India

पोलिसांना भीमा-कोरेगाव दंगलीचा अंदाज आधीपासूनच होता: प्रकाश आंबेडकर

आंबेडकर यांनी आज भीमा-कोरेगाव चौकशी आयोगासमोर त्यांची साक्ष नोंदवली.

Credit : इंडी जर्नल

 

पोलिसांना भीमा-कोरेगाव दंगलीचा अंदाज आधीपासूनच होता, मात्र योग्यवेळी पावलं उचलली नाही, असं मोठं विधान बुधवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात केलं. आंबेडकर यांनी आज भीमा-कोरेगाव प्रकरणी नेमलेल्या चौकशी आयोगासमोर त्यांची साक्ष नोंदवली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ही दंगल राजकीय अपयश आहे की प्राशासनिक अपयश, याची चौकशी होऊन जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर दंगलीच्या तत्कालीन मुख्यमंत्री भीमा-कोरेगावपासून ४० किमी अंतरावर असताना, त्यांच्यापर्यंत याबाबत माहिती का पोहोचली नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

१८१८ साली पेशवे आणि इंग्रजांमध्ये झालेल्या कोरेगाव भीमामधल्या लढाईला १ जानेवारी २०१८ रोजी २०० वर्षं पूर्ण होणार होती. त्यासाठी तिथल्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी तिथं जमले असताना तिथं जातीय दंगल पेटली. त्यानंतर ६ फेब्रुवारी २०१८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश जे एन पटेल यांच्या अध्यक्षतेत दोन सदस्यीय समितीची स्थापना केली. पटेलांशिवाय महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्य सचिव सुमित मलिक या समितीचे सदस्य होते. चार महिन्यात या समितीला त्यांचा अहवाल सादर करायचा होता, मात्र आता पाच वर्षं पूर्ण झालीअसूनही या समितीकडून अजूनही साक्षी नोंदवल्या जात आहेत.

प्रकाश आंबेडकर आज पुण्यात या आयोगासमोर त्यांची साक्ष नोंदवण्यासाठी उपस्थित होते. साधारणपणे अडीच ते तीन तास आंबेडकर आयोगासमोर त्यांची साक्ष नोंदवत होते.

"साक्ष नोंदवताना काही भाग इतिहासाचा घडला, तर काही साक्षीचा. तिथं पोलिसांनी त्यांची ऍफेडेव्हिट सादर केली. पण त्याच्यामधला सर्वात मोठा मिसिंग भाग म्हणजे तिथल्या ग्रामपंचायतीनं जे ठराव दिले होते ते त्यात नव्हते," आयोगासमोर झालेल्या चर्चेची माहिती देताना आंबेडकर म्हणाले.

शिवाय ही घडवण्यात आलेली दंगल आहे, असा आरोप त्यांनी केला.

"दंगलीआधी म्हणजे २८, २९ आणि ३० तारखेला भीमा कोरेगावच्या २० किमीच्या भागात ज्यांना ज्यांना सांगलीतून फोन आले आहेत, त्यांचा तपास झाला पाहिजे. शिवाय सांगलीतून त्यादिवशी पुण्यात कोण कोण लोकं आली, त्यांनी भीमा कोरेगावला भेट दिली की नाही, त्याची चौकशी झाली पाहिजे. व्हाट्सअपवरचे चॅट्स, एकमेकांबद्दल पसरवलेली माहिती, ही सगळी कागदपत्रं आयोगासमोर सादर करण्यात आली आहे. या सादर केलेल्या कागदांवरून मी आयोगाला विनंती केली आहे की विशेषतः कोल्हापूर भागाच्या गुप्तहेर विभागाकडे दोन दिवस आधी काय माहिती आली होती याबद्दल विचारणा करावी," आंबेडकर म्हणाले.

 

 

याशिवाय "पुण्याचे एसपी त्यादिवशी कुठे होते, त्यांची भूमिका काय होती, हे तपासावं. माझ्या माहितीप्रमाणे जी पोलिसांची छोटी मोठी दलं आहेत, ज्यातून माहिती गोळा केली जाते, त्यांनी हे सुगावे दिले होते. ते  कोणीतरी थांबवले, वर जाऊ दिले नाहीत. गृह सचिव, त्याच्याबरोबर असणारा मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री यांच्यापर्यंत किती वाजता याबद्दल माहिती गेली, हे तपासणं महत्त्वाचं आहे," अशी मागणी त्यांनी केल्याचं सांगितलं.

फडणवीस १ जानेवारीला भीमा-कोरेगाव पासून ४० किलोमीटरवर असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात होते. सकाळी साडे अकाराच्या दरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरनं तिथून उड्डाण घेतलं, अशी नोंद आहे.

"दंगल सकाळी झाली, त्यांना जर कळलं असतं, तर त्यांनी कदाचित पुण्याला येऊन या घटनेचा आढावा घेतला असता. परंतु त्यांना माहिती मिळाली नाही, अशी माझी स्वतःची माहिती आहे. त्यामुळं हे राजकीय अपयश आहे की प्राशासनिक अपयश आहे, याचा तपास आयोगानं केला पाहिजे. ज्यांनी कोणी ही माहिती दाबून ठेवली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणूनदेखील जबाबदारी निश्चित करावी," अशीही मागणी आंबेडकर यांनी आयोगासमोर केली.

सध्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक मुंबईत पार पडत आहे. त्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण नाही. मात्र त्यांचा मित्रपक्ष असलेला शिवसेना (उबाठा) या बैठकीला जाणार आहे.

याबद्दल आंबेडकरांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, "आम्ही शिवसेनेबरोबर अजून आहोत. आता आम्हाला निमंत्रण का दिलं नाही, याचं उत्तर काँगेस देऊ शकेल. मागच्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेसला ऑफर केली होती, याही वेळी त्यांना ऑफर दिली आहे. परंतु कांग्रेसचं निमंत्रण देत नसल्यामुळं आम्ही त्या आघाडीमध्ये नाही, अशी परिस्थिती आहे."

याबद्दल शिवसेना (उबाठा) अध्यक्ष उद्धव ठाकरेंशी काही चर्चा झाली का असा प्रश्न विचारला असता आंबेडकर म्हणाले, "आमचे वकील उद्धव ठाकरे आहेत, त्यांनी आता इंडियामध्ये मांडावं. अशा बैठकीत शिवसेना आमच्या बाजून बॅटिंग करेल, असं आम्ही गृहीत धरतो."

"आम्ही भाजप विरोधी लढ्यात भाग घेण्यास तयार आहोत, पण आम्हाला कोणी बोलवत नाही," अशी खंतदेखील आंबेडकरांनी यावेळी व्यक्त केली.