India

पुण्यात नदीसुधार विरोधी आंदोलनकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

पुण्यातील नागरिक आणि संस्थांनी नदीसुधार प्रकल्पाविरोधात तसंच पुण्यातील अनेक समस्यांसाठी आंदोलन पुकारलं होतं.

Credit : इंडी जर्नल

 

पुणे महानगरपालिकेसमोर पुण्यातील नागरिक आणि काही संस्थांनी एकत्र येऊन बुधवारी पुणे नदीसुधार प्रकल्पाविरोधात तसंच पुण्यातील अनेक समस्यांसाठी आंदोलन पुकारलं होतं. मात्र या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्ते आणि पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. आंदोलनाला राजकीय स्वरूप प्राप्त होऊ नये म्हणून आंदोलन करणाऱ्यांनी राजकीय कार्यकर्त्यांचा आंदोलनातील सहभागाचा निषेध केला. तर पक्षाचं नाव घेऊन अपशब्द वापरत अंगावर आलेल्या आंदोलनकर्त्यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मागे ढकललं, असं  झालेल्या प्रकाराचं स्पष्टीकरण काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिलं आणि त्याबद्दल खेद व्यक्त केला.

पुणे महानगरपालिकेनं नदीसुधार प्रकल्पाअंतर्गत पुणे शहरातील ४४ किलोमीटर नदीकाठावर सुशोभीकरणाच्या नावाखाली काँक्रेटीकरण करण्याचा घाट घातला आहे. या प्रकल्पाला सामान्य नागरिक, पर्यावरणतज्ज्ञ आणि विषयातील जाणकारांकडून विरोध होत आहे. या प्रकल्पासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असतानादेखील पुणे महानगरपालिका या प्रकल्पाला थांबवण्याच्या विचारात नाही. काही महिन्यांपूर्वी या प्रकल्पाविरोधात जनतेकडून मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र महानगरपालिकेकडून याची विशेष दखल घेतली गेली नाही.

या पावसाळ्यात पुण्याच्या रहिवाशांना रस्त्यावरील खड्डे, अपुरा पाणी पुरवठा, विस्कलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अशा बऱ्याच प्रश्नांना सामोरे जावं लागत असताना महानगरपालिका हे प्रश्न सोडवायचं सोडून नदीसुधार प्रकल्पासारख्या अनावश्यक प्रकल्पांवर खर्च करत आहे. शिवाय हाती असलेले प्रकल्प पूर्ण करायचं सोडून नवनवीन प्रकल्प हाती घेत आहे. या विरोधात आज पुणे महानगरपालिकेसमोर काही नागरिकांकडून पालिकेविरोधात आज सकाळी १० वाजता आंदोलन करण्यात आलं.

 

 

या आंदोलनाला राजकीय स्वरूप प्राप्त होऊ नये, अशी आंदोलनातील काही नागरिकांची भूमिका होती. मात्र शहरासाठीचे महत्त्वाचे विषय घेऊन नागरिक महानगरपालिकेपुढं जात असल्यानं या आंदोलनात काही राजकीय पक्षांनी सहभाग दर्शवला होता. यात आम आदमी पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी सहभागी झाले होते. या आंदोलनाचं आयोजन करणाऱ्या काही नागरिकांकडून या संदर्भात निषेध व्यक्त केला गेला. आंदोलनस्थळी उपस्थित एका व्यक्तीनं उपस्थित राजकीय कार्यकत्यांवर 'तुम्ही तुमच्या पोळ्या भाजून घ्यायला आला आहात', असा आरोप केल्याचं एका आंदोलनकर्त्यानं सांगितलं.

यावरून काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि आंदोलनात सहभागी काही नागरिकांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि नंतर आंदोलनात सहभाग न घेता निघून गेले.

 

काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचं स्पष्टीकरण

शिंदे यांनी घडलेल्या घटनाक्रमावर त्यांची भूमिका स्पष्ट केली. "या नागरिकांकडून अनेक दिवसांपासून नदी सुधार प्रकल्प आणि बालभारती ते पौड फाटा रस्त्याला विरोध केला जात आहे. त्यासाठी त्यांनी यापूर्वीही आंदोलनं केली आहेत. आम्ही त्यावेळी त्यांच्या आंदोलनाला सहभाग घेतला होता. यावेळी झालेल्या आंदोलनासाठीदेखील आमच्या भागातील जोशी बाई यांनी आम्हाला आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. त्यानुसार आज काँग्रेस भवनला झालेल्या ऑगस्ट क्रांती दिनाच्या कार्यक्रमानंतर आम्ही या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेलो होतो," शिंदे सांगतात.

