Opinion

पोतडीतून: सचिन (ग्लैडिएटर) तेंडुलकर’

२७ नोव्हेंबर २००९ आणि ५ डिसेंबर २००९ रोजी ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर यांचे लोकसत्ता या दैनिकात प्रकाशित झालेले दोन लेख.

Credit : Indie Journal

 

नुकताच भारतानं टी-२० विश्वचषक स्वतःच्या नावे करून जवळपास १३ वर्षांचा विश्वचषकांचा दुष्काळ संपवला. अर्थात ही आनंदाची गोष्ट असली, तरी त्यानंतर देशभर पाहायला मिळालेला उत्सव एक वेगळीच कहाणी सांगत आहे. आधी मॅच जिंकल्याच्या लगेच नंतर देशभरातील अनेक शहरांचे रस्ते आनंदित झालेल्या चाहत्यांनी भरून गेले. फटाके, घोषणा आणि गाड्यांच्या आवाजांनी शहरं दुमदुमून गेली. जगण्याच्या सर्वात मूलभूत सार्थतेला गाठल्याप्रमाणे ते क्षण साजरे होत होते. ते कमी पडलं होतं म्हणूनच की काय, आज गुरुवार ४ जुलै रोजी मुंबईच्या मरीन ड्राइव्ह वरून विश्वचषक आणि तो जिंकून आणणाऱ्या खेळाडूंची भव्यदिव्य मिरवणूक निघाली, जी हा लेख प्रकाशित करत असतानाही सुरूच आहे. याची सांगता सुप्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर होईलच, मात्र तोवर एक सामान्य व्यक्ती म्हणून आपल्या मनात एक प्रश्न उद्भवतोच, आणि तो म्हणजे, हे जे ओसंडून वाहत आहे, हे जे आनंदाच्या पलीकडे उन्मादात रूपांतरित होत आहे, त्याच्या झगमगीत आवरणाच्या मागे त्या कोणत्या भावना आहेत ज्या लपून राहत आहेत? आणि या प्रश्नाचा उलगडा करण्याचाच निमित्ताने, २७ नोव्हेंबर २००९ आणि ५ डिसेंबर २००९ रोजी ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर यांचे लोकसत्ता या दैनिकात प्रकाशित झालेले दोन लेख एकत्र करून प्रकाशित करत आहोत.

 

सचिन एक महान फलंदाज आहे यात वादच नाही. ज्यांना क्रिकेट पाहून आनंद मिळतो त्यांना तो देव वाटतो. हेही ठीकच. कारण समाजात रिअॅलिटी शोजनासुद्धा हात वर करून हलवणाऱ्या प्रौढांची कमी पडत नाही तिथे क्रिकेटचं काय घेऊन बसलात? सचिन तेंडुलकर हा देशाचा हीरो आहे. त्याच्या कारकीर्दीला नुकतीच २० वर्षे झाली. सर्व माध्यमांनी त्या दिवशी सचिनविषयी असा थाट केला होता की जणू सचिन हा मानवजातीचा एकमेव तारणहार आहे. अर्थात बहुसंख्य जनतेचे मत तसे नसेलही. परंतु हल्ली सवंगतेच्या नादी लागलेली माध्यमं बहुसंख्य जनतेच्या मताला फाटय़ावर मारतात! मी स्वत: क्रिकेट फार क्वचित बघतो. कोणत्याही सिंथेटिक (अनैसर्गिक) गोष्टीत मला आनंद मिळत नाही. जगात आनंद मिळवाव्या अशा गोष्टी निसर्गातच भरपूर आहेत. एखादा शेतकरी शेती करताना पाहताना मला सचिनच्या बॅटिंगचा साफ विसर पडतो किंवा साधं जंगलातून चालत जाताना गच्च भरलेलं मधाचं पोळं पाहताना मला ‘क्रिकेट’ ही गोष्ट ‘पीएसपी’, ‘गेम बॉय’ वगैरेसारखी सिंथेटिक आणि खोटी वाटते. तशी ती आहेच. ‘ऑरगॅनिक’ (नैसर्गिक) गोष्टींचा आनंद उधळायला माणसात अभिजातता लागते. सचिन किंवा कोणताही क्रिकेटर ही एक व्हच्र्युअल रिअॅलिटी आहे. एक प्रकारचं टेक्नॉलॉजिकल मॉर्फिन किंवा अफू! 

सचिन एक महान फलंदाज आहे यात वादच नाही. ज्यांना क्रिकेट पाहून आनंद मिळतो त्यांना तो देव वाटतो. हेही ठीकच. कारण समाजात रिअॅलिटी शोजनासुद्धा हात वर करून हलवणाऱ्या प्रौढांची कमी पडत नाही तिथे क्रिकेटचं काय घेऊन बसलात? सचिनवर ज्या चॅनल्सनी दिवसाचे दिवस आणि अख्खी वर्तमानपत्रं स्तुतिसुमनं वाहण्याकरता वापरली ते एकतर मठ्ठ आहेत किंवा लोकशत्रू. कारण क्रिकेट हा एक मानवजातीने जीविकेची, म्हणजे मानव जातीला पुढे नेणारी व उपजीविकेची म्हणजे मानवजातीला जगवण्याची कामे पूर्ण केली की घटकाभर विरंगुळा करण्याकरता काढलेला एक उपाय आहे.

