India

वैविध्य, प्रतिनिधित्व आणि संधी: नव्या संसदेतील खासदारांचा आढावा!

४ जूनला जाहीर झालेल्या निकालानं देशाला अनेक धक्के दिले.

Credit : Indie Journal

 

देशाच्या १८ व्या लोकसभेसाठी निकाल जाहीर करण्यात आले असून यावेळी लोकसभेत २८० खासदार पहिल्यांदा लोकसभेत प्रवेश करत आहेत, परंतू असं असतानाही या निकालानंतर तरुणांचा आणि महिलांचा लोकसभेतील सहभाग घटलेला दिसतो. गेल्यावेळच्या तुलनेत यावेळी तरुण आणि महिलांच्या सहभागात किंचित घट झाल्याचं दिसून येतं. तरी अनेक तरुण उमेदवारांना या निवडणुकीवर त्यांची छाप सोडता आली आहे. 

४ जूनला जाहीर झालेल्या निकालानं देशाला अनेक धक्के दिले. 'अब की बार ४०० पार'चा घोष लावणाऱ्या एनडीएला यावेळी ३०० चा टप्पादेखील पार करता आला नाही. त्यातील मुख्य घटक पक्ष आणि सत्तेत असलेल्या भाजपला फक्त २४० खासदारांवर समाधान मानावं लागलं. भाजपला सर्वात मोठा धक्का महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये बसला. भाजपनं महाराष्ट्रात १६, उत्तर प्रदेशात २९ तर राजस्थानमध्ये १० जागा गमावल्या.

भाजपनं गेल्या वेळीच्या तुलनेत २१ टक्के जागा गमावल्या. तर एनडीएनं २०१९च्या तुलनेत फक्त ८३ टक्के जागा मिळवल्या. तर काँग्रेसनं यावेळी त्यांचं लोकसभेतील संख्याबळ दुप्पटीनं वाढवलं आणि युपीएनं त्यांची बेरीज सव्वादोन पटीनं वाढवली. त्यामुळे यावेळीच्या लोकसभेत गेल्यावेळीच्या तुलनेत अनेक नवीन चेहरे पाहायला मिळणार हे ठरलेलं होतं. 

 

या लोकसभेत निवडुन आलेल्या एकूण उमेदवारांपैकी २८० उमेदवार पहिल्यांदा खासदार म्हणून नियुक्त झाले आहेत.

 

या लोकसभेत निवडुन आलेल्या एकूण उमेदवारांपैकी २८० उमेदवार पहिल्यांदा खासदार म्हणून नियुक्त झाले आहेत. तर २६३ खासदारांनी यापूर्वी लोकसभेत कार्यकाळ पूर्ण केला आहे. यावेळी नव्यानं खासदार झालेल्यांची संख्या गेल्यावेळीच्या लोकसभेच्या तुलनेत जास्त आहे. गेल्यावेळी एकूण खासदारांपैकी फक्त २६७ खासदार पहिल्यांदा संसदेत प्रवेश करत होते, तर २७६ खासदार हे याआधीही खासदार म्हणून निवडून आले होते. पुन्हा निवडून आलेल्या खासदारांची संख्या २०१९च्या निवडणुकीत जास्त होती, आता त्यात काही प्रमाणात घट झाली आहे. 

लोकसभा २०१४ नवे खासदार ३१४ आधीचे २२७, लोकसभा २०१९ नवे २६७ आधीचे २७६, लोकसभा २०२४ नवे २८० आधीचे २६३.

यातही समाजवादी पक्ष, तेलगू देसम पक्ष आणि राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटानं मोठ्या प्रमाणात नव्या खासदारांना निवडून दिल्याचं दिसतं. या तिन्ही पक्षांच्या एकूण खासदारांपैकी ७० टक्क्यांहून अधिक खासदार पहिल्यांदा लोकसभेत जात आहेत. तर भाजप, तृणमूल काँग्रेस, जदयु आणि शिवसेना पक्षाच्या दोन्ही गटांसाठी ही आकडेवारी ५० टक्क्यांहून कमी आहे. 

