Americas

राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्यातली मांडणी

काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.

Credit : इंडी जर्नल

 

काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांच्या आठवडाभर लांब दौऱ्याच्या पहिल्या तीन दिवसात त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी एक पत्रकार परिषद घेतली व दोन भाषणं दिली. यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या भारत जोडो यात्रेचे अनुभव, त्यातून शिकलेल्या गोष्टी, मोदी सरकारची कार्यपद्धती, त्यांची भारताची संकल्पना, भारताचं परराष्ट्र धोरण आणि इतर बऱ्याच गोष्टींवर स्वतःचं मत मांडलं.

 

'नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान'

कॅलिफोर्निया इथं अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांचा मुख्य भर भारत जोडो यात्रेवर राहिला या कार्यक्रमाचं नावसुद्धा 'नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान' असं ठेवण्यात आलं होत. पदयात्रेची पार्श्वभूमी सांगताना त्यांनी त्यांना आलेल्या अनुभूतीचा खुलासा केला सध्या वापरली जाणारी संवादाची माध्यमं, जसं की जनसभा किंवा भाषणं निरुपयोगी ठरत असल्याचं ते म्हणाले. लोकांना भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करून घाबरवत आहे. 

"त्यामुळे राजकीय साधनं वापरणं अवघड झालं आहे, हे आमच्या लक्षात आलं. भारतात वापरली जाणारी संवादाची माध्यमं भाजप आणि आरएसएसच्या ताब्यात आहेत. त्यामुळं लोकांपर्यंत पोहचण्यासाठी वेगळ्या मार्गाचा अवलंब करण्याची आवश्यकता असल्याचं आम्हाला जाणवलं आणि त्यातून आम्ही भारत जोडो यात्रा काढली," असं ते म्हणाले.  

"सरकारच्या हातात जेवढी काही ताकद होती, त्यांनी या यात्रेला थांबवण्यात लावली, पोलीस यंत्रणा वापरली, बातम्यांमधून काढून टाकलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही, त्याच कारण म्हणजे तुम्हा सर्वांचा पाठिंबा मला मिळाला तुम्ही समाज माध्यमांवर याबद्दल चर्चा केली, कारण ही भारत जोडो यात्रा ही संकल्पना तुमच्या हृदयात सुद्धा आहे," असं गांधी म्हणाले.

 

 

या कार्यक्रमात एसजेएफ या शीख फुटीरतावादी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली आणि खलिस्तानच्या मागणीत आणि गांधीपरिवाराविरोधी घोषणा दिल्या. राहुल गांधींनी या घोषणांकडे दुर्लक्ष करत प्रश्नांची उत्तरं देणं सुरु ठेवलं. 

"आमच्याबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसला सगळ्यांबद्दल आपुलकी आहे जर कोणाला काही बोलायचं असेल तर मनात कोणतीही शंका न बाळगता पुढं येऊन बोलू शकता आम्ही रागावणार नाही, आक्रमक होणार नाही. आम्ही त्याच बोलणं ऐकून घेऊन, शिवाय आम्ही त्यांच्याबद्दल आपुलकी ठेऊ कारण तो आमचा स्वभाव आहे," असं या घोषणांनंतर बोलताना गांधी म्हणाले. त्यांनी नंतर शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या उदासी भारत जोडो यात्रेची प्रेरणा असल्याचंही सांगितलं. याशिवाय त्यांनी गुरु नानक, बसवण्णा आणि नारायण गुरु यांच्या शिकवणी या यात्रेच्या प्रेम आणि आपुलकीच्या संदेशापेक्षा वेगळ्या नसल्याचं म्हटलं.