पुढं त्यांनी झालेल्या वादाचं कारण स्पष्ट केलं, "तिथं आंदोलनात सहभागी झाल्यानंतर कुठंही कोणत्याही प्रकारे पक्षाचा संबंध आला नाही. तिथं आम्ही पक्षाचा झेंडा घेऊन गेली नव्हतो किंवा पक्षाच्या कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नाहीत. आम्ही तिथं वैयक्तिक पातळीवर गेलो होतो, पक्षाचे प्रतिनिधी म्हणून नाही. मात्र तिथं आंदोलन करणाऱ्यांपैकी कोणीतरी एकानं माईक घेऊन अपशब्द बोलायला सुरुवात केली. त्यानंतर त्यानं काँग्रेस पक्षाचं नाव त्यावेळी घेतलं. मग अपशब्द बोलून अंगावर आला त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला ढकललं."

"जर त्यांना आमच्या सहभागाबद्दल हरकत होती तर त्यांनी आम्हाला तसं कानात येऊन सांगायला पाहिजे होतं. आम्ही तिथून निघून गेलो असतो. ते माईक वर बोलायची किंवा पक्षाचं नाव घ्यायची गरज नव्हती," शिंदे पुढं म्हणाले.

"कोणताही राजकीय पक्ष हा समाजाचा घटक आहे त्यांच्यामध्ये एकी नसेल तर तुम्ही ठरावा, तुम्हाला जर कोणाला बोलवायचं असेल तर बोलवा नाहीतर आम्हाला आमची आंदोलनं खूप आहेत," शिंदे म्हणाले.

त्यांनी झालेल्या संपूर्ण प्रकाराबद्दल खेदही व्यक्त केला. शिवाय झालेल्या प्रकारानंतरही आंदोलनातील मागण्यांना काँग्रेस पक्षाचा पाठिंबा राहील, असं आश्वासनही त्यांनी दिलं. "जिथं पुणे शहराच्या विकासाचा विषय आहे, जिथं पर्यावरणाला धोका आहे. तिथं आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून नेहमी पाठीशी उभं राहू," शिंदे म्हणाले.

या संपूर्ण प्रकारावर आंदोलनकर्त्यांनी बोलण्यास नकार दिला. झालेला प्रकार आम्ही सोडून दिला असून आमच्यासाठी हे आंदोलन आणि आंदोलनात मांडल्या गेलेल्या मागण्या जास्त महत्वाच्या असल्याचं आंदोलनकर्ते म्हणाले.

 

पीएमसी घेराव आंदोलन

सुमारे १० हजार कोटी अर्थसंकल्प असलेल्या पुणे महानगरपालिकेला पुणेकरांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी पैसे नाहीत का, असा प्रश्न या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांकडून विचारण्यात आला. सध्या पुणेकरांना रस्त्यावरील खड्डे, टँकरनं होणारा पाणीपुरवठा, मोडलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि न वेचला जाणारा कचरा असे अनेक प्रश्न सतावत आहे. मात्र महानगरपालिका त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत असून नको ते प्रकल्प सुरु करून ठेकेदारांच्या घशात पैसे घालत आहे, असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे.

 

 

या आंदोलनाच्या आयोजकांपैकी एक असलेले अर्थतज्ज्ञ अमित सिंह म्हणाले, "सुमारे १० हजार कोटी अर्थसंकल्प असलेली पुणे महानगरपालिका दिवसाला ३० कोटी रुपये खर्च करते. तरीसुद्धा नागरिकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागत आहे. एवढा खर्च करत असताना सुद्धा रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे कळत नाही. अजूनही बऱ्याच भागात टँकरनं पाणीपुरवठा होतोय, पुण्यात सार्वजनिक वाहतूक नाही, कचरा उचलला जात नाहीये, अशा अनेक प्रश्नांनी आम्ही पुणेकर त्रस्त आहोत."

"एवढं असतानाही महानगरपालिका पाच हजार कोटी खर्च करून नदीसुधार प्रकल्प राबवत आहे. आम्हाला आमचे रस्ते नीट करून द्या, आमच्या मागण्या नीट समजावून घ्या याच आमच्या मागण्या आहेत," सिंह सांगतात.

पुणेकरांना सामोरे जावं लागणाऱ्या या प्रश्नाकडे महानगरपालिकेचं लक्ष वेधून घेण्यासाठी, त्यासाठी महानगरपालिकेकडून एक जबाबदार अधिकारी नेमण्यात यावा यासाठी, नदीसुधार प्रकल्प बंद करण्यात यावा आणि अशा इतर अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनाला सामान्य नागरिकांचा पाठिंबा मिळावा म्हणून काल आंदोलनाकर्त्यांकडून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर आज आंदोलन करून या मागण्यासंबंधीचं निवेदन महानगरपालिका आयुक्तांकडे देण्यात आलं.