India

सिक्कीम आपदा पूर्णपणे अनपेक्षित होती का?

२२ वर्षांपुर्वीपासुनच सिक्कीममध्ये अशा प्रकारचा पुराची शक्यता सातत्यानं वर्तवण्यात येत होती.

Credit : इंडी जर्नल

 

सिक्कीममध्ये अचानक आलेल्या पुराला दोन दिवस उलटले असून सरकारकडून बचाव कार्य सुरू आहे. सिक्कीमच्या पर्वतीय भागात ढगफुटी झाली, त्यामुळे हजारो फुट उंचीवर असलेला हिमतलाव फुटला. यामुळे नदीला पूर आला आणि परिणामी तीस्ता नदीवर बांधलेलं चुंगथांग धरण फुटलं आणि नदीच्या खोऱ्यात आलेल्या पुरामध्ये आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला असून ७० हुन अधिक नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. यात भारतीय सैन्याच्या काही सैनिकांचा समावेश आहे. मात्र हा पुर अचानक आला असला, तरी जागतिक तापमान वाढ आणि जागतिक हवामान बदलाच्या वाढत्या प्रभावामुळे २२ वर्षांपुर्वीपासुन अशा प्रकारच्या पुराची शक्यता सातत्यानं वर्तवण्यात येत होती, अशी माहिती समोर आली आहे.

सिक्कीमच्या हिमालयीन पर्वतरांगामध्ये साधारणपणे १७ हजार फुटांवर असलेल्या ल्होनाक तलावाच्या परिसरात बुधवारी रात्री ढगफुटी झाली. या ढगफुटीमुळे तलावाच्या पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ झाली आणि तलावाच्या भिंती पाडत पाण्यानं तीस्ता नदीत प्रवेश केला. ढगफुटीमुळं होणार मुसळधार पाऊस आणि वेगानं खाली येणाऱ्या तलावाच्या पाण्यानं नदीवरच्या चुंगथांग जलविद्युत प्रकल्पालाही वाहून नेलं. त्यामुळे सिक्कीममध्ये पायाभूत सुविधा, सामान्यांची सपंत्ती, रस्ते, पुल अशा इतर अनेक गोष्टींच्या हानीसोबत बरीच जीवितहानीही झाली.

अशा प्रकारची घटना सिक्कीममध्ये घडू शकते याचा अंदाज २००१ पासुन लावला जात होता. २००१ साली सिक्कीम मानवी विकास अहवालात पहिल्यांदा हिमतलाव फुटण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली होती. त्यानंतर २०१३ मध्ये दुसऱ्यांदा ही शक्यता व्यक्त करण्यात आली. २०१६ आणि २०२१ मध्ये सिक्कीम सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानं राज्यातील वितळत्या हिमनद्यांचा आढावा घेत राज्यात अचानक येणाऱ्या पुराबद्दल चेतावणी दिली होती.

 

 

या सर्व अंदाज आणि चेतावण्यांमागचं कारण काही खुप वेगळं नव्हतं. जागतिक तापमान वाढीमुळे हिमनदीचं पाणी वितळण्याचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. १९६२ ते २००८ च्या काळात दक्षिण ल्होनाक हिमनदीचा सुमारे दोन किलोमीटर भाग वितळला तर २००८ पासुनच्या पुढच्या ११ वर्षात अजून चारशे मीटरचा भाग वितळला आणि त्याजागी हिमतलावाची निर्मिती झाली. २०१३ साली झालेल्या संशोधनानुसार या वितळत्या पाण्यामुळे ल्होनाक तलावाचं क्षेत्रफळ सुमारे ५०० मीटरनं तर खोली ५० मीटरनं वाढली होती.