 

पूर्वी रोमन साम्राज्यात सिंह व माणसांच्या कुस्त्या असत किंवा ग्लॅडिएटर सारख्या चित्रपटात दाखवलेले खेळ असतात ते खेळ उच्चभ्रू वर्ग पाहून त्यातून मनातल्या सुप्त हिंसेच्या विरेचनाचा आनंद घेत असे. क्रिकेट हा त्या खेळांचा आधुनिक उत्क्रांत अवतार. पुढे रोमन सम्राटांना जेव्हा जनतेला अन्न पिकवून त्यांची पोटं भरणं अशक्य झालं तेव्हा हे सारे खेळ त्या रोमन सम्राटांनी सर्वसामान्य जनतेसाठी खुले केले. जेणेकरून लोकांना पाव मिळत नाहीत, त्यांचे जीवनमान हलाखीचे आहे याचा विसर त्यांना पडावा. यासाठी काही ग्लॅडिएटर्सना (या खेळांमधल्या योद्धय़ांना) त्यांनी हीरो बनवले. जे ग्लॅडिएटर चित्रपटात आपण पाहू शकतो. जनता त्यामागे बेभान होऊन आपल्याकडे अन्न, वस्त्र, निवारा नाही हे विसरत असे. हे खेळ तेव्हा अभिजन वर्गातले लोक सत्ता आपल्या मुठीत ठेवून पुढच्या रांगेतून पाहत. सर्वसामान्य जनता स्टेडिअममध्ये मागच्या रांगेत बसून गिल्ला करत असे. आज शरद पवार, लालू यादव, अरुण जेटली वगैरे क्रिकेटबाबत नेमकं हेच करतात. सचिन हा त्यांचा बेस्ट ग्लॅडिएटर आहे. पण या साऱ्यामुळे रोमन साम्राज्याचं अभूतपूर्व पतन व विघटन थांबू शकलं नाही. जे ‘गिबन’च्या ‘डिक्लाइन अॅण्ड फॉल ऑफ रोमन एम्पायर’ या पुस्तकात आपण वाचू शकतो. शरद पवार कृषीमंत्री आहेत तरी ते सचिन आणि क्रिकेटमध्ये का रस घेतात? असा भाबडा प्रश्न कुणी विचारतो/ विचारते. ते असं करून देशाला व स्वत:ला जनतेच्या भुके कंगालपणाचा विसर पडायला लावतात.

आज सारी माध्यमं सचिन तेंडुलकरच्या वीस वर्षांच्या ‘महान’ कारकीर्दीबद्दल इतकं काही लिहितात, बोलतात. त्याने मानवजातीला कोणतं वरदान प्राप्त झालं? हिम्मतराव बावीस्कर नावाच्या महाडच्या डॉक्टरने विंचवाच्या दंशावर लस शोधून काढली. देशातल्या अनेकांचे प्राण त्याने सहजपणे वाचू लागले. त्याच्या कारकीर्दीला किती वर्षे झाली ते आपणाला ठाऊक आहे? त्यासारखेच प्रकाश - मंदा आमटे, अभय - राणी बंग यांच्या कारकीर्दीला किती वर्षे झाली ती या माध्यमांनी सेलिब्रेट केलीत कधी? किंवा इस्त्रोचे वा अनेक जीव, भौतिक, गणितातले भारतीय शास्त्रज्ञ वा समाजसेवक असतील, ज्यांनी मानवजात जगवली, घडवली, सुसंस्कृत केली. कितीजणांची कारकीर्द अशी सेलिब्रेट झाली? क्रिकेट आणि सचिन हे माझ्या दृष्टीने मानवी जीवनाच्या लक्षावधी वर्षांच्या प्रवासात अशाश्वत असे फारशी दखल न घेण्याजोगे टप्पे आहेत. जे टप्पे येतील आणि जातील. सचिन तेंडुलकर वीस वर्षे खेळला आणि त्याने विक्रमांवर विक्रम केले ते त्याने हेमलकसात जाऊन केले? की प्रयोगशाळांच्या बंद भिंतीआड आपल्या प्रयोगाचं आणि आपलं भवितव्य अधांतरी असताना माणूस जगावा, रोगमुक्त आणि सुखी व्हावा यासाठी केले? युगातल्या ग्लॅडिएटर्सना स्वातंत्र्य, पैसा व प्रसिद्धी मिळते एवढाच काय तो फरक. पण हे व्हावं म्हणून अनेक विचारवंतांनी, क्रांतिकारकांनी, लक्षावधी पुस्तकं लिहिलीत. ते फासावर गेलेत. जगभरची प्रस्थापित सरंजामी राज्यशकटं त्यांनी उलथून टाकलीत. तेव्हा हे ग्लॅडिएटर्स गुलामगिरीतून स्वातंत्र्यात आलेत. त्या महान विचारवंत, क्रांतिकारक व लेखकांची नुसती नावं लिहायला हजारो पुस्तकं लिहायला लागतील.

