रचारात राजकीय पक्षांना मांडलेले मुद्दे माध्यमातून जितक्या प्रभावीपणे पोहचतात त्यापेक्षा जास्त ते प्रत्यक्ष लोंकाच्या भेटून बोलण्याने पोहचतात. दुसऱ्या भाषेत लोकांनी टिव्हीवर पाहिलेल्या बातमीपेक्षाही तीच बातमी पाहून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने (ओपिनियन लिडर्सने) त्या विषयावर मांडलेलं मत लोकांना जास्त सोईचं आणि खरं वाटू लागतं.

ओपिनयन लिडर्सचे त्यांनी दोन प्रकार केले. एक मोनोमॉर्फिक. तर दुसरा पॉलिमॉर्फिक. यांच्या नावातंच सगळं आलं. मोनोमॉर्फिक ओपिनियन लीडर्स थोडे बरे असतात. ती एखादीच बातमी पिक्चरची स्टोरी सांगावी तशी लोकांना समजावून सांगतात. ते एकाच मुद्दाला किंवा त्याच बातमीला अडून राहतात. म्हणजे ते फार फार तर चेन्नई सुपर किंग कसं भारी आहे, धोनीवर कसा अन्याय झाला होता, त्याचा नवीन चित्रपट कोणता यावर बोलत राहतील.

परंतू दुसऱ्या प्रकारचे ओपिनियन लीडर्स थोडे ताकदवान असतात. पॉलिमॉर्फिक ओपिनियन लीडर्स आपलं मत, विचारधारा, वैयक्तिक आवडी निवडी यांची खिचडी तेलमीठ लावून दुसऱ्याला ऐकवत असतात. मग ते मोदींचे भक्त असू शकतील किंवा राहूल गांधींचे कट्टर समर्थक असू शकतात.

सध्याचं उदाहरण घेऊ. अगोदरंच माध्यमातून येणारी माहिती ही अनेक फिल्टर्स, गेटकिपिग लावून सामान्य लोकांपर्यंत पोहचत असते. त्यातही गावात रस्ते नाहीत. शेतमालाला भाव नाही. तरुणांना रोजगार नाही. गरीबांना अन्न नाही. प्यायला पाणी नाही. रस्ते नाहीत. वीज नाही. हे प्रश्न सामान्य मतदारांच्या मनात असतात.

पण त्याचबरोबर लोकसभा निवडणूक कशासाठी होते. आपण मतदान करतो म्हणजे खासदारांना निवडून देतो की थेट पंतप्रधानांना. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, वंचित बहूजन आघाडी किंवा देशातील इतर पक्ष आणि इतर कोणत्याही निवडणुका. देशातल्या प्रत्येक घडामोडीविषयी थेट अपडेट राहणं प्रत्येक नागरिकांना शक्य नसते. मुळात माध्यमातून येतं तेही थेट सत्य असतंच असं नाही. ओपिनियन लीडर्स मग आपापल्या परीने प्रभाव टाकत असतात. यांच्या प्रभावाखाली मग मराठवाड्यातला एखादा शेतकरी किंवा थेट हिंजवडीच्या आयटीकंपनीत काम करणारा शिकल्या सवरलेला नोकरदार असं कुणीच सुटत नाही.