इस्रोच्या उपग्रहानं एका आठवड्यापुर्वी घेतलेल्या तलावाच्या छायाचित्रात तलावाचं क्षेत्रफळ १७० हेक्टर होतं. तर तलाव फुटल्याच्या काही तासांनंतर घेतलेल्या छायाचित्रांत त्याचं क्षेत्रफळ घटून फक्त ६० हेक्टर एवढं राहिलं होतं. म्हणजे तलावातील जवळपास ६० टक्के पाणी वाहून गेल्याचा अंदाज आहे.

यापूर्वी झालेल्या संशोधनात तलाव फुटला तर त्यातुन किती वेगानं पाणी जाऊ शकतं, याचा अंदाजही वेळोवेळी व्यक्त करण्यात आला होता. २०१३ सालच्या संशोधनानुसार तलाव फुटल्यास ६०० घनमीटर प्रति सेकंदाच्या वेगानं पाण्याचा उत्सर्ग होऊ शकतो, असा अंदाज होता. तर २०२१ च्या अदांजानुसार जर तलाव २० मीटर खोलीपर्यंत फुटला तर ४,३०० घनमीटर प्रति सेकंड तर ५० मीटर खोलीपर्यंत फुटला तर १२,५०० घनमीटर प्रति सेकंड वेगानं पाण्याचा उत्सर्ग होऊ शकतो, असा अंदाज होतो.

 

 

हिमालयीन राज्यांत हवामान बदल आणि तापमान वाढीचा मोठा दुष्परिणाम पाहायला मिळत आहे. अशी ढगफुटी झाल्यामुळे हिमतलाव फुटून मोठं नुकसान होण्याचं ही पहिली वेळ नाही. २०१३ साली उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये चोराबारी तळ तलाव फुटल्यामुळे हजारो लोकांनी त्यांचा जीव गमावला होता. यावर्षी हिमाचल प्रदेशमध्ये बऱ्याच ठिकाणी ढगफुटी झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पूर आले. या अचानक आलेल्या पुरांमुळे हिमाचल प्रदेशमध्ये जवळपास १०० नागरिकांनी त्यांचा जीव गमावला. शिवाय हजारो कोटींच्या संपत्तीचं नुकसान झालं. तर बुधवारी रात्री उत्तर सिक्कीमच्या भागात सरासरीपेक्षा ५० टक्के जास्त पाऊस पडला होता.

सिक्कीम सरकारनं २०१६ साली ल्होनाक तलावाचा अभ्यास करून आपत्ती व्यवथापन विभागाकडून ३ आठ इंच व्यासाचे ३ पाईप तलावातील पाणी कमी करण्यासाठी बसवण्यात आले होते. शिवाय मागच्या महिन्यात धोक्याची पूर्व सूचना देणारी प्रणाली बसवण्याच्या विचारात होती. मात्र ते काम वेळेत झालं नाही. या घटनेनंतर सर्व हिमालयीन राज्यांना धोक्याच्या हिमतलावांवर अशी यंत्रणा लवकरात लवकर बसवण्याची आवश्यकता आहे, हे ठळकपणे अधोरेखित झालं.

हवामान बदलामुळे कमी कालावधीत जास्त पाऊस पडत असल्यानं ढगफुटीचं प्रमाण वाढलं आहे. तापमानवाढीमुळं हिमालयातील बर्फ वितळण्याचा वेगही वाढला आहे. त्यामुळे हिमालयातील राज्यांमध्ये पूर येण्याची शक्यता आता कैक पटीनं वाढली आहे. भारतात सध्या १६ हजारांहून अधिक हिमनद्या आहेत तर ७,५०० हुन अधिक हिमतलाव आहेत. त्यातील काही तलाव धोक्याच्या स्थितीत आहेत. त्यांच्यामुळे केदारनाथ किंवा सिक्कीमसारखी अजून एखादी घटना घडू शकते, अशी भीती जाणकार व्यक्त करतात. त्यामुळे सरकारनं आवश्यक ती खरबदारी घेणं अत्यावश्यक आहे, अशी मागणीही ते करतात.