 

पहिल्यांदा खासदार होणाऱ्या सभासदांची पक्षनिहाय टक्केवारी

भारतीय जनता पक्ष ४५%
काँग्रेस ६०%
समाजवादी पक्ष ७३%
तृणमूल काँग्रेस ३८%
द्रविड मुन्नेत्र कळघम ५०%
तेलगू देसम पक्ष ७५%
शिवसेना (उबाठा) ४४%
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ७५%
शिवसेना ४३%
लोक जनशक्ती पक्ष ६०%

पहिल्यांदा निवडून येणाऱ्या खासदार आणि तरुण खासदार यांचा थेट संबंध येतो. पहिल्यांदा निवडून आलेल्या खासदारांपैकी बहुतांश हे तरुण असतात. तरीही गेल्या अनेक निवडणुकींपासून लोकसभेत तरुणांचा सहभाग घटत चालला आहे. या लोकसभेनं गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेला कल कायम ठेवला. यावेळीच्या लोकसभेत गेल्या वेळीच्या तुलनेत कमी तरुण खासदार निवडून आले आहेत.

यावेळीच्या लोकसभेत एकूण नियुक्त खासदारांपैकी फक्त ११ टक्के खासदारांचं वय ४० पेक्षा कमी आहे. १७ व्या लोकसभेत ते प्रमाण १२ टक्के होतं. तर २५ वय किंवा त्या आसपास असलेल्या फक्त तीन उमेदवारांना यावेळी विजय मिळवता आला. जेव्हा की गेल्या वेळी सहा खासदारांना भारतानं निवडून दिलं होतं. माहिती नुसार संसदेतील ५० टक्क्यांहुन अधिक खासदारांचं वय ५५ च्या पूढं आहे. यावेळीच्या संसदेचं सरासरी वय ५६ वर्ष आहे.

सर्वात जास्त तरुण असलेल्या देशातील तरुणांचं प्रतिनिधित्व घटत असताना महिलांची ही स्थिती काहीशी तशीच आहे. गेल्या वेळीच्या लोकसभेत ७८ सभासद महिला होत्या. म्हणजे एकूण संख्याबळाच्या १४ टक्के, तर यावेळी फक्त ७४ महिला खासदारांना निवडणुकीत जिंकता आलं. ही घट टक्केवारीच्या तुलनेत अत्यंत नगण्य असली तरी इतर प्रगत देशांच्या तुलनेत कमी आहे. 

 

गेल्या वेळीच्या लोकसभेत ७८ सभासद महिला होत्या, तर यावेळी फक्त ७४ महिला खासदारांना निवडणुकीत जिंकता आलं.

 

इंग्लडमध्ये ३५ टक्के खासदार महिला आहेत, अमेरिकेत ते प्रमाण २९ टक्के आहे. तर नुकत्याच निवडणुका झालेल्या दक्षिण अफ्रिकेत हे प्रमाण ४६ टक्के आहे. तुलनेनं भारतात यावेळी फक्त १४ टक्के खासदार महिला आहेत. त्यामुळे सरकारनं संसदेत महिला आरक्षण लागू करायची गरज असल्याचं पुन्हा अधोरेखित होत आहे.

तर २००९ पर्यंत महिलांचा लोकसभेतील सहभाग १० टक्क्यांपेक्षा कमी होता. यावेळी सर्वात जास्त महिला खासदार भाजपकडे आहेत. तर त्यानंतर काँग्रेसचा क्रमांक येतो. तिसऱ्या क्रमांकाला तृणमूल काँग्रेस आहे. त्यानंतर इतर सर्व पक्षांमधील महिला खासदारांची संख्या एक आकडी आहे. 

भाजप- ३१, काँग्रेस १३, तृणमूल ११, सपा ५, डीएमके ३, जदयु आणि लोक जनशक्ती चिराग पासवान २ आणि इतर ७. 