 

माध्यमं सचिनच्या वीस वर्षांच्या ‘महान’ कारकीर्दीबद्दल इतकं काही लिहितात, बोलतात. त्याने मानवजातीला कोणतं वरदान प्राप्त झालं?

 

सचिन तेंडुलकरविषयी मला कोणतीच भवना नाही. ना प्रेम, ना आदर, ना तिरस्कार, ना द्वेष, ना खंत, ना खेद. तो आपली नव्या संस्कृतीतली तलवारबाजी करून रग्गड पैसे कमवतो आहे. पण त्याला वापरून, आपल्या दैनंदिन जीवनात ज्यांनी दु:ख, दैन्य आणि हताशता निर्माण केली आहे ते त्याचा आपल्याला विसर पाडू इच्छितात याचा मला त्वेष आहे. कोणत्याही काळातल्या कोणत्याही विचारवंताला, लेखकाला तो असतोच. शेतकरी आत्महत्या करतो त्यावर सचिनने उपाय शोधावा असं मानणं हे गैर व त्याच्यावर अन्याय करणारं आहे. कारण देशाच्या कृषीमंत्र्याकडूनच आपण जिथे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा करतो तिथे बिचारा सचिन काय करणार? मला आत्यंतिक लाज या गोष्टीची वाटते की, मराठीतल्या अनेक लेखक, कलावंत, गायक, राजकीय नेते वगैरेंनी सचिनसोबतच्या आपल्या तऱ्हेतऱ्हेच्या आठवणी लिहिलेल्या आहेत. बोललेल्या आहेत. त्या वाचताना एखादा समाज लयाला जाताना त्या समाजातले जाणकार कसे अफूबाज होतात याचं मला दर्शन झालं. या साऱ्यात केवढी वैचारिक दिवाळखोरी आहे याची मराठी वाचकांना कल्पना आहे का?

सचिनची पत्नी अंजली या सचिन बॅटिंग करताना गणपतीकडे बघतात, पाणी पितात वा ना पितात, खातात, नाही खात वगैरे.. किंवा सचिन चड्डीत होता तेव्हा ‘साहित्य सहवास’च्या काचा कसा फोडत होता.. किंवा मी लंडनमध्ये सचिनसोबत भोजन कसे घेतले (काय पदार्थ घेतले लिहिल्यास वाचून मराठी वाचकांची पोटे तरी भरली असती!) वगैरे वाचण्यात व ऐकण्यात अख्खा मनुष्यदिवस वाया घालवणे म्हणजे माणसाला गुहेतून आधुनिक संस्कृतीपर्यंत ज्यांनी आणलं अशा असंख्य, अज्ञात अनाम माणसांचा अपमान आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव वगैरे वगैरे पुढे भारतीय राजकारण्यांनी हे उद्योग करावे यासाठी फासावर गेले होते का? ‘इस्त्रो’ (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन)चे संशोधक पन्नास वर्ष जगापासून अज्ञात राहून या विश्वाच्या मूलतत्त्वाचा अभ्यास करतात. त्यांना त्यांच्या कारकीर्दीची वीस वर्ष पूर्ण झाली हे त्यांच्या धर्मपत्नीनेही सांगितलं नसेल! या वैचारिक दिवाळखोर समाजात सचिनचा देव झाला.

 

 

मग त्याने ‘मुंबई सर्वाचीच’ असं विधान केलं. ते स्वाभाविकच आहे. कारण आता उद्या सचिनला तुम्ही देव बनवून तुमच्या अॅपेंडिक्सबद्दल विचाराल व ऑपरेशन करायला सांगाल तर तो तुमचं स्वादुपिंड वेडंवाकडं फाडून ठेवणारच. तो ‘खेळ्या’ आहे, विचारवंत नव्हे. श्रीमंत असल्याने त्याला तुम्ही मान देता ते ठीकच. कारण पैशाचा मनुष्य हा लगेच दास होतो. पण सचिनला डॉ. आंबेडकरांना व जदुनाथ सरकारांना जे प्रश्न विचारायचे ते विचारलेत की हीच उत्तरं तो देणार. नशीब या विषयावर त्याचे चिमखडे बोल त्याने बोबडय़ा आवाजात काढले नाहीत. नाही तर त्याचंही कौतुक! सचिन स्वत:ला आंतरराष्ट्रीय अशा इमेजमध्ये ठेवू इच्छितो. त्यामुळे तो कधीच महाराष्ट्र धर्माचा होणार नाही. कारण डॉ. आंबेडकर आणि महर्षी कर्वे हे दोन ‘भारतरत्न’ अगोदरच मुंबई मराठी माणसाची आहे, असं म्हणून गेलेत. सचिन तर अजून ‘पद्मविभूषणच’ आहे! ग्लॅडिएटर म्हणूनही गांगुली आणि सचिन यात गांगुली श्रेष्ठ आहे. कारण तो जाणीवपूर्वक बंगाली माध्यमं व माध्यम प्रतिनिधींना अत्यंत जवळ ठेवतो. स्थानिक बंगाली चॅनल्स व भाषेतच जास्त करून बोलतो आणि शेवटी अकरा काय किंवा अकरा कोटी काय त्यांचा नेता बनणं हे मोठय़ा ग्लॅडिएरचं काम आहे. ते गांगुलीने यशस्वीपणे केलंय. सचिन कर्णधार म्हणून साफ आपटला. त्याचं स्मरण आपल्याला आहे का? की आपण मात्र तो मराठी म्हणून त्याचं हे सर्वात मोठं वैगुण्य लपवायचं? सचिनचं एक मला आवडतं. त्याला उकडीचे मोदक आवडतात. मला पण.

