Europe

४० वर्षात पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांचा ग्रीस दौरा

तुर्कीये आणि पाकिस्तानमध्ये वाढलेली जवळीक भारत-ग्रीस संबंधांमागचं निमित्त.

Credit : इंडी जर्नल

 

सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी ग्रीसच्या पंतप्रधानांच्या आमंत्रणावर ग्रीसचा दौरा करणार आहेत. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९८३ साली केलेल्या ग्रीसच्या दौऱ्याच्या सुमारे चाळीस वर्षांनंतर ग्रीसला जाणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान ठरतील. भारत आणि ग्रीसमध्ये होणार व्यापार विशेष मोठा नाही. मात्र गेल्या काही वर्षात भारताचे ग्रीसशी संबंध वाढत आहेत आणि त्यामागं कारण म्हणजे तुर्कीये आणि पाकिस्तान यांच्यात वाढलेली जवळीक.

तसे भारताचे ग्रीसशी असलेले संबंध अतिशय जुने आहेत. प्राचीन काळापासून भारताच्या आणि ग्रीसच्या नागरी संस्कृतींमध्ये व्यापार होत होता. प्राचीन काळात ग्रीक लोक प्राचीन भारतीयांना 'इंडोई' (People of the Indus River) म्हणून संबोधत होते. तर भारतीय ग्रीक लोकांचा उल्लेख 'योनास' (यवन) म्हणून करत होते. मात्र त्यानंतर ग्रीक संस्कृतीला उतरती कळा लागल्यानं भारताचे आणि ग्रीसचे संबंध दुरावत गेले. ग्रीसनं भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. मात्र या नात्यांनी विशेष जोर धरला नाही.

राजनैतिक संबंधांना सुमारे ७० वर्षांहून अधिक काळ झाला असतानाही भारताच्या पंतप्रधानांनी फक्त एकदा ग्रीसला भेट दिली आहे. तर ग्रीसचे पंतप्रधान फक्त एकदा भारत दौऱ्यावर आले आहेत. भारत आणि ग्रीस मध्ये होणारा एकूण वार्षिक व्यापार फक्त ६१५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (५०.८ हजार कोटी रुपये) एवढा आहे. भारतावर व्यापारिक निर्बंध लादून चार वर्ष झालेल्या पाकिस्तानचाही भारताशी आता होणारा व्यापारदेखील याच्या दुप्पट आहे.

शिवाय २००९ मध्ये आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रीसची अर्थव्यवस्था अजूनही चांगल्या स्थितीत नाही. ग्रीक अर्थव्यवस्थेला आजपर्यंतच्या कुठल्याही प्रगत मिश्र अर्थव्यवस्थेच्या तुलनेत प्रदीर्घ मंदीचा सामना करावा लागला होता. २००८ साली मंदीत सापडलेल्या ग्रीसच्या अर्थव्यवस्थेनं २०२१ मध्ये पहिल्यांदा चांगली सकारात्मक वाढ दाखवली. तरीही गेल्या पाच सहा वर्षांत भारताचे ग्रीसशी संबंध वाढले आहेत.

भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जून २०१८ मध्ये ग्रीसला भेट दिली होती. सप्टेंबर २०१९मध्ये भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री हरदीप सिंह पुरी ग्रीसला गेले होते. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी २०२१ मध्ये ग्रीसला भेट दिली होती. २०२३ मध्ये भारतीय नौदल आणि वायू दलानं ग्रीसच्या सैन्यासोबत युद्ध सराव केले आहे. भारतीय वायुदलानं एप्रिल महिन्यात चार लढाऊ विमानांसोबत ग्रीसच्या वायुदलानं आयोजित केलेल्या दहा दिवसीय एक बहु-राष्ट्रीय हवाई सरावात भाग घेतला होता. ग्रीसबरोबर युद्ध सराव करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

 

 

शिवाय ग्रीसच्या वायुदलाचे प्रमुख नुकतेच भारतात येऊन गेले. तसंच ग्रीसकडूनदेखील भारताला काश्मीर आणि इतर सामरिक विषयांवर पाठिंबा दिला जात आहे.

भारत आणि ग्रीसमध्ये आर्थिक संबंध तितके दृढ नसले तरी भारत आणि ग्रीसचे लष्करी आणि सामरिक संबंध वेगानं वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यामागचं कारण म्हणजे पाकिस्तान आणि तुर्कीयेमध्ये वाढलेले राजकीय संबंध. रेसिप तय्यीप एर्दोगान तुर्कीयेचे राष्ट्रपती झाल्यापासून तुर्कीयेला इस्लामिक देशांचा नेता म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं त्यांच्याकडून पाकिस्तानला काश्मीर मुद्द्यावर सातत्यानं पाठिंबा दिला जात आहे. शिवाय पाकिस्तानचं सैन्यबळ वाढवण्यासाठी तुर्कीयेकडून पाकिस्तानला विविध हत्यारं दिली जात आहेत.

