India

पिंपरी चिंचवड: अनाधिकृत कंपनीत लागलेल्या आगीत ६ कामगारांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आवारात चालणाऱ्या कंपन्यांच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.

Credit : इंडी जर्नल

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या तळवडे औद्योगिक क्षेत्रात एका कंपनीत लागलेल्या आगीत किमान ६ महिला कामगारांचा मृत्यू झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राणे फॅब्रिकेटर नावाच्या कंपनीच्या आवारात त्यांनी अवैधरित्या ठेवलेली पोटभाडेकरू कंपनी वाढदिवसाच्या केकवर लावल्या जाणाऱ्या स्पार्किंग मेणबत्तीची निर्मिती करत होती. कंपनीकडे यासाठी कोणताही परवाना नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आवारात चालणाऱ्या कंपन्यांच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात बऱ्याच सूक्ष्म, लघू आणि मध्यम स्वरूपाच्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं तयार करतात. त्यासाठी महानगरपालिका हद्दीत अनेक ठिकाणी सहकारी संस्था आणि खासगी जागांवर भाड्यानं कंपन्या चालवल्या जातात. त्यातील तळवडे क्षेत्रात एका ठिकाणी राणे फॅब्रिकेटर नावाच्या कंपनीनं भाड्यानं घेतलेल्या जागेत स्वतःचा खर्च कमी करण्यासाठी दुसऱ्या एका कंपनीला पोटभाडेकरू म्हणून ठेवलं होतं.

"या कंपनीत शटर बंद करून १६ महिला काम करत होत्या, असं कंपनीचा मालक म्हणतोय. पण तो पळून गेलाय. त्याच नाव काही कळलेलं नाही. त्यात ६ जणींचा मृत्यू झाला आहे, असं कळतं. पण एखाद्यावेळेस हा आकडा वाढू शकतो," श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर सोमवंशी सांगतात. त्यांनी ही कंपनी अनाधिकृत असल्याची माहितीदेखील दिली. राणे फॅब्रिकेटर कंपनीनं मात्र या सर्वांतून हात झटकले असून त्या दुसऱ्या कंपनीकडे सर्व परवाने उपलब्ध होते, असा दावा त्यांनी केला असल्याचं सोमवंशी सांगतात.

महानगरपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी ७ अग्निशमन वाहने दाखल झाली. जखमींना पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात प्राथमिक उपचार दाखल करण्यात आलं होतं. त्यातील ६ जणींना मृत घोषित करण्यात आलं. जखमींपैकी दोघींना ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवडच्या अग्निशमन विभागाचे उपआयुक्त मनोज लोणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीत लागलेल्या आगीत कंपनीचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याबाबत चौकशी करण्यासाठी वेळ लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. देहूरोड पोलिस स्थानकात याविषयी संपर्क साधला असता तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की अजून या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. पोलिस अजूनही घटनास्थळी असून तपासणी करत आहे.