(भाग १, २७ नोव्हेंबर २००९ रोजी प्रकाशित)

 

अलकेमिस्ट्री ‘सचिन (स्वत:चा) तेंडुलकर’

सचिन दाबून कोलाच्या जाहिराती करत असताना गोपीचंद हा कोलकात्यातला बॅडमिंटनपटू याच कोला कंपन्यांच्या तोंडावर दार लावत होता आणि स्टीव्ह वॉ कोलकात्यातल्या गरीब मुलांसाठी झटत होता. सचिन तेंडुलकर या क्रिकेटरवर मी सचिन (ग्लॅडिएटर) तेंडुलकर नावाचा लेख या ‘अलकेमिस्ट्री’ या सदरात लिहिला. ज्यामुळे मी अपेक्षा केली होती त्याहूनही खूप मोठं वादळ माझ्याभोवती उठलं. नेटवर, सोशल नेटवर्किंग साइटस्वर, मेल्स, पत्रं, एसएमएस वगैरेंद्वारा मला सातत्याने प्रतिक्रिया येत राहिल्या. त्यातल्या खूप पाठिंब्याच्या होत्या. तेवढय़ाच खूप माझ्या व माझ्या लेखनाच्या तिरस्काराच्या होत्या. दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रियांमध्ये शहाणपणा आणि मला जे म्हणायचं होतं त्याविषयी नेमकी समज अल्पमतवाल्यांना होती. मला माझ्या बाजूने वा विरुद्ध प्रतिक्रिया असं वाचताना (मुळात लेखक असल्यामुळे) विभाजन करता येत नाही. प्रतिक्रिया असो वा एकंदरीतच लेखन असो. एक तर चांगलं समजदार असतं किंवा तसं नसतं. असं चांगलं समजदार वाचणं अल्पमतातलं होतं. मुळात माझा लेख हा महाराष्ट्र धर्मावरचा नव्हता, सचिनचं मूल्यमापन करणारा नव्हता, कोणत्याही प्रकारचा राग, लोभ, प्रेम, द्वेष यापासून अलिप्त राहून राज्य संस्था आणि समाज यांच्या शोकान्त शेवटाअगोदर वेगवेगळ्या रूपात ग्लॅडिएटर्सचं अवतीर्ण होणं व सत्ताधारी व धनिकवर्गाने मूळ समस्या, समाजाच्या मानवी व प्राकृतिक आनंद व दु:खापासून दूर नेऊन बहुजनवर्गाला गंडवण्यासाठी अशा ‘खेळ्या’ ग्लॅडिएटर्सची प्रतिमा ‘लार्जर दॅन लाइफ’ करणं, ही इतिहासाची पुनरावृत्ती असते. हाच माझ्या लेखाचा विषय होता. 

 

‘ग्लॅडिएटर’ हा सचिन तेंडुलकरचा जनुकीय पूर्वज आहे. धोनीचा किंवा गांगुलीचाही.

 