भारतीय जनता पक्ष ३१
काँग्रेस १३
तृणमूल काँग्रेस ११
समाजवादी पक्ष
द्रविड मुन्नेत्र कळघम
जनता दल (युनायटेड)
लोक जनशक्ती पक्ष
इतर 

 

काँग्रेसच्या संजना जाटव

काँग्रेसच्या संजना जाटव या राजस्थानमधून पहिल्यांदा खासदार झाल्या आहेत. दोन मुलांची आई असलेल्या जाटव यांचा विवाह राजस्थान पोलीसमध्ये हवालदार पदावर असलेल्या कप्तान सिंग यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे. वर्षीय २६ संजना यांना कोणतीही विशेष राजकीय पार्श्वभूमी नाही. तरीही त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मांच्या भरतपूर जिल्ह्यातील भाजप उमेदवार रामस्वरुप कोळींना ५२००० मतांनी पराभूत केलं. डिसेंबर २०२२ मध्ये जेव्हा राहुल गांधींची भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये होती, तेव्हा त्यांनी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सहभाग घेतला होता आणि यात्रेच्या व्यवस्थापनात मदत केली होती. तर २०२३ च्या राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी संजना राजस्थान काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांच्यासोबत काम करत होत्या आणि तेव्हाच त्यांना राजकारणात प्रवेश मिळाला, असं म्हणता येईल. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजस्थानमध्ये काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यावेळी जाटव भाजपच्या रमेश खेडीविरोधात अतिशय कमी, म्हणजे ४०९ मतांच्या फरकानं पराभूत झाल्या होत्या.

 

 

काँग्रेसचे कर्नाटकमधले दोन खासदार 

काँग्रेसकडून कर्नाटकमध्ये सागर खांद्रे आणि प्रियंका जारकीहोली या दोन तरुण नेत्यांना उमेदवारी देण्यात आली होती. २६ वर्षीय सागरचे वडील काँग्रेसच्या कर्नाटक मंत्रीमंडळात जंगल आणि पर्यावरण मंत्री आहेत. तर प्रियंकाचे २०१८ पासून काँग्रेसमध्ये काम करत आहेत. त्यांच्या विजयाचं वैशिष्ट्य म्हणजे अनुसुचित जमातीच्या प्रियंका अनारक्षित मतदारसंघातून जिंकुन येणाऱ्या सर्वात तरुण महिला खासदार आहेत. सागरनं एनएसयुआईचा सरचिटणीस म्हणून काम केलं आहे. त्याच्याविरोधात बिदर मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा उभे होते. प्रियंका त्यांच्या कुटुंबाच्या अनेक महत्त्वाच्या कंपन्यांच्या संचालक पदावर आहेत. त्यांनी भाजप उमेदवार अण्णासाहेब शंकर जोल्ले यांचा पराभव केला. 

 

लोक जनशक्ती पक्षाच्या शाम्भवी चौधरी 

चिराग पासवानच्या नेतृत्वातील लोक जनशक्ती पक्षानं बिहारच्या समष्टीपूर मतदारसंघामध्ये २५ वर्षीय शाम्भवी चौधरी यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी जनता दल युनायटेडचे मंत्री महेश्वर हजारी यांचा मुलगा आणि काँग्रेस उमेदवार सन्नी हजारी यांचा एक लाख मतांनी पराभव केला. शाम्भवी याही एक राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे वडील अशोक चौधरी यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला रामराम ठोकत जेडीयुत प्रवेश केला. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी शाम्भवी पत्रकार म्हणून काम करत होत्या. 

 

सपाचे तीन तरुण खासदार

समाजवादी पक्षानं यावेळी बऱ्याच नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. त्यात पुष्पेंद्र सिरोज आणि प्रिया सिरोज यांचा समावेश होतो. दोघांचं वय २५ वर्ष आहे. पुष्पेंद्र सिरोज यांचे वडील २०१९च्या लोकसभा निवडणुकीत सपाच्या टिकीटावर लढले होते आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर प्रिया सिरोज यांचे वडील ३ वेळचे खासदार आहेत. तर सपाच्या इकरा चौधरी या देशातील सर्वात तरुण मुस्लिम महिला खासदार ठरल्या आहेत. इकरा यांनी लंडनमध्ये शिक्षण घेतलं असून २०२१मध्ये त्या भारतात माघारी आल्या. त्यांचा भाऊ नाहिद हसन माजी आमदार असून सध्या अटकेत आहे. तर २०१९च्या निवडणुकीत त्यांची आई तबस्सुम यांना भाजपच्या प्रदीप चौधरींनी पराभूत केलं होतं. यावेळी इकरा यांनी प्रदीप चौधरींचा कैराना मतदारसंघात पराभव केला.