त्यांनी या भाषणात त्यांची भारताबद्दलची संकल्पना मांडली. यात भारत म्हणजे अनेक स्तरांवर सुरु असलेल्या वाटाघाटी असल्याचं म्हटलं. राहुल यांनी त्यांच्या या संकल्पनेचा पुनर्रुचार अमेरिकेच्या नॅशनल प्रेस क्लबमध्ये झालेल्या मुलाखतीतही केला. भारतामध्ये जगभरातून अनेक विचार आणि संकल्पना आल्या. त्यावर भारतात चर्चा झाली त्यात संवाद केल्यानंतर त्या सर्व संकल्पना आणि विचार भारतानं आत्मसात केले हेच भारताचं वैशिष्ट्य आहे, असं ते म्हणाले. याबद्दल पुढं बोलताना त्यांनी भारतीय संघराज्य पद्धतसुद्धा याचंच प्रतिक असल्याचं म्हटलं. 

तामिळ ही फक्त भाषा नसून ती संस्कृती, इतिहास आणि जीवनपद्धती आहे. भारतीय संघराज्य व्यवस्था हे वेगळेपण जपते मात्र भाजप आणि आरएसएस ही मूल्य जपत नाही. तरीही, भारतात कोणावरही कोणतीही भाषा लादली जाणार नाही, असं आश्वासन राहुल यांनी दिलं. भारतात भाजपकडून होणार हल्ला आपल्या जीवनपद्धतीवर, एकतेवर आणि समानतेवरचा हल्ला आहे, असं ते म्हणाले. याशिवाय स्त्रीसमानता, अल्पसंख्यांकांचे अधिकार जपण्यासाठी, देशातील आर्थिक दरी कमी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले. 

याशिवाय त्यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. आपल्याला सर्व कळतं या अविर्भावात कोणी राहू नये. एकाला सर्व काही कळण्या आणि समजण्यासाठी जग खूप मोठं आणि गुंतागुंतीचं आहे. भारतात अशी काही माणसं आहेत, ज्यांना सगळं माहित असण्याबद्दल काडीमात्र संशय नाही. बहुतेक त्यांना वाटत की त्यांना देवापेक्षा जास्त माहित आहे. ते देवाबरोबर बसून चर्चा करू शकतात आणि देवाला काही गोष्टी समजावू शकतात त्यात नरेंद्र मोदी एक आहेत. तुम्ही जर मोदीजींना देवासमोर बसवलं तर ते देवाला विश्व कसं चालतं हे सांगतील आणि देवाला स्वतःच्या निर्मितीवर विश्वास बसणार नाही. पण सध्या हेच सुरु आहे. ते शास्त्रज्ञाला विज्ञान, इतिहासकाराला इतिहास, सैन्याला युद्ध शिकवू शकतात. पण सत्य असं आहे की त्यांना काहीच कळत नाही, नरेंद्र मोदींची टीका करताना राहुल गांधी म्हणाले. 

भारतातील आणि जगातील विषमता कमी करण्यासाठी काय करणार असा प्रश्न विचारला असता राहुल गांधी म्हणाले, "आम्ही सरकारमध्ये असताना जातीनिहाय जनगणना केली होती. भारताच्या समाजाचा एक्स रे काढायचा हा त्या मागचा विचार होता. भारताच्या लोकसंख्येची रचना कशी आहे, कोणते समाज आहे, जाती आहेत, त्यात किती लोकं आहेत, हे त्यातून शोधायचं होतं. जोपर्यंत कोण कोण आहे हे कळल्याशिवाय संपत्तीचं आणि शक्तीचं वितरण होणार नाही. आम्ही भाजपवर त्यासाठी दबाव बनवत आहोत, आम्हाला देशाला एक न्याय्य समाज बनवायचं आहे, सध्याचा भारत एक न्याय्य प्रदेश नसल्याचा अंदाज आम्हाला आहे."  

 

पत्रकार परिषद

दुसऱ्या दिवशी त्यांनी अमेरिकेच्या नॅशनल प्रेस क्लबतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. 