‘ग्लॅडिएटर’ हा सचिन तेंडुलकरचा जनुकीय पूर्वज आहे. धोनीचा किंवा गांगुलीचाही. या गाभ्याच्या मुद्दय़ामुळे जे मूर्तिभंजन होतं त्याला माझा नाइलाज आहे. ‘आयपीएल इंडियन्स’ किंवा तत्सम टीम नट वा उद्योगपतींनी विकत घेऊन त्यातून खेळाचं प्रदर्शन घडवणं व बहुजनांनी आपल्या आयुष्याचा निकड तक्ता विसरून ते बघत राहणं हे रोमन साम्राज्याच्या पतनाच्या वेळच्या ग्लॅडिएटर युगाचं पुढचं नवं तार्किक टोक आहे. माझ्या लिहिण्या – न लिहिण्याने त्यात काहीच फरक पडत नाही. असो. माझ्या लेखनावर विरुद्ध प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यात अरुंधती संजय जोशी, ह्य़ुस्टन, टेक्सास व विकास पालखेडकर यांच्या प्रतिक्रिया या प्रातिनिधिक म्हणून ‘लोकप्रभा’मध्ये संपादकांनी छापलेल्या आहेतच. यातल्या अरुंधती जोशी यांनी मला न आवडणारे मत सचिनने मांडल्यामुळे मी वैतागून गेलो असा तर्क मांडला आहे. तसे लेखात त्यांनी अनेक तर्क मांडलेले आहेत, पण सभ्यपणे मत व्यक्त करण्याचा सचिनचा अधिकार हा लोकशाहीचा आत्मा आहे, हे स्वीकारणे परुळेकरांना जड का जावे? असे त्या विचारतात. कमाल आहे! मी ‘अलकेमिस्ट्री’ या माझ्या सदरात माझ्या मते सभ्यपणे व्यक्त केले तो लोकशाहीचा आत्मा नव्हता का? की जोशीबाईंच्या मताशी सुसंगत मत मांडणे हाच लोकशाहीचा आत्मा आहे? म्हणजे जो आरोप त्या माझ्यावर करत आहेत त्याच्या त्या स्वत:च शिकारी आहेत! अमेरिकेत जाऊन भारतातल्या ‘लोकशाहीच्या आत्म्या’ची चिंता करताना या चुका क्षम्यच आहेत! पुढचा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. अरुंधती जोशीबाईंनी मला ज्यांच्याबद्दल आदर आहे त्या सामाजिक कार्यकर्त्यांवरही लिहावे असा उपरोधिक सल्ला, छोटे-मोठे नेते, सरकारी अधिकारी यांच्याविषयी मी लिहितोय् असा ‘टोमणा’ देऊन मला दिला आहे. मी माझ्या सचिनवरच्या लेखात लिहिताना त्याचा शेवट माझ्याही कारकीर्दीला पुढच्या वर्षी वीस वर्षे होतील. Unsung & unhonoured असं लिहिलं होतं ते नेमकं या कारणासाठीच होतं. हा मुद्दा त्यामुळे ऐरणीवर येईल याची मला ती वाक्यं लिहिताना (माझ्या काही चाहत्यांनाही ती वाक्यं अनाकलनीय वाटली होती.) खात्री होतीच.

 मी ‘संवाद’ नावाच्या कार्यक्रमाचे ३५०० भाग केले. माणसं भेटलेली, न भेटलेली नावाचं पुस्तक लिहिलंय. त्या दोन्हींमध्येही अभय-राणी बंगपासून प्रकाश-मंदा आमटेंपर्यंत (तिथे जाऊन) व याव्यतिरिक्त अक्षरश: शेकडो अज्ञात सामाजिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक, राजकीय उपेक्षित क्षेत्रात काम करणाऱ्या शेकडो माणसांवर मी लिहिलंय्. मुलाखतीही घेतल्या आहेत, पण मी ‘खेळ्या’ किंवा ‘ग्लॅडिएटर’ नसल्याने त्याची नोंद जोशीबाईंकडे कशी असणार? माझं काम काही सिडनीवर सेंच्युरी मारण्याच्या, रेकॉर्ड ठेवण्याच्या तोलाचं थोडंच आहे? माझ्या स्वत:बद्दलच्या ‘Unsung & unhonoured’ या ओळी या स्वत:च्या कारकीर्दीविषयी नव्हत्याच. तर आपण मानवी उत्क्रांतीत समाज म्हणून ‘खेळ्या’ आणि ‘ग्लॅडिएटर्स’ची रेकॉर्डस् ठेवतो. त्याच वेळी ज्या गोष्टींची रेकॉर्डस् ठेवायला पाहिजेत, त्याची विल्हेवाट लावतोय हे ‘डिक्लाइन अॅेण्ड फॉल ऑफ रोमन एम्पायर’शी साम्यस्थळ मला दाखवून द्यायचं होतं. जोशीबाईंनी आपसूकच ते माझं काम ते लिहून केलं. हल्ली मी छोटे-मोठे राजकारणी व सरकारी अधिकारी यांच्यावर (बहुधा योगायोगाने) लिहितो. असं लिहून माझ्यावर एक छुपा वार (अमेरिकेतून) जाता जाता केलाय. आत्तापर्यंत मी लिहिलेल्या छोटय़ा-मोठय़ा नेत्यात बंटी आव्हाड, राधाकृष्ण विखे-पाटील, सुनील तटकरे आणि सनदी अधिकारी मनीषा म्हैसकर ही मोजून चार मंडळी येतात. (पुढे अजून भर पडेल या नावात) या चारही जणांच्या आयुष्यात शून्यातून यशाकडे झेपावण्याची वृत्ती, रस्त्यावरून धोरण बनविणाऱ्यांपैकी एक बनणं किंवा तोंडात सोन्याचा चमचा असतानाही संघर्ष करण्याचे गुण मला मित्र म्हणून दिसले. ही माणसं राजकारणी व सनदी अधिकारी असल्यामुळे त्यांच्यावर लिहू नये असा ‘लोकशाहीचा आत्मा’ सांगतो का? ह्य़ुस्टन, टेक्सास अमेरिकेचं ते लोकशाहीच्या आत्म्याचं आमच्या आत्म्यालाही कळवा तसं असेल तर.. शिवाय या चारांच्या तुलनेत ज्या शेकडो-हजारो उपेक्षितांवर मी लिहिलंय, त्यांच्या मुलाखती घेतल्यात ते कुठे गेलं? हा लेखक, शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत किंवा ग्लॉडिएटर नसलेल्या कुणालाही पतन होणाऱ्या समाजात लागलेला शाप असतोच. त्याला मी अपवाद नाही. त्यातच मला आनंद आहे. 