पाकिस्तानच्या नौदलात तुर्कीयेकडून विकत घेण्यात आलेली चार ३,००० हजार टनी युद्धनौकांपैकी दोन युद्धनौका सेवेत दाखल करण्यात आल्या आहेत, तर इतर दोन पाकिस्तानमध्ये बनत आहेत. पाकिस्ताननं तुर्कीयेकडून मानवविरहित विमानंदेखील विकत घेतली आहेत. पाकिस्तानच्या वायुसेनेचे एफ १६ लढाऊ विमानं अमेरिकेनं अपग्रेड करण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तान आता ते तुर्कीयेकडून करून घेणार असल्याची चर्चा सुरु आहे.

पाकिस्ताननं यापूर्वी तुर्कीयेकडून लढाऊ हेलिकॉप्टर घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्या लढाऊ हेलिकॉप्टरमध्ये अमेरिकेचं इंजिन वापरण्यात येत होतं जे पाकिस्तानला पुरवण्यास अमेरिकेनं नकार दिला. तुर्कीयेमध्ये विकसित होत असलेल्या पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानाच्या निर्मितीत सहभागी करून घेण्याची मागणी पाकिस्तानकडून केली जात आहे. म्हणजेच पाकिस्तानचे तुर्कीयेशी असलेले संबंध अजून वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

त्याचवेळी तुर्कीये आणि ग्रीसचे संबंध खराब होत आहेत. भूमध्य समुद्रात असलेल्या सायप्रस बेटावरून दोन्ही देशांमध्ये वाद आहे. १९७४ साली ग्रीक सरकारच्या पाठिंब्यानं सायप्रस बेटावर लष्करी उठाव झाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून तुर्कीयेनं सायप्रस बेटावर लष्करी कारवाई केली. सायप्रसच्या बेटावर ग्रीक आणि तुर्किश अशा दोन वंशाचे लोक वास्तव्यास आहेत. यात बहुसंख्यांक नागरिक ग्रीक ख्रिश्चन आहेत तर २० टक्के नागरिक तुर्किश मुस्लिम्स आहेत. शिवाय हे बेट तुर्कीयेच्या सीमेपासून अत्यंत जवळ आहे. त्यामुळं या बेटावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही देशांकडून केला जातो.

 

 

शिवाय या दोन्ही देशांमध्ये सागरी सीमेबाबत वाद आहेत. भूमध्य सागरात दोन्ही देशांच्या विशेष आर्थिक क्षेत्राची सीमा नक्की कुठे संपते, या वादामुळं दोन्ही देशात बऱ्याच वेळा युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. भूमध्य सागरात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायूचा साठा आहे आणि तो मिळवण्यासाठी दोन्ही देशांकडून धडपड केली जात आहे. त्यामुळं तुर्कीयेनं पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यानंतर आता भारताकडून तुर्कीयेच्या शत्रूराष्ट्राला मदत केली जात आहे. पंतप्रधानांचा हा दौरा त्या योजनेचा एक भाग आहे.

तुर्कीयेबरोबरच अझरबैजानकडूनही पाकिस्तानला पाठिंबा दिला जात आहे. त्याला प्रत्त्युत्तर म्हणून भारतानं अर्मेनियाला शस्त्रसाठा पुरवायला सुरुवात केली आहे. अर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये नागोर्नो-काराबाख भागाबद्दल वाद आहे. २०२० मध्ये या दोन्ही देशांमध्ये त्या प्रदेशासाठी युद्ध देखील झालं होतं. त्यात अर्मेनियाचा जवळजवळ पराभव झाल्यात जमा होता, मात्र रशियानं हस्तांतरण करत ते युद्ध थांबवलं. त्यानंतर अर्मेनियानं भारताकडून आतापर्यंत स्वाती रडार, पिनाका रॉकेट्स, अँटी टँक क्षेपणास्त्र आणि इतर प्रकारचा दारुगोळा विकत घेतले आहेत. शिवाय आता अर्मेनिया भारताकडून ४० किलोमीटरहून अधिक लांब मारा करणाऱ्या एटीएजीएस तोफा आणि जमिनीतून हवेत मारा करणारं आकाश क्षेपणास्त्र विकत घेणार असल्याची चर्चा आहे.

त्यातून तुर्कीये, पाकिस्तान आणि अझरबैजान या त्रिकूटाविरोधात भारत, ग्रीस आणि अर्मेनियाचं त्रिकुट उभं राहत असल्याचं दिसून येतं. मोदींच्या एकदिवसीय दौऱ्यानंतर याविषयावर प्रगती होते की नाही, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.