India

पुणे महानगरपालिकेत कामगाराचा आत्महत्येचा प्रयत्न

मुकादमाच्या जाचाला कंटाळून कामगाराचा उद्रेक!

Credit : इंडी जर्नल

 

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य कोठीत कचरा वेचण्याचं काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं गुरुवारी सकाळी मुकादमाच्या जाचाला कंटाळून कामावर असताना फिनाइल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विष्णू कसबे असं सदर कर्मचाऱ्याचं नाव आहे. काही कचरा वेचणारे कर्मचारी कामावर येत नसल्यानं इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत होता आणि कोठीवर असलेले मुकादम पक्षपातीपणा करत असल्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असं त्यांचं म्हणण आहे. त्याबरोबरच अनेक आरोप कसबे यांनी केले आहेत. तर ही घरगुती तणावातून घडलेली घटना असुन याची सखोल चौकशी केली जात असल्याची माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यानं दिली.

विष्णू कसबे पुण्यातील हिंगणे क्षेत्रातील आरोग्य कोठीत गेल्या दहा वर्षांपासुन काम करतात. "काही दिवसांपूर्वी माझ्या मोठ्या भावाचा अपघात झाला, तो रुग्णालयात दाखल आहे. माझी आईदेखील आजारीअसते. त्यामुळे माझ्यावरच्या जबाबदाऱ्या बऱ्याच वाढल्या आहेत. मात्र मुकादम हे काहीही ऐकून न घेता पक्षपातीपणा करून माझ्यावर अतिरिक्त कामाचा भार टाकतात," कसबे म्हणाले.

सकाळच्या घटनेनंतर कसबे यांना ताबडतोब उपचारासाठी पूना रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

रुग्णालयातूनच बोलताना कसबे पुढं म्हणाले की त्यांची स्वतःची तब्येत ठीक नसल्यानं त्यांना गाडी चालवणं शक्य होत नाही, तरीही जबाबदारीचं भान जपत ते त्यांच्या मुलाला गाडी चालवण्यासाठी कामावर घेऊन येतात. "मुकादम मला मुलासह कामावर येऊ देत नाही," ते पुढं म्हणाले.

कसबे यांनी महेश लोंढे, गणेश कांबळे आणि चंदन सोनावणे या तीन मुकादमांवर मानसिक छळ करण्याचा आरोप केला. इंडी जर्नलनं आरोपींना याबाबतीत संपर्क साधला असता त्यांच्यापैकी एकानं सदर आरोपांवर काहीही बोलणं टाळलं. तर एका आरोपीनं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं, की कसबे त्यांच्या जागी काही दिवसांसाठी त्यांच्या मुलाला काम देण्याची मागणी करत होते, आणि ते शक्य नसल्यानं आम्ही त्यांना नकार दिला होता. हा आत्महत्येच्या प्रयत्नाचा कट पुर्वनियोजित असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

पुणे महानगरपालिकेचे प्रभारी महापालिका आयुक्त प्रदिप आव्हाड याबाबतीत बोलताना म्हणाले, "घरात सुरु असलेल्या तणावामुळे आणि कोठीतील मुकादमासोबत झालेल्या गैरसमजामुळे कसबेंनी टोकाचं पाऊल उचललं. मात्र आरोप झालेल्या मुकादमांची दुसऱ्या कोठीवर बदली करण्यात आली आहे." त्याचबरोबर कसबे सध्या धोक्यातून बाहेर आहेत आणि चिंतेचं काहीही कारण नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

पुण्यात कचरा उचलण्यासाठी महानगरपालिकेकडे कायमस्वरुपी आणि कंत्राटी स्वरुपाचे असे दोन प्रकारचे कामगार आहेत.

 

यासंदर्भात सिंहगड पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली. सिंहगड पोलिस स्थानकाचे अभय महाजन यांनी या माहितीला दुजोरा दिला.

महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्ट्या सर्वात मोठी महानगरपालिका असा मान मिळवलेल्या पुणे महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात घनकचरा निर्माण होतो. हा कचरा उचलण्यासाठी महानगरपालिकेकडे कायमस्वरुपी आणि कंत्राटी स्वरुपाचे असे दोन प्रकारचे कामगार आहेत. पुणे शहरात रस्त्यावर पडलेला कचरा उचलणं, सहकारी गृहनिर्माण संस्थामधील कचरा गोळा करणं, विभागणी करणं, तो गाड्यांमध्ये भरणं आणि कचरा डेपोत तो टाकणं, अशी काही कामं हे कर्मचारी करत असतात.

कसबे यांनी पुढं दिलेल्या माहितीनुसार कोठडीवर जवळपास ८० कर्मचारी कामाला आहेत. त्यातील फक्त २० ते २५ कर्मचारी कामाला येतात. इतर कर्मचारी केवळ दाखवण्यापुरते असुन ते कामावर येत नसतानाही त्यांची खोटी हजेरी लावली जाते आणि त्यांना महिन्याच्या महिन्याला पगार दिला जातो, असंही ते म्हणाले. त्याबदल्यात मुकादमाला पगारातील हिस्सा दिला जातो, असा आरोप त्यांनी केला. आरोपींपैकी एकानं हे आरोप फेटाळले आहेत.

"या आरोपांबद्दल सखोल तपास सुरु आहे. याची पुर्ण चौकशी केली जाईल," आव्हाड यांनी आश्वासन दिलं.

पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे राम अडागळे यांनी घडलेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. "सकाळी घरातून जेव्हा कर्मचारी कामावर बाहेर पडतो, तेव्हा त्याच्यावर बरेच ताण असतात. शारीरिक ताण असतो, मानसिक असतो, कौटूंबिक असतो आणि कामामध्ये ही अडचणी येत असतात. त्यानुसार आज जो प्रकार या ठिकाणी घडला आहे. तो प्रकार कशासाठी घडला, कशामुळे घडला आणि कोणामुळे घडला याची माहिती घेऊन जो दोषी आहे, त्याच्यावर युनियन म्हणून आम्ही त्याच्यावर कारवाई करू," अडागळे म्हणाले.

कसबेंच्या मुलानं हे आरोपी नियुक्त मुकादम नसतानाही मुकादमगिरी करत असल्याचा आरोप केला. "या मुकादमांनी माझ्या वडीलांकडून लाचेची मागणीदेखील केली आहे. कोठीवर मुकादम नसल्यानं ते तात्पुरत्या काळासाठी ही जबाबदारी सांभाळत आहेत," तो म्हणाला.