मला माझ्या कारकीर्दीत मी काय केलंय हे ज्ञातही नसलेल्या व्यक्तीकडून मला अभिनंदन व शुभेच्छांचे ‘कैलास जीवन’ नको आहे. शक्य झाल्यास हा समाज पतनाच्या शेवटच्या टप्प्यावर आहे हे कळावे म्हणून मी लिहितो. उद्या या समाजाचा मोहोजोदरो झाल्यावर अमेरिकेतल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाला माझं लेखन हे गोडसे भटजींच्या रोजनिशीप्रमाणे मध्ये ठेवून समया पेटवायला व नंतर फ्युजन व लावणीचा थाट उडवायला सोपे जावे म्हणून दुनियेच्या शिव्या खाऊन मी हा लेखनप्रपंच करतो आहे! अरुंधती जोशी ह्य़ुस्टनमधून माझ्या नित्य बैठकीतल्या राजकारण्यांवर ‘नजर’ ठेवून आहेत हे वाचून मन फार सुखावते. पण माझ्या बैठकीतल्यांनी वाढदिवस साजरे करावे वा नाही याबद्दल मी स्पष्टपणे (मागच्या अंकात तटकरेंवरच्या लेखातही) लिहिलेले आहे. या उपर ‘लोकशाहीचा आत्मा’ म्हणून काही आहे की नाही? आँ? दुसरे लेखक पालखेडकर माझी सचिनबाबतची जळफळाटी वृत्ती हीच माझ्या त्या लेखाची मूळ प्रेरणा आहे, असं मानतात. याला त्यांनी काही तर्क दिलेला नाही.

 

मी लिहून कुणाला सचिनवर प्रेम करायला बंदी घ्यालायला आयातुल्ला खोमेनी नाही.

 

माझा श्रीमंतांना विरोध नाही. माझा श्रीमंतीला विरोध नाही. माझा प्रसिद्धीला विरोध नाही. मी क्रिकेटर नव्हतो. मला सहा वर्षांची मुलगी आहे. ती वा माझी पत्नी आता पुरुष क्रिकेटर होऊ शकत नाहीत. श्रीमंत, प्रसिद्ध ज्याचे बरे चाललेले आहे, असे असंख्य जण माझे जगभर मित्र आहेत, तर मी सचिनवरच का जळफळाट करीन? सचिनचे वडील रमेश तेंडुलकर व माझा खूप नसला तरी बऱ्यापैकी स्नेह होता. ते मला वडिलांसारखे असूनही मित्राप्रमाणे वागलेले आहेत तेव्हा मी पोरसवदा असलो तरी मी त्यांना विसरू शकलेलो नाही. असं असताना मी सचिनवर जळफळाटाने का लिहावं? मी लिहून कुणाला सचिनवर प्रेम करायला बंदी घ्यालायला आयातुल्ला खोमेनी नाही. मी जे लिहिलेलं आहे त्यातला सत्याचा चटका न टळण्याजोगा असल्याने त्यापासून दूर पळण्याकरिता पालखेडकरांनी अतार्किक असे बेबंद आरोप माझ्यावर केलेले आहेत. त्यांच्या लेखातला एकच मुद्दा खरा आणि वास्तविक आहे. मी महाराष्ट्रात जन्माला आलो. स्वत:च्या गोतास काळ ठरणारी आणि तिला त्या तिच्या अवस्थेबद्दल जागं करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला दूषणं देणारी पालशेतकरांसारखी वा जोशीबाईंसारखी थोर लोकं ज्या भूमीत आहेत त्या भूमीत जन्म घेतला त्या दिवशीच माझा कम्लिट पोपट झालाय. पालखेडकरांच्या माहितीसाठी सांगतो, की माणसाचा एका जन्मात एकदाच पण कायमचा पोपट झाला की पुन्हा पोपट होत नाही. त्यामुळे वेगळ्या कारणाने का होईना पालखेडकरांचा माझा पोपट झाल्याचा मुद्दा खरा आहे. पण त्यांनी हे लक्षात ठेवावे की, एकदा पोपट झाला की, कायमचाच. दुसऱ्यांदा चान्स नाही! इत:पर मी खूप मनमोकळेपणाने माझ्या विरोधातल्या प्रतिक्रियांची मस्ती वाचली. 