"असे प्रश्न नरेंद्र मोदींना विचारता येणार नाहीत," असा टोलाही त्यांनी लगावला. या चर्चेत त्यांनी त्यांच्या आणि भाजपच्या विचारसणीतील भेद स्पष्ट केला, देशासमोर असलेले खरे प्रश्न अधोरेखित केले, काँग्रेसच्या परराष्ट्रीय धोरणावर प्रकाश टाकला शिवाय काश्मीर प्रश्न, अर्थव्यवस्थेची स्थिती, जगातील डिजिटल रेव्होल्यूशन, त्याचे परिणाम अशा इतर अनेक विषयांवर स्वतःच मत व्यक्त केलं.

 

 

भारताच्या अर्थव्यवस्थेत महागाई आणि बेरोजगारी हे मुख्य मुद्दे असून या मुद्द्यांच्या जोरावर आम्ही कर्नाटकात बाजी मारली असल्याचं ते म्हणाले. "भारतानं गेल्या ९ वर्षात आर्थिक प्रगती केली आहे असं म्हटलं जात असलं, तरी सध्या भारतात गरीब श्रीमंतातील दरी वाढत असून भारताची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत नाही," गांधी म्हणाले. 

"यामागे मुख्य कारण म्हणजे भाजप सरकार हे केंद्रीकरणासाठी प्रयत्न करत आहे. देशात फक्त २-३ मोठे उद्योजक असले पाहिजेत आणि तेच सर्व काही निर्माण करतील, असा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र भारताची अर्थव्यवस्था ही लघु आणि मध्यम उद्योगांच्या जोरावर चालते," असं ते म्हणाले. 

याशिवाय राहुल गांधींनी त्यांच्या लंडन इथं केलेल्या व्यक्तव्याचं स्पष्टीकरण दिलं. 

"मी भारतीय लोकशाहीत परकीय हस्तक्षेपाचा मागणी केली नाही. भारतात लोकशाही जपणं ही आमची जबाबदारी असून त्यासाठी आम्ही आमचा लढा सुरु ठेवणार आहोत, पण भारतात लोकशाहीबद्दल जे काही घडेल त्याचे परिणाम जगभर होतील आणि जगानं याची जाणीव ठेवली पाहिजे एवढंच मी बोललो असल्याचं त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं. तसंच त्यांनी रशिया युक्रेन युद्धावर भारत सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला. "भारताचे रशियाशी चांगले संबंध असून भारत आपल्या नागरिकांच्या फायद्यात असलेले योग्य ते निर्णय घेतले पाहिजेत. काँग्रेस सरकारचीही काही प्रमाणात अशीच भूमिका राहिली असती," असं ते म्हणाले. 

याशिवाय परराष्ट्र धोरणाबद्दल बोलताना जेव्हा त्यांना अमेरिकेच्या मोदी सरकारशी वाढत्या संबंधाबद्दल विचारणा केली असता हा अमेरिकी सरकारचा प्रश्न असून मी अमेरिकेनं किंवा बायडन सरकारनं काय करावं किंवा काय करू नये याबद्दल त्यांना सल्ला देऊ शकत नसल्याचं ते म्हणाले. त्यावेळी त्यांनी भारत आणि चीनच्या सीमावादावर चिंता व्यक्त केली. 

याशिवाय भारतात लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता, आर्थिक न्याय पुनर्स्थापित करण्यासाठी पत्रकारितेचं स्वातंत्र्य पुन्हा बहाल करणं, भारताची संघराज्य व्यवस्था पुन्हा विकेंद्रीकृत करणं, संपत्तीचा योग्य वाटप कारण, लघु आणि मध्यम उद्योगांना पुन्हा चालना देणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी नोंदवलं. भारताला चीनच्या विकासाच्या मॉडेलचा पाठलाग करायची गरज नसून आम्ही स्वतःसाठी विकासाचं तंत्रज्ञान आणि निर्यातीवर आधारित वेगळं मॉडेल निर्माण करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