 

 

त्यावर सचिन व तो जे बोलला त्या अनुषंगाने जरा लिहितो. सचिन तेंडुलकर भेट म्हणून मिळालेली परदेशी गाडी आपल्या प्रसिद्धीद्वारे व वजन वापरून त्यावरील कर माफ होतो का यासाठी अथक प्रयत्न करणारा ग्लॅडिएटर म्हणजे गाडीची कस्टम डय़ुटी माफ करण्याचं त्याला कळतं. पण मुंबई महाराष्ट्राची हे बिचाऱ्याला कळत नाही. तो कर त्याने तात्काळ भरला असता तर निदान मराठी नाही तर चांगला भारतीय ग्लॅडिएटर म्हणून त्याला मानला असता. कारण तो जन्माने मराठी असला तरी त्याने भरलेल्या कराचा मोठा हिस्सा उत्तर प्रदेश, बिहारसारख्या गरीब राज्यांनाच मिळणार होता. म्हणजे मुंबई भारताचीच म्हणण्याचा त्याला अधिक हक्क तरी मिळाला असता. गंमत म्हणजे सचिन जेव्हा आपल्या भेट म्हणून मिळालेल्या गाडीवरचा कर टाळण्यासाठी खटपटी लटपटी करीत होता तेव्हा ऑस्ट्रेलियाचा कप्तान स्टीव वॉ हा कलकत्यामध्ये गरीब मुलांना दत्तक घेण्यासाठी आला होता. स्वत:च्या पदरचे पैसे खर्च करून भारतीय मुलांना तो दत्तक घेत होता तेव्हा ऑल इंग्लंड बॅटमिंटन टुर्नामेंट जिंकलेल्या गोपीचंद या बॅडमिंटनपटूकडे कोला कंपन्या त्याने त्यांच्या जाहिरातीत काम करावं म्हणून खेटे घालत होत्या.

 

 

गोपीचंदने त्यांची ‘‘कोणत्याही प्रकारच्या कोला हा मानवी आरोग्याला निर्धोक असतो हे सिद्ध न झाल्यामुळे सामाजिक जबाबदारी म्हणून मी लोकांना जाहिरातींद्वारे कोला प्या असं सांगणार नाही, असं विधान करून स्वत:चं कोटय़वधी रुपयांचं नुकसान करून घेतलं. तेव्हा सचिन दाबून कोला कंपन्यांशी करार व त्यांच्या जाहिराती करीत होता. खेळात असो वा मराठी माणसात असो सचिन ‘आय माय मायसेल्फ’व्यतिरिक्त कशालाच कमिटेड नसतो. त्यामुळे त्याचं विधान तसं गंभीरपणे घ्यायला नको खरं तर (मी ते घेतलंही नव्हतं) पण सचिन पागलांनी ते इतक्या गंभीरपणे घेतलंच आहे तर जरा आता ते तपासून पाहू. ‘‘मी महाराष्ट्रीय असल्याचा मला अभिमान आहे. मुंबई भारताची’’ या वाक्याचा अर्थ काय? मला महाराष्ट्रासाठी १०६ वा हुतात्मा व्हायला आवडेल असं कृपाशंकर सिंह नेहमीच म्हणतात. (पण त्या दृष्टीने ते प्रयत्न करताना दिसत नाहीत) तद्वतच सचिनला मराठी असण्याचा अभिमान असेल तर मुंबईसाठी १०५ लोकांनी प्राणाचं बलिदान आणि डॉ. आंबेडकरांपासून ते एसएम, डांगे, बादल, नाना पाटलांपर्यंत व आचार्य अत्रेंच्या त्यागातून मुंबई महाराष्ट्राचीच हे साकार झालं हे त्याने मान्य करायलाच हवं. तो आपला आहे हे अनेक मराठी लोक मानतात. तो हे मानत नाही व हे मराठीपण तो बाणेदारपणे अंगाला चिकटवून घ्यायला तयार नाही हे त्याची विधानं दर्शवितात. शिवाय तो ‘आपला मराठी’ असेल तर त्याचा गुन्हा अधिकच गंभीर आहे. 

दुसऱ्या महायुद्धात मुसोलिनीला सत्ताभ्रष्ट करण्यात आलं तेव्हा हिटलरने त्याला शोधून काढून पुन्हा इटलीचा डय़ूक बनवलं. मुसोलिनी सत्तेवर परत आल्यावर त्याला सत्ताभ्रष्ट करणाऱ्या सर्वाना ठार करण्याचं हिटलरने ठरवलं. त्यात एक होता मुसोलिनीचा लाडका जावई आणि इटलीचा तत्पूर्वीचा परराष्ट्रमंत्री काऊंट सियानो. (याच्या डायऱ्या जगप्रसिद्ध आहेत.) मुसोलिनीच्या मुलीचा तो नवरा. तो माझाच आहे. त्याला आपण सोडून देऊ या अशी रदबदली मुसोलिनीने हिटलरकडे केली. तेव्हा हिटलर म्हणाला, ‘‘त्याला तर आधी गोळ्या घालायला हव्यात. कारण तो तर आपला होता. इतर तर परकेच आहेत.’’ पुढे काऊंट सियानोलाच प्रथम गोळ्या घालण्यात आल्या. तर मुद्दा हा की, कृपाशंकर सिंह, संजय निरुपम, रवी किशन, अमिताभ बच्चन, मनोज तिवारी, जया बच्चन, अबू आझमी हे तर परकेच आहेत. सचिन तर आपला होता ना? मग तर त्याने विश्वासात मराठीची मान कापली. माझ्या मते (लोकशाहीचा आत्मा!) महाराष्ट्राला सचिन तेंडुलकरला यासाठी कधीच माफ करता येणार नाही. आता मुद्दा राहिला श्रीमंतीचा. कोणत्याही क्षेत्रातला माणूस (मग तो ‘खेळ्या’ वा ‘ग्लॅडिएटर’ का असेना) कितीही कुशलता असली तरी तो अतिश्रीमंत होण्यासाठी त्याच्या काळाने त्याला साथ द्यावी लागते. त्याच्या काळात त्याच्या क्षेत्राविषयी जनतेची जाणीव, तंत्रज्ञांचे कसब, माध्यमांची साथ, परिसराचा विकास व व्यापकता (त्या क्षेत्राविषयीची) हीच माणसाला अतिश्रीमंत करते. (एकनाथ सोलकर कुठे श्रीमंत झाले?) त्यामुळे मर्यादेपलीकडचा सचिनसारखा धनी हा त्या धनाचा विश्वस्त असतो. ही जाणीव पु. ल. देशपांडे फाऊंडेशन काढणाऱ्या पुलंना होती. अमेरिकेत तर वॉरेन बफे वा बिल-मेलिंडा गेटस यांची वा रॉकफेलर, फोर्ड यांची फाऊंडेशन उभी राहतात ती याच भावनेतून. भारतात टाटांना ही जाणीव होती. अनेक क्षेत्रातल्या अनेक संस्था त्यांनी या जाणिवेतून उभ्या केल्या. त्यांच्या समकालीन बिर्ला यांनी मंदिरे बांधली. त्यात जाऊन लोक घंटा वाजवतात. सामाजिक बांधिलकीही हेमलकशातच दाखवता येते असं नाही. (स्टीव वॉ हे एक उदाहरण आहेच.) या उपरही माझा हा सचिनविषयीचा जळफळाट असेल तर त्याच्या भक्तांनी त्याचे ‘भारताच्या मुंबईत’ एक मंदिर बांधावे. मग माझ्यासारखे तिथे घंटा वाजवत बसतील. दुसरं काय? यावर सचिनची थातुरमातुर सामाजिक कार्ये कृपया कुणी लिहू नयेत ही विनंती.

 

येशू ख्रिस्ताला मारण्याचा व त्याऐवजी दरोडेखोराला सोडण्याचा निर्णय हा बहुमताने झाला होता.

 

येशू ख्रिस्ताला मारण्याचा व त्याऐवजी दरोडेखोराला सोडण्याचा निर्णय हा बहुमताने झाला होता. तुकोबाच्या गाथाही बहुमताने बुडवण्यात आल्या होत्या. त्यांना स्मरून मी सचिनची देवगिरी ही जाणीवपूर्वक भंजन करीत आहे. येशूने देवळांची दुकाने तोडली होती. तुकोबाने तर म्हटलेलेच आहे, सत्य आणि बहुमताचा काय संबंध? सत्या असत्यासी मन केले ग्वाही। मानियेले नाही बहुमता।। (हेच मी आज करतो आहे.) ज्या येशूने जेरूसलेममध्ये देवळांची दुकानं तोडली होती त्या येशूचा पुढे धर्म झाला आणि ‘लोकशाहीचा आत्मा’ असलेल्या अमेरिकेच्या राजकारणात बॉबी जिंदाल या भारतीयाला एका मर्यादेपलीकडे पुढे जाण्यासाठी तोच ख्रिस्ती धर्म आज स्वीकारावा लागतो हा पराभव की पतन? दोन हजार वर्षांनंतर मी नसेन. सचिनही नसेल. पण तेव्हा सामाजिक पतनाचा द्योतक ‘ग्लॅडिएटर खेळ्या’बरोबर ठरतो की, ‘मूर्तिभंजक लेखकाबरोबर ठरतो हे इतिहासावरून आपल्याला कळू शकतं. एऽऽ तोंड कोण लपवतंय ते? आँ? मी आकाशाकडे बोट दाखवतोय. ज्यांना आकाश बघायचं आहे ते आकाश बघतील. उरलेले माझ्या बोटातले दोष काढतील.

(दुसरा भाग, ५ डिसेंबर २००९ रोजी प्रकशित)