स्टॅनफर्ड विद्यापीठातील भाषण

त्यानंतर स्टॅनफर्ड विद्यापीठात झालेल्या भाषण आणि मुलाखतीत आधीच्या दोन्ही चर्चांमधील अनेक बाबींचा उल्लेख झालाच. मात्र त्याचबरोबर यात राहुल गांधींनी सत्याच्या शक्तीवर दिलेलं भाषण आणि मुलाखतीदरम्यान जगातील बदलाचा काळ, डेटा, समाज माध्यमं, चीनचं विकासाचं मॉडेल, पाश्चिमात्य आणि भारतीय अर्थव्यवस्थेनं उत्पादनाकडे केलेल्या दुर्लक्षाचे परिणाम हे मुद्दे मुख्य आकर्षण ठरले. त्यांच्या भाषणाची सुरुवात त्यांनी अब्रुनुकसानीच्या खटल्यात त्यांना देण्यात आलेल्या शिक्षेपासून केली. अब्रुनुकसानीच्या खटल्यात पूर्ण शिक्षा मिळणारे ते पहिले भारतीय असल्याचं राहुल म्हणाले.

 

 

 

भारत जोडो यात्रेदरम्यान राजकारण आणि लोकांमध्ये संवादाचा अभाव असल्याची जाणीव त्यांना झाली, असं गांधी सत्याच्या शक्तीबद्दल त्यांचं मत व्यक्त करताना म्हणाले. "मी जेव्हा चालायला सुरुवात केली तेव्हा मला राजकीय शक्ती आणि सामर्थ्य यातील फरक जाणवला. राजकीय शक्ती ही कल्पनेतून तयार होते. सामर्थ्य मात्र इतकं सरळ नाही. ते तुम्ही सत्याच्या जवळ आल्यानंतरच तुम्हाला मिळतं असं मला वाटतं." ते म्हणाले महात्मा गांधींनी काढलेला दांडी मार्च आणि ब्रिटिशांविरोधात दिलेला स्वातंत्र्यासाठीचा लढा किंवा अमेरिकेचा ब्रिटिशांविरुद्धचा स्वातंत्र्यलढा हा या सामर्थ्याचं प्रतिक आहे. 

या विद्यापीठात झालेली चर्चा ही राजकीय कमी आणि तत्त्ववादी जास्त होती. यात सध्या जगात आलेली क्रांती ही मोबिलिटी, ऊर्जा आणि कनेक्टिव्हिटी या क्षेत्रात आली असून अशीच क्रांती आपण २० व्या शतकाच्या सुरुवातीला पाहिली ज्याचा परिणाम म्हणजे दोन विश्व युद्ध होती, असं राहुल गांधींनी निदर्शनास आणलं. सत्तेचा जनमानसाशी तुटलेला संपर्क संपत्तीचं केंद्रीकरण आणि असमानता सध्या जगासमोर मोठं आव्हान आहे, असंही ते म्हणाले. राजकारणाला तंत्रज्ञानाशी जुळवून घेता आलं नसून सत्तेतील लोकांचं तंत्रज्ञानावर अधिक नियंत्रण असल्यानं विरोधी पक्षांना त्याचा फायदा घेता येत नाही, त्यातून लोकशाहीसमोर आव्हान उभं राहत असल्याची खंत राहुल यांनी व्यक्त केली. 

याशिवाय चीनच्या मॉडेलचं आंधळं अनुसरण "माझ्या देशाला करायचं नाही, आमचं उत्पादनाचं मॉडेल चीनसारख्या केंद्रीय मोठ्या कारखान्यांवर नाही तर विकेंद्रित लघु आणि मध्यम उद्योगांवर आधारित असेल" राहुल म्हणाले. दुर्दैवानं पाश्चिमात्य देश आणि भारत उत्पादन विसरले असले तरी डेटा आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण नव्यानं सुरुवात करू शकतो. सध्या डेटा जास्त महत्त्वाचा असून भारत त्याचं केंद आहे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.